बालपणीच्या आठवणीत सगळेच रमतात. कधी उसंत मिळाली की आपलं मन भूतकाळातल्या काही आनंदी आठवणींमध्ये बागडतं. असंच माझं मन गेलंय मी अनुभवलेल्या कार्टूनविश्वात. नव्वदीच्या काळातील कार्टूनविषयीच्या आठवणी, गमतीजमती, अनुभव या साऱ्यामध्ये मारलेला हा फेरफटका!

संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर हातपाय, तोंड धुऊन चहा-बिस्किट खाण्याचा कार्यक्रम अगदी ठरलेला होता. कधी कधी ते बिस्किट खाण्याचा मूडही नसायचा, पण तो मूड आणण्याचं महत्त्वाचं काम आई किंवा बाबा करायचे. ते काम केलं की झालं, आमची हाताची-तोंडाची गाठ पडायची. कंटाळवाणी वाटत असलेली बिस्किट्स चविष्ट वाटू लागायची. ‘बिस्किट्स कधी संपताहेत’ असं वाटणं ‘आई अजून दे गं एक’ यात रूपांतरित व्हायचं. हे एवढे बदल आई-बाबांच्या एका कामामुळे व्हायचे. ते महत्त्वाचं काम म्हणजे टीव्हीवर एखादं कार्टून लावून देणं. या कार्टूनमुळे त्या बिस्किटांमध्ये मजा यायची. खरं तर या दोघांचाही परस्परांशी तसा फार काही संबंध नाहीच; पण कार्टून बघत असल्यामुळे बिस्किटांची वाटी पटापट रिकामी व्हायची. बिस्किट आणि कार्टून या दोन्हींची आठवण मनात आजही तशीच आहे. ही आठवण आहे नव्वदीच्या काळातली. डोनल्ड डक, मिकी माऊस, टॉम अँड जेरी, पॉपॉय, डेक्स्टर, पॉवरपफ गर्ल्स, फ्लिस्टोन्स, स्व्ॉट कॅट अशा अनेक कार्टून्सनी आमचं बालपण मजेशीर केलं होतं. मालिका, रिअ‍ॅलिटी शो वगैरेचा काळ तेव्हा सुरू व्हायचा होता. त्यामुळे घरातल्या मोठय़ा लोकांची टीव्हीवर सत्ता तोवर आलेली नव्हती. म्हणूनच आमच्या वाटय़ाला टीव्ही बघणं यायचं. त्यामुळे कार्टूनसोबतच्या आठवणी आम्हाला जपता आल्या. आज स्पर्धात्मक आयुष्य जगताना थोडी उसंत मिळाली की जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. बालपण, शाळेच्या गमतीजमती, सोसायटीतले खेळ, घरातली मस्ती असं सगळं ओठांवर हसू आणतं. या आठवणींमध्येच कोपऱ्यात दडलेली आठवण म्हणजे कार्टून्सविषयीची!

52-lp-cartoon

पोरांपासून थोरांपर्यंत आवडलेलं, आजही आवडत असलेलं आणि कदाचित पुढची अनेक र्वष ‘आवडतं कार्टून’ या यादीत असणारं एकमेव कार्टून म्हणजे ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’. एकमेकांचे शत्रू असलेले मांजर आणि उंदीर यांना घेऊन एखादी काटरून सीरिज करावी ही कल्पनाच किती भन्नाट आहे. लहानपणी ‘कल्पना’, ‘कल्पकता’, ‘संकल्पना’ वगैरे शब्द आमच्याही कल्पनेपलीकडचे होते. तेव्हा आम्ही फक्त त्या दोघांचं भांडण, मग जेरीने टॉमला तवा, भांडं, इस्त्री अशा अनेक वस्तूंनी मारणं, मग जेरीच्या चेहऱ्याला त्या-त्या वस्तूंप्रमाणे आकार येणं, टॉमने जेरीला चिमटीत पकडणं असे सगळे खेळ आम्ही खूप एंजॉय केले. क्वचित संवाद असलेली ही कार्टून सीरिज प्रचंड गाजली. ती आजही लोकप्रिय आहेच. हे कार्टून सुरू होण्यापूर्वी एक सिंह डरकाळी फोडायचा. ही डरकाळी फोडली की सगळे दुसरे उद्योग सोडून टीव्हीसमोर डोळे एकटक लावून बसायचो. कालांतराने यामध्ये नवीन एपिसोड्स येऊ लागले. नवीन एपिसोड्समध्ये तितकी मजा नसायची. शिवाय त्या नवीन एपिसोड्सच्या सुरुवातीला अनेकदा ही डरकाळीही नसायची. मग आम्हा बहीण-भावांची एपिसोड जुना की नवी यावरून स्पर्धा लागायची. त्या डरकाळीवरून आम्ही ते ओळखायचो. काही गोष्टी आपल्याला आपल्या बालपणीची वारंवार आठवण करून देणाऱ्या असतात ना, त्यांपैकीच ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ एक. तेव्हा कार्टूनचे की-चेन, पोस्टर, लॉकेट्स असं काही मिळत नव्हतं. आता मात्र ही आठवण जपण्यासाठी की-चेनचा संग्रह करते मी.

