आशुतोष बापट
आपल्या पुराणांमध्ये कथांच्या माध्यमातून वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. वराहपुराणदेखील सप्तमातृकांच्या माध्यमातून असेच मोठे तत्त्वज्ञान मांडते.
एखादे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजगत्या समजावे म्हणून विविध पुराणांमधून कथा रचल्या गेल्या. त्या कथा एखाद्या देवतेच्या जन्माच्या किंवा एखाद्या देवतेने एखाद्या राक्षसावर मिळवलेल्या विजयाच्या असतात. बरीचशी पुराणे ही त्या त्या देवतेच्या सामर्थ्यांची वर्णने करतात. पुराणांतून काही सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. सप्तमातृका ही संकल्पना मातृका, मातृदेवता इथपासून ते महादेवाला अंधकासुरवधाच्या वेळी मदत करण्यासाठी विविध देवांनी आपल्यापासून निर्माण केलेल्या शक्ती इथपर्यंत विस्तृतपणे वर्णिलेल्या दिसतात. वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांबद्दल कथा सांगतात. त्यात बरीचशी सुसंगती असली तरी काही ठिकाणी विपर्यास किंवा काहीशी वेगळी कथा सांगितलेली दिसते. या सर्व पुराणांत वराहपुराण सप्तमातृकांची कथा सविस्तर सांगते. ती पुढीलप्रमाणे-
कश्यपाला दितीपासून दोन पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपु. त्या दोन्ही असुरांना विष्णूने अनुक्रमे वराह अवतार घेऊन आणि नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. हिरण्यकशिपुचा मुलगा प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त होताच. प्रल्हादाने हिरण्यकशिपु नंतर उत्तम राज्यकारभार केला आणि नंतर सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेतला. त्यानंतर असुरांचा राजा झालेला अंधकासुर यानेही कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून विविध वर प्राप्त करून घेतले आणि त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सर्व देवांना त्रास देऊ लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावर महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सर्व देवांची तक्रार ऐकत असतानाच प्रत्यक्ष स्वत: अंधकासुर, पार्वतीचे अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. शिव तत्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक, आणि धनंजय या तीन नागांचा बंध आपल्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिथे येऊन ठेपला. शिवाचे वाहन असलेल्या नंदीला हे समजले आणि त्याने शिवाचाच अंश असलेल्या वीरभद्राला याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचे रूप घेतले आणि त्याने हत्तीच्या रूपातील नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने हत्तीचे कातडे शिवाला भेट दिले. शिवाने ते कातडे अंगावर पांघरले आणि तो अंधकासुराशी युद्ध करण्यास सज्ज झाला. अंगावर हत्तीचे कातडे पांघरलेले, सर्पाची आभूषणे अंगावर ल्यालेली, हातात त्रिशूळ धारण करून शिव आपल्या गणांसमवेत अंधकासुराशी युद्ध करू लागला. विष्णू आणि इतर देवगण शिवाच्या साहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झाले आणि इतर देवांना तिथून पळून जावे लागले. शेवटी शिवाने आपला त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला उंच उचलून घेतले.
परंतु अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्यातून एकेक अंधकासुराच्या रूपातील राक्षस निर्माण होऊ लागला. अशा रीतीने हजारो अंधकासुर तिथे निर्माण झाले. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने हे इतर मायावी अंधकासुरांना ठार मारले. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून शिवाने आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनीही आपापली शक्ती निर्माण करून ती शिवाच्या मदतीला तिथे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी/ऐन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, आणि यमाची शक्ती चामुंडा अशा या सात शक्ती देवता तिथे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. त्या शिव आणि अंधकासुर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवाने त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवाची आयुधे होती. तसेच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवर बसून आलेल्या होत्या.
वराहपुराणात विस्तृतपणे मांडलेली ही आहे सप्तमातृकांची कथा. विविध पुराणांमधून मातृका, त्यांचा उगम, त्यांचे कार्य याबद्दल कथा वाचायला मिळतात. त्यात वराह, विष्णू, मत्स्य, कूर्म आणि देवीपुराणाचा समावेश होतो. तसेच शिल्पशास्त्रावर आधारित असलेल्या ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथातही मातृकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वराहपुराणात वर उल्लेख केलेली अगदी विस्तृत कथा पाहायला मिळते. शिवाय इतर सर्व पुराणांत या मातृकांची संख्या सात सांगितलेली असताना वराहपुराण मात्र ही संख्या आठ असल्याचे सांगते. सर्वात आधी उल्लेखिलेली योगेश्वरी ही देखील एक मातृका आहे असे वराहपुराणात म्हटलेले आहे.
