ट्रेण्ड
स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

मुंबईत अलीकडे एका उंच इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारणाऱ्या एका परदेशी तरुणाला कारवाई म्हणून त्याच्या देशात पाठवून देण्यात आले आणि सगळीकडे पार्कोर या खेळाची चर्चा सुरू झाली. काय आहे हा खेळाचा प्रकार?

दोन आठवडय़ांपूर्वी मुंबईमधील प्रभादेवी परिसरात एका तरुणाने उंच इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या उंच इमारतीवर उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी त्यानंतर या घटनेशी संबंधित तरुणांना अटक केली. ही  मुलं परदेशी होती. चौकशीनंतर या मुलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. भारतातील जवळजवळ सर्वच प्रसारमाध्यमांनी या घटनेचे वार्ताकन केले. मात्र इंग्रजी असो किंवा प्रादेशिक सर्वच प्रसारमाध्यमांनी या प्रकाराचा स्टण्टबाजी असा उल्लेख केला आहे. यासंदर्भातील बातम्या आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र प्रसारमाध्यमांच्या अज्ञानावर सडकून टीका करत ही स्टण्टबाजी नसून ‘पार्कोर’ नावाचा साहसी खेळाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्या तरुणाईला या खेळाबद्दल ठाऊक होते, म्हणूनच प्रसारमाध्यमांनी याला स्टण्टबाजी म्हटलेले त्यांना आवडले नाही. पण इंटरनेट न वापरणाऱ्यांना आणि एकंदरीत अनेकांना हा पार्कोर नक्की काय प्रकार आहे हे ठाऊक नाही. म्हणूनच त्यावर प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.

यूटय़ूबवर ढं१‘४१ (पार्कोर) हा शब्द शोध केल्यास सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उडय़ा मारत इकडून तिकडे जाणारे तरुण-तरुणींचे अनेक व्हिडीओ तुम्हाला दिसतील. हे पार्कोर म्हणजे एक प्रकारचा शारीरिक कसरतीचा प्रकार. या कसरतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडथळ्यांवर (शारीरिक आणि मानसिकही) मात करण्याची क्षमता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असतो. पार्कोरमध्ये धावणे, उडय़ा मारणे, एखाद्या गोष्टींवर चढणे या सर्व शारीरिक कसरतींचा ताळमेळ असावा लागतो. तसेच या सर्व कसरती करताना वेग आणि सूसूत्रता यांचा मेळ साधणेही गरजेचे असते. शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक स्तरावर सामथ्र्य, आत्म-सुधारणा आणि स्वत:ची ओळख करून घेण्याचे तत्त्वज्ञान अंगिकारण्यासाठी पार्कोरचा उपयोग होतो असे सांगितले जाते.

