राज्यातील कोणत्याही बडय़ा शहर-उपनगरांप्रमाणे पुण्यातील रस्ते-गल्ली आणि सोसायटय़ांमध्ये नवख्या लोकांच्या स्वागतासाठी भटक्या कुत्र्यांची टोळी हजर असतेच. दिवसभराच्या वर्दळकाळात एखादे झाड, बसस्थानक, दुकाने, पानपट्टय़ा यांच्या आडोशाला स्तब्धावस्थेत दिसणारी ही कुत्री दहा-साडेदहानंतर मात्र गल्लोगल्लीचे अनभिषिक्त राजाच्या पवित्र्यात जातात. मग त्यांच्या या राज्यात गाडी किंवा चालत शिरणाऱ्या प्रत्येक माणसाला या भटकबहाद्दरांच्या आक्रमक बाण्याचा सामना करावा लागतो. शांत निर्जन रस्त्यावरून दुचाकी दिसली रे दिसली, की अचानक तिच्या वेगाशी भुंकत स्पर्धा करायला निघालेली दोन-तीन कुत्री इथेही नजरेस पडतात. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा उपद्रव रात्री प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविणे कठीण आहे, इतके त्यांचे अस्तित्व शहरभर आहे. कुत्र्यांच्या या टोळ्यांची हद्द असते. त्या हद्दीवरूनही त्यांची रात्री आपापसांत युद्धे सुरू असतात. आपले सामथ्र्य दाखवण्यासाठी त्यांची जोरदार भुंकण्याची आणि मार लागून केकाटण्याची मैफल पहाटेपर्यंत रंगते. कधी मानवी हस्तक्षेपामुळे ढवळली जाते. विद्यापीठ रस्ता, सेनापती बापट मार्ग, फग्र्युसन रोड, कर्वे रोड आणि त्यांना लागून असलेल्या गल्ल्या, रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, जंगली महाराज रोड, कोथरूड, सिंहगड रस्ता, शहरातील सर्व पेठा, स्वारगेट, पर्वती, कात्रज, धनकवडी. यासोबत पुण्यात कुठेही जा. तेथील रहिवाश्यांची रात्र ही या श्वानसूरांच्या सक्तीची असते; तर वाहनचालकांचा प्रवास या भटक्या जीवांच्या धास्तीत सुरू राहतो.

श्वानदंश दुप्पट

गेल्या दहा वर्षांमध्ये शहरातील भटकी कुत्री चावल्याच्या तक्रारींचे प्रमाण दुप्पट झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालातील नोंदीनुसार २००५ मध्ये ९ हजार १४५ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. २०१५ अखेपर्यंत हेच प्रमाण १८ हजार ५६७ वर जाऊन पोहोचले. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ही ५२ हजारपर्यंत पोहोचली आहे. जुलै २०१६ पर्यंत शहरातील साधारण दहा हजार नागरिकांना भटके कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या. जानेवारी ते जुलै २०१६या कालावधीत दरमहा जवळपास १ हजार ६०० नागरिकांना श्वानदंशामुळे लस घेण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दिवसाला भटके कुत्रे वाढल्याचे किंवा त्यांच्या ओरडण्याचा त्रास होत असल्याचा पाच ते सहा तरी तक्रारी येत असल्याचे अधिकारी सांगतात. पालिकेने तक्रार निवारणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सर्वाधिक तक्रारी या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत असल्याच्या आहेत. दिवसाला पंधरा ते वीस तक्रारी याबाबत नोंदवल्या जात असल्याचे दिसून येते.

कचराकुंडय़ा आश्रयस्थान

शहरातील वाहून चाललेल्या कचराकुंडय़ांवर हमखास वीस-पंचवीस कुत्र्यांची टोळकी हुंदडताना दिसतात. तेथे टाकून दिलेल्या अन्नपदार्थासोबत आसपास फिरणारे उंदीर, घुशी यांना भटकी कुत्री फस्त करतात. मुळातच रस्त्यावर असलेल्या कुंडय़ांतून आजूबाजूला पसरलेला कचरा चुकवत जाताना नागरिकांना या उनाड कुत्र्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा अन्नाच्या शोधात रात्री कचराकुंडीत असलेला कचरा पहाटेपर्यंत कुत्र्यांनी बाहेर उपसून ठेवलेला असतो.

सोसायटय़ांमध्ये वाद

भटक्या कुत्र्यांचे पालनहार आणि श्वानद्वेष्टे अशी उघड विभागणी सोसायटय़ांमध्ये झाली आहे. अन् त्याचा वेगळाच मानवी संघर्ष उभा राहिला आहे. सोसायटय़ांमध्ये भटक्या कुत्र्यांना खाणे घालण्यावरून भांडणे होत आहेत. परिसरावर माणसांइतकाच कुत्र्यांचाही हक्क आहे असे मानणारा वर्ग आहे. त्याला विरोध करणारे सगळ्या कुत्र्यांना एकत्र करून मारून टाकावे, अशी टोकाची मते मांडत आहेत. ऑक्टोबर २०१६ च्या पहिल्या आठवडय़ात कोथरूड भागात भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाणे घालणाऱ्या महिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. त्यापूर्वीही कुत्र्यांना फटाक्यांच्या माध्यमातून इजा पोहोचवल्यामुळे झालेली भांडणे, कुत्र्यांना गोळ्या घालण्याचे किंवा जाळून टाकल्यावरून प्राणीप्रेमींनी केलेल्या तक्रारी असा संघर्ष सातत्याने सुरू आहे. किंबहुना दिवसेंदिवस वाढतो आहे.

सोडून दिलेल्या कुत्र्यांचा उपद्रव

एकीकडे भटक्या कुत्र्यांचीही निगा राखणारे अनेक नागरिक शहरात असताना, दुसरीकडे घरी विकत आणून पाळलेले परदेशी प्रजातींचे श्वान रस्त्यावर सोडून देणारेही अनेक आहेत. हौशीने घरी आणलेले कुत्रे मोठे झाल्यावर खूप खाते, ओरडते, घरात लहान मूल आहे, कुत्र्याचे केस गळतात अशा अनेक कारणांमुळे पाळीव कुत्री मोकाट सोडून दिली जातात. कुत्रे म्हातारे झाल्यामुळे नवे कुत्रे घरात आणले जाते आणि त्यामुळे म्हातारे कुत्रे रस्त्यावर सोडून देण्याचे प्रमाणही मोठे आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर परदेशी प्रजातींची भटकी कुत्रीही दिसतात. कुत्रे पाळल्यानंतर त्याची नोंदणी करण्याचा नियम असला तरीही त्याबाबत जागरुकता नाही आणि पालिका किंवा रहिवासी सोसायटय़ा या मुद्दय़ाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे ‘आरंभ शूर’ प्राणिप्रेमींना कोणत्याही व्यवस्थेला उत्तरच द्यावे लागत नाही. अशी रस्त्यावर सोडून दिलेली पूर्वाश्रमीची पाळीव असलेली कुत्री या समस्येत अधिकच भर घालतात. मुळात लाडाकोडात राहणाऱ्या या कुत्र्यांच्या नशिबी रस्त्यावरचे आयुष्य आले की ते अधिक आक्रमक होतात. त्याचप्रमाणे गावठी किंवा स्थानिक प्रजातींच्या तुलनेत त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यामुळे त्यांच्याकरवी अनेक आजार भटक्या कुत्र्यांमध्ये पसरतात.