अंधकासुराशी साम्य दाखवणारी अशीच एक कथा मरकडेयपुराणात येते. त्यानुसार शुंभ नावाच्या राक्षसाशी अंबिकेचे युद्ध झाले. त्या युद्धात अंबिकेला या मातृकांनी मदत केली. कारण शुंभ दैत्याला वर मिळालेला होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यातून अजून एक असुर निर्माण होईल. त्याच्या रक्ताचे थेंब या मातृकांनी वरच्यावर धरून ठेवले आणि शुंभाचा निपात केला. असुराचा मोठय़ा प्रमाणावर रक्तपात झाला आणि त्यामुळे तो हतबल होऊन पराभूत झाला. अगदी शिव-अंधकासुर युद्धासारखीच ही कथा आहे. अंधकासुराची कथा पुढे वाढवली आहे ती कूर्मपुराणाने. अंधकासुराच्या वधानंतर शिवाने भरव आणि या मातृकांना पाताळलोकात जाऊन वास्तव्य करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी पाताळलोकात प्रयाण केले. परंतु भरव जो शिवाचाच अंश होता तो शिवामध्ये विलीन झाला. मातृकांना आता कोणताही आधार राहिला नाही आणि त्या विध्वंसक बनल्या. त्यांनी सर्वत्र विध्वंस करायला सुरुवात केली. शेवटी भरवाने नरसिंहाला पाचारण केले आणि त्या मातृकांना शांत करण्यास सांगितले. नरसिंहाने त्या मातृकांना शांत केले आणि तेव्हापासून त्यांचे स्वरूप हे उपकारक बनले. अशा विविध पुराणांतून या सप्तमातृकांचे आगळेवेगळे पलू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वत्र एक मुख्य धागा समान दिसतो की कोणा दैत्याच्या निर्मूलनासाठी विविध सात देवतांनी आपल्या शक्ती महादेवाच्या मदतीसाठी निर्माण केल्या, आणि त्या पुढे सप्तमातृका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक अभ्यासकांनी मातृकांचा अभ्यास करताना त्यांचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून मिळतात असेही प्रतिपादन केलेले आहे. त्यावर मतमतांतरेदेखील आहेत. पण या सप्तमातृका पुढे मूर्तीरूपात आल्या आणि त्या प्रसिद्ध झाल्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्या नंतरचे कल्याणी चालुक्य या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिरस्थापत्यात सप्तमातृका पट्ट प्रकर्षांने पाहायला मिळतात. या मातृकांची संख्या सात असली तरी काही ठिकाणी ती आठ, १६, ३२ झालेली दिसते. या सातमातृकांच्या शिवाय माहेन्द्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचे शिल्पांकनदेखील पाहायला मिळते.
शक्ती हा शब्द लिहिताना ‘ती शक्ती’ या उद्देशाने वापरला असल्यामुळे, हा शब्द स्त्रीिलगी आहे हे वाचल्यावर लगेच समजते. परंतु मूर्ती घडवताना मात्र त्यांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी त्या मूर्ती स्त्रीरूपात घडवल्या जातात. आकर्षक आणि नेमक्या सप्तमातृकांच्या मूर्ती विविध मंदिरांमधून दिसतात. त्या मूर्ती कशा तयार कराव्यात याचे काही एक शास्त्र आहे. शिल्पशास्त्राची माहिती देणाऱ्या विविध आगम ग्रंथांमधून या सप्तमातृकांच्या मूर्ती, त्यांची ठेवण, त्यांची वाहने यांची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यानुसार ब्रह्माणी ही ब्रह्मदेवासारखी, वैष्णवी ही विष्णूसारखी अशा रीतीने त्या त्या देवाच्या शक्ती या त्या त्या देवतेनुसार शिल्पांकित केल्या गेल्या पाहिजेत. ब्रह्माणी म्हटले की तिचे वाहन आणि तिची आयुधे हे ब्रह्मदेवासारखी असायला हवीत. मग ब्रह्माणी शिल्पांकित करताना स्त्रीप्रतिमा जी बसलेल्या स्थितीत आहे. जिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. जिच्या वरच्या पाठीमागील हातात सुळा आणि अक्षमाला असून, तिचा उजवा हात अभय मुद्रेत तर दावा हात वरद मुद्रेत असावा. तिचे वाहन हंस दाखवलेले असावे आणि तिच्या मस्तकी जटामुकुट दाखवावा. हे असे पाहिले म्हणजे ही प्रतिमा ब्रह्माच्या शक्तीची आहे असे समजते. या सर्व मातृकांचा उजवा हात हे अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत दाखवलेला असतो. पाठेमागे असलेल्या दोन हातात आयुधे असतात. आणि पायाशी त्या त्या देवतेची वाहने असतात. वैष्णवी असेल तर पाठीमागच्या हातात शंख आणि चक्र तर पायाशी गरुड, डोक्यावर किरीट मुकुट. इंद्राणीच्या वरच्या हातात वज्र आणि शक्ती तर पायाशी वाहन हत्ती. तिचा रंग लाल तर डोक्यावर किरीट. विष्णूधर्मोत्तरपुराणानुसार तिला सहस्त्र नेत्र आणि तिचा रंग सोनेरी असावा.
