रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
बहुरूपी हे एके काळी वेगवेगळी रूपं घेऊन लोकांचं मनोरंजन करणारे कलाकार होते. पण बदलत्या काळाबरोबर मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या. बहुरूप्यांसमोर आता त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष उभा ठाकला आहे.

राजस्थानातील दौसा इथलं प्रसिद्ध गुप्तेश्वर मंदिर. या मंदिराच्या सभागृहात ५० हून अधिक जण जमलेत. पांढऱ्या रंगाचे फेटे घातलेल्या या लोकांच्या डोळ्यात उत्सुकता आहे, की त्यांच्या समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी नक्की काय सांगणार आहेत.. ते ज्या सभागृहात बसले आहेत तेथे ‘बहुरूपी समारोह: बहुरूपी संघर्ष समिती आपका इस्तकबाल करती है’ असे फलक लावलेले दिसतात. काही तरुण मंडळींनी पसे जमा करून ही सभा आयोजित केली आहे. समोर स्टेजवर बसलेली सगळी ज्येष्ठ नेते मंडळी त्यांच्या पूर्वजांच्या पूर्वीच्या सुवर्णकाळाच्या आठवणी जागवत आहे.

साधारण १५ दिवसांपूर्वी झालेल्या सभेत राजस्थानातील बहुरूपी जमले होते ते त्यांच्या अस्तंगत होत चाललेल्या कलेला जिवंत कसं ठेवता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी. अस्तित्वाची लढाई लढणारी कोण आहेत ही बहुरूपी मंडळी?

बहुरूपीमधला बहु हा संस्कृत शब्द आहे. बहु म्हणजे अनेक, अधिक. रूप म्हणजे ठरावीक भूमिकेचे दृश्यस्वरूप. अगदी प्राचीन काळापासून बहुरूपी जमातीचे अस्तित्व आहे. बहुरूपी हे भटक्या समाजातले अस्थिर लोक प्राचीन काळी ते समाजकारणात-राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांना हजारों वर्षांचा इतिहास आहे, तशीच फार जुनी परंपराही आहे. श्रीपती भट्टाच्या ‘ज्योतिषरत्नमाला’ या प्रसिद्ध ग्रंथात त्यांचा उलेख आहे. शिवाय समर्थ रामदासांनी आपल्या भारुडातही त्यांचा उल्लेख केलेला आहे. जटाधारी तपस्वी, गोसावी, साधू इत्यादींची सोंगे घेणाऱ्या बहुरूपीसारख्या, वेगवेगळी कला-कौशल्ये जोपासणाऱ्या भटक्या जमातींच्या भिक्षुकांचा हेरगिरीसाठी गुप्तपणे कसा उपयोग करून घ्यावा यासंबंधी ‘कौटिलीयम अर्थशास्त्रम’ ग्रंथात लिहिली आहे.

प्राचीन काळी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची करमणूक करण्यासाठी फारशी साधने उपलब्ध नव्हती. लोकांची मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी गावोगावी फिरून बहुरूपी आपली कला सादर करत. देवादिकांची, पुराण-पात्रांची सोंगे घेत. संगीत, नृत्य, अभिनय या कलांद्वारे  पुराणकथांचे कथन करत. छोटे छोटे नाटय़प्रसंग लोकांच्या अंगणात, गावागावांतील चौकात, मंदिरांसमोर सादर करत. लोकांची करमणूक करून सदाचार आणि नीतीचा प्रचार करत असत. प्रेक्षक किंवा त्यांची कला पाहणारे लोक देतील ती भिक्षा, पसे घेऊन हे बहुरूपी आपला उदरनिर्वाह चालवत असत. कालांतराने लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आध्यात्मिकतेबरोबर निखळ करमणूक करण्याची कलाही त्यांनी अवगत केली. नव्या काळातील अनेक पात्रं त्यांच्या सादरीकरणात दिसू लागली. एकाच कार्यक्रमात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना खिळवून ठेवणारा बहुरुपी हाच खरा उत्कृष्ट कलाकार अशी त्यांची धारणा आहे. यांच्या कला सादरीकरणात अचकट-विचकट, अश्लील किंवा उथळ विनोद किंवा संवाद नसतात. पुराणातील अनेक प्रसंगात ते शृंगाररसाची अभिव्यक्ती करतात, पण ती उत्कट असे वर्णन करता येईल अशी असतो.

