इंटरनेटचा वाढता वापर बघता येत्या काळात ई-बुक्स आणि ऑनलाइन पुस्तकांची विक्री याकडे प्रकाशकांचा अधिक कल असेल.
आपल्याकडे प्रकाशन संस्थांना मोठी परंपरा आहे. अनेक प्रकाशन संस्थांनी उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करून प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. पुस्तक निर्मिती करणं हेच मुळी मानाचं काम आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं महत्त्वाचं काम या प्रकाशन संस्था करत असतात. या प्रकाशन संस्थांमध्ये आता त्यांची दुसरी पिढी कार्यरत आहे. काळ, परिस्थिती, दृष्टिकोन, स्वरूप या सगळ्यातच आता बदल झाला आहे. हा बदल स्वीकारून प्रत्येकाला आपापल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागतोच. तसंच प्रकाशन संस्थांनीही सद्य परिस्थिती स्वीकारून बदलायचं ठरवलं आहे. काही प्रकाशन संस्थांमधल्या आताच्या पिढीचा या संपूर्ण प्रकाशन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घेतला. तेव्हा एक समान गोष्ट समोर आली. सगळ्याच प्रकाशनातील पुढच्या पिढीला डिजिटायझेशन महत्त्वाचं वाटतंय. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.
प्रकाशन संस्थांकडे पूर्वी घरगुती पारंपरिक उद्योग म्हणून बघितलं जायचं. त्याचं स्वरूप पूर्णत: वेगळं होतं. पण आता सगळं बदललंय. प्रकाशकांची पुढची पिढी त्याकडे आता फक्त घरगुती पारंपरिक उद्योग म्हणून न बघता त्याकडे व्यवसाय म्हणून बघते. त्यातून त्यांना वाचनसंस्कृती तर पुढे न्यायचीच आहे, पण त्याचबरोबरीने त्यांचा व्यवसायही वाढवायचा आहे. अशा वेळी गुणवत्ता आणि आर्थिक बाजू असा समतोल साधत प्रकाशकांची आताची पिढी सक्रिय असते. जुन्या वाचकांशी संबंध टिकवून ठेवत नव्या वाचकांना तयार करणं आणि त्यासाठी आजच्या घडीला करावे लागणारे सर्व बदल स्वीकारणं या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी कायम लक्षात ठेवल्या आहेत.
ऑनलाइनच्या जमान्यात आता पुस्तकंही मागे नाहीत. ई-बुक, ऑनलाइन खरेदी, किंडल, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपभोग घेताना वाचकप्रेमींना डिजिटायझेशनचा साक्षीदार होणं भागच आहे. याबद्दल डायमण्ड प्रकाशनचे नीलेश पाष्टे सांगतात, ‘इतर क्षेत्रांप्रमाणेच प्रकाशन संस्थांमध्येही तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विक्री आणि मार्केटिंगचं स्वरूप बदलतंय. सोशल मीडियाचा वापर करत डिजिटल मार्केटिंग केलं जातंय. तसंच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वाचकांना घरबसल्या पुस्तकांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा भरपूर वापर केला जातो.’ मोठी शहरं वगळता काही छोटय़ा शहरांमध्ये पुस्तकांची दुकानं खूप कमी आहेत. त्यामुळे तिथल्या वाचकांना हवी ती पुस्तकं मिळत नाहीत. अशा वाचकांसाठी ऑनलाइन प्रक्रिया फायद्याची ठरत असल्याचंही पाष्टे सांगतात. आता पुस्तकांच्या ऑनलाइन विक्रीसोबतच ई-बुक्सचाही ट्रेण्ड आहे. इंग्रजीत तो स्थिरावला असला तरी मराठीत त्याची आता सुरुवात होतेय. ज्या भागांमध्ये दुकानांची संख्या कमी आहे तिथे ई-बुक्स उपलब्ध करून द्यायला हवीत. ई-कॉमर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त ई-बुक्स पुरवणं शक्य होईल, असं पाष्टे सांगतात. डायमण्ड प्रकाशनने डेलीहंट या पोर्टलवर चार-पाच वर्षांपासून १०० ई-बुक्स आहेत. तसंच त्यांनी अॅमेझॉनसोबतही गेल्या वर्षभरात काही पुस्तकांची ई-बुक्स तयार केली आहेत. किंडलवर सध्या डायमण्ड प्रकाशनची २० पुस्तकं आहेत.
