टगू माकड तसं फार मस्तीखोर, पण तितकंच हुशार! प्राण्यांच्या शाळेत त्याचा दुसरा-तिसरा नंबर असायचाच. पहिला नंबर मात्र पिगीचा.. रानडुकराच्या पिल्लाचा यायचा. पिगी अगदी सरळमार्गी  होता. पूर्ण शाकाहारी! अभ्यासू असूनही तगडा! टगूचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कळेना की काय करावं? मधमाश्या, भुंगे, सुबक घरटं बांधणारे सुगरण नर, घुबड, बागेतला शिंपी पक्षी, जगप्रवास करून आलेले करकोचे, ससा, विषारी साप सगळेच आपापल्या कामात गुंग होते. टगूला अगदी उदास आणि एकटं एकटं वाटू लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्तीप्पाने व्यायामशाळा सुरू केली होती. तिथंही टगू सकाळी जायचा, पण एक तासापेक्षा हत्तीप्पा जास्त थांबायला द्यायचा नाही. कारण व्यायामासाठी प्राण्यांची गर्दी व्हायची आणि मग मारामाऱ्या व्हायच्या. अख्खा रिकामा दिवस टगूला खायला उठायचा. त्याने काही दिवस अस्वलकाकांच्या दुकानात मध विकण्याचं काम केलं, पण अस्वल त्याला नीट वागवत नव्हतं. तू स्वत: चोरून मध खातोस, तुझा पगार मी कापणार, असं म्हणू लागलं. त्यामुळे ते काम थांबलं!

पावसाळ्याचे दिवस होते. एक कोल्हा आजारी होता. पावसात भिजल्यामुळे ताप आला असणार. हवा खराब! तो टगूला म्हणाला ‘‘माझा निरोप मी अळूच्या पानावर लिहून  देतो. जरा माझ्या भावाकडे ते पत्र पोचव. नाही तरी तू इकडेतिकडे फिरतच असतोस.’’ शेवटचं वाक्य कोल्होबा बोलला नसता तरी चाललं असतं, पण प्रत्येकाचा शेवटी स्वभाव असतो. टगूने राग न धरता कोल्ह्य़ाचा निरोप म्हणजे ते पत्र त्याच्या भावापर्यंत नीट, वेळेवर नेऊन दिलं. दुसऱ्याच दिवशी ते खासगी पत्र भावाला मिळालं. तो तातडीने आपल्या आजारी भावाला बघायला, आपल्या गुहेत न्यायला आला. उगाच तापबिप वाढला मग? काळजी नको घ्यायला! भाऊ आहे तो शेवटी!

‘पत्र’ देऊन येताना टगूला अचानक कल्पना सुचली! आकाशात त्याच वेळी वीज चमकली! ‘प्रकाश’ पडला. टगूला नवं काही सुचलं. तो म्हणाला, हे निरोप देण्याचं, पत्र वेळेवर पोहोचवण्याचं काम आपण केलं तर?  मग त्याने तेच काम सुरू केलं! फळांच्या रूपात त्याला मोबदला मिळू लागला. त्याचं पोट आपोआप भरू लागलं. काम इतकं वाढू लागलं की, टगूने त्याच्या हाताखाली दोन कबुतरं ठेवली! ती चोचीतून पत्रं म्हणजे संदेश लिहिलेली झाडाची पानं घेऊन जायची. त्यांचंही दाणापाणी त्या संदेश सेवेमुळे सुटू लागलं.

एकदा स्वत:चं वृत्तपत्र चालवणारा गरुड ‘कुरियर’ करायला तिथे आला. तो टगूला म्हणाला, ‘‘चांगला चाललाय तुझा व्यवसाय. हे माझं पत्र मोरवाडीत मयूर साहेबांकडे द्यायचंय. जातं ना मोरवाडीपर्यंत? कारण तसं बरंच अंतर आहे.’’ कबुतर लगेच म्हणालं, जंगलराज्यात सगळीकडे आमची सेवा आहे. आता दाभोळची खाडी ओलांडून अगदी गुहागपर्यंत मी जातो. गरुडराज, तुम्ही काळजीच करू नका! उद्या दुपारीच तुमचा निरोप मयूरजींपर्यंत जाईल!