पूर्वी भारतात छोटे-मोठे अनेक राजेमहाराजे होते. त्यांना शत्रूच्या हालचाली, जनतेची सुख-दु:खे, भावभावना समजून घेण्यासाठी बहुरूपी समाजाचा गुप्तहेर म्हणून उपयोग व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी बहिर्जी नाईकांचे उदाहरण बोलके आहे. ते हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांना ‘खबऱ्या’च्या रूपात मदत करणाऱ्या शेकडो बहुरूप्यांची इतिहासात नोंद नसली तरी त्यांना राजाश्रय मिळत होता. त्यामुळे त्यांची कला हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यातून त्यांना मोठय़ांची जवळीक, प्रतिष्ठा मिळत होती. राजेशाही, बादशाही संपली. त्याबरोबर यांचा राजाश्रय संपला. मिळणाऱ्या सोयीसुविधा संपल्या. उपजीविकेसाठी पूर्वीप्रमाणे गावोगाव फिरून लोकांचे मनोरंजन करणे हा एकमेव पर्याय उरला.

विज्ञानाने प्रगती केली आणि मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध झाली. त्यामुळे साहजिकच घरात बसल्या जागी उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे मनोरंजन होऊ लागले. त्यामुळे बहुरूप्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. लोकांची मानसिकता बदलल्याने बहुरूप्यांकडे उपयोगाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. उलट अनेकदा संशयाने पाहिले जाते. त्यात रोजगारासाठी स्थलांतर करत असल्याने बहुरूप्यांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. सध्या ही जमात व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आज बहुरूपी लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे येथे आपली कला सादर करताना दिसतात. मात्र त्यांच्यातले अनेकजण बेरोजगारीच्या विळख्यात सापडले आहेत.

गुप्तेश्वर मंदिरात भरलेल्या सभेत त्यांच्या याच स्थितीविषयी चर्चा सुरू होती. ज्येष्ठ बहुरूपी शिवराज यांनी उत्तर भारतातील बहुरूप्यांना एकत्र केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालीच सभा सुरू होती. शिवराज स्वत: मूत्रिपड खराब झाल्याने डायलेसिसवर आहेत. मात्र त्यांच्या उपचारासाठी कोणतीही शासकीय आरोग्य योजना नाही. राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते असूनही ते कर्ज काढून उपचार घेत आहेत. शिवराज राष्ट्रीय दर्जाचे कलाकार असून त्यांची ही स्थिती तर अनेक बहुरूप्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड नसल्याने कोणत्याही सरकारी सवलतींचा उपयोग होत नाही.

शिवराज यांनी बठकीत बहुरूपी लोकांना शिक्षण घेऊन नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे कलाही जिवंत ठेवण्याचा संदेश दिला. तसेच सगळे नीट होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पण आजची या जमातीची स्थिती पाहता ते थोडे साशंक झाले आहेत. त्यांची ही साशंकता योग्य आहे. कारण बहुरूपी संपूर्ण भारतात आढळतात, राज्याराज्यांत त्यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र त्यांची कला आता पूर्वीप्रमाणे जोपासली जात नाही. अजूनही त्यांना भटक्यांचेच जीवन जगावे लागत आहे. आता आता कुठे त्यांची मुले एका ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. संपूर्ण देशभरातील बहुरूप्यांची समस्या म्हणजे त्यांना स्थिर निवाराही उपलब्ध नाही. गावाबाहेर जिथे मोकळी जमीन असेल तिथे हे झोपडय़ा बांधून राहतात. ती जागा कुणाच्या मालकीची असल्यास मालक नको म्हणून सांगत नाही तोपर्यंत राहता येते. जागा सरकारी असल्यास अतिक्रमण केले म्हणून हटवले जाते. म्हणजे पुन्हा दुसऱ्या गावी जायचे. त्यांचा स्थिर ठिकाणी निवारा नाही म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड मिळत नाही. आणि ती कार्ड नाहीत म्हणून कुठल्याही सुविधा नाहीत, अशा दुहेरी समस्येत हा समाज अडकला आहे. अनेक बहुरूप्यांनी कला सोडून रोजगारासाठी इतर पर्याय निवडायला सुरुवात केली आहे, पण तेही त्यांच्या जगण्यासाठी पुरेसे नाहीत. अशाने एकेकाळी राजाश्रय मिळवलेली ही कला नाहीशी होऊन जाण्याची भीती आहे.

अस्तंगत होत चाललेल्या हा कलाप्रकार  जपण्यासाठी या कलाकारांना ओळखपत्र, आरोग्य सुविधा, आधार कार्ड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यातून त्यांची भटकंती संपून त्यांना स्थिर रोजगार तर मिळेलच शिवाय कलाही जपता येईल. समाजाने आणि सरकारने मानसिकता बदलायला हवी. ही कला आणि कलाकार पुन्हा नव्याने मानसन्मान मिळवू शकले तर कदाचित शिवराज यांच्यासारख्या असंख्य बहुरूप्यांना जमातीसाठी काही केल्याच्या समाधानात आनंदाने डोळे मिटता येतील.

Story img Loader