ई-बुक्स करताना प्रकाशनाच्या व्यवसायात इतर जण काय आणि कसे करतात याचेही भान ठेवावे लागते. ई-बुक्स हे बदलत्या काळाच्या ओघाने जाणारे असले तरी प्रकाशन संस्था आता जे करत आहेत तेदेखील वाढवावे लागणार आहे, हे विसरून चालणार नाही. याबद्दल मनोविकास प्रकाशनचे आशीष पाटकर सांगतात, ‘प्रकाशन व्यवसायात बदल झाले आहेत हे खरं असलं तरी त्याच वेळी अनेक संधीही वाढल्या आहेत, हेही मान्य करावे लागेल. प्रकाशन संस्थेचं स्वरूप आता पूर्वीपेक्षा बरंचसं बदललं आहे. पूर्वी फक्त लेखक-प्रकाशक यांचे हितसंबंध महत्त्वाचे होते. पण आता यासोबतच त्याची आर्थिक गणितंही महत्त्वाची आहेत. आता प्रकाशन संस्थांची संख्या वाढली आहे. पूर्वी लेखक त्याचं पुस्तक छापून येतंय यानेच खूश असायचा. पण आता त्याच्या पुस्तकाचं मार्केटिंग, विक्रीचं स्वरूप, मानधन या सगळ्याबाबत लेखकाला कल्पना द्यावी लागते. पुस्तकांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या काय चाललंय याचा अभ्यास करत विशिष्ट प्रयोग करावे लागतात. हे सगळं करताना पुस्तकाची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते. मराठी वाचकांना गृहीत धरून चालत नाही.’ ऑनलाइनचं महत्त्व स्वीकारून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, बदललेल्या स्वरूपाचा अभ्यास याकडेही लक्ष ठेवण्याबाबत ते सुचवतात.
प्रकाशकांच्या आताच्या पिढीचं लक्ष्य ऑनलाइनच्या सर्व कक्षा वापरून हा व्यवसाय मोठं करणं हे आहे, हे स्पष्ट आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आत्मसात करून पुढे जाण्याचीही त्यांची तयारी आहे. नवं स्वीकारून त्यापुढील आव्हानंही स्वीकारायला ते तयार आहेत. नीलेश पाष्टे सांगतात, ‘कुठलंही तंत्रज्ञान स्वीकारतानाच त्यासमोरील आव्हानंही लक्षात घ्यायला हवीत. ऑनलाइनचं नवीन माध्यम नीट समजून घ्यायला हवं. ते समजून घेतल्यामुळे आम्ही चांगली पुस्तकं घेऊन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचू शकतो. या माध्यमाचा अधिकाधिक वापर करायचा आमचा प्रयत्न असतो. यामुळे छोटय़ा ठिकाणहून असलेली पुस्तकांची मागणी आम्हाला पूर्ण करता येऊ शकते.’ आशय कोठावळे आणखी एका आव्हानाबद्दल सांगतात, ‘ई-बुक्स किंवा ऑनलाइन सेवांचा पर्याय उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष पुस्तक विकत घेणारा एक मोठा वर्ग आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी चांगल्या आशयाची पुस्तकं आली पाहिजेत. ऑनलाइन विक्रीसह रिटेल विक्रीकडेही लक्ष देण्याचं आव्हान आहे. निश्चलनीकरणामुळे रिटेल सेल्सवर खूप परिणाम झाला. ते पूर्ववत आणण्याचंही एक आव्हान आहे.’
सर्व प्रकाशन संस्थांसाठी डिजिटायझेशन ही एक संधीच आहे. मराठी-इंग्रजी पुस्तकांची एकमेकांशी स्पर्धा असतेच. आज नवा वाचक निर्माण होतोय; तो प्रामुख्याने इंग्रजीकडे वळतोय. अशा वेळी इंग्रजी पुस्तकांप्रमाणे ई-बुक्स करणे, ऑनलाइन विक्री वाढवणे हे प्रयोग प्रकाशन संस्थांना आता करावे लागणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या राज्यात अनेक जिल्ह्य़ांत पुस्तकांची दुकानं नसल्यामुळे डिजिटायझेशनचा फायदाच होणार आहे. पुस्तकांची दुकानं नसलेल्या ठिकाणी वेबसाइटच्या माध्यमातून पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचू शकतात. पूर्वी पुस्तकाच्या विक्रीवर त्याची लोकप्रियता आणि ती लोकप्रियता आणखी किती काळ टिकेल याचा विचार केला जायचा. पण आता ई-बुक्समुळे चित्र बदलेल. एखादं पुस्तकं एखाद्या वाचकाला तीनेक वर्षांनीही हवं असलं तर ते त्याला सहज उपलब्ध होऊ शकतं. डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित करत असतानाच मुद्रित स्वरूपातील पुस्तकांच्या अर्थकारणाकडेही तितकंच बघावं लागणार आहे.