गरुड म्हणाला, ‘‘टगूशेठ, तुम्ही हे संदेशवहनाचं काम करा, पण आमच्या वृत्तपत्राला तुमच्या या परिसरात बातमीदार नाहीये. तिकडेही बघा की जरा! एक-दोन बातम्या दररोज पाठवणं तुम्हाला काय अवघड आहे!’’..मुलांनो बघा, यशस्वी झाल्यावर स्वत:चा उद्योगधंदा नीट केल्यावर कशी आणखी कामं चालून येतात! एक विश्वास असतो ना!

मग टगूला तेही काम मिळालं. गरुडाने त्याला ‘ओळखपत्र’ दिलं. टगूने तयार केलेलं ‘टपाल’ कबुतर लगेच गरुडापर्यंत न्यायचं. त्या बातम्यांमुळे टगूची वट वाढली! भूकंप झाला तेव्हा प्राण्यांना सावध करणारी बातमी गरुडाच्या वर्तमानपत्रात टगूने आधीच छापली. माणसं बेसावध होती, पण प्राणी ‘त्या’ रात्री मैदानात, मोकळ्या जागेत येऊन थांबले होते. सगळे प्राणी वार्ताहर टगूचे आभार मानत होते. प्राणी झोपून राहिले असते, तर भूकंपात सापडले असते. माणसांचं मात्र नुकसान झालं! भूकंपाची बातमी आधीच लावून प्राण्यांचे प्राण वाचवल्याबद्दल टगूचा प्राण्यांनी सत्कार केला. त्याला उत्तर देताना टगू म्हणाला, ‘‘बातमीदाराचे मित्रही महत्त्वाचे असतात. माझ्या बातमीचं श्रेय मी कासवभाऊला देतो. त्याला तळ्याच्या तळाशी कळलं होतं की, भूकंप होणार आहे. त्याने मला येऊन विश्वासाने सांगितलं मी फक्त प्रसिद्धी दिली!’’

टगूची ही नम्रता व प्रामाणिकपणा संपादक गरुडालाही आवडला. सगळं श्रेय त्याने स्वत: लाटलं नाही. कासवाने काही त्याला जाब विचारला नसता. गरीब होतं ते. त्यालाही गरुडाने आता पुरवणीचा उपसंपादक केलंय!

गरुडाने टगूला आता वृत्तपत्राच्या व्यवसायात ‘भागीदार’ करून घेतलंय. तो आता नुसता पत्रकार राहिलेला नाही. त्याचा मालकी हिस्सा आहे!

टगूच्या आईला वाटायचं, हा मस्तीखोर टगू पुढे काय करेल! आता तिने फक्त झाडावरच टगूला एक छान घर तयार करायला सांगितलंय. टगूने त्याच्या त्या संदेशवहन सेवेचं नाव ‘टारझन ब्युरो’ असं ठेवलंय. लई भारी आहे ना टगू?

बिचारा काळा बगळा

एक बगळा ‘काळासावळा’ होता. तुम्ही म्हणाल, असं कसं काका? तसंच असतं..खरंच! काळा बगळा असू शकतो. नव्हे असतोच. सगळीकडे आणि नेहमी असत नाही. पण संध्याकाळी अंधार पडता पडता आमच्या कोकणातल्या हिडिंबा नदीच्या काठी तो दिसतो बाबा!

तर त्या काळ्या बगळ्याला पांढरेधोप बगळे त्यांच्याबरोबर घ्यायचेच नाहीत. ते म्हणायचे, ‘ए, तू आमच्यासारखा नाहीस. आमच्याबरोबर कोठं यायचं नाही. रात ढोकरी जात ना तुझी? आम्ही धवल जातीचे शुभ्र बगळे आहोत. उगाच तुझ्या नादी लागून आमचा रंग काळा व्हायचा. जा आधी तू इथून! नाहीतर चोच मारून जखमी करू तुला. बिचारा काळा बगळा दु:खी व्हायचा, पण करणार काय? रंग कसा बदलणार? परी येते आणि जादूची कांडी फिरवून रंग बदलते असल्या गोष्टींवर त्या धडधाकट पक्ष्याचा विश्वास नव्हता.  परी असतेच कुठे खरी?.. उगाच!

