मराठवाडय़ातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असं ठामपणे सांगण्याची हिंमत अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दाखवली त्याचा रिपोर्ताज.
दुष्काळाने मराठवाडा अक्षरश: होरपळून निघत आहे. निसर्ग पोटावर मारीत असताना शासन धीर देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत आहे. परिणामी या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळीराजा थेट मृत्यूलाच जवळ करू लागला आहे. सत्तेवर आले की, जनतेला विसरून राजकारण्यांचा कारभार सुरू असतो. यात सर्वच राजकीय पक्ष आहेत. कोणाला वेगळे करता येत नाही. विरोधी पक्षात असताना दिसणारे, पडणारे प्रश्न सत्ता आली की, नेमके बाजूला राहतात आणि ‘त्यांनी पूर्वी काय केले?’ असे प्रश्न विचारून आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत, हे दाखवून देतात. याची प्रचीती आता वेळोवेळी येऊ लागली आहे. सत्तेत कोणीही असो आणि त्यात भागीदारी कोणाचीही असो शेतकरी हा ‘बळी’ राजा ठरलेलाच! मलिदा खाण्यासाठी अनेक जण पुढे राहणार पण बळी मात्र शेतकऱ्याचाच. तोही पूर्वी डगमगत नव्हता पण आता मात्र तो खचला आहे आणि म्हणूनच परिस्थितीला शरण जात मरणाला जवळ करू लागला आहे. अर्थात आत्महत्येने तो सुटला त्याचे कुटुंबीय मात्र उघडय़ावर येतात आणि त्यांचा जगण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरू होतो. अशा वेळी त्यांना आवश्यकता असते मदतीची आणि धिराची. अशा वेळी सरकार धावून येईल ही अपेक्षा आता सर्वानीच सोडून दिली आहे. पण अद्यापही माणुसकी जिवंत असल्याच्या घटना घडतात. असाच एक मदत वाटपाचा कार्यक्रम बीडला झाला. त्याने राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करणे अपेक्षित आहे. ‘एका साध्या सत्यासाठी’ हा आदर्श उपक्रम हाती घेऊन या झगमगाटातील ताऱ्यांनी त्यांची मातीशी नाळ जोडलेली कायम असल्याचे सिद्ध केले आहे.
सर्वधर्मसमभाव व सामाजिक बांधीलकीच्या गप्पा करणारे अनेक व्यक्ती, संस्था अनेक वेळा प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या कार्यात पुढे येतात. मात्र प्रत्यक्षात जेव्हा सामाजिक बांधीलकी जोपासायची असते किंवा माणुसकीच्या नात्याने मदत करण्याची वेळ येते. त्या वेळी मात्र सर्वाचेच हात वर होतात.
बीडला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन चमकोगिरी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. ते केवळ चित्रपटातीलच नव्हे तर खरोखरचे हिरो आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
पाचवीला पुजलेला दुष्काळ, पाण्याचे कायम दुर्भिक्ष, बेरोजगारी, ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागासलेला भाग अशी नाना पद्धतीची ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून कोरडा दुष्काळ व गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे. सरकारचे (बँकाचे) कर्ज, सावकाराचे कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, वयोवृद्ध माता-पित्याचे औषधपाणी अशा अनेक प्रश्नांचे चक्रव्यूहात अभिमन्यूसारखाच अडकला आहे. यातून सुटका करण्यासाठी बळीराजालाही जीवनाचा अंतच करावा लागत आहे. अशा आपल्या जीवनाचा अवेळी अंत केलेल्या एक नव्हे, दोन नव्हे तर शेकडो बळीराजांचे हे बीड जिल्ह्यतील विदारक वास्तव आहे. कुटुंबातील कर्ता माणूस गेला, घरसंसारही उघडा पडला. सरकारी मोडकीतोडकी मदत काहींना मिळाली, काहींना नाही पण महत्त्वाचे होतं सामाजिक धैर्य. ते देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता होती. त्यासाठी मायावी दुनियेतील कलाकारांनी पुढे येऊन आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या काही वर्षांत सतत नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून येणारी निराशा यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो आहे. या शेतकऱ्यांना थोडा आधार देण्याची गरज आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे थोडा अडचणीत आला असताना त्याच्या अडचणींच्या काळात त्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. हा विचार नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या संवेदनशील अभिनेत्यांनी केला. ते केवळ विचार करून थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कृती केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, वृद्ध आई-वडील आणि लहान मुलांना आधार देण्याचे काम सुरू केले आहे. जे काम शासन, प्रशासन, नेत्यांनी करायला हवं ते काम हे खरे नायक करीत आहेत. हे करताना कुठलीही प्रौढी नाही. कुठलाही स्वार्थ नाही, निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केलेला उद्योग नाही. आपले बांधव अडचणीत आलेत त्यांना भेटणे, धीर देणे आपले कर्तव्य आहे, आपल्या कमाईत समाजाचा हक्कआहे, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ते हा प्रपंच करीत आहेत.
