तिघांच्याही चित्रातले त्यांचे त्यांचे अवकाश आपल्याला खूप काही सांगून जाणारे आहे. अवकाश तेच आहे, पण त्याची रूपे अनेक आहेत. कुठे ते शोधाकडे नेते, कुठे सौंदर्यबोध करवते, तर कुठे स्वत्वाचा शोध घडवते!
जहांगीरच्या वातानुकूलित भागातील तिन्ही दालनांमध्ये एक वेगळा योग गेल्याच आठवडय़ात जुळून आला. निमित्त होते वेंकटेश पाते, आनंद महाजनी आणि तुषार कांती प्रधान या तिघांचे चित्रप्रदर्शन. चित्र- छायाचित्रातील अवकाश, विचार आणि सौंदर्यतत्त्व यांची अनोखी सांगड यामध्ये अनुभवता आली. यातील वेंकटेश पाते यांनी ‘सिमेट्री’ या शीर्षकाखाली छायाचित्रे सादर केली होती. प्रदर्शनाच्या बरोबर मधोमध एक छोटेखानी मांडणीशिल्पच होते. सर्वाधिक व्यक्त होणारा शरीरातील अवयव म्हणजे हात. अगदी साधे लक्षात घ्यायचे तर फोनवर बोलतानाही आपण हातवारे करत असतो. चालतानाही हात कसा हलतो यावरून एखाद्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. या हातांचा, मुद्रांचा वापर करत पाते यांनी शरीरामधील ‘सिमेट्री’ विविध रूपाकारांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला. खरे तर शरीरात ‘सिमेट्री’ नसते, कमी-अधिक अनेक गोष्टी असतात; पण ध्यानधारणा व चिंतनाची पाश्र्वभूमी असलेल्या पाते यांना वाटते की, माणूस शरीराच्या पलीकडे जाऊन आयुष्यात डोकावून पाहील, त्या वेळेस ही ‘सिमेट्री’ जुळून येईल आणि तोच त्याच्या ज्ञानाचा निर्वाणाचा क्षण असेल! महत्त्वाचे म्हणजे हे सादर करताना त्यांनी बराचसा कॅनव्हॉस मोकळा सोडलेला दिसतो. त्यामुळे त्यातील अवकाश अधिक जाणवते. त्या अवकाशाच्या पाश्र्वभूमीवर येणारा तो मुद्रेचा रूपाकार मग ध्यानाच्या दिशेने नेणारा ठरतो! झेन बौद्ध तत्त्वज्ञान याच अंगाने तर जाणारे आहे. त्यात अवकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हेच अवकाश पुढच्या दालनात आनंद महाजनी यांच्या चित्रांमध्ये वेगळ्या पद्धतीने अनुभवता आले. वाडय़ाचे प्रवेशद्वार, चाळीचा भाग, तोही असा की पाहणाऱ्यास तो निरसच वाटावा, एखाद्या वास्तुरचनेचा असाच कोणता तरी तुकडा ज्यात प्रथमदर्शनी सौंदर्य नाही. कदाचित तो कुरूपच अधिक भासावा; पण हे सारे महाजनी यांच्या चित्रांतून समोर येते तेव्हा इथेही त्या अवकाशाच्या माध्यमातून सौंदर्यबोध होतो, हा या चित्रांचा विशेष! माफक आवश्यकतेएवढेच रेखांकन, त्यावर केलेला जलरंगांचा तेवढाच माफक व मोजका वापर हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्टय़. रंगही तसे फिकटच; पण त्यातून महाजनी समोर जे काही उभे करतात त्यातून सौंदर्यच प्रतिबिंबित होते. त्यांचेही वैशिष्टय़ म्हणजे अवकाशाचा फील. कॅनव्हॉसवरचा बराचसा भाग स्वच्छ पांढरा मोकळा सोडलेला. काही ठिकाणी तर त्यांनी त्या मोकळ्या भागातून छाया-प्रकाशाचा खूप छान फीलही निर्माण केलेला (भगभगीत प्रकाश), जुनाट वास्तू, पण या साऱ्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी महाजनी देतात. तो त्यांना जाणवलेला वेगळा पस्र्पेक्टिव्ह आहे. त्यासाठी नेपाळी किंवा कोकणातील मंदिराच्या तिहेरी कौलारू भागाचे आतून केलेले चित्रण अवश्य पाहावे. आतमध्ये असलेली लाकडी तुळयांची रचना ज्या पद्धतीने चित्रकार दाखवतो, तो कोन नेहमीचा तर नाहीच, किंबहुना सौंदर्यबोध सहज व्हावा असाही नाही; पण त्यातच चित्रकाराची वेगळी नजर जाणवते व पाहणाऱ्यासही नेमके सौंदर्य कशात आहे, ते पाहताक्षणी जाणवते. इथे महाजनींच्या चित्रामध्ये आपल्या नजरेचा प्रवास अवकाशाकडून सौंदर्याच्या दिशेने जातो आणि मग जुनाट वास्तूचा निरस कोपरा किंवा एखादा भागही सौंदर्यपूर्ण वाटू लागतो!
तिसरे प्रदर्शन होते ते तुषार कांती प्रधान या तरुणाचे. त्याची चित्रे अमूर्त वाटतील, पण ती कथनात्म आहेत. स्वप्न किंवा मग इतरांच्या काही स्मृती ज्यामध्ये गावातील स्वसंवेद्य घेऊन माणूस शहरात येतो आणि सततच्या एका संघर्षांत झुंजत राहातो स्वत:च्या शोधात, त्याच्या या कथा आहेत, असे चित्रकार म्हणतो. इथले या चित्रांमधले अवकाश गावच्या त्या स्वसंवेद्य अशा नैसर्गिक गोष्टींचे आहे. त्यासाठी त्याने हॅण्डमेड पेपरचा वापर केला आहे. त्यावर सारवलेली जमीन दिसते आणि मग शहरी जीवनातले ओरखडे, स्वप्नांची राख आणि बरेच काही. या तिघांच्याही चित्रातले त्यांचे त्यांचे अवकाश आपल्याला खूप काही सांगून जाणारे आहे. अवकाश तेच आहे, पण त्याची रूपे अनेक आहेत. कुठे ते शोधाकडे नेते, कुठे सौंदर्यबोध करवते, तर कुठे स्वत्वाचा शोध घडवते!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab