ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे गुणवत्तेचा सर्वोच्च कस. अगदी लहानलहान देशही तिथे बावनकशी कामगिरी करीत पदकांची लयलूट करतात. पण आपल्यासारख्या शंभर कोटी लोकसंख्येच्या देशाची परिस्थिती न बोलण्यासारखीच आहे.

इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. त्यांचे भारतात आगमन होण्यापूर्वी मातीतले आणि मैदानी खेळ हीच आपली ओळख आणि वेळ घालवण्याचे साधन होते. त्यांच्या आगमनानंतर परदेशी खेळाची पाळेमुळे येथे रुजली. क्रिकेट, फुटबॉल हे खेळ ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली देणगी आहे. याच ब्रिटिश राजवटीत १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक पटकावून दिले. तत्कालीन कलकत्ता शहरात जन्मलेल्या नॉर्मन गिल्बर्ट प्रिचार्ड यांनी पुरुषांच्या २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. मात्र, १९०५मध्ये प्रिचार्ड कुटुंबीय कायमचे ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आणि त्यानंतर अमेरिकेत त्यांनी बस्तान बसवले. स्वातंत्र्यानंतर (१९५२, हेल्सिन्की) कुस्तीपटू खाशाबा जाधव (कांस्यपदक) यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक पटकावले. पण, या पन्नास वर्षांच्या कालखंडात मैदानी खेळांमध्ये भारताची अधोगती झाली. त्यानंतर अजून ६०-७० वर्षांचा कालखंड उलटला तरीही भारत सावरलेला नाही. १९०० ते २०१६ या कालखंडात भारताच्या तुलनेत लोकसंख्येने आणि क्षेत्रफळाने लहान असलेल्या देशांनी ऑलिम्पिकमध्ये गरुड भरारी घेतली. आत्तापर्यंत २३ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला २६ पदके जिंकण्यात यश आले आहेत. त्यात सर्वाधिक ११ (८ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य) पदके हॉकीतील आहेत. त्यापाठोपाठ कुस्ती (४) व नेमबाजी (४), मैदानी स्पर्धा आणि बॉक्सिंग (प्रत्येकी दोन) यांचा क्रमांक येतो. बॅडमिंटन, टेनिस, वेटलिफ्टिंग यामध्ये प्रत्येकी एक पदक भारताच्या खात्यात आहे. ११६ वर्षांच्या कालखंडात मैदानी खेळांमध्ये भारताची पीछेहाट झाली. प्रिचार्ड यांच्यानंतर एकाही खेळाडूला पदकाची कमाई करता आलेली नाही.

भारतात मैदानी खेळाची परंपरा ही पार पूर्वीपासूनची आहे. त्याला ऑलिम्पिक क्रीडा प्रकारामुळे शिस्त लागली आणि पदकाच्या शर्यतीत भारतानेही उडी मारली. पण, पूर्ण तयारी न करता परीक्षेला बसल्यावर उत्तीर्ण होण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे, तशीच अवस्था भारताची झाली. तरीही चुकांमधून शिकत भारताने ऑलिम्पिकमधील कामगिरीचा आलेख चढा ठेवला. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आला. चार्ल जेंकिन्स या दिग्गज धावपटूच्या मार्गदर्शनाखाली मिल्खा यांनी कसून सराव केला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. १९५८ च्या राष्ट्रकुल स्पध्रेत मिल्खा यांनी ४०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे रोम ऑलिम्पिक स्पध्रेत ते विजयवीर होतील असा दावाच प्रसारमाध्यमांतून केला जाऊ लागला. मात्र, त्यांना अपयश आले. त्यांच्या या प्रयत्नाचे अचूक वार्ताकन ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्राने केले होते. ‘‘ऑलिम्पिक ट्रॅक विक्रम मोडण्याची धमक मिल्खा सिंगमध्ये होती. दुर्दैवाने त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले,’’ असे वृत्तपत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ४०० मी., ४ बाय ४०० मीटर रिले स्पध्रेत सुवर्णपदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली. १९६४ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४००, ४ बाय १०० आणि ४ बाय ४०० मीटर या तिन्ही प्रकारात सहभाग घेतला, परंतु पहिल्या दोन प्रकारांत त्यांना खेळता आले नाही. ४ बाय ४०० मीटर प्रकाराच्या हिटमध्ये भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मिल्खा सिंग आणि ऑलिम्पिक हा प्रवास इथपर्यंत राहिला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी अब्दुल खालीकला नमवत ‘फ्लाइंग सीख’ हा मान पटकावला.

