धर्म, वर्ण, वर्ग हे सगळे भेद बाजूला ठेवून जगातले सगळे देश निव्वळ खिलाडू वृत्तीने जिथे एकत्र येतात, असे व्यासपीठ म्हणजे ऑलिम्पिक. मानवी बुद्धिमत्तेच्या या आगळ्यावेगळ्या आविष्काराच्या इतिहासावर एक नजर-

पृथ्वीतलावर वेगवेगळे धर्म, जाती, वर्ण या सर्व गोष्टींना दूर ठेवीत सर्वाना एकत्र आणण्याची क्षमता केवळ ऑलिम्पिक चळवळीतच आहे असे मानले जाते. या स्पर्धाप्रमाणेच स्पर्धाचा इतिहासही अतिशय रोमांचकारी आहे.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’

15-lp-olympicग्रीक संस्कृतीने जगाला दोन मोठय़ा देणग्या दिल्या आहेत. एक म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा चळवळ व दुसरी म्हणजे लोकशाही राज्यपद्धत. ग्रीसमधील ऑलिंपिया हे छोटेखानी गाव पर्यटन व यात्रेकरूंसाठी खूप लोकप्रिय. पूर्वी तेथील जिझस या देवतेपुढे कुस्ती, मुष्टियुद्धाचे सामने, धावण्याच्या स्पर्धा, रथ व घोडय़ांच्या शर्यती होत असत. अशा शर्यती ग्रीसमध्ये अन्य ठिकाणीही होऊ लागल्या. ग्रीसमधील एलिस या गावी ऑगस या राज्याच्या सैन्यदलात हक्र्युलस नावाचा अधिकारी होता. एकदा त्याला शिक्षा म्हणून राजाने त्याला हजारो घोडे असलेली पागा एका दिवसात धुवून काढण्याची आज्ञा केली. हक्र्युलसने या पागेजवळून वाहणाऱ्या नदीचे पात्रच वळविले व हजारो घोडे धुतले गेले. हे राजाला  पटले नाही. त्याने हक्र्युलसला बक्षीस देण्यास साफ नकार दिला. संतापलेल्या हक्र्युलसने राजा व त्याच्या कुटुंबीयांना ठार मारले. तो स्वत:च राजा झाला. त्याने धार्मिक उत्सव सुरू आणि वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा सुरू केल्या. या स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धा होत असेही सांगितले जाते. इसवी सन पूर्व १२५३ मध्ये ही घटना घडली.

याच कालावधीत जिझस व क्रोनास यांच्यात पृथ्वीवर राज्य कोणी करावयाचे हे ठरविण्यासाठी कुस्ती झाली. त्यामध्ये जिझसने विजय मिळविला. या विजयाप्रीत्यर्थ धार्मिक उत्सव व खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. या स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा होत्या असेही मानले जाते. इसवी सन पूर्व १२५३ ते इसवी सन पूर्व ८८४ या कालावधीत ऑलिम्पिया या गावी धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी अप्रतिम देवालये बांधण्यात आली. विविध स्पर्धा व शर्यती पाहण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असावी या हेतूने लोकांनी तेथे भव्य स्टेडियम उभारले.

16-lp-olympicप्राचीन ऑलिम्पिकच्या इतिहासाबाबत चित्रे किंवा शिल्प पाहताना असे दिसते की खेळाडूंच्या अंगावर कोणतेही वस्त्र नाही. त्यामागेही काही घटना घडली असावी असे मानले जाते. पूर्वी या स्पर्धा पाहण्यासाठी महिलांना परवानगी नसे. पिसिरोड्स हा अशा स्पर्धामधील श्रेष्ठ खेळाडू मानला जात होता. एकदा त्याची शर्यत पाहण्यासाठी त्याच्या आईने पुरुषाचा वेष केला. पिसिरोड्स याने चित्त्याचा वेग ठेवीत धावण्याची शर्यत जिंकली. ही शर्यत पाहताना तिचे कमरेखालचे वस्त्र गळून गेले. ती पुरुष नसून महिला असल्याचे सर्वाना लक्षात आले. राजाने तिला कडेलोटाची शिक्षा जाहीर केली. प्रेक्षकांच्या विनंतीनंतर राजाने ही शिक्षा मागे घेतली. मात्र स्पर्धेच्या वेळी फक्त खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आणि तेही विवस्त्र होऊन यायचे असे फर्मान काढले. त्यामुळेच खेळाडूंचे पुतळे नग्रावस्थेत दिसून येतात.

अथेन्सजवळील ऑलिम्पिया येथे बांधलेल्या स्टेडियमवर धावणे, घोडे व रथांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध आदी अनेक स्पर्धा होत असत. इसवी सनपूर्व ७७६ मध्ये हा सोहळा पाहण्यासाठी ४५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. कालांतराने दर चार वर्षांनी अशा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यामध्ये भालाफेक, लांब उडी, थाळीफेक, पोहणे आदी अनेक स्पर्धाचा समावेश होत गेला. रोमन सम्राटांच्या ग्रीसवरील आक्रमणांमुळे या स्पर्धाचा ऱ्हास होत गेला. इसवी सन ३९० मध्ये ३९१ वी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली. प्राचीन ऑलिम्पिकच्या इतिहासातील ती अखेरची स्पर्धा होती. कारण तेथे राज्य करणाऱ्या ख्रिश्चन रोमन सम्राटांचा या स्पर्धाना विरोध होता. त्यांनी इसवी सन ३९० नंतर ऑलिम्पिक स्पर्धा बंद केली. त्यातच दोन भूकंप व महापुरांमुळे तेथील दोन नद्यांची पात्रेही बदलली गेली. अनेक इमारतींबरोबरच स्टेडियम्सही जमीनदोस्त होत गेली व ऑलिम्पिकच्या स्मृतीही धूसर झाल्या. या स्मृतिपटलांना तब्बल चौदाशे वर्षांनी पुन्हा अंकुर फुटला ते १८२९ मध्ये. ऑलिम्पिकच्या विचारांनी भारलेल्या जर्मन संशोधकांनी ऑलिम्पिकविषयी संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑलिम्पिया या गावामध्ये पुन्हा उत्खनन सुरू केले. दीर्घकालीन प्रयत्नांनंतर त्यांना स्मृतिपटलाबरोबर भूगर्भात गेलेले ऑलिम्पिक स्टेडियम सापडले. जर्मन संशोधकांना काही फ्रेंच संशोधकांनीही या कामास मदत केली. या संशोधनाने सर्वात जास्त झपाटून टाकले ते बॅरन डी क्यबुर्टीन या फ्रेंच संशोधकाला. समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या या युवकाने अभ्यासानिमित्त विविध देशांचे दौरे केले. अभ्यासाबरोबरच ऑलिम्पिक चळवळीविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही. या युवकाच्या प्रभावी वाणीने अनेकांना ऑलिम्पिकविषयी उत्सुकता निर्माण झाली. हा युवक म्हणजेच आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे जनक बॅरन डी क्यबुर्टीन. २५ नोव्हेंबर १८८२ रोजी फ्रेंच युनियन ऑफ स्पोर्ट्स या संघटनेची वार्षिक सभा पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये क्युबर्टिन यांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिक चळवळीचा पुनरुच्चार केला. त्यावेळी जमलेल्या क्रीडा संघटकांवर अपेक्षेप्रमाणे प्रभाव पडला नाही. मात्र त्यानिमित्ताने पुन्हा ऑलिम्पिक विषयाला चालना मिळाली. पुन्हा १६ जून १८९४ रोजी पॅरिस येथे खेळाच्या हौशीपणासंबंधी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत क्युबर्टिन यांनी ऑलिम्पिकबाबत आग्रही मागणी केली. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या संघटकांनीही ऑलिम्पिकचा मुद्दा उचलून धरला. अन्य देशांच्या सम्राटांनीही त्यास पाठिंबा दर्शविला. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा १९०० मध्ये घेण्याचाही निर्णय झाला. मात्र संघटक तोपर्यंत थांबण्यास तयार नव्हते. त्यांनी १९८६ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. प्राचीन ऑलिम्पिकचे जनक असलेल्या अथेन्स येथे ही स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्राचीन ऑलिम्पिकच्या परंपरेनुसार दर चार वर्षांनी ही स्पर्धा घेण्यावरही मान्यता देण्यात आली.

