श्रावण महिना दोन्ही हातांनी भरभरून निसर्गाची दौलत उधळत असतो आणि माणसाला ‘घेऊ किती दो करांनी’ असं होऊन जातं. त्याचाच माणसाकडून आविष्कार होतो तो धार्मिक-सांस्कृतिक पातळीवर. त्यामुळेच श्रावणात व्रतवैकल्यांची, सणावारांची रेलचेल होऊन जाते. बहरलेल्या निसर्गाशी एकरूप होणारं उत्साही, उत्सवी मन दर वर्षी नित्यनेमाने प्रथा-परंपरांशी असलेलं आपलं नातं जोपासत राहतं. या प्रथा-परंपरांशी निगडित असलेला एक धागा धार्मिक असतो, तर दुसरा सांस्कृतिक. सांस्कृतिक पातळीवर सणा-समारंभांइतकंच महत्त्व आहे ते खाद्यसंस्कृतीला. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात गेलं तर श्रावणातली खाद्यसंस्कृती तिथल्या सामाजिक-भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळी आहे. साहजिकच तिथले खाद्यपदार्थ वेगळे, चालीरीती-प्रथा वेगळ्या. वर्षांनुवर्षांच्या लोकजीवनातून विकसित होत गेलेलं हे वैविध्य म्हणजे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. यंदाच्या श्रावणात ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्रातील या श्रावणी खाद्यसंस्कृतीतील श्रीमंतीचा प्रामुख्याने वेध घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण महिना हा नुसता महिना नसतो, तर ते जणू एक पॅकेज असते. हिरवाईने नटलेली पृथ्वी, तिचा सृजनाचा उत्सव, डोळ्यांचं पारणं फेडत असतो. एखाद्या नाजूक तृणपात्यापासून रंगबिरंगी फुलांपर्यंत काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलेलं असतं. या सगळ्या वातावरणाचा माणसाच्या मनावरही परिणाम न होईल तरच नवल. त्यामुळे धार्मिक व्रतवैकल्याची, सांस्कृतिक सणांची, त्या अनुषंगाने विकसित झालेल्या खाद्यसंस्कृतीची संपन्न रूपं बघायला मिळतात ती श्रावणातच. श्रावणी सोमवार, शिवामूठ वाहणं असो की मंगळागौर श्रावणातल्या प्रत्येक वाराला धार्मिकदृष्टय़ा काही तरी महत्त्व आहे. या प्रत्येक दिवशी करायची काही तरी व्रतं आहेत. याशिवाय नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, बैलपोळ्यासारखे सण आहेत. यातले रक्षाबंधन, बैलपोळ्याासारखे सण वैयक्तिक पातळीवर घरोघरी साजरे होतात तर नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमीसारखे सण सामूहिक पातळीवर साजरे केले जातात.

आपल्या सगळ्याच सणांना कृषीसंस्कृतीचं अधिष्ठान असल्यामुळे ते निसर्गचक्राशी जोडलेले आहेत. साहजिकच निसर्गाचं अप्रूप वाटणं आणि त्यातून त्याचं आपल्या पद्धतीने कोडकौतुक करणं आलंच. त्यातून श्रावण म्हणजे बहराचा, सर्जनाचा महिना. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला इतर महिन्यांपेक्षा जरा जास्तच कोडकौतुक आलं आहे.

डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या काठाने असणारी छोटीशी, टुमदार घरं श्रावणाच्या ऊन-पावसाच्या खेळात न्हायलेली बघताना ‘गावानेच उंच केला हात दैवी प्रसादास, भिजुनिया चिंब झाला गावदेवीचा कळस’ या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. श्रावणाच्या काळात अशा टुमदार गावांमध्ये देवळांमधून वेगवेगळे सप्ताह सुरू होतात आणि या सगळ्या वातावरणात पावित्र्य भरून राहतं.

