‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन’ असं म्हणणारी टू व्हीलरच्या जाहिरातीतली खटय़ाळ तरुणी आजच्या तरुणींचं मूर्तिमंत प्रतीक आहे. कारण आजच्या मुली एकटीने किंवा मुलीमुलींनीच कसं जायचं असा विचार न करता मस्तपैकी पर्यटनाला निघतात. झक्कास हुंदडतात. जग पाहतात. आपल्याला हवं तसं जगण्याचा आनंद मिळवणं हे त्यांच्या या स्वच्छंद भटकंतीचं इंगित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळा संपली की तिथला ग्रुप काहीसा दुरावतो. गॅ्रज्युएशन झालं की करिअरच्या गंभीर वाटेवर सगळे चालू लागतात. नोकरीच्या ट्रॅकवर गाडी सुरळीत सुरू झाली की, मग पुन्हा हे दुरावलेले मित्रमंडळ व्हॉट्सअ‍ॅपमुळे, ‘स्कूल बडीज्’, ‘फ्रेण्ड्स फॉरेव्हर’, ‘बेस्टीज्’, ‘गर्ल्स पॉवर’ या ग्रुप्समुळे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात येतात. यातही पुन्हा तरुणी आणि महिलावर्गाचे ग्रुप वेगळे असतात. त्यांच्या चर्चामध्ये सध्या नंबर वनवर चर्चा आहे ती ‘गर्ल्स स्टे आऊटिंगची’. म्हणजे दोन-चार दिवस कुठेतरी फिरायला जायची. रोजच्या कामाच्या ताणातून किमान एक उनाड दिवस मिळावा असं सगळ्यांनाच वाटतं. पण, आता या एका उनाड दिवसाचे किमान तीन उनाड दिवस झाले आहेत. घरापासून लांब शांत, निवांत ठिकाणी धमाल करणे, फिरणे या सगळ्यासाठी मुली आता ठरवून हव्या त्या ठिकाणी किमान तीन-चार दिवस राहण्याचाच प्लॅन करतात. ‘गर्ल्स स्टे आऊटिंग’चा हा ट्रेण्ड सध्या वाढतोय.

नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने काही मुली दुसऱ्या शहरात राहत असतात. त्यांचं त्यांच्या मैत्रिणींना भेटणं फारसं होत नाही. त्या प्रत्येकीच्या नोकरीचं वेळापत्रक वेगळं असल्यामुळे बाहेर जाण्याचं प्लॅनिंगही फारसं करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा काही दिवस सुट्टी असूनही त्यांच्या भेटीगाठी शक्य होत नाहीत. पण, यावर अवनी वेले आणि तिच्या मैत्रिणींनी उत्तम पर्याय शोधला होता. मूळची पुण्याची असलेली अवनी आता नोकरीनिमित्ताने दिल्लीत राहते. तिच्या सगळ्या मैत्रिणी मुंबई-पुण्यात राहतात. पण, त्यांना भेटायचं तर होतं. त्यांनी एक भन्नाट प्लॅन केला. अवनी सांगते, ‘मी दिल्लीत आणि माझ्या मैत्रिणी मुंबई-पुण्यात. त्यामुळे आमचं भेटणं फारच कमी असतं. मागच्या वर्षी एकदा वीकेण्डला जोडून सलग काही दिवस सुट्टी होती. त्यामुळे या सुट्टीत भेटायचं असं आम्ही ठरवलेलं. सुट्टी असली की साधारणपणे मी पुण्याला जाते. मुंबईची एक आणि पुण्याच्या दोन मैत्रिणी असं आम्ही पुण्यातच भेटतो. त्याच-त्याच ठिकाणी जायचा कंटाळा आला होता. त्यामुळे त्या सुट्टीत त्या तिघी दिल्लीत माझ्या घरी येतील आणि आम्ही तिथे काही ठिकाणी फिरू असं ठरवलं. त्या दिल्लीत माझ्या घरीच आल्यामुळे त्यांच्या राहण्याचा खर्च वाचला. आग्रा, दिल्ली, वृंदावन अशा ठिकाणी आम्ही फिरलो.’