याच्या जोडीला आणखी एक कार्टून असायचं. ‘पॉपॉय द सेलर मॅन’. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’च्याच मागे-पुढे लागायचं ते. या कार्टूनमधला यूएसपी म्हणजे पॉपॉयचं स्पिनच म्हणजे पालक हे खाद्य. जितकी घाई हे काटरून सुरू होण्यापूर्वी असायची तितकीच घाई पॉपॉय ते स्पिनच कधी खातोय आणि त्या प्लुटोला कधी मारतोय याची असायची. ‘पॉपॉय द सेलर मॅन.. पॉपॉय द सेलर मॅन..’ हे गाणं सुरुवातीला आणि एकदा शेवटी असं लागायचं. मजा असायची त्या गाण्यात. ऑलिव्ह ऑइलची धमाल आणखी वेगळी असायची. आधी सगळा अन्याय सहन करायचा आणि नंतर स्पिनच खाऊन ताकद आल्यावर पॉपॉय प्लुटोशी भांडणार, मारामारी करणार अशा फॉरमॅटचं हे कार्टून भन्नाट होतं. सहा ते आठ मिनिटांच्या या कार्टूनमध्ये पॉपॉय स्पिनच कधी खाणार हे सांगण्यासाठी आम्हा भावंडांमध्ये चढाओढ असायची. या कार्टूनमुळे त्या वेळी माझ्या वयोगटातल्या मुलामुलींना त्यांच्या पालकांना ‘पालेभाज्यांचं महत्त्व’ समजून सांगणं अवघड गेलं नसावं. ‘पॉपॉय पालक खातो, मग त्याला शक्ती येते. त्यामुळे तुम्हीही पालक खायला हवा’ असं समजावणं मी अनुभवलं आहे. आता हे आठवल्यावर फारच गंमत वाटते.

नव्वदीच्या काळात शेवटच्या वर्षांमध्ये मालिकांचं प्रस्थ सुरू व्हायला लागलं होतं. त्यामुळे तोवर टीव्हीच्या रिमोटवर आम्हा बच्चेकंपनीचा जास्त वचक होता. वचक असला तरी तासन्तास कार्टून बघण्याची मुभा तर मुळीच नव्हती. शाळा सकाळची असो किंवा संध्याकाळची; कार्टून शक्यतो संध्याकाळी तास ते दोन तास बघायला मिळायचं. त्यात डिस्नेच्या कार्टून्सचाही समावेश असायचा. ‘डोनल्ड डक’, ‘मिकी माऊस’, ‘डक टेल्स’, ‘अल्लादिन’, ‘चिप अ‍ॅण्ड डेल’, ‘टेलस्पीन’, ‘द लिटिल मर्मेड’ अशांनी तर आमचं विश्व कार्टूनमय केलं होतं. डोनल्ड डकसारखा आवाज काढणं हा आमच्यासाठी त्या वेळी एक ठरलेला खेळ असायचा. ‘चिप अ‍ॅण्ड डेल’ या कार्टूनमधल्या दोन खारूताई तर एकदम गोंडस. त्यांच्या बारीक आवाजामुळे हसू यायचं. ते कार्टून बघायला सुरुवात केल्यापासून स्वयंपाकघराच्या खिडकीत ग्रिलमध्ये बागडणाऱ्या खारूताईंकडे बघून गंमत वाटायची. मदतीसाठी नेहमी तत्पर आणि कोणतंही कोडं सहजतेने सोडवण्याची क्षमता असे दोन गुण असलेल्या या खारूताईंचं ‘चिप अ‍ॅण्ड डेल’ हे कार्टून एकदम भारी असायचं. ‘गुफ ट्रप’ हे वडील-मुलाच्या नात्यावर आधारित कार्टून होतं. तेव्हा ‘वडील-मुलाचं नातं’ असं अगदी गंभीरपणे त्याकडे बघितलं नाही, पण मी आणि माझे बाबा कसे तसेच ते दोघे इतका साधा विचार ते कार्टून बघताना असायचा. ‘टेलस्पिन’मधला भालू, ‘अल्लादिन’मधली सुंदर राजकुमारी, ‘द लिटिल मर्मेड’मधली जलपरी हे आणि असं बरंच आजही स्पष्ट डोळ्यांपुढे येतं. केवळ हे कार्टून्सच नाहीत तर तर हे कार्टून बघतानाच्या माझ्या आठवणीही स्पष्ट आठवतात. थोडा वेळ तो काळ डोळ्यांसमोर आला की आपसूकच चेहऱ्यावर हसू उमटतं.