ऑलिम्पिकचे स्वप्न साकार

अथेन्स येथील प्राचीन स्टेडियमवरील ७ एप्रिल १८९६ ची सायंकाळ तेथे जमलेल्या ऐंशी हजारहून अधिक लोकांसाठी संस्मरणीय ठरली. वेगवेगळ्या भाषा, जाती व धर्माचे हे लोक आधुनिक ऑलिम्पिकच्या पहिल्या स्पर्धेचे साक्षीदार होते. या स्पर्धेपूर्वी झालेल्या संयोजक देशांचेच खेळाडू पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. मात्र पहिलीच स्पर्धा होती हे लक्षात घेता ही स्पर्धा यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. अतिशय उत्साही वातावरणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि तेथूनच ऑलिम्पिकच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिल्या ऑलिम्पिकमधील प्रतिष्ठेची मॅरेथॉन शर्यतजिंकण्याचा मान स्पिरिडास लुईस या मेंढपाळाला मिळाला. स्पिरिडास हा कधी कधी गावागावात टपाल पोहोचविण्याचेही काम करीत असे. मळके कपडे, विस्कटलेले केस असा त्याचा अवतार पाहून सुरुवातीला संघटकांनी त्याला भाग घेण्यास मनाई केली. मात्र त्याचा उत्साह पाहून त्याला मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यास परवानगी देण्यात आली. त्याने शर्यतजिंकल्यानंतर लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्याच्यावर बक्षिसांचा वर्षांव झाला व त्याचे जीवनच पालटून गेले. या विजेतेपदामुळे त्याच्या घरची गरिबी कायमची दूर झाली.

फिलिपीडस्ची मॅरेथॉन धाव !

प्राचीन काळात ग्रीक व पर्शियन राजांमध्ये अनेक वेळा युद्ध होत असत. एकदा अथेन्सजवळील भागात पर्शियन सैन्याने आकस्मात हल्ला चढविला. त्यांच्या या हल्ल्यास ग्रीक सैन्याने जोरदार उत्तर दिले. अथेन्सजवळील मॅरेथॉन या गावात असलेल्या पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले. मिल्टी अ‍ॅड्स या सेनापतीच्या नेतृत्वाखाली ग्रीक सैन्याने वीस हजार पर्शियन सैनिकांना कंठस्नान घातले व शत्रूचा पाडाव केला. या विजयाची वार्ता अथेन्समधील राजास देण्यासाठी फिलिपीड्स या सैनिकाने थेट अथेन्सकडे धाव घेतली. डोंगरदऱ्यांमधून अनेक अडथळे पार करीत तो अविरत धावला. २६ मैल ३८५ यार्ड्स अंतर पार करीत तो राजाकडे पोहोचला. युद्ध जिंकल्याची वार्ता देऊन तो जमिनीवर कोसळला ते कधीही न उठण्यासाठीच. त्याचे स्मरण राहावे यासाठी ग्रीक संघटकांनी ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यत सुरू केली.

मॅरेथॉन विजेता व गरिबी याचे अतूट नाते असावे. कारण दुसऱ्या ऑलिम्पिकमध्येही मॅरेथॉन शर्यतजिंकण्याचा मान मायकेल थिआटो या मुलाने मिळविला. घरोघरी जाऊन ब्रेड-बटर विकण्याचा व्यवसाय तो करीत असे. त्याने शर्यतजिंकल्यानंतर त्याला शर्यतीचा मार्ग माहीत होता असा आक्षेपही घेण्यात आला. मात्र संयोजकांनी हा आक्षेप अमान्य केला. विजेतेपदामुळे मायकेल याला श्रीमंत बनविले. पॅरिस येथे झालेल्या या ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिटचर्ड या अँग्लो इंडियन खेळाडूने दोनशे मीटर धावणे व दोनशे मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकले. भारत देश त्या वेळी स्वतंत्र झाला नसल्यामुळे भारताचे नाव या दोन्ही पदकांपुढे जोडले गेले नाही.

क्युबर्टिन यांच्या आग्रहाखातर ही स्पर्धा पॅरिस येथे घेण्यात आली तरी या स्पर्धेत खेळाडू व प्रेक्षकांचा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सेंट लुईस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ऑलिम्पिक चळवळ अखंड राहावी यासाठी आग्रही असलेल्या संघटकांनी जिद्द सोडली नाही. सेंट लुईस येथील स्पर्धेऐवजी शिकागो शहराचे नाव ऑलिम्पिकसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र सेंट लुईस येथील संयोजकांनी आपण स्वतंत्र ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याची धमकी दिल्यानंतर त्यांचेच नाव निश्चित करण्यात आले.

ऑलिम्पिक स्पर्धाना खऱ्या अर्थाने स्थैर्यता लाभली लंडन येथे १९०८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकद्वारे. इंग्लंडचे राजे एडवर्ड यांनी या स्पर्धेसाठी भरघोस आर्थिक मदत दिली. तसेच अन्य लोकांकडूनही भरपूर मदत मिळाल्यामुळे अतिशय नीटनेटक्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. मॅरेथॉन शर्यतीबाबत काही अनपेक्षित घटना घडण्याचा प्रसंग या स्पर्धेतही पाहावयास मिळाला. शर्यतीमधील १५ व्या मैलावर अमेरिकेचा चार्ल्स हीफरसन व इटलीचा एरान्दो पित्री यांनी संयुक्त आघाडी घेतली होती. एरान्दो याने मुसंडी मारून मुख्य स्टेडियममध्ये प्रवेश केला. जोरदार धाव घेताना त्याची खूप दमछाक झाली व अंतिम रेषेपूर्वी तो जमिनीवर कोसळला. स्वयंसेवकांनी त्याला आधार देत शर्यत पूर्ण करण्यास मदत केली. मात्र हे नियमबाह्य़ असल्यामुळे त्याला विजेतेपद मिळाले नाही. तथापि संयोजकांनी खास स्मृतिचिन्ह देत त्याचा गौरव केला.

स्वीडनमधील स्टॉकहोम येथे १९१२ मध्ये पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली. अतिशय थाटामाटात झालेल्या या स्पर्धेत खेळाडूंचाही भरघोस प्रतिसाद लाभला. स्वीडनच्या राजाबरोबरच ग्रीस, रशिया, जर्मनी व इटलीच्या सम्राटांनीही या स्पर्धेसाठी पारितोषिके दिली. अमेरिकेतील रेड इंडियन या जमातीमधील जिम थॉर्पे याने दहा क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या डेकॅथलॉनमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्याला स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. हौशी व व्यावसायिक खेळाडू या वादास कंटाळलेल्या थॉर्पे याने व्यावसायिक खेळाडूचा मार्ग स्वीकारला. त्याने अ‍ॅथलेटिक्सबरोबरच नेमबाजी, जलतरण, तिरंदाजी, हॉकी, तलवारबाजी, बास्केटबॉल, हँडबॉल, फुटबॉल आदी अनेक खेळांमध्येही आपले कौशल्य दाखविले. १९५० मध्ये अमेरिकन वृत्तपत्राने केलेल्या पाहणीत सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचीच निवड केली. या महान खेळाडूने १९५३ मध्ये जगाचा निरोप घेतला. पहिल्या महायुद्धामुळे बर्लिन येथे १९१६ ची ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकली नाही. १९२० ची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा मान अँटवर्प या बेल्जियमच्या शहरास मिळाला. महायुद्धात अपरिमित हानी होऊनही त्यांनी यशस्वीरीत्या ही स्पर्धा आयोजित करीत साऱ्या जगाला थक्क केले. या स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक चळवळीस दोन परंपरा घालून दिल्या. यजमान देशाच्या खेळाडूने शपथ घेण्याच्या प्रथेस याच स्पर्धेद्वारे प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ऑलिम्पिक महासंघाने प्रथमच खास ध्वज तयार केला व त्याचाही उपयोग या स्पर्धेद्वारे सुरू झाला.

