सुनीता कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ या कादंबरीमध्ये पांडुरंग सांगवीकर आणि त्याचा मित्र सुरेश एक खेळ खेळतात. आजपासून हजारो वर्षांनी उत्खनन झाले तर जे अवशेष सापडतील ते बघून तेव्हाचे लोक आजच्या जीवनाविषयी काय बोलतील असा ‘भविष्यातल्या इतिहासा’ची मांडणी करण्याचा खेळ असतो तो.

आपण सगळेचजण गेला दीड महिना टाळेबंदीमुळे घरी बसून आहोत.

त्या आधीचा काळ कसा होता…

दळणवळणाच्या, संवादाच्या वेगवान साधनांमुळे गेली काही वर्षे सगळ्यांनाच वर्ष महिन्यासारखं संपतं, महिना आठवड्यासारखा संपतो, आठवडा दिवसासारखा संपतो आणि दिवस तर कधी संपतो कळतच नाही, असं वाटायचं.

आणि अचानक करोनानं सगळं ठप्प करून टाकलं.

आता आपण पांडुरंग सांगवीकरच्या उलटा खेळ खेळून बघू या, तो म्हणजे कोणे एके काळी (म्हणजे अर्थात दीड महिन्यापूर्वी. आता तो काळही पंधरा वर्षे जुना झाल्यासारखा वाटायला लागला आहे)

तर कोणे एके काळी…

  • कोणे एके काळी सगळे लोक आपापली वाहनं घेऊन घराबाहेर पडायचे. तेव्हा वाहनं एकमेकांसमोर अडून ‘ट्रॅफिक जॅम’ नावाचा प्रकार व्हायचा. त्याच्या सारख्या बातम्या दिल्या जायच्या.
  • कोणे एके काळी लोक घरातून बाहेर पडून ‘ऑफिस’ नावाच्या ठिकाणी जाऊन काम करायचे. त्यासाठी त्यांना पगार मिळायचा.
  • कोणे एके काळी ‘सुट्टी’ नावाचा प्रकार होता. तेव्हा लोक ऑफिसला न जाता घरीच थांबायचे.
  • कोणे एके काळी लोक घराबाहेर पडले की एकमेकांना बघता क्षणी ओळखायचे. उलट मुखपट्ट्यांनी चेहरा झाकून फिरणाऱ्यांकडे तेव्हा संशयित म्हणून बघितले जायचे.
  • कोणे एके काळी लोक एकमेकांना भेटायचे तेव्हा हस्तांदोलन करायचे. अधिक जवळीक असेल तर घट्ट मिठ्या मारायचे.
  • कोणे एके काळी मुंबईत लोकल ट्रेन चालायच्या आणि त्यांच्यामध्ये मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही अशी खचाखच गर्दी असायची…
  • कोणे एके काळी विकेण्डना मॉलमध्ये गर्दी कशी आवरायची हा प्रश्न असायचा.
  • कोणे एके काळी सहज घराबाहेर पडलं तरी सहज शंभर दोनशे माणसं दिसायची.
  • कोणे एके काळी लोक हॉटेलमध्ये जेवायला जायचे. त्यासाठी रांगा लावून उभे रहायचे.
  • कोणे एके काळी घराघरातल्या मुलांना सारखं ऑनलाइन राहिलात तर अभ्यास कधी करणार असं विचारलं जायचं.
  • कोणे एके काळी लोक सुट्ट्या घेऊन आपल्या गावातून दुसऱ्या गावी, आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात, आपल्या देशातून दुसऱ्या देशात फिरायला जायचे. त्याला ‘पर्यटन’ म्हणायचे.

असं आहे ‘कोणे एके काळी’ हे प्रकरण…

तेव्हा घ्या आता चॅलेंज आणि करा तुमची पण ‘कोणे एके काळी’ची यादी…

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once upon a time article of lokprabha aau