19-lp-theaterनाटक म्हणजे मराठी माणसाचा प्राण.. नाटकाच्या त्याच्या या वेडापायी मराठी रंगभूमीची वैभवशाली परंपरा निर्माण झाली आहे. पण रंगमंचावर एक वेगळंच जग निर्माण करणाऱ्या नाटकाच्या पडद्याआड पाहिलं म्हणजेच नाटय़गृहांची अवस्था पाहिली तर एक विदारक चित्र समोर येतं.

नुकतंच ठाण्यात ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन सुरू झालं. नाटय़संमेलन म्हणजे रंगदेवतेचा उत्सव. गेली ९६ वर्ष तो अव्याहत सुरू आहे, याचाच अर्थ मराठी रंगभूमीला मोठी परंपरा आहे. आजच्या हाय टेक काळात मराठी रंगभूमीने एकीकडे तंत्रज्ञानाची कास धरली आहे, तसंच दुसरीकडे साजरीकरणाच्या प्रभावामुळे नाटय़संमेलनाचा ‘इव्हेंट’ होऊ लागला आहे. संमेलनासाठी लाखो-करोडो रुपये खर्च होत असतानाच संबंधित कलाकृती जिथे सादर केली जाते, त्या नाटय़गृहांकडे मात्र काहीसं दुर्लक्षित होताना दिसतंय. ‘नाटय़गृहांची वाईट अवस्था’ या विषयावर खरं तर अनेकदा चर्चा झाली आहे. पण, प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तिचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. म्हणूनच नाटय़संमेलनाचं सध्याचं इव्हेंटीकरण आणि ग्लॅमराइज रूप बघता महाराष्ट्रातील नाटय़गृहांच्या वाईट परिस्थितीवरही नजर टाकणं महत्त्वाचं ठरतं.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
sangeet Manapaman Krishnaji Prabhakar Khadilkar Drama play entertainment news
१८ गायकगायिकांच्या १४ गाण्यांनी सजलेला ‘संगीत मानापमान’

आपल्याकडे सरकारी, खासगी आणि महानगरपालिका अशा तीन मालकींची नाटय़गृहे आहेत. एरवी सरकारी कारभारावर अनेकदा बोललं जातं. सरकारी कामात दिरंगाई असते, सरकारी कसं वाईट होतं असे ताशेरे ओढले जातात. पण, नाटय़गृहांच्या बाबतीत मात्र अपवाद ठरतो. इथे सरकारी नाटय़गृहांसारखीच खासगी आणि महानगरपालिकेच्या नाटय़गृहांची अवस्था आहे. नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अभाव नाटय़गृहांमध्ये दिसून येतोय. रंगमंचावर फळ्या एकसारख्या नसतात. लाइट्स लावण्याची सुविधा नसते. रंगमंचावर वरच्या भागात असलेल्या झालरी स्वच्छ नसतात. दिवे टांगलेले असतात पण, त्यातले दिवे फुटलेले असतात. विजेचा प्रवाह अधेमधे बंद पडतो. सगळीकडे जनरेटरची सुविधा असतेच असं नाही. काही ठिकाणी मेक अप रूममध्ये बसायला जागा नसते. तिथल्या काचा, आरसे फुटलेले असतात. मेकअप करताना आवश्यक असणारे दिवेच उपलब्ध नसतात. स्वच्छतागृह स्वच्छ नसतात. प्रकाशयोजनेसाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री नसते. अशा अनेक गोष्टी नाटकाला बाधा आणणाऱ्या असतात. अशी परिस्थिती साधारणपणे कमी-अधिक प्रमाणात सगळ्याच नाटय़गृहात दिसून येते.

सातत्याने नाटक करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे प्रशांत दामले. गेली अनेक वर्षे प्रशांत नाटकांमध्ये काम करीत असल्यामुळे त्यांचा नाटय़गृहांशी नियमितपणे संपर्क आहे. त्यामुळे नाटय़गृहांच्या सद्य:स्थितीबद्दल ते त्यांचं मत मांडतात. ‘संपूर्ण महाराष्ट्रात नाटय़गृहांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अशी परिस्थिती उद्भवण्याला तिथे रोजची साफसफाई नसणे, हे कारणीभूत आहे. सगळ्यात वाईट अवस्था आहे ती स्वच्छतागृहांची. काही नाटय़गृहांमध्ये मेकअप रूमचे आरसे, दिवे वेगळ्याच पद्धतीने बसवले असतात. यामुळे कलाकारांची गैरसोय होते. काही नाटय़गृहांमध्ये साऊंड सिस्टीम चांगली नाही. प्रेक्षकांना संवाद नीट ऐकू येत नाहीत, अशाही तक्रारी येत असतात. नाटय़गृहांच्या व्यवस्थापक टीमला सांगूनही त्याची दखल घेतली जाईलच असं नाही’, प्रशांत सांगतात.

