त्याचं नाव नोआ स्टायकर. वय अवघं २९ वर्षे. ज्या वयात आपल्याकडे स्थिरस्थावर होण्याची धडपड सुरू असते त्या वयात हा पक्षिवेडा चक्क पाठीवर एक बॅग लटकवून वर्षभरासाठी जगभर फिरला आणि त्याने तब्बल सहा हजारांच्यावर पक्ष्यांच्या नोंदी करून पर्यावरणविषयक दस्तावेजात मोलाची भर घातली आहे. त्याबद्दलचा त्याचा ब्लॉग म्हणजे तर पक्षिवैविध्याचा आरसाच आहे.
सर्वसामान्य जगाने वेडा म्हणावा असा एक ध्यास त्याने घेतला. एका वर्षांत किमान पाच हजार पक्ष्यांच्या प्रजाती पाहायच्या. पाचच का? कारण न थांबता जर प्रवास केला तर किमान इतक्या प्रजाती सहज पाहता येतील असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याआधी तो दक्षिण-उत्तर अमेरिकेत भरपूर भटकला होताच. पण २०१४ मध्ये त्याच्या डोक्यात हे खूळ मूळ धरू लागले. आपल्यासारख्यांना हे खूळच वाटावे अशीच बाब आहे. कारण पक्षी पाहायला जाणे ही संकल्पनाच आपल्याकडे आत्ता कोठे रुजू लागली आहे. पण त्याने हे ठरवले. त्याला अनेकांनी पाठिंबा तर दिला, काही साधनसामग्री आणि अर्थसाहाय्यदेखील मिळाले. परत आल्यानंतरच्या त्या अनुभवावरील पुस्तकाच्या प्रकाशनाची खात्री मिळाली. अर्थात या सर्व व्यावहारिक बाजू झाल्या. पण महत्त्वाचे होता तो जगभरातील पक्षिप्रेमींनी निरीक्षकांनी दिलेला प्रतिसाद. त्याच जोरावर त्याने एक वर्षांत तब्बल ४१ देशांत भटकून सहा हजार ४२ पक्षी प्रजाती पाहिल्या. त्याच नाव नोआ स्ट्रायकर. हा मूळचा अमेरिकेतला. व्यवसायाने लेखक. एका मासिकाचे संपादनाचे काम पाहणारा आणि त्याचं वय अवघं २९ वर्षे.
जगावेगळे काही तरी करायला वेडेच असावे लागते हेच सांगणारा. आणि अशा वेडेपणाला साथ देणारा समाजदेखील असावा लागतो हेच दाखवून देणारी त्याची ही अनोखी भटकंती. पक्षी पाहून तुला काय मिळणार, असा टिपिकल भारतीय व्यावहारिक प्रश्न त्याला त्याच्या देशात कोणीही विचारला नाही. कारण असे पक्ष्यांच्या मागेमागे भटकणे हे तेथे इतके रूढ झालेय की, या संकल्पनेवर ‘बिग इयर’ नावाचा चित्रपटदेखील येऊन गेला आहे.