पाओ नूरमीचे वर्चस्व

फिनलंडच्या पाओ नूरमी याने अँटवर्प येथे १० हजार मीटर व १९ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविले. पाच हजार मीटर शर्यतीत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने १९२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पाच क्रीडा प्रकारांमध्ये अजिंक्यपद मिळवित स्वत:चा ठसा उमटविला. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेत पंधराशे मीटर अंतराची शर्यतजिंकल्यानंतर केवळ एका तासाच्या फरकाने पाच हजार मीटर अंतराची शर्यत जिंकून सनसनाटी कामगिरी केली. नूरमी याने पुन्हा १९२८ च्या ऑलिम्पिकमध्ये दहा हजार मीटर धावण्याची शर्यत जिंकून कारकीर्दीतील नववे ऑलिम्पिक सुवर्णपदक नोंदविले. पॅरिस येथे ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बर्फाच्छादित प्रदेशाचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असलेल्या देशांनी बर्फावरील खेळांसाठी स्वतंत्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची मागणी केली व ही मागणी लगेच मान्य होऊन फ्रान्समध्येच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात आली. पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेने जगाला आणखी एक देणगी दिली ती म्हणजे जॉनी वेसमुल्लर. धिप्पाड व सुरेख शरीरयष्टी लाभलेल्या या खेळाडूने जलतरणात अनेक विक्रम केले. त्याचे विक्रम अनेक वर्षे मोडले गेले नव्हते. त्याचे छायाचित्र पाहिल्यानंतर हॉलीवूडमधील निर्मात्यांनी त्याला टारझनवरील चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठी निवडले. लहानपणी तो खूप आजारी होता व त्याची तब्येत सुधारण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला पोहण्याचा व्यायाम करण्यास सांगितले. त्याने एकाग्रतेने पोहण्याचा व्यायाम सुरू केला व त्यामुळेच त्याची जलतरणाची कारकीर्द घडली व जीवनास कलाटणी मिळाली.

भारताचे पहिले सोनेरी यश

अ‍ॅमस्टरडॅम येथे १९२८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच भारताने अधिकृत प्रवेशिका पाठविली होती. या स्पर्धेद्वारे भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ झाला. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या गेलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या अप्रतिम कौशल्याच्या जोरावर भारताने १९२८, १९३२ व १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतास सुवर्णपदक मिळवून दिले. अ‍ॅमस्टरडॅम येथील स्पर्धेस प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

जात, धर्म, वर्ण आदी भेद विसरून विविध देशांच्या लोकांनी गुण्यागोविंदाने ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यावा ही क्युबर्टिन यांची इच्छा होती. खेळाडूंनी एकत्र रहावे अशी व्यवस्था असली पाहिजे असेही त्यांचे मत होते. लॉस एंजेलिस येथे १९३२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळी क्रीडानगरीचे स्वप्न साकार झाले. अर्जेन्टिनामधील एका शहरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या जॉन कार्लिस झ्ॉबेला या १९ वर्षीय शाळकरी मुलाने मॅरेथॉन शर्यत जिंकून सनसनाटी कामगिरी केली. याच स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने अमेरिकेविरुद्ध २४-१ असा विजय मिळविताना सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम नोंदविला. १९३६ च्या ऑलिम्पिकद्वारे क्रीडा ज्योतीची प्रथा सुरू झाली. ग्रीसमधील ऑलिम्पिया शहरातील प्राचीन मंदिरापासून ही ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तेथून ही ज्योत स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या बर्लिन शहरात आणण्यात आली. या स्पर्धेपासून प्रत्येक ऑलिम्पिकच्या वेळी क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याची प्रथा सुरू झाली. बर्लिन येथील ऑलिम्पिकच्या वेळी जर्मन सम्राट हिटलर याने आपल्या लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन घडविले नाही तर नवलच. त्याने मॅरेथॉन शर्यत जिंकणाऱ्या ग्रीसच्या सायडेन लुईस याला आपल्या शेजारी आसन देत त्याचा गौरव केला. त्याने सुवर्णपदक विजेत्या जर्मनी व फिनलंडच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले मात्र अमेरिकेच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. सर्वाना त्याचे हे वर्तन खटकले. याच स्पर्धेत जे.सी. ओवेन्स याने अ‍ॅथलेटिक्समध्ये कमाल केली. त्याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत नोंदविलेला १०.३ सेकंद हा विक्रम १९६० पर्यंत मोडला गेला नव्हता.