ज्या बगळ्याला बाकीचे बगळेच नेहमी वगळतात. त्याला इतर पक्षी तरी कसे विचारतील? अगदी एकटा पडायचा तो ‘रात्रबगळा’! खरं तर पांढऱ्या बगळ्यांपेक्षा तो जास्त चांगली मासेमारी करायचा. अंधारात मासे हेरणं सोपं नाही. है ना? तरी पण त्याला ते छान जमायचं. रंगरूप काही फार महत्त्वाचं नसतं. पण गोऱ्या बगळ्यांना हे कोण समजावणार? ते फारच गर्विष्ठ होते. काळ्या बगळ्याला तुच्छतेने वागवायचे. बगळा बगळीचं लग्न असो किंवा बगळ्याच्या पिल्लाचा वाढदिवस असो. काळ्या बगळ्याला बोलवायचे नाहीत. फक्त एकदा त्याला एक पांढरी बगळी म्हणाली, ‘मासे उरलेत आमच्याकडे पाहिजेत तर घेऊन जा.’ काळा बगळा म्हणाला, ‘मी कशाला उरलेले मासे घेऊ? माझे मी कष्ट करतो. माझी काही चोच मोडलेली नाही!’ बगळी लगेच म्हणाली, ‘अरे वा! फार बोलायला लागलास तू! पाण्यात रंग बघ जरा स्वत:चा’. शेवटी सगळे बगळ्याच्या रंगावर जायचे!

एके दिवशी मात्र वेगळीच मजा झाली. काळा बगळा खिन्न होऊन उदास बसला होता. एकटेपणाचा त्याला कंटाळा आला होता आणि इतक्यात एक पांढरा पक्षी त्याला उडत येताना दिसला. तो चक्क ‘पांढरा कावळा’ होता. होय रंगद्रव्य हरवलेला पांढरा कावळासुद्धा असतो बरं का! साधे, नेहमीचे कावळे काव काव करत त्याचा पाठलाग करत होते. काळ्या बगळ्याने त्या पांढऱ्या कावळ्याला चटकन आपल्या घरटय़ात घेतलं. दोघांचे रंग वेगवेगळे असले, तरी ‘वेगळेपण’ हे साम्य होतेच की! आपला जीव वाचवणाऱ्या काळ्या बगळ्याबद्दल त्या पांढऱ्या कावळ्याला आपलेपणा वाटू लागला. वेगळेपण कुणी मागून घेत नाही. निसर्ग ते देतो. मग अशा प्राण्याला छळणं, घायाळ करणं बरोबर आहे का? अजिबात नाही. पांढऱ्या कावळ्याने काळ्या बगळ्याला एक चांगली बातमी सांगितली. तो म्हणाला ‘आता यापुढे तू ‘बिचारा’ राहाणार नाहीस. कारण पांढऱ्या शुभ्र मोराचं राज्य आता या जंगलावर येणार आहे.’

पांढरा मोर त्या काळ्या बगळ्याने कधीच पाहिला नव्हता. तो लगेच पांढऱ्या कावळ्याबरोबर नव्या होऊ घातलेल्या राजा मोराकडे गेला. राजा मोर पांढराधोप होता. अगदी पिसारासुद्धा पांढराशुभ्र! पक्ष्यांची मते त्यालाच सर्वात जास्त पडली. कारण तो खूप प्रामाणिक आणि गरीब पक्ष्यांची बाजू घेणारा होता. शिवाय वेगळेपणामुळे उठून दिसायचा. माणसंसुद्धा थांबून थांबून त्याचेच फोटो काढायचे. निळे-जांभळे मोर छान असतात. पण तसे अनेक आहेत. पांढरा राजा मोर मात्र एकच होता.

राजा मोराने काळ्या बगळ्याला आपल्या पदरी ठेवून घेतलं. राजा म्हणाला, ‘तू काही काळजी करू नकोस! आता आपलं राज्य आहे. मी बघतो कोण तुला त्रास देतं ते.’ पहिल्याच सभेत राजाने सर्व पाखरांना सांगितले, ‘एखादा पक्षी वेगळा दिसतो, रंग नेहमीचा नाही म्हणून त्याला दूर लोटता येणार नाही. हा माझा हुकूम समजा! तोच इथला कायदा! काळा बगळा माझ्या दरबारात काम करतो. त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान हे ‘सामान्य’ बगळ्यांनी यापुढे लक्षात ठेवावं. मुलांनो, काळा बगळा आता मजेत आहे. त्याला छळण्याची कुणाची हिम्मत नाही. कारण ‘राजा’ त्याच्या पाठीशी आहे. तुम्हीही ‘ए काळ्या’ असं कुणाला म्हणू नका. प्रॉमिस?

माधव गवाणकर response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most interesting story for childrens