नेपाळला गेल्या वर्षी भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला त्या वेळेस छायाचित्रकार सुमित दयाल नवी दिल्लीमध्ये होता. भूकंपाची घटना कळल्यानंतर त्याने काठमांडूच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी भरलेले दिल्ली-काठमांडू विमान त्याने गाठलेही. पण ते उतरण्यापूर्वीच नेपाळला बसलेल्या दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे ते पुन्हा दिल्लीला वळविण्यात आले. कसेबसे करून तो काठमांडूला पोहोचला तेव्हा प्रलयानंतरचे उद्ध्वस्त शहर त्याला पाहायला मिळाले.
खऱ्या अर्थाने सारे काही रस्त्यावर आले होते. त्यानंतर त्याने विविध पद्धतीने भूकंपग्रस्तांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. मात्र यश येईना, अखेरीस इन्स्टाग्राम या व्हिज्युअल सोशल मीडियाचा वापर केला. #नेपाळफोटोप्रोजेक्ट असा हॅशटॅग तयार केला आणि लोकांना आवाहन केले की, फोटोसोबत माहितीही पाठवा. काय, कधी, कसे, कुठे, केव्हा या संदर्भातील माहितीही पाठवा. या भूकंपामध्ये नऊ हजार जण ठार तर तब्बल २२ हजार जण जखमी झाले होते तर लाखो बेघर. कुठूनच काही माहिती मिळत नव्हती. पण त्याच वेळेस मध्येच कनेक्शन मिळाले की लोक इन्स्टाग्रामवर अपडेट करत होते. मग त्याचाच आधार घेत हा प्रकल्प अस्तित्त्वात आला, #नेपाळफोटोप्रोजेक्ट. यावर आलेल्या फोटोसोबत माहिती नसेल तर मग पाठविणाऱ्यास ते प्रवृत्त करायचे. या प्रकल्पातून आलेल्या फोटोंची मांडणी त्या त्या भागात झालेल्या रिश्टर स्केलप्रमाणे करून एक सादरीकरण सुमित व त्याची सहयोगी तारा बेदी यांनी तयार केले. हा लाइक्स वाढविण्याचा प्रयोग नव्हता. तर भूकंपानंतरचे जीवन आणि मदत या दोन्हींशी त्याचा संबंध होता. या निमित्ताने एक दस्तावेजीकरण झाले तेही कलात्मक अंगाने. हे खूप बोलके आहे. मुंबईच्या जहांगीर कलादालनाशेजारी असलेल्या मॅक्सम्युलर भवनमध्ये १८ जूनपर्यंत सुरू असलेल्या नेपाळविषयक प्रदर्शात ते पाहता येणार आहे. ६८ हजार जण त्या इन्स्टाग्राम पेजचे फॉलोअर्स होते. एक प्रकारे सिटिझन्स जर्नालिझमचा हा वेगळा प्रयोगही ठरला. त्या फोटोच्या जीपीएस लोकेशन्समुळे नेमक्या ठिकाणी मदत मिळणेही सोपे गेले.
हिमालयाच्या कुशीतील हे राष्ट्र नेपाळ खरे तर गेली १५ वष्रे खूप चच्रेत आहे. राजवाडय़ातील हत्याकांडापासून ते नव्या राज्यघटनेपर्यंत भरपूर काही घडले. त्या साऱ्याचा धांडोळा नेपाळमधील आणि नेपाळबाहेरून आलेल्या अशा अनेक कलावंत, छायाचित्रकारांनी या प्रदर्शनामध्ये घेतला आहे. झिशान अकबर लतिफ याने बार्पाक या भूकंपाच्या केंद्रस्थानाचेही चित्रण केले. तिथे असलेले अवशेषांचे ढिगारे बरेच काही सांगून जातात. शारबेंदू डेची छायाचित्रे बरेच काही सांगून जातात. भूकंपग्रस्तांना डे विचारायचा की, तुमच्या स्वप्नात काय येते. सर्व जण सांगायचे की, त्या भूकंपग्रस्तांच्या छावणीमध्ये कुणी तरी फिरते आहे. रात्री झोपल्यानंतर डोक्याशी येते असेही वाटते. लाखी हा नेपाळी असुर आहे. तो भूकंप घेऊन येतो म्हणतात. हे गृहितच धरून डे ने एका कलाकाराला लाखीचा मुखवटा घालून भूकंपग्रस्त ठिकाणी, इमारतींच्या मलब्यावर उभे केले आणि उद्ध्वस्त ठिकाणी त्याचे चित्रण केले. हे प्रतीकात्मक चित्रण, नेपाळींच्या मनातील भीतीचे मानसशास्त्रीय चित्रण ठरते. त्याचे सादरीकरण त्याने एका मिट्ट काळोखी तंबूमध्ये या प्रदर्शनात सादर केले आहे.
फिलिप ब्लेन्किन्सोप याने गनिमी काव्याने लढणाऱ्या माओवाद्यांचे त्यांच्या छुप्या ठिकाणी जाऊन केलेले चित्रण हेदेखील येथील विशेषच आहे. १९९६ सालापासून हा लढा सुरू आहे. माओवादी तरुण तरुणींच्या कणखरतेचे थेट दर्शन या छायाचित्रांमध्ये पाहता येते. त्यांचे सादरीकरणही काळ्या मिट्ट तंबूत बल्पच्या प्रकाशात पाहता येते. वातावरण निर्मिती चांगली करण्यात आली आहे.
२००६ पासून नेपाळने सहा पंतप्रधान पाहिले आणि गेल्या आठवडय़ात पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे. राज्यघटनेचे पुनल्रेखनही झाले, दंगल झाली, गॅस- वीज- पाण्याच्या तुटवडा या साऱ्या समस्यांना नेपाळी जनता सामोरी गेली. नेपाळमधील या साऱ्या घटनांचा केवळ आढावा नव्हे तर कलात्मक आढावा हे प्रदर्शन घेते. कलेच्या माध्यमातून दस्तावेजीकरणाच्याही पलीकडे जाता येते आणि कलेतील दृश्यहेतूही साध्य करता येतो हेच या प्रदर्शनाने दाखवून दिले आहे.
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab