हृदयाशी संबंधित उपचारांमध्ये पेसमेकर बसवणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे. म्हणूनच पेसमेकर म्हणजे काय? तो का बसवला जातो, केव्हा बसवला जातो हे समजून घेणे आवश्यक आहे.
पेसमेकर तुमच्या जीवनाची अत्यंत महत्त्वाची लय पूर्वपदावर आणण्याचे काम करतो. ही लय असते तुमच्या हृदयाची. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात सर्वप्रथम पेसमेकरचे यशस्वी प्रत्यारोपण (इम्प्लाण्ट) करण्यात आले. या क्रांतिकारी जादूई शोधामुळे लक्षावधी हृदयरोग्यांचे जीवन सुखमय झाले. पेसमेकरच्या साहाय्याने हृदयाची बिघडलेली लय पूर्वपदावर आणणे शक्य होते व ती व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते.
सुरुवातीच्या पेसमेकर्समध्ये सातत्याने तांत्रिक सुधारणा होत राहिल्या व परिणामी आजचे पेसमेकर्स आकाराने लहान, वजनाला हलके व वापरायला सुटसुटीत झाले आहे. यातले अधिक प्रगत पेसमेकर्स तर नैसर्गिक हृदयाइतके उत्तम काम करतात. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्ण त्यांचे नेहमीचे धावपळीचे दैनंदिन जीवन अतिशय समाधानकारक पद्धतीने जगू लागले आहेत. पेसमेकर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर पेसमेकर बसविलेल्या रुग्णाची देखभाल करणे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे खूप सुलभ झाले आहे.
तुमच्या हृदयाची नैसर्गिक लय :
हृदय हा स्नायू संपूर्ण शरीरातल्या सर्व पेशींना प्राणवायू व पौष्टिके रक्तामार्फत पोचविण्याचे काम करणारा पंप आहे. हृदयाची विभागणी चार कप्प्यांत केलेली असते. वरच्या दोन कप्प्यांना- उजवी/डावी कर्णिका तर खालच्या दोन कप्प्यांना- उजवी/डावी जवनिका असे म्हटले जाते. शरीर व फुप्फुसांकडून हृदयाच्या वरच्या भागात म्हणजे कर्णिकेत रक्त येते व तिथून पंपिंग होऊन ते जवनिकेत येते व तिथून शरीराच्या इतर भागांना पुरविले जाते.
निरोगी हृदयामध्ये नेहमी कर्णिकेचे आकुंचन जवनिकेच्या आधी होते. याला ‘अॅट्रियो व्हेन्टिक्युलर समकालिकता’ असे म्हणतात व यामुळे हृदयाच्या पंपिंगची कार्यक्षमता वाढते आणि जवनिकेत आकुंचनापूर्वी पुरेसा रक्त साठा जमा झाल्याची खात्री केली जाते.
सामान्यत: हृदयाच्या पंपिंगचे नियंत्रण उजव्या कर्णिकेत असलेल्या ‘सिनो अॅट्रिअल नोड’ मधून निर्माण होणाऱ्या विद्युतकंपनाने (पल्स) होत असते. म्हणजेच ‘सिनोअॅट्रिअल नोड’ हा नैसर्गिक पेसमेकर आहे. शरीराच्या प्राणवायू व पौष्टिकांच्या गरजेवर एस्.ए. नोडतर्फे देखरेख ठेवली जाते. शरीराच्या मागणीप्रमाणे एस.ए. नोडमार्फत ही विद्युतकंपने जलद/धिम्या गतीने पाठवली जातात. प्रत्येक कंपन हे कर्णिकेतून जाताना कर्णिका आकुंचन पावते व कंपन हृदयाच्या मध्यभागी (जिथे कर्णिका व जिवनिका एकमेकाला जोडलेल्या असतात) येते. याला ए.वी. नोड (किंवा एट्रियोवेनट्रिकुलर नोड) असे म्हणतात. ही विद्युत कंपने कर्णिकेतून जवनिकेत पोहोचण्याचा ए.वी. नोड हा एकमेव मार्ग आहे हे विद्युतकंपन कर्णिकेपासून ए.वी. नोडमार्गे जवनिकेपर्यंतचा प्रवास पोचते व ही पूर्ण प्रक्रिया म्हणजेच हृदयाचा एक ठोका. एस.ए नोडमधून निघालेले पुढील कंपन जवनिकेत येईपर्यंत हृदयविश्रांती घेते व ते कंपन जवनिकेत पोचले, की पुन्हा ठोक्याचे चक्र चालू होते.
आपल्या शारीरिक कार्याच्या पातळीप्रमाणे आपल्या शरीराची प्राणवायू व पौष्टिकांची गरज बदलते व निरोगी एस.ए. नोड आपल्या या ठोक्यांची गती किंवा हृदयाची गती बदलली जाते. सामान्यत: तुम्ही विश्रांती घेत असता ही गती मिनिटाला ६०-८० ठोके एवढी असते. जेव्हा आपण मर्यादित शारीरिक श्रम करतो तेव्हा मिनिटाला १०० ठोक्यापर्यंत वाढते तर सातत्याने अतिश्रम घडत असताना आपल्या शरीराच्या अवयवांच्या प्राणवायू व शुद्ध रक्ताच्या मागणीप्रमाणे ती मिनिटाला १५० ठोके वा त्याहूनही जास्त होऊ शकते.
हृदयाच्या मंद लयीमुळे होणाऱ्या समस्या
पेसमेकरची गरज भासणारी सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी हृदयाची व्याधी म्हणजे ‘ब्रॅडिकार्डिआ’. यात शरीराच्या गरजा पुरविण्यासाठी आवश्यक त्या गतीने हृदयाचे ठोके पडत नाहीत किंवा त्यात अनियमितता असते.
मंद हृदयगतीची लक्षणे
* चक्कर येणे * अतिथकवा येणे * दम/ धाप लागणे * व्यायाम करता न येणे * ग्लानी/ मूच्र्छा येणे. या सर्व लक्षणांमुळे रुग्णाच्या सर्वसाधारणपणे जीवन जगण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होतो व तो दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे करू शकत नाही. सामान्यत: हृदयाची लय बिघडण्याच्या खालीलपैकी एक वा दोन्ही कारणांमुळे मोठय़ा प्रमाणात ब्रॅडिकार्डिआ होतो.
सिक सायनस सिन्ड्रोम :
यात एस.ए. नोडमार्फत विद्युतकंपनांचे प्रसारण फार धिम्या गतीने अथवा अनियमितपणे होते यामुळे हृदयाची लय फार हळू वा अनियमित होते व परिणामी वरील लक्षणे अनुभवास येतात.
हार्ट ब्लॉक (रक्ताभिसरणात अडथळा/बाधा): जेव्हा विद्युतकंपन हळू होते, अनियमित होते किंवा ए.वी. नोडकडे (हृदयाच्या नैसर्गिक पेसमेकरकडून निघालेली विद्युतकंपने जवनिकेपर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग) वा त्याखालीच थांबते तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. मार्गेच जवनिकेत पोचते. परिणामी जवनिका फार हळू वा अनियमितपणे ठोके देतात व वर दिलेली लक्षणे अनुभवास येतात.
हृदयाची लय धिमी होण्याच्या समस्यांची अनेक कारणे असतात व त्यात हृदयातील आनुवंशिक दोष, विशिष्ट आजार, वृद्धापकाळ किंवा हृदयविकाराच्या एखाद्या झटक्यात क्षतिग्रस्त झालेल्या पेशी यांचा समावेश असतो किंवा याचे कारण अज्ञात असू शकते.
पेसमेकरचे कार्य :
हृदयाची लय धिमी झाल्याच्या सर्वाधिक समस्यांवर आजमितीस उपलब्ध असलेली एकमेव उपचार पद्धती म्हणजे पेसमेकरचे प्रत्यारोपण होय. जेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके मंदगतीने पडू लागतात, तेव्हा पेसमेकर अचूकपणे कालबद्ध केलेली विद्युतकंपने निर्माण करून त्यास उत्तेजना देतो. ही विद्युतकंपने तुमच्या हृदयाची आकुंचन/प्रसारणे सामान्य हृदयलयीच्या जवळपास आणतात व अशा प्रकारे बॅड्रिकार्डिआचे दुष्परिणाम कमी केले वा टाळले जातात.
पेसमेकर ही खरे तर दोन भाग असलेली प्रणाली आहे.
पल्स जनरेटर (विद्युतकंपनांचा उद्गाता):
ही एक छोटीशी धातूची डबी असते व यात इलेक्ट्रॉनिक मंडल (सर्किट) व दीर्घकाळ चालणारी बॅटरी असते. एक किंवा दोन रोधक आवरणातल्या तारा ज्यांस ‘लीड्स’ असे म्हणतात.
पल्स जनरेटर हा एक छोटा संगणक असतो व त्यात विद्युतकंपने निर्माण करण्यासाठी व त्यांच्या आवर्तनांचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रॉनिक मंडल असते. आजकालचे पल्स जनरेटर साधारणत: मनगटी घडय़ाळाच्या डायलच्या आकाराचे असतात. ‘पेसिंग लीड्स’ (रोधक आवरणातल्या तारा) निर्माण झालेली कंपने हृदयरपत पोचवतात. लीडचे एक टोक पल्स जनरेटरला जोडलेले असते व दुसरे रक्त वाहिनीतून हृदयाच्या उजव्या कर्णिकेत अथवा उजव्या जवनिकेत जोडलेले असते.
पल्स जनरेटरमार्फत निर्माण झालेले कंपन अतिशय सूक्ष्म शक्तीचे असते व पेसमेकरचे कार्य चालू असताना त्याचा कुठलाही झटका तुम्हाला जाणवत नाही. पेसिंगबरोबरच (गती देणे) या जनरेटरमध्ये हृदयात निर्माण झालेल्या नैसर्गिक कंपनांची संवेदना नोंद केली जाते. म्हणजे हृदयामार्फत जर नैसर्गिकरीत्या कंपन निर्माण झाले तर त्यावेळी जनरेटर कृ त्रिम कंपन निर्माण करत नाही.
प्रत्यारोपित पेसमेकर्स हे ‘प्रोग्रॅमेबल’ म्हणजे संगणकीय आज्ञावली असलेले असतात. पेसमेकर बसवल्यावर तुमच्या हृदयाच्या स्थितीत बदल होऊ शकतो. असा बदल जर घडलाच तर कोणतीही शस्त्रक्रिया केल्याशिवाय पेसमेकरचे सेटिंग किंवा त्याच्या कार्यप्रणालीत बदल करता येतात. असे बदल हे तुमच्या बदललेल्या स्थितीत सर्वोत्तम प्रकारे उपयोगी पडतील असे असतात. हे फेरबदल प्रोग्रॅमर संगणकाद्वारे रेडिओ लहरीमार्फत तुमच्या शरीरातील पेसमेकरला आज्ञा देऊन केले जातात. आणि तुम्हाला हे जाणवत नाही. पेसमेकर प्रणालीची नियमितपणे तपासणी करण्यासाठीही प्रोगॅ्रमर वापरले जातात.
पेसमेकरचे विविध प्रकार
मंद गतीने हृदयाचे ठोके पडण्याची कारणे प्रत्येक रुग्णाबाबतीत वेगवेगळी असल्यामुळे यावरची उपचार पद्धतीही त्याला अनुसरून वैविध्यपूर्ण असते.
सध्या उपलब्ध पेसमेकर्स :
* एककप्पी पेसमेकर्स (गतिप्रतिसाद यंत्रणेशिवाय) (single chamber pacemaker)
* द्विकप्पी पेसमेकर्स (गतिप्रतिसाद यंत्रणेशिवाय) (double) (dual chamber pacemaker)
* गतिप्रतिसादी पेसमेकर (एककप्पी/द्विकप्पी असे दोन्ही) (Rate Responsive pacemaker)
तुम्हाला कुठल्या प्रकारचा हृदयदोष आहे, तुमच्या हृदयाची एकूण प्रकृती व तुमची जीवनशैली यावरून तुमचे डॉक्टर तुम्हाला कोणत्या प्रकारचा पेसमेकर बसविणे योग्य आहे ते सुचवतात. अर्थात कुठल्याही प्रकारचा पेसमेकर बसवला तरी अधिकाधिक कामात सहभागी होणे शक्य करून तो तुम्हाला पुन्हा आयुष्य नव्या उमेदीने जगण्याला मदत करतो.
(पूर्वार्ध)
डॉ. गजानन रत्नपारखी – response.lokprabha@expressindia.com