बाहेर ब्रंच, लंच किंवा डिनरला जायचंय, तिथे एकदम स्टाइलबाज दिसायचंय.. आणि म्हणून तुम्हाला प्रश्न पडलाय की कोणते कपडे घालायचे? टेन्शन नही लेने का!
बाहेर खायला किंवा जेवायला जाणे म्हणजे आपल्या परिसरातील जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन लंच किंवा डिनर कारण्यापर्यंतच बाहेर जेवायची संकल्पना सुरुवातीला मर्यादित होती. हीच संकल्पना हळूहळू व्यापक होत आहे. हल्ली अनेक कुटुंबं ठरवून एखाद्या दिवशी एखाद्या सुंदर, लॅव्हिश रेस्टॉरंट्समध्ये जेवायला जातात. त्यात गार्डन रेस्टॉरंट्स, थ्री स्टार किंवा फाइव्ह स्टार रेस्टॉरंट्स असतात. तरुण मंडळी अनेक पब्स, कॅफेज, फास्टफूड कॉर्नर्सना भेटी देतात. अनेकदा एथनिक रेस्टॉरंट्स किंवा थिम बेस्ड रेस्टॉरंट्सनासुद्धा भेटी दिल्या जातात. या सगळ्यात खाण्याबरोबरीनेच महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये जाताना कसे कपडे घातले जावेत, स्टायलिंग कसं करावं याविषयी-
त्याचबरोबर वीकेंड्सना ब्रेकफास्टसाठी बाहेर जाण्याचा ट्रेण्ड आहे, तेव्हा सुरुवात करू या ब्रेकफास्टपासूनच.
ब्रेकफास्टसाठी जाण्याची वेळ आणि ठिकाण यानुसार काय घालायचं ते ठरवायला लागतं. ब्रेकफास्टसाठी जात असाल तर तुमचा पेहराव कॅज्युअल असेल तरीही हरकत नाही. त्यामध्ये ट्रॅकपॅण्ट्सपासून अगदी डे ड्रेसेस किंवा स्कर्ट्सपर्यंत कोणतेही कपडे तुम्ही वापरू शकता. सकाळच्या वेळी बाहेर जाताना काही तरी ‘ओव्हर द टॉप’ करायची गरज नाही. पेहराव अत्यंत सिम्पल ठेवावा.
ब्रेकफास्टला जाताना ट्रॅक पॅण्टबरोबर एखादा आवडीचा टी-शर्ट घाला. जीन पॅण्ट्ससुद्धा खूप कॅज्युअल आणि मस्त दिसतील. लूज पँट्स, कुलॉट्ससुद्धा मस्त दिसतील. त्याबरोबर साजेसा टॉप घाला. सकाळच्या वेळी लाइट शेड्स, पास्टल कलर्स खूप फ्रेश दिसतात. त्यामुळे ब्लू, पिंक, यल्लो, ग्रीन अशा शेड्स प्रामुख्याने वापरा.
ड्रेस घालणार असाल तर, आपण ब्रेकफास्टला जात आहोत हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. टी-शर्ट ड्रेस नक्की वापरून बघा. बरोबरीनेच फ्लेयर्ड किंवा सेमी फ्लेयर्स ड्रेस वापरा. प्लेटेड ड्रेसेससुद्धा खूप छान दिसतील. मोठाले बॉ, स्टडस् किंवा मोती अशा प्रकारचे डिझाइन्स असलेले ड्रेसेस टाळा.
स्कर्ट्स घालणार असाल तर प्लेटेड स्कर्ट्स सध्या ट्रेण्ड इन आहेत आणि ब्रेकफास्टसाठी छान सूट होतील. रंग लक्षपूर्वक वापरा. त्यावर टॉप टक इन करा, किंवा क्रॉप टॉप घाला.
हे सगळं मॉडर्न वेयर वापरायची सवय नसेल तर पलाझो पॅण्ट्स, नॅरो बॉटम पॅण्ट्स, त्यावर लॉन्ग कुर्ती आणि एखादा सुंदर दुपट्टा त्यावर टीम अप करा. तसेच लॉन्ग स्कर्ट आणि कुर्ती हे सुद्धा मस्त कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करून बघा.
लंचसाठी जाताना…
लंचसाठी जाण्याची वेळ म्हणजे अर्थातच दुपारची. आपण कोणत्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये जात आहात हे लक्षात घ्यावं. एखाद्या पॉश रेस्टॉरंटमध्ये जाणार असाल तर कधी कधी त्या रेस्टॉरंटची काही थीम असते. त्या थीमला साजेसे आऊटफिट्स वापरावे. रंगांचे कॉम्बोज, फॉर्मल ड्रेसिंग, एथनिक वेयर्स वापरावेत.
प्रामुख्याने व्हाइट शेड्समधील कपडे लंचसाठी जाताना वापरले जातात. त्यांच्याबरोबरीने तुम्ही कोणतीही शेड टीमी अप करू शकता. अशा वेळी व्हायब्रन्ट रंगाची पॅन्ट किंवा टीशर्ट घालण्यापेक्षा सटल शेड्स निवडाव्यात. व्हाइट घालायला आवडत नसेल तर कोणत्याही रंगाची लाइट शेड निवडा.