इंग्लड, अमेरिकेत रुजलेली ‘बिग डे’ ही त्यामागची मूळ संकल्पना. पक्षिनिरीक्षणास अनुकूल असा दिवस निवडाला जातो आणि त्या दिवशी पक्षिप्रेमी त्या एकाच दिवसात जास्तीत जास्त पक्षी पाहण्यासाठी दूरदूपर्यंत जातात. याच संकल्पनेचा विस्तार झाला तो ‘बिग इयर’मध्ये. १९५० पासून २००८ पर्यंतच्या काळात अनेक पक्षिनिरीक्षकांनी यात वेगवेगळे प्रयोग केले. पण सलग एक वर्ष ठरवून जगभरातील पक्षी पाहणारी होती रुथ मिलर आणि अॅलन डेविस ही ब्रिटिश जोडगोळी. २००८ मध्ये त्यांनी तब्बल चार हजार ३४१ पक्षी पाहिले. अर्थात त्यांचा प्रवास हा सलग नव्हता. पुढील प्रवासाच्या जुळणीसाठी व इतर कामासाठी ते मायदेशी यायचे आणि परत पुढे जायचे. नोआने त्याचे ‘बिग इयर’ ठरवले ते न थांबता करण्याचे. अर्थातच पूर्वीपेक्षा अधिक पक्षी त्याला नक्कीच पाहता येणार होते. तसेच झालेदेखील. १६ सप्टेंबरला भारतात असताना त्याने चार हजार ३४१ हा आकडा पार केला. त्याचे उद्दिष्ट पाच हजाराचे होते. ते त्याने २६ ऑक्टोबरला फिलिपाइन्समध्ये पार केले. तरीदेखील तो वर्ष संपेपर्यंत फिरत राहिला. शेवटी पुन्हा भारतात आला. कारण उत्तरपूर्वेकडील राज्यातील काही पक्षी त्याला पाहायचे होते. मूळ उद्दिष्ट हे भरपूर पक्षी पाहायचे होते. विक्रम ही तर केवळ पूरक गोष्ट होती. किंबहुना एखादा स्वच्छंदी पक्षी कसा कोणत्याही सीमांच्या मर्यादेत न अडकता विहरत असतो तसाच हादेखील भटकत होता. ‘बर्डिग विदाऊट बॉर्डर’ हे त्याच्या भटकंतीचे समर्पक नाव सार्थ करणारीच त्याची ही भटकंती होती.
अंटाकर्ि्टकाहून सुरू झालेला त्याचा हा प्रवास असंख्य घटनांनी, व्यक्तींनी आणि अनेक रोमांचक अनुभवांनी भरलेला आहे. दर दिवशी नवा प्रदेश, नवी माणसे आणि अर्थातच नवे पक्षी. जेथे जेथे जे काही मिळेल ते खायचे, जे प्रवासाचे साधन असेल ते वापरायचे, जेथे जागा मिळेल तेथे पाठ टेकायची अशी त्याची धारणा. शरीराचे आणि मनाचे उगा चोचले पुरवायचे नाही हेच त्याच्या यशाचे गमक म्हणावे लागेल. त्याची एकंदरीतच घडण अशी झाली होती की अक्षरश: एका पाठपिशवीतच त्याचे सारे बिऱ्हाड सामावले होते. सुविधांच्या कमतरतेत त्याला लक्ष आणि वेळ घालवायचा नव्हता.
नोआचा एकंदरीतच हा वर्षभराचा प्रवास पाहिल्यावर त्याचा सर्वात रोमांचक अनुभव कोणता, इतक्या पक्ष्यांमधून आवडलेला पक्षी कोणता वगैरे प्रश्न म्हणजे एका अनुभवाने किंवा एका पक्ष्याने दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखे आहे. प्रत्येक दिवस हा नवा होता हे त्याच्या ब्लॉगवरून अगदी स्पष्टपणे जाणवते. त्याच्या या जगप्रवासाची अत्यंत सोप्या भाषेत त्याने मांडणी केलेली आहे.
हा ब्लॉग वाचल्यावर काही गोष्टी मात्र अगदी ठळकपणे उठून दिसतात. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पक्षिप्रेमींनी त्याला केलेली मदत. त्याचे हे बिग इयर त्यांच्याच पायावर उभे आहे. त्यासाठी २०१४ मध्ये तब्बल चार महिने त्याने केवळ नियोजनात घालवले होते. कोणत्या भागात कोणते पक्षी आढळतील. त्यातही नेमका कालावधी कोणता, स्थानिक पक्षिनिरीक्षक कोण हे सारे त्याने या चार महिन्यांत नोंदवले. जगभरातील पक्षिनिरीक्षकांचे इंटरनेटवर असणारे जाळ त्याच्या कामी आले. त्यामुळे अगदीच नैसर्गिक अथवा भौगोलिक अडचणी आल्या तेव्हाच त्याचे प्रवासाचे वेळापत्रक थोडे पुढे-मागे करावे लागले.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पक्षिनिरीक्षकांचे उल्लेख. जगभरातील शंभरहून अधिक नावे त्याच्या नोंदीत दिसतात. त्यांनी केलेली मदतीचा स्पष्ट उल्लेख दिसतो. त्याबाबतचा युगांडातील अनुभव खूप काही सांगणारा आहे. तो आणि त्याचा जोडीदार जेव्हा रुहीजाजवळील गवताळ जंगलात पोहचले तेव्हा इमोस हा स्थानिक मार्गदर्शक एका झाडाकडे टक लावून पाहत होता. त्या झाडाच्या टोकावर एक पक्षी बसलाय असे त्याने नोआला खुणेनेच सांगितले. उघडय़ा डोळ्यांनी तर काहीच दिसत नव्हते. नोआने बायनाक्यूलर डोळ्याला लावून फोकस करण्याचा प्रयत्न केला तरी नीटसे दिसत नव्हते. आणि क्षणभरात त्याला हालचाल जाणवली. पानाच्या आकाराचा, पानासारखाचा दिसणारा ग्रॉउर्स ब्रॉडबिल
(Grauer’s Broadbill) त्याला दिसला. लिंबासारखा हिरवट असा तीन इंचांचा हा पक्षी झाडाच्या टोकावर बसतो. फारसा हालचाल करत नाही. त्याचा आवाजदेखील ऐकू येईल न येईल असा असतो. नोआ म्हणतो की, हा पक्षी शोधण्यासाठी कधी कधी तुम्हाला अनेक महिनेदेखील लागू शकतात, इतके त्याचे अस्तित्व न जाणवणारे असते. हा पाहायला मिळणे हा केवळ नशिबाचाच भाग म्हणावे लागेल. केवळ स्थानिक मार्गदर्शकामुळे हे होऊ शकले. त्या दिवसाच्या फोटोची कॅप्शनदेखील परिच्छेदाएवढी दिली आहे. त्यात तो म्हणतो की, तुम्ही जर या छायाचित्रातील पक्षी ओळखून शकलात तर नक्कीच तज्ज्ञ म्हणवून घेऊ शकता.
या जगभरातील जाळ्याचा दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा होता तो म्हणजे त्याच्या एकंदरीतच खर्चात झालेली बचत. ४१ देशांतील भटकंतीला केवळ ६० हजार अमेरिकन डॉलर्स खर्चावे लागले.
जागतिक विक्रम वगैरे गोष्टी तर झाल्याच, पण दोन महत्त्वाच्या गोष्टींची या निमित्ताने विशेष दखल घ्यावी लागेल. एक म्हणजे नोंदीचे अद्ययावतीकरण आणि पक्षिनिरीक्षणातील सध्याची जगभरातील परिस्थिती. जगभरातील पक्ष्यांच्या नोंदी असणारी अनेक पुस्तके सध्या आहेत. पण आजची नेमकी स्थिती नोआच्या भटकंतीमुळे अधोरेखित होत गेली. एखाद्या पक्ष्याचे अस्तित्व नोंदलेले असायचे पण त्याचे छायाचित्र नसायचे. तर एखाद्या पक्ष्याची अलीकडच्या काळातील नोंद नसायची. हे सारं त्याच्या भटकंतीमुळे पुन्हा एकदा कागदावर आले. त्याचे अगदी समपर्क उदाहरण भारतातच