‘भीमाशंकराच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ या ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया. प्लास्टिकच्या भस्मासुराचा अक्राळविक्राळ चेहरा आणि त्याचं भयप्रद रूप या प्रतिक्रियेतून आपल्यासमोर येतं.
‘भीमाशंकराच्या मस्तकी कचऱ्याची गंगा’ हा सुहास जोशींचा लेख वाचला. त्यांनी प्लॅस्टिकच्या अर्निबध वापराबाबत लिहिले आहे. अशीच परिस्थिती थोडय़ा फार फरकाने सर्वत्र किल्ले, उद्याने, फारसे प्रसिद्ध नसलेली देवालये. इत्यादी ठिकाणी पाहावयास मिळते. याला कारण प्लास्टिक नावाच्या भस्मासुराचा उदय.
१९ व्या शतकाच्या मध्यास औद्योगिक क्रांती घडल्याने सर्व कुटिरोद्योग बंद पडले, शहरे वाढू लागली व बकाल झाली. खेडी ओस पडू लागली. लोक नोकरीसाठी शहराकडे वळू लागले व खुराडय़ात राहू लागले. त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकात प्लॅस्टिक नावाचा भस्मासुर उदयास आला आहे. या प्लास्टिकने वेष्टन प्रक्रियेत (पॅकेजिंग मटेरियल) फार मोठी क्रांती घडवून आणली आहे. दूध, तेल, कन्फेन्शनरी, रसायने, धान्य, भाजी इत्यादीमध्ये प्लास्टिकचा वारेमाप वापर होत आहे. जसे प्लॅस्टिकचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे तोटेही आहेत. प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही. प्लास्टिक १०० वर्षांहून अधिक टिकतं. हेच कारण पर्यावरणाच्या नाशास कारणीभूत ठरत आहे.
जगांत सर्वत्र प्लास्टिकचा वापर होत आहे, पण भारतासारखी कठीण परिस्थिती ऐकिवात येत नाही. त्याचे कारण असावे सरकार व कठोर कायदे व त्यांचे नागरिकांकडून पालन. भारतात परिस्थती उलटी आहे. त्याचे कारण आपली मनोवृत्ती. सरकार कायदे बनवते, जाहिराती करते पण त्याचे पालन वेगळ्या एजन्सीद्वारे करावे लागते, हे होत नाही. याचे कारण अधिकारी वर्गाचा नाकर्तेपणा पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष असावे.
आपण भारतात कोठेही फिरलो तर रस्त्यावर, रस्त्याकडेला गुटख्याची रिकामी पाकिटे, थुंकणे, पिचकारी, शिंकरणे वगैरे गोष्टी आढळतात. त्यातून आपली गलिच्छ मनोवृत्ती दिसून येते. याकरिता प्रत्येक नागरिकास नागरी भान (सिव्हीक सेन्स) असणे आवश्यक आहे. ते शिकवून प्राप्त होत नाही. तर मुळातच असणे आवश्यक आहे. अगदी शिकलेल्या, गलेगठ्ठ पगार घेणाऱ्यांकडेही कधी कधी हे भान नसते. उदाहरणच द्यायचे तर भर रस्त्यात गाडी थांबवून पिचकारी मारणे असली कृत्ये नेहमीच केली जातात आणि हा आपला सार्वभौम हक्क आहे असेच सर्वजण समजतात.
प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
भारतात कोठेही जा. रेल्वेच्या, रस्त्याच्या दुतर्फा, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या यांचे खच पडलेले दिसतात. प्लास्टिक पिशवीमध्ये नको असलेले खाद्यपदार्थ घालून त्या पिशव्या कचराकुंडीत टाकल्या जातात. हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी गायी वगैरे त्या पिशव्या चघळून गिळतात. नंतर त्यांचे विघटन न झाल्याने ते तसेच पोटात रहाते. परिणामी त्यांचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे प्लास्टिकची न वापरलेली जाळी समुद्रात पडल्याने अनेक मासे त्यात अडकून मृत्यू पावल्याची उदाहरणे आहेत. प्लॅस्टिक पिशवी गिळल्याने आतडय़ाला पीळ पडल्याने अनेक शार्क, डॉल्फिन मृत्यू पावल्याची उदाहरणे आहेत.
प्लास्टिकचा शोध लागल्याने पॅकेजिंग इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आले व हेच पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. पूर्वी दूध भांडय़ात घ्यावे लागे. तेल डब्यात घ्यावे लागे. कडधान्ये, कागदी पिशवीत मिळत. गूळ, खजूर वगैरे कागदातून बांधून दिला जात असे. सोबत पिशवी असणे अनिवार्य असे. भाजी पिशवीतूनच न्यावी लागे. परंतु हे सर्व बदललेले आहे. बरोबर पिशवी नसेल तर भाजी, तेल, दूध, कडधान्ये वगैरे प्लास्टिक थैलीतून नेता येते. हेच कारण प्लास्टिकच्या कचरावाढीस कारणीभूत ठरत आहे.
पूर्वी कोठे बाहेर जावयाचे असल्यास घरातूनच भाजी-पोळी व इतर पदार्थ डब्यातून नेता यावयाचे. डबा किमती असल्याने तो परत घरी आणला जाई. पाणी फिरकीच्या तांब्यातूनच नेले जाई. त्यावेळी नूडल्स, वेफर्स, टेट्रापॅकमधील पेये उपलब्ध नव्हती. प्लॅस्टिकचा सर्वत्र वापर अजून सुरू व्हायचा होता.
