आ गया नॉडी.. नॉडी, आओ हम सब खेले..
संध्याकाळी शिकस्त्याप्रमाणे कार्टून नेटवर्क लावल्यावर हे गाणं सुरू व्हायचं आणि पिवळ्याधम्मक विमानातून उडत येणारा गोल चेहऱ्याचा गोंडस मुलगा यायचा. तो गाडीतून गावभर प्रत्येकाला त्यांची कुरिअर्स देतो आणि घरी येताच त्याच्यासमोर अख्खं गाव त्याच्या बर्थडेला जमलेलं असतं. त्यांच्या हातात त्यानेच वाटलेली कुरिअर्स, त्याचीच गिफ्ट्स म्हणून. अशा बर्थडे सरप्राइजची प्रत्येक जण वाट पाहत असतो. त्यामुळे अगदी टायटल ट्रॅकपासूनच नॉडी समोरच्याला जिंकायचा.
‘टॉय टाऊन का एक और सुहाना दिन’ असं म्हणत रोज त्याच्या गोष्टीची सुरुवात व्हायची. ‘मेक वे फॉर नॉडी’ या नावावरूनच हे कार्टून या मुलावर आहे, याचा अंदाज येतो. पण हा मुलगा बेन टेनसारखा हिरो नाही, ना त्याच्याकडे भीमसारखी कोणती सुपरपॉवर. ना तो मास्कसारखा जोकर आहे ना जॉनी ब्राव्होप्रमाणे स्वत:ची फजिती करतो. टॉम जेरीप्रमाणे खोडय़ा काढणारा जोडीदारही नाही त्याला. उलट तो गुणी मुलगा आहे. सगळ्यांना मदत करणारा, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, आनंद देणारा. थोडक्यात सांगायचं झालं तर, शिनचॅनच्या अगदी उलट आणि आईबाबांच्या मनातील ‘आपली पोरं कशी असावी’ या प्रतिमेला साजेसा. पण तरीही बच्चेकंपनीचा लाडका.
हे अजब रसायन जुळलं कारण, नॉडीचा भोळेपणा हाच त्याचा प्लस पॉइंट. त्याचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो त्याचा भलामोठा गोल चेहरा आणि डोक्यावरची त्रिकोणी निळी टोपी. वाऱ्याची मोठी झुळूक आली किंवा गाडीला अचानक ब्रेक दिल्यावर हिसक्यात त्याचं डोकं जोरात हलायचं आणि टोपीला लागलेला घुंगरू वाजायला लागायचा. मग हातांनी धरून डोकं थांबवायला लागायचं. मुळात तो लहान असूनही गाडी चालवायचा, याचं बच्चे कंपनीला जास्त कुतूहल होतं. त्याच्यामुळे लहानपणीच कित्येकांना आपण गाडी चालवू शकतो असं वाटू लागलेलं. मोडकीतोडकी का होईना कविता पण करायचा आणि वाढदिवसापासून ते घरात झालेली चोरी शोधताना प्रत्येक निमित्तासाठी ऑन द स्पॉट कविता करायचा. इतका समंजस, मनमिळाऊ मुलगा अर्थातच गावाचा लाडका असणार.
बरं, गावाचं नाव टॉय टाऊन. त्यामुळे जिकडेतिकडे पाहावं तिथे खेळण्यातली घरं आणि तशीच माणसं. नॉडीचं घर लिडोमध्ये बनविल्यासारखं. बिग इअरचं जंगलात आहे म्हणून मशरूमच्या आकारातलं. पोलीस चौकीचा आकार पोलिसांच्या लांबट टोपीसारखा आणि गॅरेजला आकार एका गाडीचा. त्यामुळे काही गोंधळच नको. दिसायला छान आणि ओळखायला सोप्पं. याची मित्रमंडळी आणि गावकरीसुद्धा तितकेच भन्नाट. मोठय़ा कानाचे बिग इअर नॉडीला आजोबांच्या जागी. काहीही अडचण आली की तो पहिल्यांदा त्यांना गाठतो. वक्तशीर, नियमांनुसार चालणारे पोलीसकाका मि. प्लॉड आणि कोणत्याही समस्येचं उत्तर असणारे मेकॅनिक मि. स्पार्क ही गावातली जुनीजाणती आणि मोठी मंडळी. कुकीज बनवणारी टेसी बिअर नॉडीची जिवलग मैत्रीण. डायना डॉल म्हणजे गावातली जुगाडू. तिच्या खेळण्यांच्या दुकानात सगळ्या गोष्टी मिळतात. मास्टर टब्बी आणि मार्था मंकी ही खोडकर जोडगोळी आणि पायाच्या जागी गोलाकार अंडय़ासारखा भाग असलेले मि. वॉब्लीमॅन हे त्यांचे ठरलेले टार्गेट. आइस्क्रीम शॉपची मालकीण मिस पिंक कॅट गावातली सर्वात स्टायलिश, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. गॉबी आणि शाय हे खरंतर व्हिलन पण त्यांची फसगत पाहून कोणालाही त्यांची दया येईल असे.
नॉडी गोड बोलून औषधाची गोळी द्यायचा. कोणाशी भांडू नये, मस्करी करू नये. कोणाला त्रास होईल असं वागू नये. मोठय़ांशी कसं वागावं, इतरांना मदत करावी हे धडे तो द्यायचा, अगदी सहज गमतीने, गोष्टी सांगत. त्याच्या वागण्यामधून, चुकांमधून. त्यामुळे मुलांना या गोष्टी सहजच समजून जायच्या आणि नॉडीमुळे आपली मुलं छान वागताहेत म्हणून आईबाबा पण खूश. त्यामुळे नॉडी घराघरात लाडका होता. आता नॉडी टीव्हीवर भेटत नाही. पण इंटरनेट आहेच ना. कधी तरी यूटय़ुबवर नॉडीचा एपिसोड शोधा. तुम्हीही म्हणाल,
‘आओ सब झुमे सब नाचे, है सुहाना दिन, नॉडी आया उसे मिले..’
मृणाल भगत