घरासमोरून मिरवणूक चालली होती. कानठळ्या बसतील अशा आवाजात संगीत सुरू होते. जोरजोरात गाणी लावली होती. घरात शिरताच वैताग आला आणि माझी चिडचिड सुरू झाली. समोरच्या मैदानातल्या गणपती उत्सवात रोज सकाळी भूपाळी लावत होते त्याची आठवण झाली आणि दोन्हींमधला विरोधाभास जाणवला. सकाळी मधुर आवाजातली अर्थपूर्ण भूपाळी ऐकून गेले दहा दिवस मन प्रसन्न होई, ताजेतवाने वाटे. त्याउलट या मिरवणुकीतल्या गोंधळाने मात्र मला माझ्या मनावर ओरखडे आल्यासारखे वाटले.
घडय़ाळात न बघता किती वाजले ते कळावे यासाठी रोज सकाळी रेडिओ लावणारे बरेच जण असतात. पण वेळ कळण्याबरोबरच चांगली गाणी ऐकायला मिळाली तर अर्थातच खूश व्हायला होते. आपल्यापैकी बहुतेकांची आवडती गाणी, आवडते गीतकार, संगीतकार आणि गायक ठरलेले असतात. संगीताच्या या प्रत्येक घटकाशी आपले एक अतूट नाते लहानपणापासूनच तयार होते. आपल्याकडे तर चित्रपट गाण्यांमुळे हिट होतात. भावगीतांचे आणि नाटय़संगीताचे एक भांडारच आपल्याकडे आहे. अनेक जणांना शास्त्रीय संगीताचीही खूप आवड असते. शास्त्रीय गायन आणि विविध वाद्यांचे वादन याची काही प्रमाणात तरी ओळख आपल्याला असते. अशा प्रकारे संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
संगीत नादमय असते, तालबद्ध असते, त्याला लय असते आणि त्यातून विविध भावनांचा आविष्कार होतो. संगीताचा आपल्या भावभावनांवर परिणाम होतो. आपल्या मेंदूतील वेगवेगळ्या रसायनांचे प्रमाण संगीताने बदलते आणि आपल्या भावना आणि वागणे यावर परिणाम होतो. आपल्या प्रतिकारशक्तीला आवश्यक अशा पेशींचे प्रमाण संगीताने वाढते. मनावर ताण निर्माण करणाऱ्या अंत:स्रावाचे प्रमाण संगीताने कमी होते. संगीताचा असा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो.
संगीत ऐकणे आणि गाणे म्हणणे, वाद्य वाजवणे अशा दोन प्रकारे आपल्याला संगीताचा आस्वाद घेता येतो. कधी आपण एकटय़ानेच गाणे ऐकतो किंवा एखाद्या कार्यक्रमात अनेक जण एकाच वेळेस संगीताचा आनंद लुटतात. कधी कधी आपण आपल्याशीच गुणगुणत असतो, तर कधी कुणासमोर गाणे म्हणून दाखवतो. याउलट सामूहिक गीत किंवा वादन यात आपण इतरांच्या सोबत आपली कला सादर करतो. या प्रत्येक गोष्टीत वेगळा आनंद सामावलेला असतो. समूहाबरोबर काम करताना आपण आपोआप दुसऱ्यांशी सहकार्य करायला शिकतो. इतरांशी आपले एक नाते निर्माण होते आणि आपल्यातील एकटेपणा संपून जातो.
संगीताच्या अशा विविध गुणधर्माचा मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी उत्तम उपयोग करता येतो. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण याचा अनुभव वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतच असतो. उदाहरणच द्यायचे तर खूप दमून घरी आल्यावर एखादे उडत्या चालीचे, आनंदी भाव निर्माण करणारे गाणे ऐकले की आपोआप उत्साह वाटतो आणि आपण कामाला लागतो.
प्रवासात गाणी ऐकण्याची अनेकांना सवय असते. त्याचा तर आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. मनात खूप विषय घोळताहेत, समोर कामाने गच्च भरलेला दिवस आहे, काही विषयांमधला संघर्ष मनात सुरू आहे, अशा वेळी आपले आवडते एखादे गाणे लागले आणि आपण ते लक्षपूर्वक ऐकले तर आपल्या मनावरचा ताण कमी होतो. शरीर आणि मन शिथिल (१ी’ं७) होते, आपल्या कामावर पुन्हा नीटपणे लक्ष केंद्रित करता येते; त्यामुळे मग कामे भराभर होतात आणि आपला दिवस एकदम मजेत पार पडतो. संगीत ऐकणे आणि प्रत्यक्ष सादर करणे दोन्ही गोष्टींनी ताण कमी होतो. स्वत:च्या भावना व्यक्त करायला संगीत मदत करते. आपल्यातील सर्जनशीलता वाढवते.
किशोरावस्थेतील मुलांच्या दृष्टीने तर संगीत फार महत्त्वाचे असते. स्वत्वाची ओळख करून द्यायला संगीताची मदत होते, तसेच मित्रमंडळींमध्ये सामावून जायला संगीत मदत करते. मुलांच्या भावनांचा उद्रेक न होता त्या व्यक्त होण्याचे साधन म्हणजे संगीत. याउलट काही विशिष्ट प्रकारचे कर्कश संगीत आक्रमकता वाढवते, हिंसक वृत्ती निर्माण करते. काही वेळा संगीत उद्दीपित करणारे असते. स्वत:च्या भावना ओळखायला शिकतानाच संगीताद्वारे इतरांच्या भावना समजून घ्यायलाही मुले शिकतात. समूहात कसे वागायचे, एकमेकांशी नाते कसे जोडायचे हेही शिकतात.
विद्यार्थ्यांबाबत तर असे शास्त्रीय संशोधन झाले आहे की संगीताने त्यांची चिंता, टेन्शन कमी होते आणि शैक्षणिक प्रगती होते. अर्थात त्यासाठी विद्यार्थी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकतात हे महत्त्वाचे आहे.
संगीताचा मानसिक विकारांच्या उपचारांमध्येही यशस्वीपणे वापर केला गेला आहे. आपल्याकडे तर प्राचीन काळापासून हा उपयोग माहीत आहे. विशिष्ट राग विशिष्ट रोग बरे करण्यासाठी वापरले जात असे आपले प्राचीन साहित्य सांगते. विविध रागांमधून विविध रस निर्माण होतात, हे तर आपण जाणतोच. चिंता, विशेषत: शस्त्रक्रियेआधी निर्माण होणारी चिंता, त्यानंतर होणाऱ्या वेदना, मरणाच्या जवळ येऊन ठेपलेल्या रुग्णाच्या मनातली मृत्यूची भीती कमी करण्यासाठी संगीत उपचारपद्धतीचा वापर केला जातो. त्याचबरोबर उदासीनता कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. अर्थात त्याबरोबर औषधोपचारही आवश्यक असतातच. संगीत उपचारपद्धतीमध्ये संगीत ऐकणे, गीते लिहिणे, त्याला चाल लावणे, ते म्हणणे, एखादे वाद्य वाजवणे अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. अगदी स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक विकारामध्येही रुग्णाने समूहामध्ये मिसळावे, तसेच आपल्या भावना व्यक्त कराव्यात, त्याच्यातील आक्रमकता कमी व्हावी यासाठी संगीताचा उपयोग केला जाऊ शकतो. संगीत म्हणजे एक प्रकारचे ध्यान (meditation) लावणे होय. मानसिक समाधानापासून आध्यात्मिक प्रगतीपर्यंत संगीताचा प्रत्येकाला उपयोग होतो, तो प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत