देशातील अत्यंत प्रगतिशील आणि विकासाच्या दृष्टीने इतर प्रमुख शहरांच्या पुढे असलेले शहर अशी पुण्याची ओळख आहे. विद्येच्या या माहेरघराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशीही ओळख प्राप्त झाली आणि नव्या युगात आता माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या नकाशावरही पुणे झळकले आहे. हिंजवडी, वाकड, खराडी, नगर रस्ता या भागांत आयटी कंपन्या मोठय़ा संख्येने सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे शिक्षणाबरोबरच नोकऱ्यांसाठी पुण्यात येणाऱ्यांच्या संख्येतही सातत्याने मोठी वाढ होत आहे. िपपरी-चिंचवड एमआयडीसी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडी नॉलेज पार्क, तळेगाव इन्फोटेक पार्क, रांजणगाव, चाकण, जेजुरी येथील औद्योगिक केंद्र यामुळे एकूणच आर्थिक विकासाला आणि बांधकाम उद्योगाला चालना मिळाली आहे.
पुणे शहराची अधिकृत, म्हणजे शासननिर्णयानुसार भौगोलिक वाढ केव्हा होणार हे तूर्त सांगता येत नसले, तरी पुण्याचा विस्तार वेगाने सुरू आहे आणि पुण्याच्या लोकसंख्यावाढीचे प्रमाणही मोठे आहे. शहराची सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन आणखी अडतीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला असला तरीही तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तो प्रस्ताव केव्हा मंजूर होईल हे अनिश्चित आहे, पण आज ना उद्या शासनाला हा प्रस्ताव मान्य करावा लागणार आहे.
पुणे शहराच्या लोकसंख्येत वाढ होण्याचे मुख्य कारण नोकरी आणि व्यवसायासाठी तसेच शिक्षणासाठी राज्यातून आणि परराज्यातून येणाऱ्यांची मोठी संख्या. शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे स्वाभाविकच घरांची मागणीही वाढत गेली आणि गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला चालना मिळाली. पुण्यात सदनिकांना चांगली मागणी सुरू झाल्यानंतर स्वाभाविकच बांधकामेही तशाच पद्धतीने होऊ लागली. त्यातून घरे, बंगले आणि सदनिका भाडय़ाने देणे हा एक नवा व्यवसाय पुण्यात सुरू झाला. त्यामुळे खरेदीदारांना अनेक पर्यायही उपलब्ध झाले.
दोन-तीन खोल्यांच्या सदनिकांपासून (वन बीएचके, टू बीएचके) ते आलिशान सदनिकांपर्यंत आणि छोटय़ा बंगल्यांपासून ते डुप्लेक्स, रो हाऊसपर्यंतचे सगळे पर्याय विविध भागांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच शहरात, उपनगरात आणि समाविष्ट गावांमध्येही सदनिकांची बांधकामे आणि नवीन गृहप्रकल्प सातत्याने उभे राहताना दिसत आहेत.
पुण्याजवळ असलेल्या हडपसरमध्ये मगरपट्टा सिटी ही टाऊनशिप उभी राहिली आणि त्यानंतर अनेक उपनगरांमध्ये तसेच समाविष्ट गावांच्या हद्दीत टाऊनशिप उभ्या राहिल्या. स्वाभाविकच त्यांचे एक वेगळे आकर्षण घरखरेदीत निर्माण झाले. शहराजवळचे छोटे शहर अशा स्वरूपाच्या आणखीही अनेक टाऊनशिप पुण्यात येत्या काळात उभ्या राहणार असल्याने सदनिका व बंगले खरेदीच्या क्षेत्रात त्यांचे स्थान वैशिष्टय़पूर्ण राहणार आहे. शहरातील मोकळे भूखंड विशेषत: आसपासच्या गावांमधील मोकळ्या जागांच्या किमतीही नेहमीच उंच राहिल्या आहेत. विशेषत: पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरासह मावळ, मुळशी आदी तालुक्यांमधील जमिनींना घरबांधणीमुळेच मोठा भाव प्राप्त झाला आहे.
पुनर्विकासातील अडथळे
जुन्या वाडय़ांचा तसेच ज्या इमारती बांधून पंचवीस-तीस वर्षे झाली आहेत त्यांचा पुनर्विकास हा पुण्यातील एक मोठा प्रश्न आहे. मात्र या प्रक्रियेत अनेक अडथळे उभे राहिलेले असल्यामुळे वाडय़ांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मध्य पुण्यात अद्यापही वाडय़ांची संख्या मोठी आहे. या वाडय़ांच्या पुनर्विकासासाठी जादा एफएसआय मिळणे आवश्यक असल्याची मागणी आहे. त्याबरोबरच जुन्या इमारतींनाही जादा टीडीआर मिळाला तरच त्यांचा विकास शक्य होणार असला तरी त्याबाबतही अद्याप ठोस धोरण नसल्याने त्याबाबतही संदिग्धताच आहे. ज्या इमारतींना पंचवीस-तीस वर्षे झाली आहेत अशा इमारतींची शहरातील संख्याही मोठी आहे. मात्र त्यातील अनेक इमारती अरुंद रस्त्यांवर उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना अतिरिक्त टीडीआर मिळू शकत नाही. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाबाबतही गेले दोन-तीन महिने शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
पुणे परिसरावर दृष्टिक्षेप
आयटी उद्योगांमुळे पुण्याजवळच्या िहजवडी, वाकड, िपपळे सौदागर वगैरे परिसराचा सर्वागीण विकास झाला असून तो डोळे दिपून टाकणारा आहे. हिंजवडी परिसराचा ‘आयटी हब’ म्हणून विकास करण्याचा शासनस्तरावर निर्णय झाला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला. देशाच्या कानाकोपऱ्यांतून येथे उच्चशिक्षित वर्ग नोकरीनिमित्ताने आला आणि तो निवासासाठी योग्य सुविधा पाहू लागला. चांगला पगार असल्याने घरेही चांगलीच हवीत, अशी अपेक्षा असणाऱ्या या वर्गाची गरज लक्षात घेऊन पुणे-मुंबई भागातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी या भागाकडे लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला छोटय़ा स्वरूपातील घरे येथे तयार झाली आणि आता मोठे गृहप्रकल्प, रो हाऊसेस, टाऊनशिप उभ्या राहू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर तीस-पस्तीस मजली इमारतींचे प्रकल्पही येथे सध्या सुरू आहेत आणि दीडशे एकरांपेक्षा अधिक जागेत मोठय़ा टाऊनशिपही उभारल्या जात आहेत. नगर रस्ता, खराडी येथेही आयटी उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू झाले आहेत. पुण्यापासून पस्तीस किलोमीटरवर असलेल्या तळेगावलाही डेस्टिनेशन तळेगाव असे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुंतवणुकीसाठी तळेगावचा विचार प्राधान्याने केला जातो, एवढे या भागाला महत्त्व आले आहे.
विनायक करमरकर – response.lokprabha@expressindia.com