झिमझिमणारा पाऊस, डोंगरउतारावरून खळखळणारे झरे, झावळ्यांवरून ओघळणारे पाणी आणि चहूकडे हिरवीगर्द झाडी..पावसाळ्यातील हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटक चिखलदऱ्याला धाव घेतात. पाऊस अंगावर घेण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याची उधळण टिपण्यासाठी होणारी गर्दी चिखलदऱ्याची महती सांगून जात असते.
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे विदर्भाचे नंदनवन म्हणूनही प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून ३६६६ फूट उंचावर असलेल्या या स्थळाची निवड इंग्रजांनी उन्हाळ्यातील विश्रांतीचे ठिकाण म्हणून केली. सुमारे हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेला गावीलगड किल्ला या ठिकाणचे महत्वही अधोरेखित करतो. इतिहासकारांच्या मते, या नयनरम्य स्थळाचा शोध १८२३ मध्ये कॅप्टन रॉबिन्सन याने लावला, पण सुमारे सात हजार वर्षांपूर्वी चिखलदरा हे गाव राजा विराटाची समृद्ध नगरी होती, असे मानले जाते. महाभारतकालाशी नाते जोडणाऱ्या चिखलदऱ्याजवळ भीमकुंड आहे. भीमाने किचकाचा वध केल्यानंतर याच कुंडात हात स्वच्छ केले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे किचकदरा म्हणून हा भाग ओळखला जाऊ लागला. नंतर त्याचे नाव चिखलदरा झाले, असे सांगितले जाते. भीमकुंड हे स्थळ गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. समोर तीन हजार ५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताच्या दरीच्या सुरुवातीला भीमकुंड धबधबा आहे. देवी पॉईंटही जवळच आहे. शक्कर तलावाच्या बाजूला असलेल्या या जागी काही पायऱ्या उतरून जावे लागते. एका भुयारात देवीचे मंदिर आहे. तिच्या डाव्या बाजूला चंद्रभागेचा उगम आहे. नदीचे पाणी मंदिरासमोरील छोटय़ा कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते. देवी पॉईंटहून जवळच मोझरी पॉईंट आहे. येथून गावीलगड किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग दिसतो. येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नवीन टुमदार विश्रामगृह उभारले आहे. बाजूला हरिकेन पॉईंट आहे.
नर्सरी गार्डनहून सेमाडोहच्या रस्त्याने समोर गेल्यावर काही अंतरावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता लागतो. हा रस्ता पंचबोल पॉइंटपर्यंत जातो. येथून समोर चार डोंगरांनी वेढलेली दरी दिसते. येथे मोठय़ाने आवाज केल्यास पाच प्रतिध्वनी ऐकू येतात. वैराट पॉइंटही प्रसिद्धच. चिखलदऱ्यापासून ११ किलोमीटर अंतरावर वैराट देवीचे मंदिर आहे. ते खोल दरीच्या एका उभ्या फडातील भुयारात आहे, असे सांगितले जाते. येथे सर्वसामान्यांना पोहोचणे अशक्य असल्याने हे नवीन मंदिर बांधण्यात आले. इंग्रज अधिकारी मिडोज टेलर याने येथे अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी आमराई आणि बगिचा तयार केला. सध्या फॉरेस्ट गार्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बगिच्याचे व्यवस्थापन वन विभागाकडून केले जाते. या बागेत विविध जातींच्या फुलाफळांची झाडे आहेत. या ठिकाणी कॉफी आणि चहाची लागवड केली जात होती. कालांतराने चहाची लागवड बंद झाली. कॉफीची झुडुपे मात्र अनेक ठिकाणी दिसतात. इंग्रजकालीन इमारतीही अस्तित्व टिकवून आहेत. अप्पर आणि लोअर प्लॅटो, अशा दोन भागात विभागलेल्या या शहराची निसर्गसंपन्नता पर्यटनदृष्टय़ा महत्वाची ठरते. पावसाळ्यात तर त्याचे सौंदर्य अधिकच बहरून येते. शिवसागर, वैराटदेवी किंवा सनसेट पॉइंट, देवी पॉइंट, वनउद्यान, वीर तलाव, शक्कर तलाव, मोझरी पॉइंट, भीमकुंड, हरीकेन पॉइंट, पंचबोल पॉइंट, मंकी पॉइंट, लाँग पॉइंट, रवी पॉइंट, प्रॉम्पेक्ट पॉइंट, बॅलन्टाइन, अशी चिखलदरातील प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे.
गावीलगड किल्ला अनेक वष्रे वऱ्हाडची राजधानी होता. बहामनी, इमादशाही, निजामशाही, मोगल आणि मराठे यांची सत्ता या किल्ल्याने अनुभवली. स्थापत्यकलेच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व वेगळेच. भव्य, सुंदर दरवाजे, मजबूत इमारती, तलाव, तोफांची ओळ, प्रार्थनास्थळे हे किल्ल्याचे वैभव आहे. किल्ल्यातील अनेक वास्तू सुस्थितीत आहेत. पुरातत्व विभागाने या किल्ल्याची डागडुजी सुरू केली आहे. चिखलदऱ्याच्या वाटेवर लागणारे ओहोळ, दूरवरून दिसणारे धबधबे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेत एकदा चिखलदऱ्याला पोहोचलं की, पर्यटकांचा तेथून पाय निघत नाही.
मोहन अटाळकर
response.lokprabha@expressindia.com