दुसऱ्या महायुद्धात अनेक देशांची अपरिमित हानी झाली होती. त्यामुळे १९४० व १९४४ च्या ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. १९४८ मध्ये लंडन येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हॉलंडच्या फ्रॅन्सिना ओवेन या महिलेने अ‍ॅथलेटिक्समधील चार क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवीत आश्चर्यजनक कामगिरी केली. दोन मुलांची माता असलेल्या ओवेन या ३० वर्षीय खेळाडूने अन्य महिलांसाठी आदर्श निर्माण केला. अमेरिकेच्या हॅरिसन डिलार्ड या दीडशे पौंड वजन असलेल्या युवकाने शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकून आपल्याकडेही वेगवान धावण्याचे कौशल्य आहे हे दाखवून दिले. भालाफेकीत सुवर्णपदकजिंकणाऱ्या फ्रान्सच्या टापिओ पाओटेव्हरा याला हॉलीवुडचे दरवाजे खुले झाले आणि त्याच क्षेत्रात तो स्थिरावला. महायुद्धामुळे दोन ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या नाहीत. त्याचा फटका अनेक गुणवान खेळाडूंना बसला होता. एमिल झेटोपेक हा त्यापैकी एक खेळाडू. झेटोपेक याने १९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये पाच हजार व दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. एवढेच नव्हे त्याने मॅरेथॉन शर्यतीचेही विजेतेपद मिळविले. त्याची पत्नी डोना हिने या स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. पती-पत्नींनी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. याच स्पर्धेत भारताच्या खाशाबा जाधव या कुस्तीगिराने देशास पहिले अधिकृत वैयक्तिक पदक मिळवून दिले. त्यांनी कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.

मेलबर्न येथे १९५६ मध्ये आयोजित करण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा अनेक वादंगांनीच गाजली. स्टेडियम्स उभारताना आलेल्या अनंत अडचणी, रशियन खेळाडूंच्या प्रवेशाबाबत निर्माण झालेला वाद, हंगेरी व रशिया यांच्यातील राजकीय वैमनस्य यामुळे सतत ही स्पर्धा चर्चेत राहिली. युरोपातील लष्करी संघर्षांचाही फटका या स्पर्धेवर बसला. हॉलंड व स्वित्र्झलडच्या खेळाडूंनी ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली.

क्रीडा क्षेत्रासाठी महान देणग्या

रोम येथे १९६० मध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिकद्वारे जगाला मॅरेथॉनपटू अबेबे बिकेला व बॉक्सर कॅशियस क्ले अर्थात महंमद अली हे दोन महान खेळाडू मिळवून दिले. इथिओपियाच्या राजवाडय़ात पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या बिकेला याने ऑलिम्पिकमधील मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्या वेळी अनेकांनी त्याला वेडय़ात काढले. मात्र कमालीचा जिद्दी असलेल्या या खेळाडूची महत्त्वाकांक्षा पाहून त्याचे नाव मॅरेथॉन शर्यतीसाठी देण्यात आले. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे तो अनवाणीच धावला. लांब अंतराच्या शर्यतींसाठी त्याच्याकडे उपजत कौशल्य असल्यामुळे त्याने अनेक अनुभवी खेळाडूंना मागे टाकून ही शर्यत जिंकली. या विजेतेपदामुळे त्याच्यावर बक्षिसांचा वर्षांव झाला नाही तर नवलच. त्याच्याकडून स्फूर्ती घेत इथिओपियामध्ये लांब अंतराच्या शर्यतीमधील अनेक जगज्जेते तयार झाले. महंमद अली यांनी बॉक्सिंगमध्ये अनेक विश्वविजेतेपदांवर आपली मोहोर नोंदविली. मात्र त्यांच्या कारकीर्दीस रोम येथील ऑलिम्पिकद्वारेच खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. भारतीय पुरुष हॉकी संघाची सुवर्णयुगाची मालिका याच स्पर्धेत खंडित झाली. पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला पराभवाचा धक्का दिला.