कॉलेज संपल्यानंतर मैत्रिणींच्या भेटीगाठी कमी होतात. रोजच्या रुटीनमधून थोडी विश्रांती मिळावी यासाठी वेळ काढून आता तरुणी बाहेर फिरायला जाण्याचं ठरवतात. कधी मोठा ग्रुप असतो तर कधी अगदी दोघीच असतात. ऑफिसला जायचं नाही, कोणाचे फोन घ्यायचे नाहीत, कोणाशी कामासंबंधित बोलायचंही नाही; हा आनंद अनुभवण्यासाठी तरुण मुली घरापासून लांब मैत्रिणींच्या सहवासात काही दिवस मजेत घालवतात. खूप दिवसांनी भेटलेल्या या मैत्रिणींच्या गप्पांना पूर्णविरामच नसतो. निवांतपणा अनुभवत त्या भरपूर एकमेकींसोबतच्या आठवणी जमा करत असतात. कधीकधी अशा आऊटिंगला काहीतरी निमित्त ठरतं. अमृता कुलकर्णीचा अनुभव तसाच आहे. ‘आमच्या एका मैत्रिणीचं लग्न ओझरमध्ये होतं. त्याच दरम्यान आम्ही फिरायला जाण्याबद्दल ठरवत होतो. त्यावेळी ओझरचं लग्न आटपून तिथेच फिरू या असं ठरलं. ओझरमध्ये एका गावात राहिलो. शेती, नदी, तलाव, हिरवळ अशा निसर्गाच्या सान्निध्यातला शांत-निवांत अनुभव आनंददायी होता. नवीन ठिकाण बघायचंय असं न ठरवता निसर्गाच्या सहवासात वेळ घालवणं आम्हाला पसंत होतं. म्हणून गावातल्या त्या दिवसांत आम्ही सहा जणींनी खूप धमाल केली’, अमृता सांगते.

मुली-मुलीच राहायला जाणार आहेत, हे कळल्यावर घरचे सदस्य वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचे. बऱ्याच मोठय़ा चौकशी सत्रानंतर काहींनाच होकार मिळायचा. आजही हे सत्र होतंच. कोणासोबत जाताय, बाकीच्यांचे फोन नंबर्स, कुठे जाताय, आजूबाजूला काय आहे वगैरे चौकशी आजही होते. पण, आजच्या तरुणींना आऊटिंगसाठी पटकन नकार मिळत नाहीत. आजचे पालकही त्यांच्या मुलींशी आता मोकळेपणाने वागतात, बोलतात. त्यामुळे आज मुलींना ‘मी चार दिवस मैत्रिणींसोबत अमुक ठिकाणी राहायला जातेय’ असं सांगणं फारसं जड जात नाही. पालकांसाठी कोणत्या मैत्रिणींसोबत आहात हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. शाळेतल्या खूप वर्षांची मैत्री असलेल्या मुलीसोबत आपली मुलगी जात असेल तर त्यांची हरकत नसते. कारण त्या मुलीला ते पालक खूप र्वष ओळखत असतात. अलीकडे झालेल्या मैत्रिणीसोबत असं आऊटिंग ठरलं तर मात्र पालक परवानगी मिळत नाही. रीमा जोशी याबद्दल सांगते, ‘साधारण सात-आठ वर्षांपूर्वी मी आणि माझ्या तीन मैत्रिणी तळेगावला गेलो होतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तळेगावला एका मैत्रिणीच्या घरीच आम्ही रहायला गेलो होतो. तिच्याकडे जाण्याआधी आम्हा प्रत्येकीच्या घरच्यांनी काळजीपोटी सगळी चौकशी केली होती. त्यानंतरच आम्हाला परवानगी दिली होती. तळेगावला जाणं सोपंही आणि स्वस्तही म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं. गप्पा मारणं, फिरणं, खाणं अशी खूप धमाल केली.’ काही वर्षांपूर्वी मुलीने एक रात्र बाहेर राहणं म्हणजे घरातल्यांना काळजी असायची. आताही असते. पण, आता मुलींच्या बाहेर राहण्याकडे समजूतदारपणे आणि विश्वासाने बघितलं जातंय. ही शहरी भागातील स्थिती. शहरातही सगळीकडे असाच दृष्टिकोन आहे असं नाही. काही घरांमध्ये आजही मुलींना मुलींसोबतही राहायला पाठवलं जात नाही. पण, याचं प्रमाण थोडं कमी आहे. आता मुली शिकतात. चार ठिकाणी वावरल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास आलेला असतो. तसंच त्या आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबीही असतात. त्यामुळे घरच्यांकडून परवानगी मिळणं आता काहीसं सोपं जातं. हा सकारात्मक बदल स्वागतार्ह आहे.