‘पॉवरपफ गर्ल्स’ आणि ‘डेक्स्टर लॅबोरेटरी’ हे दोन कार्टून्स तर भन्नाट होते. ब्लॉसम, बबल्स, बटरकप या तीन सुपरपॉवर गर्ल्सची गोष्ट म्हणजे ‘पॉवरपफ गर्ल्स’. तिघी वेगवेगळ्या स्वभावाच्या. एक हळवी, दुसरी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेणारी, तर तिसरी रागीट. अशा तीन टोकांच्या स्वभावाच्या मुली एकत्र असतात. त्यांचे हे स्वभाव या कार्टूनच्या शीर्षकगीतामध्येच आहेत. आताही हे लिहिताना ते गाणं आठवतंय. ‘फायटिंग क्राइम, ट्राइंग टू सेव द वर्ल्ड, हिअर दे कम जस्ट इन टाइम, द पॉवरपफ गर्ल्स’; अहा.. काय गाणं होतं ते. सुट्टीच्या दिवसांमध्ये सगळी भावंडं एकत्र जमलेलो असायचो तेव्हा हे गाणं तालासुरात म्हणायचो. विशेषत: ‘..द पॉवरपफ गर्ल्स’ हे शेवटचं वाक्य तर जोरात म्हणायचो आणि ते झालं की एकमेकांकडे बघून पोट धरून हसायचो. सुपरपॉवर असल्यामुळे त्यांना नेहमी अडचणीच्या ठिकाणी धोक्याशी सामना करण्यासाठी बोलावलं जायचं. विशेषत: त्यांना हे बोलावणं शहराच्या महापौरांकडून यायचं. मग या तिघी त्यांचा सुपरपॉवरचा अवतार दाखवायच्या. असं हे कार्टून. सुपरपॉवर म्हणजे नेहमीच अ‍ॅक्शनच असणार हा समज नव्हता कधी. ड्रामा, ह्य़ुमर, अ‍ॅक्शन असं सगळंच त्यात होतं. अध्र्या तासात तीन छोटे-छोटे एपिसोड्स असायचे. तो अर्धा तास कसा निघून जायचा कळायचंही नाही.

आमचं बालपण आणखी आनंददायी करण्यात ‘डेक्स्टर लॅबोरेटरी’ या कार्टूनचाही मोठा सहभाग आहे. या कार्टूनचं नाव जरी उच्चारलं तरी ‘दी.. दी..’ हा मोठा आवाज कानात घुमतोय. डेक्स्टरने त्याच्या दीदीला मारलेली ही हाक भारीच असायची. समजा हे कार्टून दुसऱ्या खोलीत सुरू असेल आणि आपण दुसऱ्या खोलीत असलो आणि हा ‘दी.. दी..’ असा आवाज ऐकू आला की समजायचं की कार्टूनच्या एपिसोडमध्ये आता डेक्स्टरच्या दीदीने त्याच्या वैज्ञानिक प्रयोगाची विल्हेवाट लावलेली आहे. ही हाक फार सूचक होती. त्या दीदीचे लांबलचक पाय, बुटका डेक्स्टर, त्याचे छोटे हात फार गमतीशीर वाटायचे. डेक्स्टरचा चौकोनी चेहरा बघून तर आम्ही भावंडं अनेकदा आरशात बघून आपला चेहरा असा चौकोनी तर नाही ना, याची खात्री करायचो. सगळंच बालिश होतं ते. पण आता हे आठवून स्वत:वरचं हसायला येतं.

अ‍ॅक्शन कार्टून बघण्याची फारशी आवड नसायची. पण तरी शाळेत त्या कार्टून्सवर चर्चा झाली की मग ते कार्टून बघितलं जायचं. ‘बॅटमॅन’, ‘एक्स मॅन’, ‘मास्क’, ‘ड्रॅगन बॉल’, ‘स्व्ॉट कॅट्स’ ही सगळी काटरून्स भन्नाट होती. यातलं सगळ्यात जास्त आवडलेलं कार्टून म्हणजे ‘मास्क’. एका तरुणाला जुना मास्क मिळतो. गंमत म्हणून तो मास्क तो तरुण घालून बघतो आणि तो एक वेगळाच माणूस बनतो. त्यानंतरची सगळी मजा या कार्टूनमध्ये होती. मास्क घालण्यापूर्वीचा तरुण आणि नंतर मास्क घातलेला तरुण अशी दुहेरी रूपं त्या कार्टूनमध्ये असायची. ‘मास्क’मधला हिरो ‘झक्कास’ हा शब्द एका वेगळ्याच स्टाइलने म्हणायचा. संपूर्णत: अ‍ॅक्शन कार्टून नसलं तरी ते मजा आणायचं हे मात्र नक्की. ‘स्व्ॉट कॅट’ हेही कार्टून मनोरंजन करायचं. कोणत्याही अडचणी, संकटं, गुन्हे यांना थांबवण्याचं काम या स्व्ॉट कॅटकडे असायचं. त्यामुळे आम्हा बच्चेकंपनीसाठी ते एकदम हिरो कॅटेगरीतच होते.

‘फ्लिन्स्टोन’ हे कार्टून फार क्रिएटिव्ह होतं. या कार्टूनमध्ये काही कुटुंबं होती. वेगवेगळ्या कुटुंबांत घडणाऱ्या गोष्टी यामध्ये दाखवल्या जायच्या. यात आकर्षण असायचं ते लाकडाच्या वस्तूंचं. गाडी, घर, घरातल्या वस्तू, स्वयंपाकघरातली भांडी, कपडे असं सगळंच लाकडाचं असायचं. ते बघून आपलं घर असं का नाही असं आम्ही आईला विचारायचो. तेव्हाचं कल्पनाविश्व वेगळंच होतं. समोर जे चांगलं, आकर्षक दिसायचं ते आपल्या खऱ्या आयुष्यातही असावं, असंच वाटायचं. मस्त रंगबेरंगी असं कार्टून आमची करमणूक करायचं. अशीच क्रिएटिव्हिटी होती ती, ‘थॉमस अ‍ॅण्ड फ्रेंड्स’ या कार्टूनमध्ये. हे कार्टून ट्रेन्सवर आधारित होतं. ट्रेन्सचं इंजिन म्हणजे त्या-त्या पात्रांचा चेहरा असायचा. मग त्यांचं कुटुंब. त्यात आई, मुलगी, मुलगा असं असायचं. या ट्रेन्सची आपापसातली मैत्री, लहान मुलांना म्हणजे लहान ट्रेन्सना दिलेली चांगली शिकवण, संकटाच्या वेळी एकत्र येऊन दिलेला लढा असं सगळं त्यात होतं. रूळ, स्टेशन्स, कारशेड, डोंगराळ भागाच्या मध्यातून ट्रेन्सने जाणं हे सगळं फार आकर्षक होतं. ट्रेन्सच्या आयुष्यावर केलेलं भाष्य अप्रतिमच होतं. यात इंजिनावर तयार केलेला पात्रांचा चेहरा अतिशय कल्पक होता. त्यावरचे हावभाव इतके सुंदर असायचे की क्षणभर ती ट्रेन आहे हे विसरायलाच व्हायचं. ‘बॉब द बिल्डर’ या कार्टूनमध्येही क्रिएटिव्हिटी आहे. यात एका बिल्डरची म्हणजे बॉबची गोष्ट होती. त्याच्यासोबत त्याच्या मशीन्स, ट्रॅक्टर, जेसीबी अशा काही गाडय़ा म्हणजे कार्टूनमधली इतर पात्र. ही पात्र त्याच्याशी बोलतात. बॉबने हाती घेतलेलं प्रत्येक काम यशस्वीरीत्या संपवण्यासाठी इतर पात्रं त्याला मदत करत असत. इथेही गाडय़ांच्या समोरील भागाला चेहऱ्याचा लुक दिला होता. या कार्टूनचं गाणं आजही आठवतं. ‘बॉब द बिल्डर.. करके दिखाएंगे.. बॉब द बिल्डर. हा भाई हा..’ अशी सुरुवात होती त्या गाण्याची. ते ‘हा भाई हा’ हे म्हणताना काय उत्साह यायचा आमच्यात!