आशियाई खंडातील पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा मान जपानला १९६४ मध्ये मिळाला. टोकियो येथे झालेली ही स्पर्धा आशियाई देशांसाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. दिमाखदार व विलोभनीय उद्घाटन सोहळा, खेळाडूंसाठी आरामदायक व आल्हाददायक निवास व्यवस्था, विशाल स्टेडियम्स, आधुनिक तंत्रज्ञानाची रेलचेल, खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद व विविध क्रीडा प्रकारात नोंदविलेले ऐंशी विक्रम यामुळे ही स्पर्धा वैशिष्टय़पूर्ण ठरली. बिकेला याने मॅरेथॉनमध्ये विजेतेपद राखताना लांब अंतराच्या शर्यतींवरील आपली हुकमत सिद्ध केली. स्पर्धेपूर्वी त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती व त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र बिकेला याने हा सल्ला धुडकावून लावला आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला.

स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडा सुविधांची स्पर्धेपूर्वी चाचणी घेण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रारंभ याच ऑलिम्पिकद्वारे झाला. भारतासाठी आनंदाचा क्षण म्हणजे हॉकीत पुन्हा सुवर्णपदकावर मोहोर नोंदविली गेली आणि तीदेखील पाकिस्तानवर मात करीतच.

मेक्सिको शहरास १९६८ च्या ऑलिम्पिकचे संयोजन मिळाले. मात्र हे शहर समुद्रसपाटीपासून खूप उंच असल्यामुळे खेळाडू आजारी पडतील अशी टीका अनेक संघटकांनी केली. खुद्द मेक्सिकोमध्येही स्पर्धेविरोधात सूर आळवण्यात आला होता. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दहा हजार मीटर शर्यतीत सहभागी झालेल्या रॉनी क्लार्क याचे निधन झाल्यामुळे टीकाकारांना आयतेच खाद्य मिळाले होते. क्लार्क हा शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात असताना अतिश्रमामुळे तो कोसळला व त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. हा अपवाद वगळता ही स्पर्धा अतिशय यशस्वी झाली. स्पर्धेत ११२ देशांचे सहा हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यांच्या सहभागामुळेच संयोजकांचा उत्साह वाढला. स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अनेक देशांनी त्यास विरोध दर्शविल्यानंतर आफ्रिकेला प्रवेश नाकारण्यात आला.

ऑलिम्पिकमधील ओलीस नाटय़

म्युनिच येथे १९७२ मध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा जलतरणपटू मार्क स्पिट्झ व जिम्नॅस्ट ओल्गा कुबर्ट यांनी गाजविली. मात्र ही स्पर्धा ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात कलंकित स्पर्धा ठरली. खेळाडूंच्या वेषात आलेल्या अरब अतिरेक्यांनी इस्रायलच्या १९ खेळाडूंना ओलीस ठेवले. त्यापैकी नऊ खेळाडूंनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली मात्र अन्य खेळाडूंना ठार मारून अरब अतिरेक्यांनी स्पर्धेला काळिमा फासला. हे अतिरेकीही मारले गेले. स्पर्धेच्या अकराव्या दिवशी झालेली ही घटना साऱ्या जगाचा थरकाप उडविणारी घटना होती. ही घटना होऊनही उर्वरित स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. भारतीय हॉकी संघाची पदक मालिका येथे संपुष्टात आली. मॉन्ट्रियल येथे १९७६ मध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा रुमानियाच्या नादिया कोमेनसी हिने गाजविली. दहापैकी दहा गुण नोंदवित तिने ऑलिम्पिकच्या इतिहासात विक्रमी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेत रग्बी संघ पाठविणाऱ्या न्यूझीलंडला या स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करावी अशी मागणी काही आफ्रिकन देशांनी केली. मात्र ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर आफ्रिका खंडातील २६ देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला. मॉन्ट्रियल शहराने हौसेने ही स्पर्धा आयोजित केली खरी मात्र त्यांचे आर्थिक अंदाजपत्रक साफ कोसळले व त्यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी तेथील नागरिकांना अनेक वर्षे कर भरावा लागला. बहिष्काराची घटना पुन्हा मॉस्को येथे १९८० मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या वेळीही घडली. रशियाने १९७९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठविल्याच्या निषेधार्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पश्चिम जर्मनी यांच्यासह ६५ देशांनी बहिष्कार घातला. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांनी आपल्या खेळाडूंना वैयक्तिक प्रवेशिकेद्वारे भाग घेण्यास अनुमती दिली होती. या बहिष्काराचा फायदा भारतास झाला. त्यांनी पुरुषांच्या हॉकीत सुवर्णपदक जिंकले.