20-lp-theaterशहरी भागातील नाटय़गृहांमध्येच व्यवस्थापकांची अशी परिस्थिती आहे. तर मग बाहेरगावी काय असेल त्याचा अंदाज येऊ शकतो. मिरजमध्ये बालगंधर्व नाटय़मंदिर हे महापालिकेचं आहे. इथल्या व्यवस्थापन विभागात फक्त एक कर्मचारी असतो. त्यामुळे या नाटय़गृहाच्या अडचणी कोणाला सांगणार, असा प्रश्न इथे प्रयोगासाठी येणाऱ्या नाटककर्त्यांना पडलेला आहे. नाटय़गृहात असलेल्या साधनसामुग्रीची पुरेशी माहितीही व्यवस्थापकांना नसल्यामुळे प्रयोगाच्या वेळी लागणाऱ्या वस्तू, साहित्य उपलब्ध होऊ शकत नसल्याची आढळून येतं. इतर काही कर्मचारी या नाटय़गृहात दिसलेच तर ते कंत्राटी पद्धतीने नेमले जातात. खरं तर बालगंधर्व हे नाटय़मंदिर चांगलं आहे. पण, तिथे सोयी-सुविधा फारशा बऱ्या नाहीत.

ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे या गंभीर विषयावर त्यांचं स्पष्ट मत मांडतात. ‘‘रस्ते, रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणांची अवस्था वाईट असूनही लोक तिथे जातातच. आपल्याकडे ‘चलता है’चा फंडा खूप चालतो. गरज आणि आवड अशी दोन कारणं त्यामागे आहेत. आम्ही नाटय़प्रेमी असल्यामुळे अशा वाईट अवस्थेतही प्रामाणिकपणे प्रयोग करतो. काही खासगी नाटय़गृहे सर्वार्थाने चांगली आहेत. काही ठिकाणी कर्मचारीही उत्तम असतात; पण तिथे भाडे खूप जास्त असते. प्रत्येक वेळी प्रत्येकाला ते परवडतंच असं नाही. बाहेरगावच्या नाटय़गृहांसह मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांतही नाटय़गृहांची अवस्था वाईट आहे. महानगरपालिकेच्या नाटय़गृहांमधील व्यवस्थापकांवर काही बंधनं असतात. बंधनात राहूनही चांगली कामं करता येतात; पण नाटकाविषयी प्रेम हवं. अनेक ठिकाणी एसी बंद असतो, पंखे नसतात, या अडचणी वारंवार सांगितल्या जातात. बरेच नाटय़कर्ते स्वत:चे लेपल माइक घेऊन जातात. नाटय़गृहात कुबट वास येत असल्यामुळे काही जण स्प्रेसुद्धा घेऊन जातात,’’ अतुल पेठे त्यांना आढळून आलेल्या अडचणी सांगतात. ते एक नजर नाटय़ संमेलनावरही टाकतात. त्यांच्या मते नाटय़गृहांसारख्या मूलभूत ठिकाणी असणाऱ्या गैरसोयींवर संमेलनासारख्या घडामोडींमुळे प्रकाश पडायला हवा; पण नाटय़ संमेलनात कोणत्याही प्रकारची गंभीर चर्चा घडत नाही. तिथलं नाटकांविषयीचं ध्येय स्पष्ट नाही. चित्रपट महोत्सवांप्रमाणेच नाटय़ महोत्सवही आणखी व्हायला हवेत, असंही ते सुचवतात.