भारत एका मागून एक ऑलिम्पिक अपयश पचवत होता. ‘पय्योली एक्स्प्रेस’ पी. टी. उषा यांच्या रूपाने पुन्हा आपण ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न रंगवू लागलो. १९८४ च्या लॉस अँजिलीस ऑलिम्पिक स्पध्रेत पी. टी. उषा यांना काही शतांश सेकंदाच्या फरकाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच महिलांची ४०० मीटर अडथळ्याची शर्यत खेळविण्यात आली आणि त्यात भारताकडून पी. टी. उषाने सहभाग घेतला. उपांत्य फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या उषाला ५५.४२ सेकंदाची वेळ नोंदवल्यामुळे अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मोरॅकोच्या नॅवल एल मौटावाकेल (५४.६१ सेकंद) व अमेरिकेच्या ज्युडी ब्राऊन (५५.२० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले, तर कांस्यपदक पटकावणाऱ्या रोमानियाच्या क्रिस्टीना कोजोकारू ५५.४१ सेकंदात शर्यत पूर्ण केली. भारताकडून मैदानी खेळात ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पी. टी. उषा यांच्यानंतर भारताचे ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली, परंतु पदकाची पाटी कोरीच राहिली. या दिग्गजांमध्ये अजून एक नाव आवर्जून घ्यावे लागेल आणि ते म्हणजे अंजू बॉबी जॉर्ज हिचे. २००४ च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिक स्पध्रेत तिने ६.७५ मीटर लांब उडी मारून सहावे स्थान पटकावले. तिचा हा विक्रम अजूनही भारतीय खेळाडूला मोडता आलेला नाही.

राजकीय हस्तक्षेप, क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत उदासीनता, अपुऱ्या सुविधा अशी अनेक कारण यामागे आहेत. आता परिस्थिती सुधारत आहे आणि त्यामुळेच आशादायी चित्राचे स्वप्न रंगवले जात आहे. पण, ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंची आणि भारतीयांची तुलना केल्यास आपण अजून किती पिछाडीवर आहोत याची कल्पना येईल. यंदा भारताकडून ३६ मैदानी खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यापैकी ललिता बाबर, सुधा सिंग, टिंटू लुका या महिला धावपटू आपापल्या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत मजल मारतील अशी अपेक्षा आहे. अनुभवी विकास गौडा काही चमत्कार करू शकतो. ऑलिम्पिकपेक्षा आव्हानात्मक असणाऱ्या डायमंड लीग, विश्व अजिंक्यपद स्पर्धामध्ये या खेळाडूंनी पदक जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. मात्र, महत्त्वाच्या स्पर्धामध्ये कच खाण्याचा भारतीयांचा इतिहास पाहता ही दावेदारी किती यशस्वी ठरेल, याबाबत शासंकता आहे. दबावाखाली भारतीय खेळाडू साजेशी कामगिरी करू शकत नाही, हे जरी खरे असले तरी ऑलिम्पिकमधील इतर देशांच्या खेळाडूंची कामगिरी लक्षात घेता आपण किती पिछाडीवर आहोत याची प्रचीती येईल. मैदानी खेळात भारतीयांची कामगिरी मागील काही वर्षांत उल्लेखनीय झाली आहे, परंतु ऑलिम्पिक पदकापर्यंत ती उल्लेखनीय नाही. त्यामुळे पदकापेक्षा सध्या तरी आपापल्या गटाची अंतिम फेरी गाठणे, हेच लक्ष्य भारतीय खेळाडूंसमोर आहे. त्यात ते यशस्वी झाल्यास आपल्यासाठी ते पदक पटकावल्यासारखेच असेल. भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनीही असेच मत व्यक्त केले आहे.

पात्र ठरलेले खेळाडू

  • धरमबीर सिंग – २०० मीटर
  • मुहम्मद अनास – ४०० मीटर
  • जिन्सन जॉन्सन – ८०० मीटर
  • मुहम्मद अनास, अय्यासमी धरून, मोहन कुमार, सुमीत कुमार, मोहम्मद कुन्ही, अरोकिया राजीव – ४ बाय ४०० रिलेय
  • थोनाकल गोपी, खेता राम, नितेंदर सिंग रावत – मॅरेथॉन
  • बलजिंदर सिंग, गुरमि सिंग, इरफान कोलाथूम थोडी – २० किमी
  • संदीप कुमार, मनीष सिंग – ५० किमी
  • अंकित शर्मा – लांब उडी
  • रेजिंत महेश्वरी – तिहेरी उडी
  • इंदरजित सिंग – गोळाफेक
  • विकास गौडा – थाळीफेक
  • द्युती चंद – १०० मीटर
  • सरबानी नंदा – २०० मीटर
  • निमॅला शेओरन – ४०० मीटर
  • टिंटू लुका -८०० मीटर
  • ललिता बाबर, सुधा सिंग – ३००० मीटर स्टीपलचेस
  • अश्विनी अकुंजी, देबाश्री मजुमदार, जिस्ना मॅथ्यूज, एम. आर. पूवम्मा, निर्मल शेओरन, अनिंल्डा थॉमस – ४ बाय ४०० मीटर रिले
  • ओ.पी. जैशा, कविता राऊत, सुधा सिंग – मॅरेथॉन
  • खुशबीर कौर, सपना पुनिया- २० किमी
  • मनप्रित सिंग – गोळाफेक
  • सीमा अंतील – थाळीफेक
    स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com