ऑनलाइन म्हटलं की त्याच्या जोडीला तरुणाई असं समीकरण आपसूकच येतं. पण आजचा तरुणवर्ग किती वाचतो, याबद्दल विचार करणं महत्त्वाचं ठरतं. आजची तरुण पिढी वाचत नाही किंवा नवीन वाचक निर्माण होत नाहीत अशी टीका नेहमी केली जाते. पण याबद्दल थोडं वेगळं मत आशीष पाटकर मांडतात, ‘नवीन वाचक येत नाहीत, असं विधान करणं मला चुकीचं वाटतं. एखाद्या लेखकाची विशिष्ट लाट असते. मधेच एखादा लेखक येतो. त्याच्या लिखाणाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे वाचक त्याकडे आकर्षिले जातात. मग पुन्हा थोडं शांत असतं. पुन्हा दुसरा एखादा चांगला लेखक येतो. वाचक पुन्हा त्याचं लेखन वाचू लागतात. या लाटा येत राहणारच. खरं तर या लाटा आम्हीच आणायला हव्यात. तरुणांचे विषय, त्यांना आवडतील-भावतील असे विषय त्यांना दिले तरच ते वाचनाकडे वळतील.’ अलीकडे मराठी-इंग्रजी पुस्तकांची गुणवत्ता समान झाली आहे. सध्या इंग्रजी प्रकाशक काही मराठी पुस्तकांचे हक्क मागतात. हे चित्र आधी उलट असायचं, पण आता तेही बदलतंय. याचं प्रमाण आता फार नसलं तरी याची सुरुवात झाली आहे, हे नक्की’, असंही ते सांगतात.
आता सगळ्यांच्याच आयुष्यात सोशल मीडियाचं खूप महत्त्व आहे. कोणत्याही क्षेत्राच्या मार्केटिंगचं एक प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे हमखास बघितलं जातं. त्यात तितकी ताकद आहे, हे नाकारून चालणारही नाही. एकाच वेळी एकाच पोस्टने असंख्य लोकांपर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. सोशल मीडियाचा वापर करून प्रकाशन संस्था वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. मनोविकासचे आशीष पाटकर सांगतात, ‘सोशल मीडियामुळे चांगले लेखक सापडतात. आम्ही अशा लेखकांना लिहायला प्रवृत्त करतो. पूर्वी दिवाळी अंक, वेगवेगळे साप्ताहिकं, मासिकं चाळून-वाचून त्यातून लेखक शोधायला लागायचे. हा पूर्वीचा ट्रेण्ड आता सोशल मीडियामुळे बदललाय. त्या व्यासपीठावर भेटणाऱ्या लेखकांना थोडं तयार करून घ्यावं लागतं हे खरं आहे. पण वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करणारे लेखक मिळतात, हेही महत्त्वाचं आहे.’ तर मॅजेस्टिकचे आशय कोठावळे सांगतात, ‘मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेचं फेसबुक पेज आहे. त्यात आम्ही पुस्तकांचं परीक्षण, पुस्तकांची माहिती असं सतत काही तरी लिहीत असतो. ते तिथल्या एखाद्या वाचकाला आवडलं तर ते शेअर केलं जातं. तसंच त्याला ते पुस्तक विकत घ्यायचं असेल तर तिथेच ‘बाय नाऊ’ असा एक पर्याय असतो. त्यावर क्लिक करून वाचक ते पुस्तक खरेदी करू शकतात. आधी एखाद्या पुस्तकाचं परीक्षण ते वाचायचे. मग दुकानात जाऊन ते पुस्तक विकत घ्यायचे. पण फेसबुक पेजच्या या सोयीमुळे आता त्यांचा वेळ वाचतो.’ वाचकांसाठीची ही सोय खरंच चांगली आहे. पुस्तकाची माहिती, परीक्षण वाचून तिथल्या तिथे वाचकाला ते पुस्तक खरेदी करता येतं. तर पाष्टे सांगतात, ‘आमच्या अक्षरनामा या पोर्टलवर कला, संस्कृती, साहित्य, राजकारण अशा अनेक विषयांवरील लेख प्रकाशित केले जातात. वेगवेगळ्या विषयांवरील लेखन वाचण्याची आवड असणाऱ्यांना या निमित्ताने गुंतवून ठेवलं जातं. तसंच तिथे मराठी पुस्तकांच्या जाहिराती, परीक्षणं, लेखकांच्या मुलाखती असा वाचनीय आशय देऊन वाचकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातूनच पुस्तकांची विक्री किती आणि कशी होईल यासाठी प्रयोग केले जातात. आमच्या या उपक्रमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
डायमण्ड प्रकाशनाचे नीलेश पाष्टे एक वेगळा मुद्दा मांडतात, ‘सध्या कोणतीही घटना, प्रसंग, बातमी डिजिटल माध्यमातून तेही प्रामुख्याने स्मार्ट फोनवर सर्वप्रथम समजते. त्यामुळे नवीन पुस्तकाची प्रसिद्धी या डिजिटल माध्यमातून व्हायला हवी. मराठी पुस्तकाची डिजिटल उपस्थिती हवी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मासिकात, वर्तमानपत्रांत जाहिरात, प्रकाशन सोहळा, प्रदर्शन, व्याख्यानं असे कार्यक्रम करावे लागणारच आहेत पण डिजिटायझेशनचं प्रमाणही वाढायला हवं. वाचक सर्वाधिक मजकूर म्हणजे लेख, माहिती, बातमी त्याच्या स्मार्ट फोनमधूनच वाचतो. ७०-८० लोक वेबसाइटसुद्धा मोबाइलमधूनच बघतात. लोकांची मजकूर वाचण्या-बघण्याची पद्धत बदलली आहे. यानुसार पुस्तक प्रसारासाठी आणि विक्रीसाठी त्याचा वापर करणं हे खरं तर आव्हान आहे. पण त्याच वेळी त्याचा फायदाही आहे. लोकांची बदलत असलेली वाचनपद्धती स्वीकारायला हवी. त्यातून नवीन वाचक तयार होईल. अर्थार्जनाचे नवीन प्रकार निर्माण होतील.’
मागच्या वर्षी निश्चलनीकरणामुळे प्रकाशन व्यवसायाला बसलेला फटका, पुस्तकविक्रीत झालेली घट, प्रदर्शनांची संख्या, पुस्तकांची बदललेली आवड या सगळ्या गोष्टी सध्या प्रकाशन व्यवसायाची परीक्षा बघत आहेत. पण असं असलं तरी प्रकाशन व्यवसायापुढे असलेलं आव्हान आणि संधी दोन्हीचा विचार करता प्रकाशकांची पुढची पिढी सज्ज आहे. त्यांच्या आव्हानांमध्ये भरीस भर म्हणून आता जीएसटीदेखील (वस्तू आणि सेवा कर) आहे. थेट पुस्तकावर जीएसटी नसला तरी पुस्तकनिर्मितीतील प्रत्येक घटकावर जीएसटी आहे. त्यामुळे साहजिकच पुस्तकाची किंमत वाढणार आहे. आधीच पुस्तकविक्रीत झालेली घट बघता आता पुस्तकाची किंमत वाढल्यामुळे पुस्तकविक्री आणखी कमी होईल का, अशी शंका व्यक्त होतेय. पण असं सगळं असताना प्रकाशकांची पुढची पिढी इंटरनेटच्या माध्यमातून विविध पर्याय निवडत वाचकांपर्यंत पोहोचत आहे. या माध्यमाचा वापर करतानाच ते विविध प्रयोगही करत आहेत. त्यांचा या प्रकाशनाच्या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. याच दृष्टिकोनामुळे प्रकाशन संस्थांचं स्वरूप आणि त्या निमित्ताने प्रकाशन व्यवसायात होणारा बदल येत्या काळात दिसू शकेल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com@chaijoshi11