बिबटय़ा मागावर

भटक्या कुत्र्यांची समस्या जुनी असली तरी या कुत्र्यांच्या मागावर येणाऱ्या बिबटय़ांची समस्या नव्याने शहरापर्यंत येऊन धडकली आहे. भटकी कुत्री हे बिबटय़ासाठी तुलनेने सोपे खाद्य असल्याचे निरीक्षण नोंदवले जाते. कुत्र्यांच्या मागावर मनुष्यवस्तीपर्यंत येणाऱ्या बिबटय़ांचा उपद्रव जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये होत होता. आता शहरातील भागांतही बिबटे शिरू लागले आहेत, अशी माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात येते. महिनाभरापूर्वी कोंढवा या शहराच्या गजबजलेल्या भागात असणाऱ्या एनआयबीएम या संस्थेच्या आवारात बिबटय़ा शिरला होता. दौंड, हडपसर या भागातही बिबटे दिसून आले आहेत. याउलट हे कुत्रेही काही प्राण्यांसाठी घातक ठरत आहेत. खडकवासला, एनडीए भागात हरणांवर कुत्र्यांकडून हल्ले होत असल्यामुळे हरणे जखमी होत असल्याचे प्रकार घडत होते.

पालिका काय करते?

कुत्र्यांना मारून टाकण्यावर बंदी आल्यानंतर पालिकेकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत हे निर्बीजीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत पालिकेकडून ११ हजार ६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. सध्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी शहरात ‘ब्लू क्रॉस सोसायटी’कडून केंद्र चालवले जाते. तेथे दोन शस्त्रक्रिया कक्ष आहेत आणि साधारण ८० ते ९० कुत्री या केंद्रात ठेवता येऊ शकतात. आता पालिकेकडून बाणेर भागात नवे केंद्र आणि रुग्णालय उभे करण्यात येत आहे. साधारण १२० कुत्रे ठेवता येण्याची क्षमता असणाऱ्या केंद्राच्या निर्मितीसाठी ४२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

प्राणिप्रेमींचा पुढाकार

परदेशी कुत्रे पाळून प्राणिप्रेम व्यक्त करण्याऐवजी भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना आसरा देण्यासाठी काही श्वानप्रेमी सरसावले आहेत. समाजमाध्यमांवर आपापले गट करून त्यांचा चळवळींचा प्रसार सुरू आहे. डॉ. रवी कसबेकरांसारखे प्राणिप्रेमी, पीपल फॉर अ‍ॅनिमल्स, ‘पॉज’, ब्लू क्रॉस सोसायटी, अ‍ॅनिमल वेलफेअर यासारख्या स्वयंसेवी संस्थांकडून भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर्स उभी करण्यात आली आहेत. संस्थांकडून प्राणिदत्तक मेळावे घेऊन भटक्या कुत्र्यांना घर मिळवून दिले जात आहे. कुत्री पकडण्यास मदत करणे, त्यांचे लसीकरण करणे, निर्बीजीकरण करणे यासाठी या संस्था पालिकेलाही मदत करतात. अनेक महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी गट करून भटक्या प्राण्यांना घर मिळवून देण्यासाठी काम करत आहेत.

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांकडून कुत्र्यांना नष्ट करण्याची मागणी केली जाते. त्याला प्राणिप्रेमी आणि संघटनांकडून विरोध केला जातो. मात्र खरेच एखादा प्राणी नष्टच करणे हा नैतिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने व्यवहार्य उपाय आहे का? किंवा भटक्या कुत्र्यांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना, कुत्रे आक्रमक झाल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून प्राणिप्रेम कितपत योग्य? या दोन्ही बाजूंच्या प्रश्नांवर अद्यापही सुवर्णमध्य निघालेला नाही. हा प्रश्न फक्त पुण्यापुरताच अर्थात नाही. देशातील शहर किंवा गाव कोणतेही असो, कोणत्या ना कोणत्या प्राण्याशी जुळवून घेतच माणसाला जगता येणार आहे, हे स्वीकारून त्यानुसार जागृती आणि आवश्यक उपाय करण्याची गरज अगदी अडीच काटय़ावर आहे.
रसिका मुळ्ये – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader