वैशाली चिटणीस
लोकप्रभा दिवाळी २०२०
स्वत:ला शेतीप्रधान देश म्हणवतो तेव्हा त्यामागे कित्येक पिढय़ांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या ज्ञानाचं संचित असतं. त्या पिढय़ांनी निसर्गाला देवत्व बहाल केलं. त्याच्या प्रत्येक हालचालीचं सातत्याने निरीक्षण केलं. त्याला त्याच्या कलाने, गतीने वाढू देण्याएवढा संयम दाखवला. सारं काही इन्स्टन्ट मिळवण्याची घाई करण्यापेक्षा जे आहे ते दीर्घकाळ टिकवण्याएवढं शहाणपण त्यांच्यात होतं. हे शहाणपण आता आपल्या हातून निसटू लागलं आहे. आजच्या समृद्धीसाठी कायमचा कफल्लकपणा ओढवून घेतला जात आहे. अशा स्थितीत, या इन्स्टन्ट जमान्यातही काही गावखेडय़ांत, कडे-कपारींत दडलेल्या आदिवासी पाडय़ांत त्या शहाणपणाच्या खाणाखुणा आजही शिल्लक आहेत. या मातीतलं शुद्ध बियाणं त्या दुर्गम भागांत जपलं जात आहे. जमिनीत रसायनांची भेसळ न करता जुन्याच पद्धतीने वाढवलं जात आहे. शाश्वततेच्या वाटेवरच्या पाईकांविषयी..
आपल्या भागातल्या मिलेट्च्या संदर्भात आपण काहीतरी करायला हवं असं नीलिमा जोरावर यांना वाटायला लागलं. पण नेमकं काय करायचं ते सुरुवातीला लक्षात येत नव्हतं. पण ते उत्तर हळूहळू सापडत गेलं ते कळसूबाईच्या परिसरातल्या जहांगीरदारवाडी या गावात. डोंगरउतारावरची शेती असल्यामुळे इथे पावसात एकदाच पीक घेतलं जातं. भात, नाचणी, वरी यावर त्यांचा भर असला तरी नाचणी त्यांच्या आहारातून गेली होती. त्यामुळे वर्षांतून एकदा येणाऱ्या भात आणि वरीवर ते जगत. त्यातही खाचरात भात पिकवला जाई आणि डोंगरउतारावर वरी. भात घरी खाल्ला जात असे आणि वरी विकली जात असे. पण तिला फारसा भाव मिळत नाही ही इथल्या लोकांची समस्या होती.नीलिमा यांनी जहांगीरदारवाडी गावात जायला सुरुवात केली होती. खरंतर या भागात त्यांना पाणी प्रश्नावर काम करायचं होतं. पण त्याऐवजी शेतीच्या प्रश्नांवरच स्थानिक लोकांशी चर्चा व्हायला लागली. नीलिमा यांच्या पुढाकाराने तिथल्या महिलांचा ‘कळसूबाई महिला शेतकरी बचत गट’ स्थापन करण्यात आला. संेद्रिय शेतीचं महत्त्व त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली. हो-नाही करत करत दोन शेतकरी त्यासाठी तयार झाले. २०१४ मध्ये त्यांनी जुनी बियाणं घेऊन नाचणी, वरी, काळभात, जिरवेल लावायला सुरुवात केली. ते पीक यायला लागलं. पण त्याचा खरा परिणाम जाणवला २०१८ मध्ये. त्या वर्षी या परिसरात भाद्रपदानंतर एक थेंबही पाऊस पडला नाही. हायब्रिड बियाणं, खतं या सगळ्यावर अवलंबून असलेल्यांची सगळी गणितं चुकली. त्यांचं पीक वाळून गेलं. पण पारंपरिक बियाणं लावलेल्यांना मात्र कमी पावसातही ८० टक्के पीक हाताला लागलं. २०१९ मध्ये अती पाऊस झाला. तेव्हाही गावठी भातच तगला.
(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)