पार्कोरचा इतिहास

जगभरात आज पार्कोर या नावाने लोकप्रिय असणाऱ्या या शब्दाचे मूळ फ्रेंच भाषेत आहे. फ्रान्समध्ये उगम झालेल्या या प्रकाराचे मूळ नाव आर्ट डु डिप्लेसमेन्ट असं आहे. म्हणजेच विस्थापन अथवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची कला. या नावावरूनच हा काय प्रकार आहे याची कल्पना येते. मात्र याला आता पार्कोर किंवा फ्री रिनग असंही म्हटलं जातं. पार्कोरचा प्राथमिक स्तरावरील विचार सर्वात आधी फ्रेंच सन्यदलातील अधिकारी जॉर्ज हेबर्ट यांनी मांडला. त्यांनी पार्कोर हा शब्द पार्कोर्स डय़ू कॉम्बिटेन्ट (अडथळ्यांची शर्यत) या शब्दावरून शोधला आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण सन्यातील जवानांना देण्याचा विचार मांडला. पुढे रेमण्ड बबेले या मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासणाऱ्या अधिकाऱ्याने या कवायतींच्या प्रकाराला साचेद्धता दिली. रेमण्ड यांचा मुलगा डेव्हिड याने आपल्या आठ मित्रांबरोबर पुढे १९८० च्या काळात फ्रान्समधील यामाकासी नावाच्या गटाची स्थापना करून या खेळाचा प्रचार आणि प्रसार केला. डेव्हिडबरोबर यान हनौत्रा, चाऊ बेले, लॉरेन पिमोंतेसी, सेबॅस्टियन फौकन, गुइलीन ग्युबा बॉयके, चार्ल्स पेरर्ीे, मलिक डिऊफ आणि विलियम्स बेले या आठ जणांनी एकत्र येऊन ‘यामाकासी’ची स्थापना केली होती. यामाकासी हा िलगला भाषेतील शब्द असून त्याचा बोली भाषेतील अर्थ होतो ‘शक्तिशाली माणूस, शक्तिशाली आत्मा.’ ज्या गटाने या कलेचा शोध लावला त्या गटाच्या नावाप्रमाणेच एखाद्याला शारीरिक, मानसिक आणि वैचारिकदृष्टय़ा शक्तिशाली बनवणे हेच आजही या कलेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पार्कोर ही संज्ञा पहिल्यांदा डेव्हिड बेले याने १९९८ मध्ये वापरली. फ्रेंचमधील पारकोर्स (Parcours) या शब्दापासून पार्कोर (Parkour) शब्दाचा जन्म झाला आहे. पारकोर्स या शब्दाचा अर्थ होतो ‘रुट’ किंवा ‘कोर्स’ म्हणजेच रस्ता. तर पाश्चिमात्य देशामध्ये यासाठी वापरली जाणारी फ्री रिनग ही संज्ञा २००३ मध्ये या खेळासंदर्भात चॅनल फोरवर तयार करण्यात आलेल्या ‘जंप लंडन’ या लघुपटाच्या फ्रान्समधील निर्मात्यांपैकी असणाऱ्या गिलाउम पेलेटियर याने शोधून काढली आहे. इंग्रजी भाषा समजणाऱ्यांना पार्कोर या फ्रेंच शब्दाचा अर्थ सोप्पा करून समजवण्यासाठी फ्री रिनग हा शब्द वापरण्यात आला. सध्या दोन्ही नावांनी हा खेळ ओळखला जात असला तरी मुख्यपणे पार्कोर म्हणूनच त्याला जगभरात मान्यता मिळताना दिसत आहे.

डेव्हिड बेले यांनी पार्कोर या खेळाला लोकप्रिय करत आजचे आधुनिक स्वरूप दिले. या खेळामध्ये चपळ हालचालींच्या माध्यमातून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे अपेक्षित असते. हा खेळ खेळण्यासाठी प्रचंड चापल्या, मानसिक तयारी आणि सरावाची गरज असते. कारण यामध्ये धावणे, उडय़ा मारणे, िभतीवर चढणे, पोहणे, कोलांटय़ा उडय़ा मारणे, लटकणे अशा अनेक गोष्टींचा योग्य वापर करावा लागतो. सध्या या खेळाला ग्लॅमरस स्वरूप आले असले तरी डेव्हिड यांनी या खेळाची सुरुवात केली तेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कणखर होणे हा एकच उद्देश या खेळामागे होता. सध्या मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये पार्कोर आणि फ्री रिनग या दोन्ही नावांनी हा खेळ खेळला जातो. पार्कोर आणि फ्री रिनग एकच असल्याचे सांगणारा एक गट आहे तर काहीजण दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगतात. फ्री रिनगमध्ये धावणे, उलटय़ा उडय़ा मारणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हे उद्दिष्ट असते तर पार्कोरमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना या खेळातील हालचालींवर जास्त भर दिला जातो, असं दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत असं मानणारे सांगतात.

