विदर्भात साजऱ्या होणाऱ्या विविध पारंपरिक उत्सव-सणांचे वेगळेपण सर्वश्रुत आहे. जुन्या काळच्या रूढी, प्रथा परंपरांचे जतन करून ते आजही मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात. विशेषत: श्रावण महिन्यात येणाऱ्या तान्या पोळ्याच्या दिवशी उपराजधानीत मारबतीची मिरवणूक निघते. हे विदर्भाचे वेगळेपण आहे. तसंच नागपंचमी हा सणसुद्धा विदर्भात त्याकाळच्या प्रथा-परंपरांनुसार घरोघरी उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो.
विदर्भात नागपंचमी सणाचे विशेष महत्त्व असून या दिवशी घरोघरी गारुडी पुंगी वाजवीत फिरतात. विशेषत: महिला वर्ग त्याच्याकडे असलेल्या नाग किंवा सापाची दूध-दही अर्पण करून पूजा करतात; तर काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. ग्रामीण भागात शेतीमध्ये नागपंचमीचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी शेतकरी शेतात काम करीत नाही. शेतीला सर्वात जास्त उंदरांपासून धोका असताना साप उंदराचा शिरकाव शेतात करू देत नाही. त्यामुळे शेतकरी मनोभावे नागाची पूजा करीत असतात. पारंपरिक पद्धतीने वडा पुरणाचा नैवेद्य करून घरोघरी पूजा केली जाते.
नागपंचमीच्या वेगवेगळ्या प्रथा असून त्या अजूनही सुरू आहेत. साधारणत: नागपंचमीला घरोघरी कुठल्याही लोखंडी शस्त्राचा उपयोग केला जात नाही. विशेषत: विळी, कातरी, चाकू आदी प्रकार या दिवशी उपयोगात आणले जात नसल्यामुळे भाजी हाताने तोडायची असल्यामुळे अशा भाज्या या दिवशी करतात. पोळ्या करण्यासाठी तव्याचा उपयोग केला जात नाही. या दिवशी पुरणाचे दिंड किंवा पुरणपोळी हा प्रकार घरोघरी केला जातो.
नागपंचमीला अनेकांच्या घरी थंड पाण्याने स्नान करण्याची पद्धत आहे. गरम पाण्याचा उपयोग केला तर ते अशुभ मानले जात असल्यामुळे घरात कितीही आजारी माणूस असो की लहान बाळ असेल त्याला थंड पाण्याने आंघोळ घालावी लागत असून ती प्रथा आजही अनेक ठिकाणी सुरू आहे.
एरवी ताट किंवा पत्रावळीमध्ये जेवण करतात तर नागपंचमीला काही घरांमध्ये जमिनीला तूप लावून त्यावर जेवण केले जाते. अजूनही ही परंपरा अनेक घरांमध्ये जपली जाते. शहरातील जमिनी मार्बलची असल्या तरी ग्रामीण भागात जमीन मातीने सारवून त्यावर तूप लावले जाते आणि त्यावर भोजन केले जाते.
काही लोकांकडे नागपंचमी कुळाचाराचा सण असल्यामुळे ब्राह्मणाला जेवायला बोलावले जाते. त्यानंतर त्याला दक्षिणा देऊन त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर त्याला यजमान उदबत्तीचा चटका देतात आणि तो ओरडला की सगळ्यांनी जेवायला बसायचे अशी पद्धत आजही विदर्भातील अनेक घरांमध्ये आहे. त्याचप्रमाणे ज्या ब्राह्मणाला घरी बोलवायचे आहे त्याला नागपंचमीच्या एक दिवस आधीच रात्री यजमानांनी आपल्या घरी झोपायला बोलावयाचे आणि सकाळी तो झोपेतून उठत जागा होत नाही आणि आावाज देणार नाही तोपर्यंत घरातील अन्य मंडळींनी उठायचे नाही अशीही प्रथा आहे.
ग्रामीण भागात नागपंचमीला शेतकरी नांगरणी किंवा पेरणी करीत नाही. शेतीचे रक्षण करणाऱ्या नागाची आणि ज्या ठिकाणी वारुळ आहे त्या ठिकाणची पूजा केली जाते. शेतमजुरांना आणि बैलांना या दिवशी आराम असतो. शेतकरी आपापल्या घरी नागपंचमीचा सण साजरा करतात.
ग्रामीण भागात महादेवाची गाणी म्हणत गावात फिरत असतात. अनेक लोक मध्य प्रदेशामध्ये पंचमढीला नागद्वाराला यात्रा करतात. ती यात्रा करून घरी येऊन पूजा करतात. पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये या दिवशी जुगार मोठय़ा प्रमाणात खेळला जातो. हा जुगार वेगवेगळ्या पद्धतीचा असला तरी तो खेळला नाही तर नागपंचमीचा सण साजरा केल्याचे समाधान मिळत नाही. या दिवशी काही गावातील युवक लिंबू फेक स्पर्धा आयोजित करतात. सर्वात जास्त दूर ज्याचा लिंबू जाईल त्यावर बोली लावली जाते. जास्तीत जास्त दूर फेकणाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत असतो. कुठल्याही शस्त्राचा उपयोग करणे म्हणजे ते अशुभ असल्याचे मानले जाते. त्यामुळे खाजगी तांत्रिक कारखाने बंद असतात. वर्तमानपत्र मशीनवर छापले जात नाही. त्यामुळे या दिवशी प्रसारमाध्यमांना सुटी दिली जाते.
राम भाकरे – response.lokprabha@expressindia.com