महानगरपालिकेच्या नाटय़गृहांच्या व्यवस्थापकीय विभागात संवाद साधायला माणसं नाहीत. ती असली तरी अडचणींची योग्य दखल घेतली जात नसल्याचं दिसून येतं. नाटकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत अपुरी माहिती असल्यामुळे असं घडतं. नाटय़कर्त्यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. ठरावीक वेळेत घडणारी ती गोष्ट नाही. त्यासाठी नाटय़गृहांमध्ये रंगभूमीवर प्रेम करणारे कर्मचारी असायला हवेत. काही नाटय़गृहांमध्ये नाटय़प्रेमी कर्मचारी आहेत; पण ते अपवाद म्हणून. त्यामुळे व्यावसायिक नाटक करणारे साऊंड सिस्टम, लाइट्स, लेपल माइक असं सगळंच प्रयोग करताना सोबत घेऊन जातात.

21-lp-theaterनाटय़गृहांचं बांधकाम करताना नाटकाच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात. नाटकाला लागणारा रंगमंच किती मोठा-लहान हवा, त्याची उंची किती असावी, विंगा कशा असाव्यात, मेकअप रूमची वेगळी रचना असावी का, स्वच्छतागृहांची बांधणी कशी असावी या साऱ्याचा योग्य रीतीने विचार करणं खूप गरजेचं आहे. या अभ्यासाचा अभाव अनेक नाटय़गृहांमध्ये दिसून येतो. पनवेलचं वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह चांगलं आहे; पण सुरुवातीला इथे तीन जिने वर चढून नाटकाचं सामान, सेट न्यावा लागायचा. काही कलाकार, निर्मात्यांच्या सूचनेनंतर सामान वर नेण्यासाठी तिथे ट्रॉली बसवण्यात आली. मुळात अशा प्रकारची सूचना करावी लागणं हेच चुकीचं आहे. नाटकाचं संपूर्ण साहित्य नेण्यासाठी स्वतंत्र सोय नाटय़गृहाने करायलाच असावी. धुळ्याचं एक खासगी नाटय़गृह अतिशय सुंदर आहे; पण त्याच्या खासगीकरणामुळे त्याचं भाडं खूप आहे. यामुळे तिथे फारसे प्रयोग होत नाहीत. तिथल्या जाणकार, नाटय़प्रेमी रसिक प्रेक्षकांना नाटकांपासून दूर राहावं लागतं. दादरच्या रवींद्र नाटय़ मंदिरात प्रायोगिक नाटकांसाठी मिनी थिएटरची सुविधा आहे; पण तिथे प्रयोग करण्यासाठी नाटकाचं सामान वरच्या मजल्यापर्यंत नेण्याची सोयच नाही. ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाचा रंगमंच प्रचंड मोठा आहे. बहुद्देशीय असं ते नाटय़गृह आहे, असं म्हणायला हरकत नाही. रंगमंच मोठा असल्यामुळे नाटकाचं नेपथ्य अतिशय छोटं दिसतं. त्यामुळे नाटकाचा तितकासा प्रभाव पडत नाही. माटुंग्याच्या यशवंत नाटय़ मंदिरातील तालीम करण्याचा हॉल अतिशय बंदिस्त आहे. मिरजमध्ये असलेल्या बालगंधर्व नाटय़ मंदिरापर्यंत पोहोचताना मोठा बाजार लागतो. त्यामुळे तिथवर पोहोचायला बराच वेळ जातो. नाटय़गृहं बांधताना संबंधित सल्लागाराची मदत घेतली तर नाटकाला पोषक असणाऱ्या गोष्टी घडू शकतील.

नाटय़ संमेलनासाठी फिरता रंगमंच, दादोजी कोंडदेव स्टेडिअम सजवणं, विविध उच्च दर्जाचे विविध कार्यक्रम ठेवून संमेलनाचाही दर्जा वाढवणं अशा अनेक गोष्टी केल्या जाताहेत. जितक्या आस्थेने संमेलन सजवलं जातंय तितक्याच प्रेमाने नाटय़गृहांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष दिलं तरी खूप आहे, असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. नाटय़गृहांसाठी वर्षांची एक निश्चित रक्कम ठरलेली असते. ही रक्कम नाटय़गृहांनुसार बदलत जाते. त्यामुळे नाटय़ संमेलनासाठी पैसे आहेत; पण नाटय़गृहांसाठी नाहीत, असं म्हणता येणार नाही; पण त्याचं नियोजन योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. तसंच ठरवून दिलेल्या रकमेत नाटय़गृहाची विशिष्ट गोष्ट करता येत नसेल तर त्याबाबत सरकार, महापालिका किंवा अन्य कोणा मालकीचं नाटय़गृह असेल त्यांना तातडीने कळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