देशभरातील अनेक शहरांमध्ये पार्कोर खेळणारे ग्रुप्स आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्येही एक ‘फ्री सोल टीम’ नावाची पार्कोर खेळणारी कम्युनिटी होती. मात्र या कम्युनिटीमधील सदस्य फारसे सक्रिय नव्हते. मात्र मुंबईमधीलच सायरस खान, ऋषी प्रसार आणि दीपक माळी या तीन तरुणांनी एकत्र येऊन ‘मुंबई पार्कोर’ नावाच्या गटाची औपचारिक स्थापना करून आणखी तरुणांचा त्यामध्ये समावेश केला. मुंबई पार्कोरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल दीपक सांगतो, ‘मी मागील आठ वर्षांपासून हा खेळ खेळतो. इतर मुले हा खेळ आपल्या पद्धतीने खेळण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतात असे लक्षात आल्यानंतर साधारण साडेतीन वर्षांपूर्वी मी, सायरस आणि ऋषीने एकत्र येऊन मुंबईमध्ये या खेळासंदर्भातील प्रशिक्षण देणारा ग्रुप सुरू केला. तेव्हा मी पाच दिवस मुंबईत असायचो आणि आठवडय़ाच्या शेवटी पुण्याला. आता मी पुण्यातच असतो. इथेही आम्ही टीम मायो (मेक युअर ओन वे) हा पार्कोरचा ग्रुप सुरू केला आहे.’  दीपक सांगतो, ‘सोशल मीडियावरून आम्हाला या खेळासंदर्भात बरीच विचारणा झाली. आमचे व्हिडीओ अनेकांनी लाईक, शेअर वगरे करून आम्हालाही हे शिकायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आम्ही पार्कोर शिकवणारे क्लासेस सुरू केले. आज आम्ही मुंबई पार्कोरच्या माध्यमातून या खेळासंदर्भातले वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित करतो. तसेच एकत्र सराव घेणे त्याचप्रमाणे जॅम सेशन्स म्हणजेच वेगवेगळ्या वयोगटातील पार्कोरप्रेमींनी एकत्र येऊन सराव करणे असे उपक्रमही चालवतो. आम्ही आत्तापर्यंत पाच ते सहा जॅिमग सेशन्स घेतले असून राष्ट्रीय स्तरावरील पार्कोर जॅिमग सेशन्समध्येही आमच्यापकी अनेकजण सहभागी होतातत, असे दीपक अभिमानाने सांगतो.

शाळांमध्ये प्रशिक्षण

मुंबईमधील काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये पार्कोरचे प्रशिक्षण दिले जात असल्याचेही दीपकने सांगितले. अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे या घाटकोपरमधील शाळेपासून ते ब्रीज कॅण्डी येथील डीबीएस या जर्मन शाळेमध्येही हा खेळ मुलांना लहान वयापासूनच शिकवला जातो. या शाळांमध्ये मुंबई पार्कोरमधील तरुण शिकवण्यासाठी जात असल्याची माहिती दीपकने दिली. मुंबईच नाही तर कल्याणमधील काही शाळांमध्येही पार्कोरचे प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय दादरमधील एका एनजीओमधील मुलांनाही मुंबई पार्कोर्सचे प्रशिक्षक हा अनोखा खेळ शिकवत आहेत.

भविष्य काय?

या खेळाला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत दीपकने व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक्स फेडरेशनने या खेळाला २०१७ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर फेडरेशनवर बरीच टीका झाली होती. मात्र यंदाच्या वर्षी फेडरेशनच्या पुढाकाराने ६ ते ८ एप्रिल दरम्यान पहिल्या पार्कोर विश्वचषक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. २०२० मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय पार्कोर चॅम्पियनशिप आयोजित करण्याचा फेडरेशनचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही परिस्थिती असतानाच आता कुठे या खेळाबद्दल जागरूकता निर्माण होत असल्याचे दीपक सांगतो. आज मुंबईमध्ये ४० ते ५० प्रोफेशनल पार्कोर्स (पार्कोर खेळणारे) आहेत. मालाड, विरार, अंधेरी अशा शहराच्या छोटय़ा छोटय़ा भागांमध्ये एकूण सात पार्कोर ग्रुप्स आहेत. तर देशभरातील पार्कोर ग्रुप्सची संख्या शेकडोमध्ये आहे. हळूहळू हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. हे या खेळाच्या वाढीच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे दीपक सांगतो. अनेक शाळांमध्ये हा खेळ शिकवला जावा यासाठी मुंबई पार्कोर्सचे प्रयत्न सुरू आहेत. बॉलीवडूमधील अनेक नवीन अभिनेते जी स्टंटबाजी करतात त्यामधील बराच भाग हा पार्कोरचा असल्याने या खेळाचा प्रसार होण्यास मदत मिळत असल्याचेही दीपकला वाटते. आज अनेक पार्कोर्स शिकवाणारे प्रशिक्षक हे बडय़ा कंपन्यांसाठी वेगवेगळ्या शूटिंगसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी कोरिओग्राफी करतात. नाईके, नेटफिक्स, वयकॉम एटीन, एमटीव्ही, धर्मा प्रॉडक्शन्स या बडय़ा कंपन्यांसाठी’ मुंबई पार्कोर’ने काम केले आहे.