व्रतवैकल्यं करण्यासाठी त्यामुळे एकदम कुणी सोमवारी शंकराला लाखभर प्राजक्ताची फुलं वाहण्याचा संकल्प करतं आणि मग त्या घरचे सगळे टपटप पडणारी प्राजक्ताची नाजूक फुलं वेचण्यात गर्क होऊन जातात. प्राजक्ताच्या फुलांचा मंद सुवास, त्यांचं ते नाजूक पण देखणं रूपडं श्रावणाच्या वातावरणाला अधिकच गहिरं बनवतं. शंकराला सव्वा लाख बेल वाहण्याचा संकल्पही असाच. धार्मिकदृष्टय़ा शंकर या देवतेच्या जवळ नेणारा आणि मानसिक-शारीरिकदृष्टय़ा गुणकारी अशा बेलाच्या झाडाच्या जवळ नेणारा. या महिन्यात एकीकडे पोथी-पुराणे, ग्रंथवाचन, निरूपण या सगळ्यातून जीवनाच्या या विलक्षण खेळाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होतो तर सण आणि व्रतवैकल्य यांच्यामधून सांस्कृतिक-धार्मिक जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न होतो. नागपंचमी, श्रावणी सोमवार, जरा – जिवंतिका पूजन, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, पोळा, पिठोरी अमावास्या, शीतलासप्तमी असं सगळं साजरं करण्यात श्रावण कधी सरला हे समजतही नाही.

या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतात त्या वेगवेगळ्या कहाण्या. ‘एक आटपाट नगर होतं’पासून सुरू होणाऱ्या. ‘उतू नकोस मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस,’ असं बजावणाऱ्या. ‘आयुष्य सुफळ संपूर्ण व्हायला हवं,’ असं सांगणाऱ्या. या साध्यासुध्या कहाण्या साध्यासोप्या भाषेत जीवनाचा अर्थ सांगून जातात.

नागपंचमीला बांधले जाणारे झोके आणि हातावर रंगणारी मेंदी म्हणजे एके काळी मुलींसाठी आनंदाची खाण असायची. आता काळ बदलला आणि आनंदाच्या कल्पना बदलल्या असल्या तरी मेंदीच्या पानांवर अजूनही मुलींचं मन झुलत असतंच.

हे सगळं आपल्या रोजच्या जीवनात. श्रावण तिथं चैतन्य आणतो कारण मुळात निसर्ग चैतन्यमय झालेला आसतो. पावसाने दऱ्याखोऱ्यांचं रूपच पालटून टाकलेलं असतं. हिरव्यागार डोंगररांगा आणि लाल-तपकिरी पाणी घेऊन धावणाऱ्या खळाळत्या नद्या. त्यांची हिरवी आणि लाल तपकिरी रंगसंगती मनाला एकदम तजेला देऊन जाते. पाण्याचा खळखळाट, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकाचे डराँव डराँव या सगळ्या चित्राला एक नाद प्राप्त करून देतात. ओल्या मातीवर गांडुळं आणि गोगलगायी दिसायला लागतात. झाडांच्या खोडांवर किंवा ओल्या पालापाचोळ्यावर अळंबी (कुत्र्याच्या छत्र्या) उगवलेल्या दिसतात. जागोजागी नाजूक पानांचे नेचे खडकांच्या भेगांमध्ये उगवतात. पानगळ झालेल्या सर्वच झाडांना एव्हाना नवीन पानं आलेली असतात. ठिकठिकाणी हिरव्या मखमली शेवाळाचं आवरण तयार होतं.

पावसाच्या काळात डोंगराच्या अंगाखांद्यावर झुळझुळणारे धबधबे या सगळ्या निसर्गचित्रात अनोखे रंग भरतात. काही धबधबे धबाबा कोसळणारे, निसर्गाच्या रौद्र रूपाचा आविष्कार घडवणारे, तर काही तुषार अलगद उडवत मनसोक्त भिजण्यासाठी आवाहन करणारे. हे आवाहनही कुणाला नाकारता न येण्याजोगं असंच.