आजही ट्रेन किंवा बसने वगैरे प्रवास करताना अनेक तरुणींच्या बॅगला ट्विटीचं किचेन बघते. फॅशनेबल पर्सवर ट्विटीचं चित्र असतं. काहींच्या वॉलेटचं डिझाइन तसं असतं. काहींना टी-शर्टवर ट्विटी हवी असते. अनेकींचे डीपी, एफबी प्रोफाइल पिक ट्विटीचे असतात. अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये ट्विटीला भारीच डिमांड! अर्थात हे प्रेम नवं आणि तात्पुरतं नक्कीच नाही. हे प्रेम फार आधीपासूनच आहे. ट्विटीच्या कार्टूनमुळे हे वेड लागलंय. ट्विटी हा शब्द उच्चारतानाच किती गोंडस वाटतो. ‘द सिल्व्हेस्टर अ‍ॅण्ड ट्विटी मिस्ट्रीज’ या कार्टूनमुळे ट्विटी लोकप्रिय झाली. यामध्ये एक आजी, सिल्व्हेस्टर कॅट, हेक्टर डॉग आणि ट्विटी अशी चार पात्रं होती. सिल्व्हेस्टर नेहमी ट्विटीला पळवून नेण्याचा प्रयत्न करायचा. आजीने हेक्टरला ट्विटीचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामुळे सिल्व्हेस्टरचा ट्विटीला पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न, हेक्टरचं त्याच्यावरील बारीक  लक्ष आणि ट्विटीच्या स्वत:च्या बचावासाठी केलेल्या छुप्या खोडय़ा हे सगळं मजेशीर वाटायचं. निखळ मनोरंजन हा एकमेव हेतू या कार्टूनचा होता. यातली आजीसुद्धा गोड होती. टॉम अ‍ॅण्ड जेरी, मिकी, मिनी माऊस, गुफी असे अनेक  कार्टून्स विसरणं शक्यच नाही. त्यापैकी ट्विटी एक. गर्लिशनेस आहे तिच्यात. नाजूक, गोड, सुंदर अशी ट्विटी सगळ्या मुलींना नेहमीच हवीहवीशी वाटते. असाच धावपळीचा आणि पकडापकडीचा खेळ असायचा ‘रोड रनर’ या कार्टूनमध्ये. उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य भागातील वाळवंटात रोड रनर हा पक्षी आणि कोयोट म्हणजे लांडगा हा प्राणी असतो. या दोघांवर आधारित या कार्टूनमध्ये तसं विशेष काही नसायचं. पण तरी ते लोकप्रिय झालेलं होतं. हे दुपारी एक वाजता लागायचं. याची वेळ आठवते कारण, त्यानंतर दुपारी दीड वाजता टॉम अ‍ॅण्ड जेरी सुरू व्हायचं. सुरुवातीला टॉम अ‍ॅण्ड जेरी बघण्यासाठी टीव्ही पाचेक मिनिटं आधी लावायचे. मग आधी सुरू असलेल्या ‘रोड रनर’चा शेवटचा भाग काही दिवस बघत होते. मग हळूहळू त्याची मजा वाटू लागली. म्हणून ते दुपारी एक वाजता लावून संपूर्ण बघायला सुरुवात केली. रोड रनर हा अतिशय वेगवान पक्षी. कार्टूनमध्ये असलेला लांडगा फार भुकेला असतो. त्यामुळे तो रोड रनरची शिकार करण्यासाठी नानाविध प्रयत्न करत असतो. पण त्याच्या वेगाने पळण्यामुळे तो लांडग्याच्या हाती काही केल्या लागत नाही. दर वेळी त्याच्या प्रयत्नात तोच फसत जातो. त्याची ही फजिती बघणं तेव्हा गंमतीशीर वाटायचं.

