करिअर ही म्हटलं तर सापेक्ष कल्पना आहे. अमूक एखादं स्थान मिळवण्यासाठीची धडपड हेसुद्धा करिअर असू शकतं आणि अशी धडपड न करता, स्पर्धेच्या जगात सगळ्यांबरोबर न धावता, शांतपणे आपल्याला ज्यात आनंद मिळतो ते करत राहणं हेसुद्धा करिअर असू शकतं.
प्रश्न आहे, आपण त्याकडे कसं बघतो हा.
‘‘काय करावं या मुलाचं काही समजत नाही. अगदी हात टेकले याच्यापुढे!’’
‘‘काय झालं एवढं?’
‘‘पुढच्या आठवडय़ात त्याचे कॅम्पस इंटरव्हय़ू आहेत आणि पठ्ठय़ा म्हणतोय की, मला अशा घाण्याला जुंपून घ्यायचे नाही. म्हणे काही तरी क्रिएटिव्ह करायचंय.’’
‘‘मग तुम्ही एवढे रागावलात का? उलट तो आपला रस्ता स्वत: धडपड करून शोधतो आहे याचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे.’’
‘‘अहो, असा रस्ता शोधण्यात र्अध आयुष्य जाईल. एक तर ही अॅडमिशन त्याच्या मनाविरुद्ध झाली आणि आता ही थेरं.. आम्ही कधी याच्याबाबतीत निश्चिंत होणारच नाही का?’’
‘‘त्याला हा कोर्स करायचा नव्हता का? मग तुम्ही का जबरदस्ती केली? त्याला काय करायचं होतं?’’
‘‘त्याने व्हायोलिनचं खूळ डोक्यात घेतलं होतं. रात्रंदिवस तेच! कसंबसं त्यातून त्याला बाहेर काढलं आणि आता..’’
‘‘अहो, पण त्यातून तुम्ही त्याला बाहेर का काढलंत?’’
‘‘मग काय? ते काय करिअर आहे का?’’
‘‘का? ते का करिअर नाही?’’
‘‘अहो, अशा खुळचट गोष्टींमध्ये काही भरवशाची कमाई आहे का? करिअर करायचं म्हणजे डॉक्टर, इंजिनीअर, कॉम्प्युटर, सी.ए. हेच भरपूर कमाई देणारे पर्याय आहेत. बाकी सर्व जुगारच. लागला तर जॅकपॉट नाही तर हाती भोपळा.’’
‘‘म्हणजे ज्यात भरपूर पैसा मिळतो तेच चांगलं करिअर, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?’’
‘‘अर्थातच, त्यात काही दुमत असू शकतं का?’’
‘‘समजा, एखाद्या मुलाला किंवा मुलीला कमाई अगदी डोळे दिपवणारी नसेल, पण काम खूप आनंद आणि समाधान देणारं असेल, तर तो किंवा ती यशस्वी आहे, असं तुम्ही म्हणाल की नाही?’’
‘‘हे बघा, यशस्वी होण्यासाठी फक्त कामातलं समाधान पुरेसं नसतं. पैसा हवाच!’’
‘‘आणि हेच आपण लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवतो. शिक्षण म्हणजे मुलांच्या आंतरिक क्षमतांचा परिपूर्ण विकास करण्याची, त्यांना सुजाण मानव बनवण्याची प्रक्रिया हे आपल्या गावीही नाही. आपण त्याच्याकडे केवळ पैसा कमावण्याची कुवत देणारं साधन अशा संकुचित नजरेने बघतो. आपल्या क्षमतांचा विकास झाल्यावर पैसा आपोआप येईल, हे अजमावून पाहायलाही आपण तयार नाही. आपल्या तरुण पिढीच्या डोळ्यांवरही आपण हाच चष्मा चढवला आहे. त्यामुळे पैसा कमावण्याच्या, मोठ्ठे पॅकेज मिळवण्याच्या शर्यतीत धावण्यासाठी ते तयार होतात, छाती फुटेपर्यंत धावतात, भरपूर पैसाही कमवतात, पण बरंच काही गमावून. आपल्याला आवडीच्या गोष्टी आयुष्यभर करायला मिळाल्या नाहीत, याची खंतही बोचत राहते. याचा दोष ते आपल्या आईवडिलांना देत राहतात. आपल्या अवतीभवती अशी अनेक उदाहरणं आपण बघतोच आणि या सगळ्या पुढल्या परिणामांपेक्षा वर्तमान अधिक महत्त्वाचा आहे. मुलांच्या नैसर्गिक ऊर्मी आपण मारू नयेत. कल्पना करा, सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर यांना आपण नोकरीच्या घाण्याला जुंपलेलं बघू शकतो का? आणि या सर्व नामवंत व्यक्ती आहेत; पण अशा असंख्य व्यक्ती जगात आहेत, ज्यांनी आयुष्यभर एकच ध्यास घेऊन त्याचा पाठपुरावा केला आहे. तेच त्यांचं करिअर आहे.’’
‘‘आणि पोटाचं काय?’’
‘‘अहो, पैसा व कामातील आनंद यांचे प्राधान्यक्रम वेगळे असू शकतात. संगीत, साहित्य, कला यांच्या साधनेपुढे काहींना बाकी सर्व फिकं वाटतं. एखादं वाद्य, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, लेखन, अध्यापन, संशोधन यासाठी लोक आयुष्य वेचतात. या मूल्यांचा आदर व जोपासना करणाऱ्या शांतिनिकेतन, नई तालीम, अरविंद व कृष्णमूर्ती यांच्या विचारांवर आधारलेल्या व इतरही अनेक भिंतीपलीकडच्या शाळा आपल्याकडे आहेत.’’
‘‘म्हणजे तुमच्या मतानुसार मुलांनी फक्त कला जोपासत बसावं. औपचारिक शिक्षण घेऊच नये!’’
‘‘हा आमच्या म्हणण्याचा विपर्यास आहे. आम्ही करिअर व पैसा यांच्यातील अंतर दाखवत आहोत आणि शिक्षणाचा उद्देश काय याविषयी बोलत आहोत. शिक्षणानेच मुलांच्या अंगभूत गुणांना पैलू पाडले जातात आणि या प्रक्रियेतून पुढे गेल्यावर अनेक वेगळ्या वाटा खुणावू लागतात. विज्ञान म्हणजे आपल्याला फक्त डॉक्टर, इंजिनीअर दिसतात, पण आज नॅनो टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी असे दिवसागणिक विकसित होत जाणारे किती तरी पर्याय आहेत. कॉम्प्युटर व तत्संबंधी क्षेत्रे यांत केवढी प्रगती व संशोधन होत आहे. पंचमहाभूते. पृथ्वी, पाणी, तेज, वायू व आकाश.. संशोधनासाठी खुली आहेत. या क्षेत्रांमध्ये करिअरच्या वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या व्यक्ती व संशोधन संस्था आहेत. प्रशासकीय सेवा, संरक्षण दले, सागरी विज्ञान अशी किती तरी क्षेत्रे करिअर घडवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. आजचं जग हे मूलत: बाहय़ देखाव्याचं जग आहे, त्यामुळे ड्रेस डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट ही क्षेत्रेसुद्धा अत्यंत उभारती क्षेत्रे आहेत.’’
भाषा या विषयाकडे आपण अगदी अनास्थेने बघतो. आपण एखादी भाषा बोलतो म्हणजे आपण लगेच त्या भाषेचे तज्ज्ञ होत नाही. यासाठी त्या भाषेचे शिक्षण घ्यावे लागते. आज भाषा विषयांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. शिक्षकीपेक्षा व्यतिरिक्त लेखन, भाषांतर, दुभाषक या कौशल्यांना मोठी मागणी आहे. परदेशी भाषांच्या बाबतीत तर ही मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर असते.
जी गोष्ट भाषेची तीच बी.एडसारख्या अभ्यासक्रमाची. याची सांगड आपण सरधोपटपणे फक्त शालेय शिक्षणाशी घालतो; परंतु त्यामध्येदेखील दृष्टिहीन, मूककर्णबधिर, मतिमंद मुले. ऑटिझमग्रस्त मुले, डिसलेस्किक मुले यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षण देणारे खास अभ्यासक्रम असतात व अशा प्रशिक्षित शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात मोठी मागणी असते, हे किती जणांना माहिती असते?
तात्पर्य काय, कारकीर्द कशी घडवायची याबद्दल डोळ्यांवर झापडे बांधून विचार न करता व तेच मुलांवरही न लादता त्यांना आपले पंख पसरू द्यावेत. ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ ही कोती वृत्ती बाळगण्यापेक्षा ‘कुठलेही क्षेत्र निवडले तरी त्यात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीची गरज असते, यशाला कुठलाच शॉर्टकर्ट नसतो’ हे तरुण पिढीच्या मनावर कोरायला हवे. त्याचबरोबर कुठलेही क्षेत्र हे उच्च किंवा नीच नसते, त्याबद्दलची आपली ‘लगन’ महत्त्वाची असते, हेही त्यांना जाणवून द्यायला हवे. यशस्वी माणसे कुठल्याच वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ती नेहमीच्याच साधारण गोष्टी अत्यंत असाधारणपणे करून वेगळ्या वाटा निर्माण करतात. मळलेल्या वाटांवरून जाणारे बहुसंख्य असतात, पण आपली वाट निर्माण करणारे ‘तेजस्वी जीव’ असतात. तसे होणे अवघड असले तरी आनंददायी असेल नाही का?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com