अभिनेता प्रसाद ओक यांनी नुकताच एक फोटो सोशल साइटवर पोस्ट केला होता. ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा वर्धा येथे प्रयोग होता. तेथील नाटय़गृहात मेकअप रूममध्ये आरसा नसल्यामुळे वैभव मांगले यांनी मोबाइलचा सेल्फी मोड ऑन करून त्यात आपला चेहरा बघत मेकअपला सुरुवात केली. हा क्षण प्रसाद यांनी त्यांच्या कॅमेरात टिपला. कलाकारासाठी सगळ्यात आवश्यक असलेली गोष्टच नाटय़गृहात नाही हे या फोटोच्या निमित्ताने समजलं. प्रसादही नाटय़गृहांच्या अवस्थेबाबत नाराज आहेत. ते म्हणतात, ‘नाटय़गृहांमधली स्वच्छतागृहांकडे सर्वाधिक लक्ष द्यायला हवं. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग असला की दर वेळी आम्हाला व्हीआयपी खोली उघडून द्या असं सांगावं लागतं. ठाण्याचं गडकरी रंगायतन आणि डोंबिवलीचं सावित्रीबाई फुल कलामंदिरात स्वच्छतागृहांचं तेच चित्र बघायला मिळतं. मेकअप रूममध्ये आरसे, दिवे व्यवस्थित नसतात. अशा परिस्थितीतही आम्ही कलाकार प्रामाणिकपणे काम करतो. कारण आमचं नाटकावर आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या रसिकप्रेक्षकांवर प्रेम आहे.’ अभिनेत्री मधुरा वेलणकरही हाच मुद्दा मांडते, ‘नाटय़गृहांमध्ये सगळ्यात भीषण प्रकार असतो तो स्वच्छतागृहांचा. त्यांची निगा राखली नाही तर ते कलाकारांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतं. अनेकांना तंबाखू, पान खाऊन खुच्र्या खराब करण्याची सवय असते. काही नाटय़गृहांमधल्या दारांना कडय़ा नाहीत. लॅच असतील तर ते तोडून काढलेलं असतं. मेकअप रूममध्येच स्वच्छतागृहही असायला हवी. किमान महिलांसाठी तरी असायलाच हवं. जुन्या नाटय़गृहांचं बांधकाम आता बदलू शकत नाही. पण, नव्याने बांधकाम होणाऱ्या नाटय़गृहांमध्ये तरी या गोष्टींकडे लक्ष असायला हवं.’ कलाकारांनीही तितक्याच जबाबदारीने त्या-त्या नाटय़गृहांमध्ये नीटनेटकेपणा ठेवायला हवा, असंही ती नमूद करते.

कलाकारांनीही जबाबदारीने नाटय़गृहात वावरायला हवं, असंच मत ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांचं आहे. ते म्हणतात, ‘नाटय़गृहांच्या अवस्थेला नाटय़गृहाचे व्यवस्थापक किंवा मालकांना दोष देणं पटत नाही. नाटय़गृहात प्रयोग असताना कलाकारांनीही जबाबदारीने वागायला हवं. मेकअप रूम अस्वच्छ असण्याला काही वेळा काही कलाकारही कारणीभूत आहेत. टिशू पेपर वापरल्यानंतर तो तसाच तिथे फेकणं, मेकअपच्या साहित्यातील काही सामान सांडणं असे प्रकार कलाकारांकडून होत असतात. त्यामुळे कलाकारांनी त्यांच्यापरीने स्वच्छता ठेवायला हवी. काही कारणास्तव नाटय़निर्माते प्रयोगांना जाऊ शकत नाहीत. त्यांनी स्वत: व्यवस्थापकांशी येणाऱ्या अडचणींबाबत संवाद साधायला हवा. सांगूनही परिस्थिती सुधारत नसेल तरच मीडियाकडे जा.’ स्वच्छतागृहांच्या बाबतीत मात्र ते नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, स्वच्छतागृहांची निगा का राखली जात नाही याची कारण मला अजून कळली नाहीत. या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. ‘स्वच्छतागृहांमध्ये किमान एक भारतीय शौचालय हवं हा माझा आग्रह आहे. कारण सगळ्यांनाच कमोड वापरता येत नाही. या कारणामुळेही तिथे स्वच्छता नसते. गुडघ्यांचे आजार असलेल्या कलाकार आणि प्रेक्षकांसाठी कमोडची आवश्यकता असते. त्यामुळे ते असायलाच हवं. पण, त्या जोडीला एका तरी भारतीय शौचालयाचा समावेश असावा,’ असा त्यांचा आग्रह आहे.