पक्षी-प्राण्यांची कार्टून्स बघायला जितकी मजा यायची ना तितकीच तरुण मुलांच्या व्यक्तिरेखा असलेली कार्टून्स बघताना यायची. ‘स्कूबी डू’, ‘जॉनी ब्रावो’, ‘एड, एड्ड अ‍ॅण्ड एड्डी’ ही त्यापैकीच काही कार्टून्स. ‘स्कूबी डू’ ही मित्रांची गोष्ट. श्ॉगी, फ्रेड जोन्स, डॅफ्न ब्लेक, वेल्मा डिन्क्ले या चौघांची गोष्ट. पण, यांच्या मैत्रीत आणखी दोघं समाविष्ट आहेत. स्कूबी डू आणि मिस्ट्री मशीन. रहस्यमय गोष्टींचा शोध घेण्यासाठी हे सगळे काम करतात. यात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि त्यानुसार घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक एपिसोडला वेगळी रंगत आणायच्या. ‘स्कूबी डूबी डू, व्हेअर आर यू..’ असं याचं गाणं चालीसकट आठवतंय. अशीच मैत्रीवर आधारित आणखी एक कार्टून सीरिज म्हणजे ‘एड, एड्ड अ‍ॅण्ड एड्डी’. यात दाखवलेले तिघे मित्र दिसायला अतिशय गबाळे. वागायलाही फार काही हुशार नाहीत. पण, काहीही झालं तरी ते त्यांची मैत्री टिकवतात. हे कार्टून बघून लहानपणी आम्हा मित्र मैत्रिणींमध्ये होणारी भांडणं लगेच मिटायची. कार्टून कसंही असो हा एक चांगला संदेश मिळायचा आम्हाला.

परीक्षा सुरू असतानाही मी कार्टून बघायचे. अभ्यासातून ब्रेक म्हणून बाहेर खेळायला न जाता अर्धा तास करमणूक म्हणून कार्टून बघायचे. मग असा अर्धा तास निवडला जायचा ज्यावेळी आमचं आवडतं कार्टून लागायचं. कार्टून बघण्यासाठी एवढा लबाडपणा तर चालूच शकतो. मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीत तर भावंडं, सोसायटीतला मित्रपरिवार अशा सगळ्यांसोबत कार्टून बघण्याची मजा काही औरच असायची. आता जसं वेगवेगळी चॅनल्स लावण्यासाठी घरात बहीण-भावांमध्ये भांडणं होतात तसंच आमचं कार्टून्स लावण्यावरून व्हायचं. बरं तेव्हा ‘ऑनलाइन बघं तू नंतर’ असं सांगण्याचीही सोय नव्हती. त्यामुळे ही भांडणं अगदी टोकाला जायची. तेव्हा एकमेकांचा राग यायचा. पण, त्या भांडणामुळे एकमेकांना मनाविरुद्ध एखादं कार्टून बघावं लागायचं. जबरदस्तीने का होईना, अशी कार्टून्स बघावी लागत असल्यामुळे आमच्या यादीत कार्टून्सची भर पडत गेली. त्यांची गोडी निर्माण झाली. तेव्हा शिनचॅनसारखं आगाऊ कार्टून नव्हतं. त्यामुळे आईबाबा निर्धास्त होते. मुळात तेव्हा आजच्या लहान मुलांसारखी समज नव्हती. त्यामुळे कार्टून फक्त कार्टून म्हणून बघायचो आम्ही. हवं ते कार्टून बघण्यासाठीचं भांडणं आज आठवलं की फार हसू येतं. त्या आठवणी जाग्या होतात. मनातलं ते कार्टूनविश्व पुन्हा अनुभवावंसं वाटतंय. पण, आता त्यासाठी ऑनलाइनची मदत घ्यावी लागेल. टीव्हीसमोर बसून चहा-बिस्कीट खात ही कार्टून्स बघण्यात जी मजा आहे ती लॅपटॉप किंवा मोबाइलच्या एका क्लिकवर नक्कीच नाही. आज कितीही नवनवीन कार्टून्स आले, त्यात प्रयोग झाले, आकर्षकरीत्या मांडणी केली तरी माझ्या आठवणींतल्या त्या कार्टूनविश्वाची जागा तशी कायम असेल. कारण त्यात फक्त कार्टूनच्या आठवणी नाहीत, तर त्याच्याशी निगडीत भावंडांसोबतची केलेली मस्ती, मित्रपरिवारसोबत केलेला आगाऊपणा, कार्टून बघण्यासाठी केलेली लबाडी, धमाल असं सगळंच मनात घर करून आहे. हे विश्व पुन्हा अनुभवण्यासाठी तरी लहानपणा देगा देवा असं म्हणावंसं वाटतं!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com