रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
मकरसंक्रांत झाली की थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागायला लागते किंवा असलीच थंडी तर ती उत्तर भारतात. फेब्रुवारी-मार्चमध्येही थंडी उत्तर भारतीयांसाठी नवीन नाही. मात्र संक्रांत होऊन १५ दिवस झाले तरी मध्यंतरी थोडासा कमी झालेला थंडीचा कडाका दक्षिण भारतात अधिकच वाढत आहे. ढगाळ वातावरण, दुपारी चटचटणारे उन किंवा थंडगार वारे आणि रात्री पडणारी थंडी असे काहीसे वातावरण सध्या आपल्याला अनुभवायला मिळत आहे.
अर्थात ही स्थिती फक्त महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे असे नाही तर थंडीचा हा जोर दक्षिणेतील राज्यांमध्येही दिसून येतो. केरळ, तामिळनाडूमध्ये नवीन वर्षांच्या प्रारंभी जी कडाक्याची थंडी पडली ती अद्याप कायम आहे. मुन्नारसारख्या ठिकाणी तर तापमान शून्याच्या खाली जाऊन बर्फाची पातळ चादर अंथरली गेली आहे. केरळमध्ये गेल्या तीन दशकांत प्रथमच तापमान एवढे कमी झाल्याची नोंद आहे. ही स्थिती स्थानिकांसाठी नक्कीच नवीन आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच जाणवणारी थंडी फेब्रुवारीमध्येही कमी व्हायला तयार नाही. पावसाळ्यात आलेल्या पुरानंतर केरळमध्ये हवामान बदलाचे परिणाम मोठय़ा प्रमाणात दिसतायेत. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील तफावत ही कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश यांच्यामुळे दिसून येते. समुद्रकिनाऱ्यांवरील राज्यांमध्ये इतर ऋतूंमध्ये आढळणारी आद्र्रता गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाली आहे. हवेतील आद्र्रता ही ग्रीनहाऊस गॅसप्रमाणे कार्य करते. या आद्र्रतेमुळे सूर्यापासून मिळणारी उष्णता साचवून ठेवली जाते, ज्यामुळे रात्रीचे तापमान खाली जात नाही. मात्र पूरस्थितीनंतर एकंदरच केरळच्या हवामानातील बदलांमुळे आणि गाजा चक्रीवादळामुळे येथील हवेतील आद्र्रता कमी झाली आहे. तसेच आकाश निरभ्र असल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येत असल्याने दिवसा येथे त्रासदायक उन असते तर रात्री कडाक्याची थंडी. म्हणूनच इथल्या कमाल आणि किमान तापमानातील तफावत अधिक आहे. भारतीय उपखंडात उच्चदाबाचा पट्टा तयार झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केरळमधील तापमान वर्षभर मध्यम असते तर गुलाबी थंडीत ते आल्हाददायक असते. मात्र अगदी गोठवून टाकणारी थंडी याच वर्षी पडली आहे. पुरानंतर पाठोपाठ आलेल्या या थंडीने केरळवासी मात्र काहीसे चक्रावून गेले आहेत. पूरस्थिती ही नसíगक आपत्ती असली तरी त्यालाही वातावरण बदल कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते पश्चिम घाटात झालेली बेसुमार वृक्षतोड, दगडांच्या खाणीसाठी डोंगरांचे सपाटीकरण, नदी पात्रात झालेले अतिक्रमण, वनक्षेत्रात मानवाचा वाढता हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे पूरस्थिती ही मानवनिर्मितही आहे. यामुळेच केवळ पूरच नव्हे तर अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले होते. ज्या तीव्रतेने पाऊस आणि थंडी पडली त्याच तीव्रतेचा अतिशय कडक उन्हाळाही केरळवासींना अनुभवायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
केरळ हे खरे तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडला तर निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला अनुभवायला लागते. आपल्याकडे महाराष्ट्रातही पश्चिम घाट विस्तारलेला आहे. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पश्चिम घाटाच्या पट्टय़ात असणाऱ्या जिल्ह्यांत डोंगररांगा पोखरल्या जात आहेत. येथील भूस्खलनाचे प्रकार वाढले आहेत. तर नवक्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप, डोंगरातील रस्ते यामुळे उत्तराखंडात होणारी अतिवृष्टी अशा अनेत आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्ग या सगळ्या आपत्तींतून काही सांगू पाहतो आहे. वेळीच ऐका निसर्गाच्या हाका असेच काहीसे या हवामान बदलातून निसर्गाला सांगायचे आहे का?
छायाचित्र सौजन्य : केरळा टुरिझम