प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com
मे महिन्याची सुट्टी लागली आणि स्नेहा आजीची नातवंडे तिच्याकडे पोहोचलीदेखील. आजीचे घर म्हणजे नुसती धमाल मस्ती, खाण्यापिण्याची चंगळ व हवे तसे बागडण्याची परवानगी; नाही म्हणायला एकच वैतागवाडी व ती म्हणजे खेळासोबतच सुट्टीतील अभ्यास देखील पूर्ण करण्याची सक्ती. आज सौमित्र शाळेतल्या टीचरने दिलेला अभ्यास करत होता. स्नेहा आजीचे सौमित्रवर बारीक लक्ष होते; तिने पाहिले की सौमित्र एक गणित करत असताना अडखळत होता. आजीने लगेच सौमित्रला ते गणित सोडवायला एक युक्ती सांगितली; पण झाले उलटेच. सौमित्र आजीला म्हणाला, ‘आजी असे थोडेच सोडवतात गणित; आमच्या टीचरची पद्धत वेगळी आहे व तीच बरोबर आहे.’ स्नेहा आजी मिश्किल हसली; तिला हे अभिप्रेतच होते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक उमटली, या वर्षीच्या मे महिन्यातील टास्क तिला आयतेच मिळाले होते.
दुपारच्या जेवणानंतर आजीने सौमित्र, अनन्या, सोनाक्षी, अवनी, सार्थक अशा सगळ्या नातवंडांना गोळा केले. स्नेहा आजीने नेहमीप्रमाणे गोष्ट सांगायला सुरुवात केली, ‘एकदा अकबर बादशाहच्या दरबारात एक मूíतकार आला, त्याच्याकडे एक सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती होत्या.’ त्यावर सोनाक्षी उसळून म्हणाली, ‘आजी हे काय गं! ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. बिरबलाने तीन तारा घेतल्या मग त्याने त्या तिन्ही मूर्तीच्या कानांत तारा घातल्या. पहिल्या मूर्तीमध्ये कानातून आत घातलेली तार तोंडातून बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीमध्ये एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीमध्ये कानातून घातलेली तार मूर्तीच्या पोटात पोहोचली व ती बाहेर आलीच नाही. त्यामुळे पहिली मूर्ती कनिष्ठ कारण ही मूर्ती अशा लोकांचे प्रतीक आहे जी कोणतेही रहस्य दडवू शकत नाहीत. अशा लोकांना महत्त्वाची रहस्ये सांगितल्यास सांगणाराच गोत्यात येऊ शकतो. दुसरी मूर्ती मध्यम कारण अशी मूर्ती अशा लोकांचे प्रतिनिधित्व करते जे कोणत्याही गोष्टी लक्षपूर्वक ऐकतच नाहीत. ते एका कानाने ऐकतात व दुसऱ्याने सोडून देतात; अशा लोकांना काही महत्त्वाचे सांगून उपयोग देखील नसतो. तिसरी मूर्ती सरस कारण या मूर्तीप्रमाणे असणारी माणसे, सर्व विश्वाची रहस्ये आपल्या पोटात साठवून ठेवतात. अशी माणसे विश्वासपात्र असतात कारण कोणत्याही गोपनीय गोष्टीची वाच्यता त्यांच्याकडून होत नाही.’ स्नेहा आजीला सोनाक्षीचे कौतुक वाटले पण मुलांकडे बघून ती म्हणाली, ‘नाही बुवा, मला हे पटत नाही. माझ्या मते पहिली मूर्ती मध्यम, दुसरी कनिष्ठ व तिसरी सरस आहे.’ सार्थक उपहासाने म्हणाला, ‘बघा रे, आता आपली आजी बिरबलापेक्षा स्वत:ला हुशार समजायला लागली आहे.’
आजी म्हणाली, ‘ऐका तर खरं, आपण सर्वप्रथम दुसरी मूर्ती पाहू, ती अशा लोकांचे प्रतिनिधित्व करते ज्या लोकांना कितीही ज्ञान द्या, यांचे आपले पालथ्या घडय़ावर पाणी, एका कानाने ऐकायचे व ते ज्ञान ग्रहण न करताच दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. हे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता असा प्रकार. आता तिसरी मूर्ती पाहू; मला सांगा तुम्हाला जर कोणी नवीन ज्ञान दिले व ते तुम्ही स्वत: जवळच ठेवले तर दुसऱ्यांना त्याचा काय बरं उपयोग! तुम्ही चहूबाजूने ज्ञान गोळा करत असाल व स्वत: जवळचे ज्ञान मात्र इतरांना देत नसाल तर तुमच्यासारखे स्वार्थी तुम्हीच. आता पहिली मूर्ती पाहू. ही मूर्ती अशा लोकांचे प्रतिनिधित्व करते जे लोक इतरांकडून ज्ञान श्रवण करतात व त्याला आपल्या विचारशक्तीची जोड देऊन तेच ज्ञान इतरांना नवीन स्वरूपात वाटतात. असे लोक ज्ञानावर सर्वाचा हक्क असतो या विचारांचे असतात व त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करायला मनापासून आवडत असते.’
नातवंडांनी हे ऐकले मात्र त्यांना आपली आजी म्हणजे अचानक बिरबलाची पण आजी वाटू लागली. स्नेहा आजी म्हणाली, ‘आज मी तुम्हाला एकांगी विचार करणे कसे सोडून द्यायचे व ‘चेंज ऑफ माइण्डसेट’ कसे करायचे हे शिकविणार आहे.’ स्नेहा आजीने पुढचा प्रश्न विचारला, ‘मुलांनो काळा रंग चांगला की पांढरा?’ अनन्या म्हणाली, ‘आजी, पांढरा चांगला अन काळा वाईट ना गं! कारण आपण म्हणतो ना अमक्या तमक्याने खडतर मेहनतीने धवल यश प्राप्त केले, याउलट काळा पसा, काळी जादू, काळा दिवस, एकाद्या व्यक्तीची काळी बाजू असे सर्व शब्द वाईट गोष्टींकडे बोट दाखवितात.’ त्यावर सौमित्र म्हणाला, ‘आपली आजी काय वेडी आहे असा सरळसोट प्रश्न विचारायला, नक्कीच काही तरी गोम आहे या प्रश्नात.’ क्षणभर विचार करून सौमित्र म्हणाला, ‘आपला देश कृषिप्रधान देश आहे, या देशाला काळ्या ढगांची आवश्यकता असते; कारण तेच तर पाऊस आणतात. काळे ढग नुसते असून काय फायदा?; काळीभोर सुपीक माती असेल तरच पिके बहरणार ना!’ स्नेहा आजी म्हणाली, ‘बरोबर, पण आता पांढरा रंग वाईट हे कसे सिद्ध कराल?’ त्यावर सार्थक म्हणाला, ‘माझी मावशी, तिने डोक्यात पांढरा केस काय पाहिला एकदम, ‘अरे बापरे’ मी म्हातारी म्हणून किंचाळलीच’; त्याच्या म्हणण्याला दुजोरा देताना सोनाक्षी म्हणाली,‘अंगावर पांढरे कोड आले की त्या बिचाऱ्या माणसाला काही जण झिडकारतात. पांढरा कागद म्हणजे सगळे कसे सुनेसुने, नो क्रिएटिव्हिटी; म्हणूनच तर गाणे आहे, ना मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया.’
स्नेहा आजी म्हणाली, ‘सौमित्र, तुझ्या बाबाने आताच नवीन गाडी घेतली आहे ना; त्यात ब्रेक आणि एक्सलेटर असतात, बरोबर? मग मला सांग यातील पॉझिटिव्ह व निगेटिव्ह गोष्ट कोणती?’ सौमित्र म्हणाला, ‘एक्सलेटरमुळे गाडी जोरात पळवता येते तर चालत्या गाडीला खीळ बसते ते ब्रेक्समुळे. त्यामुळे ब्रेक्स नेगेटिव्ह; बरोबर ना!’ आजी म्हणाली, ‘आता दुसऱ्या बाजूने विचार करून बघ.’ सौमित्र म्हणाला, ‘एक्सलेटर जोरात दाबला तर अतिवेगामुळे अपघात होऊ शकतात तर ब्रेक्समुळे अपघात होण्यापासून आपण वाचू शकतो. ब्रेक असतो म्हणून तर आपल्याला एक्सलेटर दाबण्याचे स्वातंत्र्य जोपासता येते; त्यामुळे ब्रेक्स पॉझिटिव्ह. ब्रेक्स म्हणजे संयम तर एक्सलेटर म्हणजे भावनेचा अतिरेक.’ स्नेहा आजीने विषयाचा शेवट करताना मुलांना श्रीखंडवडी देत म्हटले, ‘आयुष्य हे चढउतारांनी भरलेले असते. चढ म्हणजे दमछाक तर उतार म्हणजे आरामदायक वाटचाल असा सर्वसाधारण समज असतो; पण जोवर आपण डोंगरमाथा चढत नाही तोपर्यंत सुंदर दऱ्याखोऱ्यांचं दर्शन आपल्याला घडत नाही. तर उतारावर चालत असताना तोल जाऊन पडण्याची भीती असते; तेव्हा आजच्या कथेचे सार काय ‘चेंज युवर माइण्डसेट.’
सौमित्रच्या डोक्यात आता खऱ्या अर्थाने प्रकाश पडला होता; तो स्नेहा आजीला म्हणाला, ‘आजी माझे चुकले. टीचर शिकवितात तेच बरोबर बाकी सर्व चुकीचे हा विचार एकांगी आहे हे मला पटले; आणि म्हणून तू आज हे सर्व सांगितलेस ना!’ स्नेहा आजीने फक्त एक मोहक हास्य देत सर्व नातवंडांना आपल्या कुशीत घेतले.