पूर्वीची चॉकलेटस् व बिस्किटे ही बटरपेपर वेस्टनात असत. त्यावर पातळ कार्डबोर्डचा खोका व त्यावर रंगीत वेष्टन असे. औषधे व सौंदर्यप्रसाधने व औषधी गोळ्या या कटाक्षाने बाटलीमधून मिळत असत. त्या बाटल्यांचा परत उपयोग होत असे, परंतु आता प्लास्टिकमुळे वापरा व फेका हे ब्रीदवाक्य आहे. मोकळ्या बाटलीची नगण्य किंमत असते.
दुसरीकडे पूर्वीच्या तुलनेत लोकांचे पगार वाढले. पर्यटन आणि हॉटेलिंग वाढले. लोकांना स्वत:च्या कार्स घेता येऊ लागल्या. कॅलेंडर पाहून जर सुट्टय़ा आल्या तर लोक वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन करू लागले.
किल्ले देवस्थाने, थंड हवेची ठिकाणे या ठिकाणी गर्दी होऊ लागली. जागा असेल तेथे लोक जाऊ लागले. बरोबर खाण्याच्या वस्तू प्लास्टिक पेले, प्लास्टिक प्लेट, पाण्याच्या बाटल्या घेण्यात येऊ लागल्या. जिथे जागा मिळेल तेथे खाणे-पिणे होऊन व खाण्याच्या प्लेट, उरलेले अन्न, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या आसपासच टाकल्या जाऊ लागल्या. ते उचलून कचरापेटीत जाऊन टाकणे हे आपल्या रक्तातच नाही. अशा तऱ्हेने सर्वत्र कचरा साठत जातो.
लोकांना ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी कसे वागावे याची काहीही माहिती नसते. प्राचीन कालचा वारसा टिकवून ठेवावा त्या अवशेषांची नासाडी करू नये हे त्यांच्या ध्यानात येत नाही. काही महाभाग, देवालये, किल्ला, मंदिर, गुंफा, चैत्य विहार या जागी आपले नाव कोरण्यात धन्यता मानतात. त्यांना पुरातत्त्व विभागतल्या कर्मचाऱ्यांनी हटकले असता, ते हुज्जत घालतात.
काही ठिकाणी पुरातत्व विभाग कार्यरत असतो. पण खूपदा कर्मचारी कमी असतात. त्यांना फारसे काहीही अधिकार नसतात. महत्त्वाची आणि युनेस्कोने जागतिक वारसा (ऌी१्र३ंॠी) ठरवलेली ठिकाणे वगळता इतरत्र दयनीय स्थिती असते.
हल्ली एक-दोन दिवस सुट्टी आली तर विचारूच नका. तरुण मंडळी पर्यटनाच्या नावाखाली धागडधिंगा, मद्यपान, गाणे बजावणे करतात. इतरांना त्रास होईल हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. खाणेपिणे झाल्यावर त्याचा कचरा उचलून कचरापेटीत टाकला जात नाही.
हे सगळं बदलायला हवं. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये अशी शिकवणी घरापासून सुरुवात केली पाहिजे. लहान मुलांना जेव्हा चॉकलेट, कँडी, बिस्किटे खाल्ल्यावर त्यांचे रॅपर्स घरातील कचरा डब्यात टाकावे हे कटाक्षाने शिकवावे. आपणाकडे नागरी भान मुळातच नाही, ते लहानपणापासूनच दिले तर हीच मुले इतरांना त्याची शिकवण देतील.
देवळे ही हल्ली व्यापारी केंद्रे बनलेली आहेत. तेथील पुजाऱ्यांना देवालयांची स्वच्छता राखण्यात, त्यासाठी भक्तांना प्रवृत्त त्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे, विसर पडलेला असतो. अशा सगळ्याच ठिकाणी खूप गर्दी असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवायला हवे. भाविकांच्या सुरक्षेचाही विचार व्हायला हवा. प्रत्येक देवस्थानने स्वत:ची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता देवस्थानाने यात्रीकर लावावा असे वाटते.
पर्यटनस्थळे, देवालये व इतर पर्यटन ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी असणे श्रेयस्कर आहे. त्यामुळे दोन पोलीस चौकांतील तक्रारीच्या जागेबाबत (Area) र्कायवाही करणे सोपे जाईल.
हे बदलण्यासाठी भाविकांनी, पर्यटकांनी कचरा करू नये, याकरिता जागोजागी कचराकुंडय़ा ठेवण्यात याव्यात. सर्वत्र सूचनांचे फलक, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेत लावावेत व त्यावर संबंधित यंत्रणेची देखरेख असावी. त्या सूचनांचे पालन होते का हेही पाहणे महत्त्वाचे आहे, आवश्यक आहे.
प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही याची महिती अनेकांना नसते. त्यामुळे ते माहीत करून देणे आवश्यक वाटते. प्लास्टिकच्या अर्निबध वापरामुळे पर्यावरण, प्राणिमात्र, समुद्रजीव यांची बेसुमार हानी होत आहे. म्हणून प्लास्टिकच्या अर्निबंध वापरावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिकच्या पिशवीतून सामान घेणाऱ्यांबरोबरच देणाऱ्यांसाठी जबर दंड हवा. तसेच प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालावयास हवी. कमी मायक्रॉनच्या पिशव्यांवर तर बंदी हवीच. याकरिता कठोर कायदा करण्याची जरुरी आहे. आपल्याकडे सक्ती केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. याकरिता आपली मानसिकता बदलणेही आवश्यक आहे.
जयंत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com