निसर्गाच्या वरदहस्तामुळे श्रावण एकदम देखणा होऊन जातो. साधी पावसाळ्यात उमलणारी फुलं घ्या. त्यांच्या शेकडो जाती, शेकडो रंग आणि हजारो छटा हे या ऋतूचं अद्भुतच! रंगरूपगंधाचा निसर्गाचा हा आविष्कार म्हणजे खरंत्ोर कोडंच आहे. साधं जंगलात कुठेही उगवणारं जांभळ्या रंगाचं कारवीचं फूल आपल्यासमोर असा काही नजारा उभा करतं..   आणि अशी ही कारवी सात वर्षांतून एकदाच फुलते. बाकीच्या झाडांना दर वर्षी, काहींना वर्षांतून दोनदा तर काहींना तर वर्षभर फुले येतात. खरं तर कार्वी म्हणजे काही अतिदुर्मीळ वगैरे वनस्पती नाही. अख्ख्या पश्चिम घाटातच कार्वीचे राज्य आहे. ती साधारण सहा ते १८ फुटांपर्यंत वाढते. दर वर्षी पावसाळ्यासोबत कार्वीची झुडपे उगवतात. पावसाळ्यात त्यांना हिरवीगार पाने येतात. त्यावर अनेक अळ्या गुजराण करतात. पाऊस गेला की पाने सुकून, गळून जातात व केवळ एक खुंट उरतो. हे तब्बल सात र्वष सुरू राहतं. आठव्या वर्षी मात्र पावसाळ्यात पानांसोबतच हळूहळू कळ्याही येऊ  लागतात. ऑगस्टपासून कार्वी फुलायला लागते. सर्वच झाडांना एकत्र बहर येतो आणि साधारण महिनाभर संपूर्ण डोंगरउतार गुलाबी-जांभळ्या रंगाने झळाळून उठतो. सप्टेंबरनंतर बहर ओसरू लागतो आणि मग या झुडपांवर फळे येतात. उन्हाळ्यापर्यंत झुडपासोबत ही फळेही सुकतात आणि मग पहिल्या पावसासोबत फुटून बिया सर्वत्र विखुरल्या जातात. या बियांनाच मग धुमारे फुटतात आणि कार्वीच्या नव्या पिढीचे सात फेरे सुरू होण्यास सुरुवात होते. याबरोबरच सोनकी, नागफणी, कवला, भारंगी, मंजिरी, वायुतुरा, कळलावी, तेरडा, गौरीहार, सोनटक्का अशी पावसाळ्यातल्या फुलांची खूप मोठी यादी आहे.

फुलाइतकीच पावसाळ्यात निसर्गाची कमाल दिसते ती पावसाळी भाज्यांमध्ये. अर्थात आज शहरी लोकांना फार थोडय़ाच प्रमाणात या भाज्या माहीत आहेत त्यामुळे त्या खाण्याचे प्रमाणही कमी आहे. आदिवासींना मात्र त्यांच्या परंपरागत शहाणपणामुळे या भाज्या आणि त्यांचे औषधी उपयोग नीट माहीत असतात.

आपल्याला एरवी माहीत असणाऱ्या मेथी-पालक-लाल माठ या पालेभाज्यांपेक्षा पावसाळी रानभाज्या वेगळ्या असतात. भारंगी, चायवळ, पोळू, लवंडी, केरा, कैला, कुर्डू, नारळी, रानकेळी, घोळू, रानमाठ, कुडा, कंठोली (हिरव्या काटेरी फळासारख्या दिसणाऱ्या या भाजीला काही जण ‘कटरेली’ असेही म्हणतात.) वांघोटी, पेंढरा, पाथरी, मोरवा, खडासिंग, लोत, मोदोडा, टाकळा, अळीव या भाज्यांची आता नावेही आपल्याला माहीत नसतात. पावसाळ्यात शेवग्याच्या फांद्यांची छाटणी करतात तेव्हा मिळणारी शेवग्याची पाने म्हणजे भाजी आवडणाऱ्यांसाठी मेजवानीच असते. या भाज्या नुसत्याच चवीच्या नाहीत तर औषधीदृष्टय़ाही महत्त्वाच्या असतात. एखादी हृदयासाठी चांगली, एखादी किडनीसाठी, तर एखादी रक्तशुद्धीसाठी! भारंगी तर बहुगुणीच पण या रानभाज्या कधीही मुळापासून उपटायच्या नसतात त्यांची फक्त पानंच खुडायची असतात. कोकणात पावसात अळूची कोवळी, छोटी पानं मिळतात. त्यांना ‘तेरं’ म्हणतात. हे अळू परसातले, आपणहून वाढवलेले अळू नाहीत. ते रानातच मिळतात. आणि फक्त पावसाळ्यातच. त्यांची भाजीही विशिष्ट पद्धतीनेच करायची असते. याशिवाय शेवळं,शेंडवळ, घोळ या भाज्याही खास पावसाळ्यातच खायच्या असतात. मुख्य म्हणजे या रानभाज्यांची लागवड कुणी करीत नाही. निसर्गच दर पावसाळ्यात त्यांची लागवड करतो.

असा हा देखणा, हसरा, नाचरा श्रावण. त्याच्या रंगात रंगायला लावणारा. चला तर मग या अंकाच्या श्रावणसफरीला.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com