दुष्काळ पडला तर नापिकी व पीक आले तर शेतमालास भाव नाही, हे दुष्टचक्र कायम पाहावयास मिळत आहे. शेतकरी आत्महत्यांवर चर्चा, कारणमीमांसा, विश्लेषणं, सव्र्हे, अहवाल करण्यात सरकार आणि अनेक संस्था गुंतल्या असताना, या गंभीर विषयाबाबत नेतेमंडळी अत्यंत उदासीन असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासह काही संवेदनशील मराठी कलाकारांनी सगळ्यांसाठीच एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. बीड जिल्ह्यतील आत्महत्याग्रस्त ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाना आणि मकरंद यांनी मदतीचं वाटप केलं. तेव्हा, शेतकऱ्यांचे अनुभव ऐकताना त्यांचा कंठ दाटून आला, अश्रूंचा बांध फुटला. मदत किती केली, यापेक्षाही त्यांनी जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला तो अनमोल आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या नाना आणि मकरंदला व्यथित करीत होत्या. या शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना फक्त सहानुभूतीची नव्हे; तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे, हे ओळखून मकरंदनं पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही कलाकारांना साद घातली. त्याला नानासह, सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, पुरुषोत्तम बेर्डे आणि जीतेंद्र जोशी यांनी प्रतिसाद दिला आणि जवळपास २० लाख रुपये जमा झाले. त्याचं वाटप नाना आणि मकरंद यांनी ९ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाऊन केलं. हा कार्यक्रम तसा चमकोगिरी करणारांचा नसल्याने त्याची जाहिरातबाजी जास्त झाली नाही. सभागृहात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, मुले आणि मुली तसेच नातेवाईक असल्याने कार्यक्रम अतिशय गंभीर वातावरणात झाला.
शेतकरी आत्महत्येची बातमी आली की मन व्यथित होतं. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, या शेतकऱ्यांना आपणही काही तरी मदत केली पाहिजे, याची जाणीव होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत, असं नानानं प्रांजळपणे सांगितलं. पैसा कपाटात राहिला तर ते कागदाचे तुकडे असतात, पण तो कुणाच्या मदतीला आला तरच त्याला किंमत आहे. म्हणूनच, सिनेमा, नाटकातील कामापेक्षा या कामाचं अधिक समाधान आहे, अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या. कोण मदत करते आणि कोण नाही, सरकार किती काम करते यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वानी मिळून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं सांगतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे हक्क त्यांना मिळवून द्यावेत, असं आवाहनही त्यानं केलं. सरकार विचारत नाही, आपला कुणीच वाली नाही, या नैराश्यातून मृत्यूला कवटाळू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत नानानं शेतकऱ्यांना धीर दिला.
अन् नानाचे डोळे पाणावले
या कार्यक्रमादरम्यान आत्महत्याग्रस्त केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील शेतकऱ्याची पत्नी ज्योती महादेव मोराळे या बोलायला उभ्या राहिल्या. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची कशी दुर्दशा झाली हे सांगताना त्यांना हुंदका आवरता आला नाही. बोलता-बोलता त्यांना भोवळ आली. त्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. हे पाहून नाना आपली खुर्ची सोडून त्या महिलेच्या मदतीला धावून आले. मोठय़ा भावाप्रमाणे त्या महिलेला धीर देताना नाना आणि मकरंदचे डोळे पाणावले होते.
अशी जमली मदत
नाना नाटेकर – १५ लाख रुपये, मकरंद अनासपुरे – २ लाख रुपये, सयाजी शिंदे – १ लाख रुपये, रेणुका शहाणे – १ लाख रुपये, दिलीप प्रभावळकर – ३० हजार रुपये, पुरुषोत्तम बेर्डे – १० हजार रुपये, जीतेंद्र जोशी – १५ हजार रुपये, झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान – १ लाख रुपये.
राजकारण्यांनी माणसासारखं वागावं!
आज प्रत्येकाचा कल ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याकडे आहे. आपल्या व्यवसायाकडे प्रत्येक जण बिझनेस म्हणून पाहत आहे, परंतु शेती व्यवसायाकडे कोणीच बिझनेस म्हणून पाहत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत मकरंद अनासपुरेनं व्यक्त केली. शहरी भागाच्या संवेदना संपत जाणे हे अराजकतेचं लक्षण आहे. शेतकरी संघटित नाही, तो संप करत नाही, त्यामुळे त्याच्या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही. अशा वेळी राज्यकर्त्यांनी सुज्ञ होऊन थोडं माणसासारखं वागावं, अशी चपराक त्यानं लगावली.
ज्ञानोबा सुरवसे – response.lokprabha@expressindia.com