किफायतशीर स्पर्धा

ऑलिम्पिक स्पर्धेचे योग्यरीत्या आयोजन केले तर ही स्पर्धा फायदाही मिळवून देते हे लॉस एंजेलिस शहराने दाखवून दिले. त्यांनी १९८४ मध्ये अतिशय थाटामाटात या स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेस आर्थिक मदत करण्यास अमेरिकन शासनाने नकार दिल्यानंतर तेथील संघटकांनी स्पर्धेसाठी मोठय़ा प्रमाणात पुरस्कर्ते मिळविले. एवढेच नव्हे तर स्पर्धेचा सर्व खर्च वजा जाता त्यांनी मोठय़ा प्रमाणात नफा मिळविला. अमेरिकन धावपटूंना भावी कारकीर्दीसाठी हा निधी त्यांनी दिला. घरच्या मैदानावर कार्ल लुईस या धावपटूने चार सुवर्णपदकेजिंकून ओवेन्सच्या चार सुवर्णपदकांच्या विक्रमाची बरोबरी केली. १९५२ च्या ऑलिम्पिकनंतर प्रथमच चीन संघाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. रशियाने या स्पर्धेवर बहिष्कार घातला. त्यांची अनुपस्थिती अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, जलतरण आदी खेळांमध्ये प्रकर्षांने जाणवली. १९८८ च्या ऑलिम्पिकमध्ये बेन जॉन्सन याचे उत्तेजक प्रकरण साऱ्या जगाला हादरा देणारे ठरले. लुईस याला पराभूत करण्यासाठी कॅनडाच्या या खेळाडूने उत्तेजकाचा आधार घेतला. त्याचे पितळ उघड झाले. तेथूनच उत्तेजकाची गंभीर समस्या जगापुढे आली. पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी खेळाडू उत्तेजकासारखा शॉर्टकट मार्ग स्वीकारतात असे चित्र त्यानंतर सातत्याने दिसू लागले. बार्सिलोना (१९९२), अटलांटा (१९९६), सिडनी (२०००), अथेन्स (२००४), बीजिंग (२००८) व लंडन (२०१२) येथील ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनच्या खेळाडूंनी सुरुंग लावला. जागतिक  क्रीडा क्षेत्रात बलाढय़ प्रतिस्पर्धी म्हणून चीनचे खेळाडू अधिकाधिक पदकांची लयलूट करू लागले. मैदानावरील यशस्वी कामगिरीबरोबरच संयोजनातही आपण अव्वल आहोत हे त्यांनी बीजिंग येथील ऑलिम्पिकद्वारे दाखवून दिले. रशियन संघ राज्यातून अनेक नवीन देश आल्यानंतर रशियाच्या वर्चस्वास तडा गेला. मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट, शैली अ‍ॅन फ्रेझर यांच्यासारखे अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी अनेक वर्षे ऑलिम्पिकमध्ये हुकमत गाजविली. अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धा तेथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळेही गाजली. याच स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेस याने कांस्यपदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली. खाशाबा जाधव यांनी मिळविलेल्या कांस्यपदकानंतर ४४ वर्षांनी पेस याने भारतास वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवून दिले. हळूहळू भारतीय खेळाडू पदकतालिकेत दिसू लागले आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यापेक्षाही त्यामध्ये सहभागी होणे हे अधिक महत्त्वाचे असते हे क्युबर्टिन यांनी व्यक्त केलेले मत भारतीय खेळाडू तंतोतंत पाळत आले आहेत.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही कोणत्याही एका देशाची मक्तेदारी आता राहिलेली नाही. अमेरिका, चीन, रशिया यांच्याबरोबरच केनिया, जमेका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जर्मनी, रुमानिया, दक्षिण कोरिया, जपान, क्यूबा आदी देशही सातत्याने ऑलिम्पिकमध्ये भरीव कामगिरी करू लागले आहेत. जगातील सर्वात सर्वागसुंदर सोहळा म्हणून ख्याती मिळविलेल्या ऑलिम्पिकची व्याप्ती वाढत चालली आहे. दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र पारा ऑलिम्पिक स्पर्धा, युवा खेळाडूंसाठी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धाचे आयोजनही आता होऊ लागले आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com