कसे, किती वेळात शिकता येते?

दीपक सांगतो, ‘इंटरनेटवर तुमच्या शहराच्या नावापुढे पार्कोर शब्द गुगल केलात तर तुम्हाला जवळच्या पार्कोर ग्रुप्सबद्दल महिती सहज मिळेल. मात्र केवळ छान दिसतं म्हणून पार्कोर शिकता येत नाही. पार्कोर शिकण्यासाठी आधी मनाची तयारी करावी लागते. आम्ही प्रशिक्षण देताना शारीरिक तयारीबरोबरच मानसिक तयारी किती आहे याचा आधी अंदाज घेतो. एखाद्याच्या मनात किती भीती आहे यावर त्याला हा खेळ शिकण्यासाठी किती वेळ लागेल हे ठरते. त्यामुळे मनातील भितीवर मात केल्यावर हा खेळ शिकण्यासाठी केवळ सरावाची गरज असते’ असं दीपक या खेळाबद्दलची माहिती देताना सांगतो. उडय़ा मारणे, पळणे, लटकणे यासाठी केवळ शारीरिक नाही तर मानसिक तयारीही आम्ही करून घेतो. आणि मानसिक तयारीला अधिक वेळ लागतो. त्यामुळेच जेवढी तयारी अधिक तेवढं अचूकपण अधिक असं दीपक या खेळात पा्रवीण्य मिळवण्याचं सूत्र असल्याचं सांगतो.

कायदा काय सांगतो

आपल्या देशात अनेक गोष्टींबद्दल होते तेच पार्कोरबद्दल आहे. पार्कोरसंदर्भात औपचारिक कायदे सध्यातरी देशात नाहीत. पण इंटरनेटवरील अनेक चर्चा आणि भारतीय कलमातील कायद्यांचा आढावा घेतल्यास असं दिसतं की सध्याच्या कायद्यानुसार मोकळ्या जागी सार्वजनिक ठिकाणी कोणालाही हानी न पोहोचवता पार्कोर खेळण्यास हरकत नाही. मात्र जास्त गर्दीच्या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्थानक, विमानतळे, सरकारी इमारती यासारख्या सार्वजनिक ठिकाणी हा खेळ खेळणे चुकीचे ठरू शकते. कारण या ठिकाणी सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. सध्यातरी सार्वजनिक ठिकाणी पार्कोर कुठे खेळावा आणि कुठे नाही याबद्दलचे नियम नाहीत पण हा खेळ खेळताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवणे, तिची मोडतोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पार्कोर खेळताना संबंधित व्यक्तीने केलेल्या कसरती पाहून कोणी तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून समज दिली जाऊ शकते. मात्र वारंवार असे केल्यास आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्कोर संदर्भातील एखाद्या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाकडे, पोलीस स्थानकात अर्ज करून त्यासंदर्भात माहिती दिल्यास फायद्याचे ठरू शकते असं काही नेटकरी पार्कोरच्या कायदेशीर बाबींबद्दल बोलताना सांगतात.

