नाशिक शहरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेलं नांदूर मध्यमेश्वर हे अप्रतिम असं पक्षीक्षेत्र आहे. पण इथं येऊन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांमुळे इथली शांतता विचलित होते.
दिवाळीनंतर देशभर पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. पर्यटनासाठीच्या या सर्वोत्तम काळात पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशाच एका ट्रीपबद्दल गप्पा मारत असताना पक्षी बघायला भरतपूरला जायला जमत नाही, कारण ते दूर आहे असं कुणीतरी म्हणाल्यावर महाराष्ट्राच्या भरतपूरची जंगलकथा सांगायचं नक्की झालं. थंडी सुरू होऊन स्थिरावल्यावर पंखवाल्यांना पाहायला जवळचं ठिकाण म्हणजे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे आजची जंगलकथा बनलंय.
महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमेकडील नाशिक जिल्ह्यत निफाड तालुक्यात खानगाव थडी इथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर १९११ सालच्या सुमारास एक दगडी बंधारा बनवण्यात आला. गंगापूर आणि दारणा पाणसाठय़ातून सोडलं जाणारं पाणी या दगडी बंधाऱ्याच्या परिसरात साठायला लागून इथे पाण्याचा कायमस्वरूपी फुगवटा बनला. या फुगवटय़ामुळे बनलेला जलाशय परिसर पक्ष्यांना उत्तम अधिवास पुरवत असल्याने हजारो पक्ष्यांनी या परिसरात मुक्काम करायला सुरुवात केली. नांदूर मध्यमेश्वर परिसरात गंगापूर आणि दारणेतून सोडलं जाणारं पाणी साठवलं जातं आणि ते पुढे कालव्यांतून शेतीसाठी वापरात आणलं जात. या वाहत्या पाणी व्यवस्थेमुळे बाराही महिने उत्तम हिरवा अधिवास निर्माण झालेला इथे दिसून येतो. आपल्याकडे होणारी मजेदार गोष्ट म्हणजे पर्यटन क्षेत्राच्या आसपास असलेली जंगलं, अभयारण्यं भरपूर लोकप्रिय होतात आणि अनेक सुविधा उपलब्ध होतात. मात्र प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटन शहराजवळ नसल्याने दुर्लक्ष जाणारी अनेक ठिकाणं आपल्याला दिसतात. नांदूर मध्यमेश्वर अशाच ठिकांणांपैकी एक म्हणता येईल. महाराष्ट्राचं भरतपूर अशा विशेषणांनी दस्तुरखुद्द डॉक्टर सलीम अलींनी नावाजलेलं नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आजही बऱ्यापैकी दुर्लक्षित म्हणता येऊ शकेल असंच आहे.
कुंभमेळ्यामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक शहरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या पक्षीतीर्थाबद्दल आजही आपल्याकडे म्हणावी तेवढी उत्सुकता दिसून येत नाही. गंगापूर आणि दारणा पाणसाठय़ाच्या विसर्गातून वाहत येणाऱ्या मातीने, वनोपजामुळे नांदूर मध्यमेश्वर परिसरात अनेक नैसर्गिक बेटसदृश भाग बनले असून त्या परिसरात बहुतांश पाणवनस्पती आणि जलचर वास्तव्यास आल्याने समृद्ध जल अन्नसाखळी या परिसरात नांदते आहे. हीच समृद्ध अन्नसाखळी अनेक पक्ष्यांना इथे आकर्षित करते. कायम आणि स्थलांतरित अशा शेकडो प्रकारच्या पक्ष्यांनी गजबजणारा हा परिसर १९८६ साली अभयारण्याचा दर्जा देऊन संरक्षित केला गेला. सुमारे १०१ किलोमीटरचा परिसर महाराष्ट्र वन विभागाने संरक्षित करून नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. नांदूर मध्यमेश्वर परिसराला प्राचीन काळाची जोड लाभल्याने इथे असलेलं मंदिर आणि नदी परिसर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. रामायण काळात रामाने सीतेसाठी सुवर्ण मृगाची हत्या ज्या ठिकाणावर केली, त्याच जागेवर मध्यमेश्वरचे देऊळ उभे असल्याची आख्यायिका सांगितली जाते. २५० वर्ष जुनं असलेलं मध्यमेश्वराचं देऊळ आणि देवळाच्या दारातली नऊ फुटी दीपमाळ पारंपरिक बांधकामाचा नमुना आहे. या दीपमाळेवर १७३८ सालाचा उल्लेख करणारं कोरीवकाम आहे. मध्यमेश्वर देवळाजवळच खानगाव थडी गावात निसर्ग माहिती केंद्र असून या केंद्रात विविध मॉडेल्स, फोटोच्या माध्यमातून पर्यटकांना नांदूर मध्यमेश्वरचा परिसर समजेल अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे होणारे स्लाइड शोज, फिल्म शोज, पक्षी निरीक्षणाचे ट्रेल्स आणि कॅम्प यामुळे इथे आलेला निसर्ग अभ्यासक नांदूर मध्यमेश्वरच्या परिसराशी व्यवस्थित जोडला जातो.
नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य या नावातच या जागेचं वैशिष्टय़ सामावलेलं आहे. इथे झालेल्या नोंदीनुसार २३० हून जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. यातील ८० हून जास्त प्रकारचे पक्षी स्थलांतरित प्रकारात गणले जातात. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये इथे गूस, गॉडवीट, फ्लेिमगोज, स्पूनबिल्स, विव्हर्स वगैरे मंडळी आहेत. तर इथेच राहणाऱ्या स्थानिक पक्ष्यांची यादी भरपूर मोठी आहे. यात चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंडय़ा, ससाणा, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात. नांदूर मध्यमेश्वर परिसरातल्या उत्तम नैसर्गिक अधिवासामुळे, इथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र जाहीर करण्यात आलं आहे. या अभयारण्याची निर्मितीच पक्ष्यांच्या अधिवासासाठी केलेली असली तरी अभयारण्याच्या परिसरात अनेक वन्यजीव वास्तव्याला आहेत. इथल्या पाणवठय़ांमध्ये पाणमांजरं, मासेमार मांजरं, उदमांजरं नियमित दिसतात. परिसरातल्या ऊस शेतीमध्ये येऊन जाऊन असणारे कोल्हे आणि लांडगेही मधूनच इथे दर्शन देऊन जातात. नांदूर परिसरात सरडे, सुरळ्या, साप, मुंगूस यांची रेलचेल असून अनेकदा हे जीव उन्हात शेकताना किंवा नदीच्या काठावर दिसून येतात. या सगळ्यांची एकमेकांवर अवलंबलेली समृद्ध जीवनसाखळी या परिसरात नांदते आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या परिसरात राहाणाऱ्या हजारो पक्ष्यांसाठी मुबलक खाण उपलब्ध आहे. कारण इथल्या पाणवठय़ांमध्ये २४ हून जास्त प्रकारचे मासे सापडतात. या पक्ष्यांना घरटी करायला उत्तम अशी झाडं परिसरात असून सुमारे ४६० प्रकारची झाडं, झुडपं आणि वनस्पती यांची नोंद केली गेली आहे. पाण्याचं प्राबल्य जास्त असल्याने त्यापैकी ८०हून जास्त पाणवनस्पती इथे आढळल्या आहेत. मध्यमेश्वर तलावाच्या परिसरात असलेल्या विरळ जंगलात निम, बाभुळ, विलायती चिंच, गावठी चिंच, मोह, आंबा, पांगारा वगैरे झाडं आहेत. पाणवठय़ाच्या जवळ मानवी वस्ती असल्याने इथला काही भाग नागरी शेतीसाठी वापरला जातो. ज्यात ज्वारी, ऊस, गहू वगैरे पिकं घेतली जातात.