दिसून आले ते ओरिएंटल बे आऊल या पक्ष्याबाबत. ३१ डिसेंबरच्या सूर्यास्ताच्या वेळी त्याला दिसलेला सिल्व्हर ब्रेस्टेड ब्रॉडबिल हा सहा हजार ४२ वा होता. त्याचे बिग ईअर संपलेले होते. त्याच वेळी त्याला ओरिएंटल बे आऊल आढळला. हा पक्षी त्याने इंडोनेशियात पाहिला होता. पण येथे तो दिसल्यावर जाता जाता त्याचे छायाचित्र घेतले. त्याचे हेच छायाचित्र कदाचित भारतातील या पक्ष्याचे पहिलेच छायाचित्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याच्या भटकंतीने दस्तऐवजीकरणात अशा अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टींची भर घातली आहे. आणि हे सारे त्याने अगदी बैजवार लिहून ठेवले आहे. तेदेखील स्वत:पुरते गुपित म्हणून नाही तर ‘ई-बर्ड’ या पक्ष्यांच्या चेकलिस्टबाबत जगातील सर्वात मोठी चेकलिस्ट असणाऱ्या वेबसाइटवर. या वेबसाइटचा आधार जगभरातील तज्ज्ञ घेत असतात. पक्षिनिरीक्षण संपल्या संपल्याच तो अॅपच्या माध्यमातून हे सारे काम पुरे करत असे. त्याच्या प्रवासाचे हेच महत्त्वाचे फलित म्हणावे लागेल.
त्याच्या भटकंतीचा दुसरा फायदा म्हणजे सहाही खंडांतील पक्षिनिरीक्षकांच्या जाळ्याचे एकत्रीकरण. प्रत्येक प्रदेशातील पक्षिनिरीक्षकांची मानसिकता आणि त्याची प्रगती अशा अनेक गोष्टी त्याच्या भटकंतीत नोंदल्या गेल्या आहेत. आपल्याबाबत बोलायचे तर काहीशी खेदाची बाब म्हणावी लागेल अशी नोंद त्याने केली आहे. तो म्हणतो की अशियातील पक्षिनिरीक्षकांना पक्षी पाहण्यापेक्षा त्याचा फोटो काढण्यात अधिक स्वारस्य आहे. किंबहुना फोटो काढला नसेल तर आपण हा पक्षी पाहिलाच नाही की काय असे त्यांना वाटू लागते. डोळ्यांना दुर्बीण लावून पक्ष्याची वर्तणूक अभ्यासावी हा पक्षिनिरीक्षणातला मूळ उद्देश त्यामुळे काहीसा बाजूला पडतोय की काय असे तो लिहतो. नोआचे कौतुक करताना हा मुद्दा आपल्याकडच्या पक्षिनिरीक्षकांना ध्यान्यात घ्यावा लागेल हे नक्कीच.
हल्ली आपल्याकडे हळूहळू का होईना पक्षिनिरीक्षणाचं वेड रुजत चाललय. नोआ जगभरात भटकत होता तेव्हा भारतात शशांक दळवी हा त्याचं बिग ईअर देशांतर्गत साजर करत होता. २०१५ मध्ये त्याने ००००????? पक्षी पाहिले आहेत. दोघेही बिग ईअर संपल्यावर मुंबईत एकमेकांना भेटले. बिग ईअर संपले असले तरी नोआला फॉरेस्ट आउलेट पाहायचा होता. त्यासाठी तानसा अभयारण्यात दोघेही दिवसभर भटकले. नोआचा हा सगळा विक्रमी प्रवास वगैरे ठिकाय, पण आपण काय घ्यायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या विक्रमाची गिनिज बुक वगैरेमध्ये नोंद होणार नाही. पण त्यातून पक्षी पाहण्याला चालना मिळणार आहे. अगदी बिग ईअरसारखा विक्रम नाही, पण निदान या दोघांच्या वेडेपणामुळे आपल्या देशात पक्षिनिरीक्षण म्हणजे केवळ उनाड भटकंती नाही इतपत जरी समज आली तरी खूप झाले.
(छायाचित्र सौजन्य: https://www.audubon.org/features/birding-without-borders)
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @joshisuhas2