वध्र्यामध्ये नाटय़गृह नाही; पण तिथल्या दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात अनेकदा नाटकांचे प्रयोग होतात. तर न्यू इंग्लिश हायस्कूल रंगमंच हे खुले नाटय़गृह आहे. या दोन्ही ठिकाणी प्रयोग होत असले तरी मूलभूत सुविधांचा काही प्रमाणात अभाव आहे. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर नाटय़गृहामध्ये व्यवस्था चांगली आहे. पण, व्यावसायिक नाटकांना आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी मात्र तिथे नाहीत. अमरावतीच्या केशवराव भोसले नाटय़मंदिराची परिस्थिती मात्र गंभीर आहे. विंग, मेकअप रूम अतिशय अस्वच्छ असतात. मेकअप रूममध्ये फक्त एक किंवा दोनच आरसे असतात. खुच्र्याची अवस्थाही वाईट असते. अकोल्यातल्या प्रमिलाताई ओक सभागृहाचीही अशीच काहीशी स्थिती आहे. मेकअप रूम, स्वच्छतागृह, खुच्र्या चांगल्या नाहीत. या परिसरात दुसरं कोणतंही नाटय़गृह नसल्यामुळे इथेच नाटकांचे प्रयोग होतात. परशुराम साईखेडकर नाटय़गृह आणि महाकवी कालिदास कलामंदिर या नाशिकच्या दोन महत्त्वाच्या नाटय़गृहांमध्येही काही अडचणी आहेत. दोन्ही नाटय़गृहांमध्ये खुच्र्याची अवस्था सारखीच आहे. एकीकडे खुर्चीचा बसण्याचा भाग तुटलेला दिसून येईल तर दुसरीकडे पाठ टेकण्याचा भाग वाकलेला दिसेल. कोल्हापूरच्या केशवराव भोसले या महत्त्वाच्या नाटय़गृहात बऱ्याच अडचणी होत्या. स्वच्छता नव्हती, आवाज व्यवस्थित ऐकू येत नसे, खुर्चा मोडकळीस आलेल्या होत्या. पण, एक-दीड वर्ष या नाटय़गृहाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. काही गोष्टींसाठी अजून परवानगी मिळायची आहे. ती मिळाली की ते पुन्हा सुरू होईल. सांगलीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहाची परिस्थिती बरी आहे. इचलकरंजीच्या नारायणराव घोरपडे या नाटय़गृहाच्याही दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून ते नव्याने सुरू झालं आहे.  वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात काही वेळा राजकीय कार्यक्रमांमुळे नाटकांना दिलेल्या तारखा रद्द करायला सांगतात, अशी माहिती मिळाली. अशा प्रकारे नाटकांचे प्रयोग रद्द केले जात असतील तर त्यात निर्मात्यापासून कलाकार, बॅक स्टेजला काम करणाऱ्या सगळ्यांचंच नुकसान आहे. नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात मेकअप रूमला एक खिडकी केली आहे. खोली हवेशीर राहावी यासाठी खिडकीची रचना केली आहे. पण, त्या खोलीच्या खिडकीबाहेरच कचरा ठेवलेला असतो. त्यामुळे खिडकी बंद ठेवावी लागते. ज्या उद्देशाने खिडकी केली आहे, तो उद्देश बाजूला पडलाय. मिरजमध्ये असलेल्या बालगंधर्व नाटय़मंदिरात विंगेंच्या बाजूला मेकअप रूम नाही. रंगमंचाच्या मागच्या बाजूला एक मोठी भिंत आहे, त्यानंतर थोडी जागा सोडून मग मेकअप रूम आहेत. त्यामुळे कलाकाराला तिथून रंगमंचावर यायला वेळ लागतो. विंगांच्या बाजूला मेकअप रूम आहेत पण, त्याच वेगळं सामान ठेवलेलं आहे. इथे फिरता रंगमंच असूनही त्याचा आनंद घेता येत नाही. तो फिरण्यासाठी त्याखाली असलेल्या चाकांचा प्रचंड आवाज होतो. त्यामुळे नाटकाचे संवाद नीट ऐकू येत नाहीत. रंगमंचावर असलेल्या लाकडी वस्तूंना वाळवी लागली आहे. या नाटय़ मंदिरात बालगंधर्व यांचा पुतळाही नसल्याची खंत तिथले काही रंगकर्मी व्यक्त करतात. कल्याणच्या अत्रे रंगमंदिराच्या काही व्यवस्थापकांकडून असं कळलं की, तिथे स्वच्छतागृहाबद्दलच्या तक्रारी येतात हे खरंय; पण त्यामागचं स्पष्टीकरणही ते देतात. अत्रे रंगमंदिरात प्रेक्षकांची क्षमता ८५० इतकी आहे. त्यामुळे एका दिवसात तीन नाटकांचे प्रयोग असतील तर इतके प्रेक्षक एका दिवसात स्वच्छतागृह वापरतात. आता इतक्या प्रेक्षकांचा राबता असल्यामुळे नाटय़गृह स्वच्छतागृहांची जितकी काळजी घेतं ते कमीच वाटतं. शनिवार-रविवार प्रेक्षकांची संख्या आणखी जास्त असते. एकीकडे भाडेवाढ झाली म्हणून निर्माते निषेध नोंदवतात; पण भाडेवाढ का होतेय याचा विचार होत नाही. व्यवस्थापकांपर्यंत एखादी अडचण आली तर ती ते सरकापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करतात. व्यवस्थापक-सरकार-प्रत्यक्ष निर्णय ही प्रक्रिया बरीच लांब असल्यामुळे काम होण्यासाठी वेळ लागतो; पण ‘तुमची तक्रार पुढे नेली आहे’ हे नेहमीचं उत्तर ‘सरकारी उत्तर’ वाटतं याला काय करणार. वर्षभर नाटय़गृहासाठी काय करणार आहोत याचं एक पत्रक द्यावं लागतं. या सगळ्या कामांना वेळ लागतो; पण तरी नाटय़गृह ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतेय. अत्रे रंगमंदिरमधले संपूर्ण एसी बदलण्यात येणार असल्याचीही माहिती कळते. नाटय़गृह खासगी असो, महापालिकेचं असो किंवा सरकारी असो, सगळ्याच नाटय़गृहांमधील व्यवस्थापकीय विभाग उदासीन असतो असे नाही. काही ठिकाणी आवडीने लक्ष घालून कलाकारांना मदत केली जाते; पण त्यासाठी त्या विभागातील माणसं नाटय़प्रेमी असायला हवीत, कारण नाटकांना हव्या असणाऱ्या गोष्टींबद्दल आणि नाटय़गृहाच्या रचनेबद्दल त्यांना माहिती असली तर गोष्टी अधिक सोयीस्कर होतील.