लंचसाठी जाताना जॅकेट्स तुम्ही वापरू शकता. कॅज्युअल शर्ट्स खूपच छान दिसतील. बरोबरीने वेल फिटेड जीन्स हे कॉम्बिनेशन मस्त दिसेल. स्ट्रेट स्कर्ट्स किंवा स्ट्रेट ड्रेसेस खूप छान दिसतील.
डिनरसाठी जाताना…
रात्रीच्या वेळी डिनरसाठी जाताना तुम्हाला रंगसंगती लक्षात घ्यायला हवी. ब्राइट किंवा जस्ट भडक कलर्स वापरण्यापेक्षा सट्ल, डल शेड्स वापरा. ग्रे, ब्राऊन शेड्स, रेड, ऑलिव्ह ग्रीन, नेव्ही ब्लू, ब्लॅक अशा शेड्स नक्की वापरा. रात्रीच्या वेळी पास्ट्ल शेड्स नकोच.
डिनरसाठी जाताना गाऊन्स, ऑफ शोल्डर्स, स्किन हगिंग ड्रेसेस वापरू शकता. असे कपडे घालायला संकोच वाटत असेल तर वरील कलर शेड्समधील टॉप्स, हायनेक ड्रेसेस, कुर्तीज, फ्लोअर टच ड्रेसेस वापरू शकता. या वेळी डायमंड ज्वेलरीसोबत तुम्ही कपडे टीम अप करा.
रात्रीच्या वेळी थीम बेस्ड रेस्टॉरंट्समध्ये जाणार असाल तर त्या त्या थीमला साजेसेच कपडे घाला. एखाद्या युथफुल रेस्टॉरंटमध्ये जात असाल तर ब्राइट कलर शेड्स वापरू शकता. पिंक, पर्पल, ब्लू, ऑरेंज, ग्रीन नक्की वापरा. इंडियन थीम बेस्ड रेस्टॉरंट असेल तर वेस्टर्न आऊटफिट्स वापरण्यापेक्षा इंडियन वेअर घाला. त्या वेळी दुपट्टा, शॉल, व्यवस्थित टीम अप करा. डिनरसाठी जाताना फूट वेयरमध्ये तुम्ही प्रयोग करू शकता. ड्रेसेसवर पेन्सिल हिल्स, बॉक्स हिल्स, किटन हिल्स, पंप्स, अँकल बूट्स, नी हाय बूट्स असे वेगवेगळे फूटवेयर्स वापरून बघा. डिनरसाठी जाताना लाइट मेकअप करू शकता. मेकअप करताना गुलाबी रंगाचा वापर टाळा. त्याऐवजी स्मोकी आइज, ब्राऊन किंवा कॉपर ब्लश वापरा. डार्क लिपकलर्स वापरा. मॅट मेकअप करण्यावर भर द्या. मेकअप करायला आवडत नसेल तर इतर काही करण्यापेक्षा थोडा आयमेकअप आणि लिपस्टिक वापरा.
आपली बॉडी टाइप आणि कपडे यांचा ताळमेळ योग्य ठेवावा. पिअर शेप असाल तर डार्क शेड नेहमी बॉटमसाठीच वापरा. ब्राइट शेड्स किंवा लाइट शेड्स शक्यतो बॉटम म्हणून वापरू नको, जेणेकरून लोअर बॉडीकडे लक्ष केंद्रित होणार नाही आणि अप्पर बॉडी उठावदार दिसेल. खांदे ब्रॉड असतील तर ऑफ शोल्डर्स शक्यतो टाळा. नाही तर लक्ष केवळ खांद्यांकडेच केंद्रित होईल. ऑफ शोल्डर वापरात असाल तरीही एखादं जॅकेट नेहमी बरोबर बाळगा. तुम्ही स्लिम बॉडी टाइपमध्ये मोडत असाल तर लेअरिंग हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. लेअरिंगमुळे वोल्युम क्रिएट होईल आणि तुम्ही अति बारीक दिसणार नाही. तसेच फ्लेयर्ड आऊटफिट्स, प्लेटेड ड्रेसेस, स्कर्ट्स नक्की वापरा.
आपल्या कम्फर्ट लेव्हलच्या बाहेर जाऊन कपडे घालण्यापेक्षा, आपल्याला आवडतील असेच कपडे वापरा. त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रयोग करू शकता. कॉन्फिडन्ट राहा. मस्त दिसा.
हॅप्पी ड्रेसिंग…
काही टिप्स
- बाहेर खाण्यासाठी जाताना तुम्ही उठावदार दिसण्यासाठी वेळ आणि रंग यांचा ताळमेळ साधणे अत्यावश्यक आहे.
- भरपूर ज्वेलरी वापरण्यापेक्षा नाजूक चेन्स, स्टड्स, नेकपिसेस वापरा.
- काही तरी वेगळं करण्याच्या नादात ओव्हर द टॉप लुक तयार होऊ शकतो. तो टाळा.
- सकाळच्या वेळी गाऊन्स, पार्टी ड्रेसेस वापरू नका
- गार्डन रेस्टॉरंट्सला जात असाल, तर शक्यतो ड्रेसेस किंवा स्कर्ट्स टाळा.
- रात्री गोल्डन किंवा सिल्व्हर कलर्ससुद्धा वापरून बघा. शिमर विथ ब्लॅक नक्कीच छान दिसेल.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com