चामुंडा शिल्पित करताना अत्यंत भयावह अशी दाखवलेली असते. केस अस्ताव्यस्त पिंजारलेले, शरीरावर मांस नाही. सगळ्या बरगडय़ा दिसताहेत, पायाचे स्नायू दिसतात. तिने मुंडक्यांचा मुकुट परिधान केलेला आहे. एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हातात कपाल धरलेले. तिचे सुळे बाहेर आलेले दिसतात. कधी कधी तिच्या पोटावर विंचू शिल्पित केलेला असतो. मानवी शव हे तिचे वाहन असून ती त्यावर उभी दाखवतात. पूर्वकरणागम या ग्रंथानुसार तिचे तोंड उघडे दाखवतात आणि तिच्या डोक्यावर चंद्राची कोर दाखवतात. तिचे वाहन घुबड असते तर तिच्या ध्वजावर गरुड असतो. माहेश्वरी शिल्पांकित करताना तिच्या वरच्या दोन हातांत शूल आणि अक्षमाला असते, तिचा मुकुट हा जटामुकुट असतो तर तिचे वाहन नंदी असतो. विष्णुधर्मोत्तरपुराणानुसार तिला पाच तोंडे दाखवलेली असतात, त्या प्रत्येकाला तीन डोळे दाखवलेले असतात. तिचा रंग पांढरा असून तिच्या सहा हातात सूत्र, डमरू, शूल आणि घंटा तर पुढचे दोन हात वरद आणि अभय मुद्रेत दाखवलेले असतात. कुमार म्हणजेच कार्तिकेयाची शक्ती कौमारी शिल्पांकित करताना तिच्या दोन हातांत शक्ती आणि कोंबडा दाखवतात. उर्वरित हात अर्थातच अभय आणि वरद मुद्रेत असतात. वाराही दाखवताना तिचे तोंड वराहाचे असते. तिच्या दोन हातांत हल आणि शक्ती असते तर तिच्या मस्तकी करंडमुकुट असतो. विष्णुधर्मोत्तरपुराण या तपशिलात काही गोष्टींची भर घालते. त्यानुसार तिला सहा हात असून त्यात दंड, खड्ग, खेटक आणि पाश असतात. उर्वरित दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. पूर्वकरणागमानुसार तिच्या हातात शारंग धनुष्य दाखवलेले असते. तसेच अनेक ठिकाणी या सप्तमातृकांच्या शेजारी असलेला वीरभद्र हा वीणावादन करताना दाखवलेला असतो.
सप्तमातृकांची वाहने, आयुधे त्याचे मुकुट यांची माहिती असल्यावर आपल्याला विविध मंदिरांमधून शिल्पांकित केलेले सप्तमातृकापट्ट पाहताना त्यांची तपशीलवार माहिती होते. कर्नाटकात विविध मंदिरांमधून हे पट्ट पाहायला मिळतात. सागर या गावाजवळ असलेल्या केळदी या गावी असलेल्या मंदिरात सुंदर असा सप्तमातृका पट्ट दिसतो. महाराष्ट्रातसुद्धा मुख्यत्वे मराठवाडय़ात हे असे सुंदर आणि देखणे सप्तमातृकापट्ट मंदिरांतून पाहायला मिळतात. लातूर इथल्या मंदिरात असाच सुंदर सप्तमातृका पट्ट आहे. तसेच धर्मापुरी इथे असलेल्या किल्ल्यात पूर्वी एखादे मंदिर असावे. त्या मंदिरांचे अवशेष त्या किल्ल्यात तटबंदीमध्ये वापरलेले दिसतात. त्या अवशेषातच एक सुंदर सप्तमातृकापट्ट पाहायला मिळतो. सप्तमातृकांच्या शेजारी एका बाजूला वीरभद्र तर दुसऱ्या बाजूला गणपती कोरलेला असतो. गणपती हा गणांचा अधिपती असल्यामुळे या सप्तमातृकांच्या बाजूला त्याचे शिल्पांकन केलेले असते. सप्तमातृकांची सर्वात भव्य आणि मोठी शिल्पे आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेणीत यज्ञशाळा म्हणून ठिकाण आहे. तिथे भव्य आकाराच्या सप्तमातृका कोरलेल्या पाहायला मिळतात. पण त्या खूपच भग्न झालेल्या आहेत. इथे त्या सप्तमातृकांसोबत राणी माणकावतीचे शिल्पसुद्धा आहे. इथल्या रामेश्वर लेणीत (लेणी क्रमांक २१) सप्तमातृकांचे भव्य शिल्प पाहायला मिळते. अतिशय देखण्या, डौलदार सप्तमातृका या लेणीमध्ये कोरलेल्या पाहायला मिळतात. मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे. काही शिल्पे भग्न झालेली दिसतात तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य काही कमी होत नाही. इथे सप्तमातृकांच्या मधोमध गणपती शिल्पित केलेला आहे. खूप सुंदर अशा या मातृकांच्या पायाशी त्यांची वाहने आणि हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत.
शेजारी बसलेल्या सप्तमातृका हे सगळीकडे दिसतेच, परंतु महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्य़ात मुखेड गावी दाशरथेश्वर मंदिराच्या बाह्य़िभतींवर नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर कल्याणी चालुक्यांच्या राजवटीमधले आहे. अतिशय सुंदर अशा या मातृका काहीशा भग्न झालेल्या आहेत. मात्र त्यांचा आवेश, नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव निव्वळ देखणे आहेत. सप्तमातृकांचे अगदी निराळे या ठिकाणी पाहायला मिळते.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या म्हणजे एखादे गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसांना सांगायचे असेल तर ते विविध कथांद्वारे सांगितले जाते. पुराणेसुद्धा आपल्याला अनेक देवदेवता, राक्षस यांच्या कथा सांगतात मात्र त्या पाठीमागे काही ना काही तत्त्वज्ञान सांगायचे असते. सप्तमातृकांच्याद्वारे वराहपुराण असेच एक मोठे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडू पाहते आहे. त्यानुसार शिव, अंधकासुर किंवा या मातृका ही सगळी रूपके आहेत. ती आपल्या मनाच्या विविध अवस्थांची प्रतीके म्हणून पाहायला हवीत. शिव आणि अंधकासुराचे युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचे युद्ध समजले गेलेले आहे. तसेच हे पुराण पुढे असेही सांगते की या सात मातृका म्हणजे मानवी स्वभावाचे दोष सांगितलेले आहेत. योगेश्वरी हे काम अथवा इच्छा, महेश्वरी हे राग-क्रोध, वैष्णवी हे लोभ, ब्रह्माणी मद, कौमारी मोह, इंद्राणी मत्सर, वाराही असूया आणि चामुंडा हे पशुत्व याचे प्रतीक आहेत. ज्ञानरूपी शिवाने हे सगळे दोष आपल्या काबूत ठेवले आणि त्यामुळे त्याला अज्ञानरूपी अंधकासुरावर विजय मिळवता आला. मनाचे हे सगळे कंगोरे जरी असले तरी ते काबूत ठेवून योग्य दिशेने त्यांचा वापर केला तर अज्ञानरूपी अंधकाररूपी अंधकासुराचा नायनाट करणे सर्वसामान्य व्यक्तीलादेखी सहज शक्य असते. गहन तत्त्वज्ञान सरळ सोप्या गोष्टींमधून लोकांसमोर मांडायचे पुराणांचे हे कसब म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे.
(संदर्भ : एलिमेंट ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी- टी. ए. गोपीनाथ राव)