एखाद्या क्षेत्रात जशी अंगभूत कौशल्याची गरज असते तशीच त्या क्षेत्रात काम करायची पॅशनदेखील असावी लागते. आणि काळानुसार बदलणाऱ्या तंत्राचा अचूक वापरदेखील महत्त्वाचा असतो. या तिन्हींची योग्य सांगड घालता आली तर करिअरची वेगळी वाट चोखाळताना अडखळायला होत नाही. छायाचित्रणाच्या क्षेत्रात गेली २० वर्षे आपला वेगळा ठसा उमटवणारा केदार भट हे त्याचं यशस्वी उदाहरण म्हणावं लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केदार हा मूळचा भौतिकशास्त्राचा विद्यार्थी. छायाचित्रणात अजून डिजिटल वारं यायचं होतं. तुलनेनं काहीसा खर्चीक असाच प्रकार म्हणूनच छायाचित्रणाकडे पाहिलं जायचं. आजच्यासारखे गळ्यात डीएसएलआर लटकवून फिरणारे तेव्हा दिसत नसत. त्या काळात फोटोग्राफीमध्ये करिअर वगैरे असं काहीच त्याच्या डोक्यातदेखील नव्हतं. एक अर्थाजनाचं साधन म्हणून त्याने फोटोग्राफी सुरू केली. तेव्हा त्याला लक्षात आलं की यात आपल्याला गती आहे.

तो ठाण्यात राहायचा. एक प्रयोग म्हणून त्यानं एका इंग्रजी दैनिकासाठी ठाण्याची काही छायाचित्रं पाठवून दिली. ठाण्याच्या पुरवणीत त्यांनी ती अगदी पहिल्या पानावर मोठय़ा आकारात छापली. हा केदारसाठी टर्निग पाइंट ठरला. काही ऑफबीट विषयांसाठी त्याला वृत्तपत्राच्या असाईनमेंट मिळू लागल्या.

वृत्तपत्रांसाठी छायाचित्रण हा जरी काहीसा ग्लॅमरस असा विषय वाटत असला तरी त्यात धावपळ बरीच असते. वेळेवर पोहचावे लागते, योग्य तो प्रसंग टिपावा लागतो आणि योग्य त्या वेळेत ते छायाचित्र वृत्तपत्राच्या कार्यालयात मिळणे गरजेचं असतं. अन्यथा त्या छायाचित्राची किंमत शून्य होते. केदारने यातच खरी बाजी मारली. आजच्यासारखा वायफाय किंवा मोबाइल फोटोग्राफीचा जमाना २० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हता. मात्र केदार थेट फिल्डवरूनच छायाचित्र पाठवू लागला. येथे त्याने तंत्राचा आधार घेतला. विंडोजचा पॉकेट पीस त्याने बाळगला. त्यात कॅमेऱ्याचं कार्ड टाकता यायचं आणि फोटो पाठवणं शक्य व्हायचं. ती वेळ त्यानं नेमकी साधली. अनेक वृत्तपत्रं केदारचे फोटो वापरू लागले. पीटीआयसारख्या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने तर ठाणे जिल्ह्य़ातील छायाचित्रणाची जबाबदारी त्याला दिली.

साधारण २००५च्या दरम्यान इंग्रजी वृत्तपत्रांची बाजारपेठ मोठय़ा तेजीत होती. तेव्हा साधारण एक वर्षभर त्याने आऊटलूक मासिकात फोटोग्राफर म्हणून नोकरी केली. पण त्याचा पिंड हा नोकरी करण्याचा नव्हता. त्यामुळे तेथे तो फार काळ रमला नाही. खरं तर फ्रिलान्स फोटो जर्नालिस्ट ही संकल्पना तशी आर्थिकदृष्टय़ा परवडणारी नव्हती. पण ती केदारने यशस्वी करून दाखवली.

हे सारं पोटापाण्याचं सुरू असतानाच समांतरपणे त्याने त्याच्या आवडीच्या विषयात म्हणजेच वन्यजीव छायाचित्रणात काम सुरू केलं होतं. ती त्याची पॅशन होती, त्यामुळेच त्याच्या वन्यजीव छायाचित्रणाची दखल देशविदेशात घेतली गेली.

२००९ मध्ये नॅशनल वाईल्ड लाइफ फोटो स्पर्धेतील ‘लॅण्डस्केप आणि प्लान्टस’ विभागात त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळाले होते. त्यावर्षी तब्बल ७० हजार छायाचित्रं स्पर्धेत होती आणि परीक्षणाचे तीन राऊंड झाले होते. त्यावरूनच त्याच्या कामाची गुणवत्ता लक्षात येते.

नंतर एकदा अंबोलीच्या जंगलात भटकत असताना ‘व्हाइट कोटेड ब्राऊन पाम सिवेट’चं छायाचित्र केदारने टिपलं होतं. त्या प्रजातीची ही पहिलीच नोंद होती. जागतिक दर्जाच्या आयुसीएनने या संस्थेने त्यांच्या जुलै २०१४च्या जर्नलच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रकाशित करून केदारचा जागतिक पातळीवर सन्मान केला.  नंतरच्या काळात देशातील अनेक स्पर्धासाठी त्याने परीक्षक  म्हणून देखील काम पाहिलं आहे. २००४ साली मुंबई प्रेस क्लबने त्याचा ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ म्हणून सन्मान केला.

२० वर्षांच्या कारकीर्दीनंतर तो आता वळलाय ते छायाचित्रण शिकवण्याकडे. देशभरातील अनेक जंगलांमध्ये त्याच्या विविध कार्यशाळा सुरू असतात. शिकवण्याच्या क्षेत्रात अनेक प्रयोग करायला मिळतात पण शिकवण्याचं काम आणखीनच आव्हानात्मक असल्याचे तो सांगतो. फोटो काढले, दिले की विषय संपतो, पण शिकवायचं असेल तर तुम्हाला सतत जागरूक राहावं लागतं. नवनवीन ज्ञान मिळवावं लागतं. नव्या तंत्राशी जुळवून घ्यावं लागतं. आणि ही सतत चालणारी प्रक्रिया असते. ते सारं तो आवडीने करतोय.

सध्या तो अगदी मोजक्याच असाईनमेंट घेतो. स्वत:चा व्यवसाय सांभाळतो आणि त्यातून आनंददेखील मिळवतो. त्याची तंत्रज्ञानाशी जवळीक आजही तेवढीच आहे. त्यामुळे स्वत:च्या वेबसाइटसाठी त्याने वेब डिझायनिंगदेखील शिकून घेतलं आहे. आणि जोडव्यवसाय म्हणून वेबसाइट डिझाइनची कामंदेखील करत असतो.

सुरुवातीच्या काळातील न्यूज फिल्डमधील कामाची त्याची ओढ अजूनही आहेच. त्यात रोज काही तरी वेगळं करायला मिळायचं. त्यामुळेच रस्त्यातून जाताना एखादी घटना घडत असेल तर आजही त्याला ती धावपळ आठवतेच, आणि अगदी सहजपणे पत्रकार मित्रांना फोन जातोच. कारण आजही त्याच्यातला फोटो जर्नालिस्ट जागा असतो.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographer kedar bhat