अभयारण्याच्या जलाशयाजवळ सूर्योदय व सूर्यास्त बघणं ही विशेष यादगार आठवण ठरू शकते. या दोन्ही वेळी परिसरातले तमाम खग गणगोत इथे एकवटलेले असतात. दिवस उजाडताना आणि मावळताना पाणथळीच्या जागी पक्ष्यांची होणारी लगबग, हालचाल आणि वावर आवर्जून पाहण्यासारखा असतो. नांदूर मध्यमेश्वर परिसरात वन विभागाने चार मचाणांची सोय केलेली असून यावर बसून पक्षी निरीक्षण करता येतं. राहण्याची सोय या परिसरात मर्यादित असून आगाऊ आरक्षण करूनच इथे जावं लागतं. सिंचन विभागाचा १०० वर्ष जुना बंगला इथे असून वन खात्याने पर्यटकांच्या निवासाची सोय केलेली आहे. या सर्व सोयीचं आरक्षण वन विभाग. नाशिक यांच्याकडे होतं. पर्यटकांसाठी तलावात बोटींची सोय केली असून हल्ली ती वापरात नसते. कारण जलाशयातल्या पाण्याच्या पातळीवर बोटिंग करू द्यायचं की नाही हे ठरवलं जातं. त्याचप्रमाणे पाण्यात असलेल्या वनस्पतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांना धोका उत्पन्न होत असल्याने बोटिंग उपलब्ध नाही. या अभयारण्याने परिसरातील स्थानिकांना इको गाईड म्हणून उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
कुठल्याही जंगलाबद्दल लिहिताना तिथली रसभरीत वर्णनं करून पर्यटकांचा अथवा अभ्यासकांचा ओघ तिथे वळवायला काहीच हरकत नसते. मात्र अशा सततच्या वर्दळीचा परिणाम तिथल्या नैसर्गिक अधिवासावर होत असेल का, हा प्रश्न सतत मनाला टोचत राहतो. नाशिक, सिन्नरसारख्या शहरांजवळ असलेलं हे अभयारण्य अनेकदा मौजमस्ती करायला आलेल्या पर्यटकांमुळे गजबजलेलं असतं. इथे अभयारण्यात यायची फी अगदी नाममात्र असून ५-५० किंवा ५०० रुपयांच्या दंडाला कुणीही घाबरत नाही हे विदारक सत्य आहे. औरंगाबाद विमानतळ इथून अवघ्या १७५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथे येणारे पर्यटक इथे येत नाहीत. कारण म्हणावी तेवढी माहिती आणि सुविधा इथे उपलब्ध नाही. मुंबई भुसावळ रेल्वे मार्गावरच निफाड हे रेल्वे स्थानक इथून अवघ्या १२ किलोमीटरवर आहे. शासनाच्या इकोहट्स, टेन्ट् हाऊस आणि गेस्ट हाऊस मर्यादित संख्येत असून आरक्षण न करता गेल्यास इथे गैरसोय होऊ शकते. नांदूर मध्यमेश्वर हे मौजमजेचं ठिकाण नसून पक्षी निरीक्षणासाठी उत्तम जागा आहे हे लक्षात न ठेवता गोंगाट करणारे, पक्ष्यांना दगड मारून उडवणारे, आवाज करून टाळ्या वाजवून उडवणारे, गाणी म्हणून दंगा करणारे हुल्लडबाज प्रवासी इकडे येऊन जातात. अनेक नामवंत भटके आणि अभ्यासक देशविदेशातल्या नामवंत ठिकाणी जाऊन येतात पण खेदाने नमूद करतात की नांदूर मध्यमेश्वरला जाणं झालेलं नाही. आजच्या जंगलकथेत मी कुठल्याही पक्ष्यांची साद्यन्त वर्णनं केलेली नाहीयेत. निसर्ग अभ्यासकांनी आणि पक्षी निरीक्षकांनी या परिसरात जाऊन नांदूर मध्यमेश्वरच्या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि पक्ष्यांची ही अद्भुत दुनिया पाहावी हा त्यामागचा हेतू आहे.
अंगावर उमटणाऱ्या शहाऱ्यांनी थंडी सुरू झाल्याची जाणीव करून दिली आणि निसर्गाचं कॅलेंडर ऋतूची पानं पालटत असल्याचं लक्षात आलं. ‘युनायटेड कलर्स ऑफ ग्रीन’चे रंग हळूहळू ‘ऑल कलर्स ऑफ ग्रे’ शेडकडे सरकण्याची सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा निसर्गाने कूस पालटल्याची जाणीव झाली. कूस पालटून पाहताना आसमंतात घडणारे बदल शोधायला लागताना पंखवाले पाहुणे आपल्या आसमंतात येऊन दाखल व्हायला सुरुवात झालीय हे जाणवतं. निसर्गात शांत पाणवठय़ावर बसून पाण्यात आपले काटकुळे पाय अलगद टाकत, खालमानेने पाण्यातील गवत निवडत खाणं पटकावणारे, पंख फडफडवून आपली मऊ पीसं साफ करणारे, माना वळवत पंख फडफडवणारे पक्षी बघणं यासारखं निव्वळ सुख नाही. कॅमेरे, बायनाक्युलर्स, फिल्ड गाइड्स पुस्तक पाठीवरच्या पिट्टमध्ये टाकून महाराष्ट्राच्या भरतपूरमध्ये या थंडीत जाऊन या. अभयारण्याची राणी, अर्थात जांभळी पाणकोंबडी बघायला हरकत नाहीच. इस बार जरूर आओ नंदूर में..
रुपाली पारखे देशिंगकर response.lokprabha@expressindia.com