मुली नवीन ठिकाणी फिरायला जातात त्यांना अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. राहाण्याचं ठिकाण, तिथे फिरायला जाण्यासाठी लागणारी कार आणि त्याचा ड्रायव्हर या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. अवनी आणि तिच्या मैत्रिणींना आग्य्राला जाताना एका कारची गरज होती. त्यावेळी त्या कारचा ड्रायव्हर तिच्या वडिलांच्या ओळखीचा होता, असं ती सांगते. हॉटेल आणि कारचा ड्रायव्हर या बाबतीत अतिशय काळजी घ्यावी लागते, असंही तिचं म्हणणं आहे. तसंच अमृताचंही म्हणणं आहे. ‘एक दिवस मैत्रिणीच्या मावशीकडे राहिलो होतो. त्यामुळे तिथली काळजी नव्हती. पण हॉटेल बुकिंगच्या वेळी आम्ही अधिक काळजी घेतली होती. ओळखीच्या एकाकडून हॉटेलची चौकशी करून त्यालाच तिथलं बुकिंग करायला सांगितलं होतं.’ असे स्टे आऊटिंग करून मुली त्यांची स्पेस जगत असतात. निवांत, शांत, संथ आयुष्याचा आनंद घेत असतात. मैत्रिणींसोबत असल्यामुळे त्यांना हवं ते करण्याचीही मुभा असते. पण, अशा वेळी त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:पुरते काही नियम घालून घेतलेले केव्हाही चांगले. अनोळखी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत न भटकणं, अनोळखी लोकांशी अतिविस्तृतपणे न बोलणं, एकटं कुठेही न जाणं असे काही सोपे नियम पाळले जावेत.

दोन-चार दिवस बाहेर फिरायला जाणं हे लग्न न झालेल्या तरुणींसाठी एकवेळ सोपं आहे पण, लग्न झालेल्या महिलांसाठी? तर, तेही आता शक्य आहे. काहींनी हे शक्य करून दाखवलंय. ऋजुता जोग आणि तिची बहीण दोघी विवाहित आहेत. दोघींनाही मुलं आहेत. पण, दोघींनी एकदा ठरवलं आणि गोवा गाठलं. दोघीही रोजच्या रुटीनला काहीशा कंटाळल्या होत्या. एकमेकींशी बोलताना गोव्याला जायचं ठरलं आणि दोघींनी तिथे मनसोक्त धमाल केली. ‘रोजच्या कामातून थोडी विश्रांती हवी म्हणून आम्ही दोघींनी गोव्याला जायचं ठरवलं. घरच्यांना याबद्दल सांगितल्यावर कोणीच अडवणूक केली नाही. उलट ‘तुम्ही असं ठरावीक काही महिन्यांनी जायला हवं’ असं माझ्या नवऱ्याने मला सल्ला दिला. माझ्या बहिणीचं एकत्र कुटुंब आहे आणि माझ्या घरी माझ्या मुलाला सांभाळणारी एक बाई आहे, त्यामुळे आमच्या मुलांना सांभाळण्याची अडचण आली नाही. तेव्हा परीक्षेचे दिवस नव्हते. गणेशोत्सव सुरू असल्यामुळे शाळेत थोडा निवांतपणा होता. हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही गोवा गाठलं. मनसोक्त गप्पा मारल्या, फिरलो, पोटपूजा केली. मागच्या वर्षी दोघीच गेलो होतो, पण आता पुढच्या वेळी आम्हा चौघा बहिणींचा जायचा विचार आहे’, असं ऋजुता सांगते.

आज ठरवलं आणि उद्या निघाले असं मुलांसारखं मुलींचं होणं थोडं अवघड आहे. मुलींचं एखाद्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग बरेच दिवस सुरु असलं तरी तो प्लॅन त्या यशस्वी करतात. आता मुली नोकरी करतात. नोकरीच्या वेळा वेगवेगळ्या असतात. या सगळ्या गोष्टी सांभाळून मुली भेटण्याचं, फिरण्याचं ठरवतात. थोडक्यात काय, तर ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन’ असं म्हणायला मुली आता सज्ज आहेत!
चैताली जोशी

response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our tourism