मुंबईमधील घटनेचे वार्ताकन चुकीचे…

प्रभादेवी येथे घडलेल्या प्रकाराबद्दल बातम्यांमध्ये पाहिले तेव्हा समजले. या प्रकरणानंतर सर्वात वाईट वाटलेली गोष्ट म्हणजे या खेळाबद्दल माहिती नसताना प्रसारमाध्यमांनी यावर केलेली चर्चा. माहिती नसताना अशा प्रकारची चर्चा प्रसारमाध्यमांनी घडवून आणणे चुकीचे होते. इमारतीवरून उडी मारली म्हणून ज्या तरुणांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले त्यांच्याकडे पार्कोर या खेळाचा १४-१५ वर्षांचा अनुभव आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. या तरुणांनी मायदेशात गेल्यानंतर त्यांना भारतात मिळालेल्या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर नाराजीच्या पोस्ट केल्या आहेत. १२ वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदाच त्याच्याबाबत असं झालं आहे. आपण या गोष्टीचा उगाच बाऊ करतो. आज इंटरनेटवर वावरणाऱ्या अनेकांना या खेळाला काय म्हणतात हे माहीत आहे. असं असतानाही या खेळाला आजही आपल्याकडे प्रसारमाध्यमांनी स्टंटबाजी म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही  हा खेळ खेळतो त्यावेळीही लोक आमच्या कसरतींचा, उडय़ांचा, धावण्याचा बाऊ करतात. मग आम्ही त्यांना या खेळाबद्दची माहिती सांगितल्यावर कौतुक होतं. यावरून इतकंच दिसून येतं की, लोकांना नीट माहिती दिली तर त्यांचे या खेळाबद्दलचे गरसमज दूर होतील. पण होतंय असं की ज्यांना काहीच ठाऊक नसतं ते लोकच या नवीन गोष्टींबद्दल जास्त आणि चुकीचं बोलतात. खरं तर या खेळाला आता लोकांचा पािठबा हवा आहे. पण नको ती माहिती पसरवणाऱ्या लोकांमुळे या नव्या प्रकारांना हवा तो पािठबा मिळत नाही. पण हळूहळू ही स्थिती नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे.
– दीपक माळी, सहसंस्थापक (मुंबई पार्कोर)

देशातील काही महत्त्वाचे पार्कोर ग्रुप्स

  • केओस फॅक्ट्री (बंगळुरू) (२००९ पासून)
  • आसाम पार्कोर कम्युनिटी (गुवाहाटी)
  • चेन्नई पार्कोर (चेन्नई) (२००७ पासून)
  • मुंबई पार्कोर (२०१४ पासून औपचारिकरीत्या)
  • बेंगळुरु पार्कोर (बेंगळुरु)   ल्ल पार्कोर नाशिक (नाशिक)
  • टीम लिओनाईन (रामपूर)
  • काश्मीर फ्री रिनग अ‍ॅण्ड पार्कोर फेडरेशन (काश्मीर)

पार्कोरबद्दलच्या मजेदार गोष्टी

  • मुजाहिद हबीब हा भारतातील पार्कोर चॅम्पियनशिपचा पहिला विजेता
  • युनायटेड किंगडममध्ये पहिल्यांदा खेळ म्हणून मान्यता.
  • भारतीय संरक्षण दलातील एनएजी कमांडोजलाही पार्कोरचे प्रशिक्षण दिले जाते.
  • हा खेळ तरुणींपेक्षा तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
  • हा खेळ आहे की कला याबद्दल दुमत आहे
  • अक्षय कुमार, विद्युत जामवाल, अर्नोबद्य सिंग, टायगर श्रॉफ या िहदी अभिनेत्यांना पार्कोर येते.

पार्कोरबद्दलचे हॉलीवूडमध्ये गाजलेले सिनेमे

  • ब्रिक मॅन्शन (२०१४)
  • डिस्ट्रिक्ट बी ट्वेल्वह १२ (२००४)
  • कॅसिनो रॉयल (२००६)
  • लिव्ह फ्री ऑर डाय हार्ड (२००७)
  • शार्लरेक होम्स : अ गेम ऑफ शॉडोज (२०११)
  • ट्रेसर्स (२०१५)
  • फ्री रनर (२०११)

पार्कोरचा वापर करण्यात आलेले बॉलीवूडमधील सिनेमे

  • कमांडो
  • बॉस
  • कमांडो टू
  • एक था टायगर
  • हिरोपंती