निर्माते प्रसाद कांबळी थोडा वेगळा मुद्दा मांडतात. ‘‘नाटय़गृहांना मराठी नाटकांपेक्षा इतर नाटकं आणि कार्यक्रमांमध्ये अधिक रस असल्याचं दिसून येतं. मराठी नाटकांबाबत एकूणच दुजाभाव दाखवला जातो असं वाटतं. पाल्र्याचं दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह दुरुस्त केलं आहे; पण आता तिथे मराठी नाटकं कमी चालतात. काही नाटय़गृहांमध्ये तर इव्हेंट्सच जास्त होत असतात. मग नाटय़गृहांवर इतके पैसे खर्च करून त्याचा मराठी रंगभूमीला काय फायदा झाला? काही नाटय़गृहांमधले कर्मचारी १० ते ५ या वेळेतच काम करतात. नाटक रात्री संपणार असेल आणि तेव्हा काही अडचण असेल तर ती सांगायची कोणाकडे? स्वच्छतागृह, मेकअप रूम, सिक्युरिटी अशा मूलभूत अडचणी साधारणत: सर्वत्रच आढळून येतील. योग्य सिक्युरिटी नसल्यामुळे काही ठिकाणी चोऱ्याही होतात. असे प्रकार झालेले आहेत,’’ महत्त्वाच्या मुद्दय़ांसह प्रसाद काही प्रश्नही उपस्थित करतात.

या सगळ्यात कलाकार आवाज का उठवत नाहीत, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे; पण आता माध्यमे वाढली आहेत. मालिका, सिनेमा, जाहिरात, नाटक अशी अनेक माध्यमं कलाकारांना उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्या एका माध्यमावर त्यांचं काही अवलंबून नाही. फक्त नाटक करणारे कलाकार कमी आहेत. अनेक कलाकार नाटकांसह मालिका, सिनेमाही करतात. त्यामुळे नाटकावर त्यांचं अवलंबून राहणं कमी झालंय. अर्थात यात गैर काही नाही. कलाकार अवलंबून नसले तरी अनेक कलाकार असेही आहेत जे यात पूर्ण लक्ष देतात. संपूर्ण वेळ यासाठी काम करता येत नसलं तरी त्यांना आढळून येणाऱ्या समस्या त्या पुढे आणतात. हेही नसे थोडके!

एखादा प्रेक्षक तीनशे रुपये देऊन सिनेमाला जातो. त्याला तिथे चांगल्या स्थितीत असलेले स्वच्छतागृह, सुरू असलेले एसी, उत्तम खुच्र्या असा सगळ्यांचा अनुभव घेता येतो. तेच तीनशे रुपये नाटकासाठी दिल्यानंतर मात्र त्यांना फक्त नाटकाचा आनंद घेता येतो. इतर सुविधा मात्र मिळत नाहीत. हा विचार व्हायला हवा; पण त्याच वेळी प्रेक्षकांनीही त्यांच्या परीने स्वच्छतागृह नीट वापरायला हवीत. कलाकारांनीही मेकअप रूम, रंगमंच, विंग यांचा योग्य वापर करायला हवा. नाटय़गृहांतील व्यवस्थापकीय विभागानेही कलाकार, प्रेक्षकांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यात लक्ष दिलं पाहिजे. असा विचार केला तर नाटय़गृहांची परिस्थिती सुधारेल यात शंका नाही. दुरुस्तीचं काम पूर्ण झालेल्या नाटय़गृहांमुळे सगळ्याच नाटय़गृहांचं चित्र बदलण्याची नांदी झाली असं म्हणू या.

हे असायला हवं

  • महिला कलाकारांच्या मेकअप रूममध्ये स्वच्छतागृह असायला हवं.
  • स्वच्छतागृहांची निगा राखण्यात नियमितपणा असायला हवा.
  • नाटय़गृहांमधल्या दारं-खिडक्यांच्या कडय़ा सुस्थितीत असाव्यात.
  • मेकअप रूममध्ये आरसे आणि दिवे यांची योग्य रचना हवी.
  • नवी नाटय़गृहं बांधताना नाटक क्षेत्रातल्या जाणकारांचा सल्ला घ्यावा.
  • अपंग आणि वयस्कर व्यक्तींसाठी दोन ते तीन लिफ्ट्सची सोय असावी. गर्दीच्या वेळी एक लिफ्ट अपुरी पडते.
  • प्रेक्षागृहात क्रायरूम असावी. लहान मुलांना घेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही खोली असते.
  • प्रेक्षागृहातल्या खुर्चा, लाइट्स, एसी यांची दैनंदिन देखभाल केली जावी.
  • प्रेक्षागृहात एसी असणं आवश्यकच आहे. एसी नसलेल्या नाटय़गृहांमध्ये पंख्यांच्या आवाजामुळे नाटकाचे संवाद नीट ऐकू येत नाहीत.
  • नाटय़गृहातल्या कर्मचाऱ्यांना नाटक आणि त्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टींबद्दल किमान माहिती असावी.

चित्र बदलतंय

नाटय़गृहांची अवस्था बिकट असल्याचं चित्र असलं तरी काही नाटय़गृहांची परिस्थिती आता बदलताना दिसतेय. नागपुरातल्या वसंतराव देशपांडे सभागृहाच्या दुरुस्तीचं काम अधिवेशनाआधी पूर्ण झालं. कोल्हापूरमध्येही असंच बघायला मिळतंय. केशवराव भोसले हे नाटय़गृह आता सुस्थितीत असून लवकरच ते प्रेक्षकांसाठी खुलं होणार आहे. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरातही काही प्रमाणात सुधारणा केल्याची माहिती मिळते. विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाची दुरुस्ती नुकतीच पूर्ण झाली आहे. चंद्रपूरचे प्रियदर्शनी नाटय़गृह दोन महिन्यांपूर्वीच दुरुस्त होऊन नव्याने सुरू झाले आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader