lkp20गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या जगातील दोन प्रचलित सॉफ्टवेअर कंपन्यांचे मुख्य जेव्हा भारतात येतात तेव्हा त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या येण्याने आपल्या देशाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख होणार, प्रगतीची नवी दिशा मिळणार हे निश्चित असतं. सरत्या वर्षांत या दोन्ही कंपन्यांच्या सीईओंनी भारतात हजेरी लावली. पण यावेळेस त्यांच्या स्वागताला कौतुकाचे, आपुलकीचे वलय आले. कारण पहिल्यांदाच गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या मुख्यपदी दोन भारतीयांची निवड झाली होती. सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला, असे आपल्या देशाचे दोन शिलेदार नेमणूक झाल्यावर पहिल्यांदा स्वदेशी येणार ही कौतुकाचीच बाब होती. पण त्याचबरोबर या भेटीतून अनेक अपेक्षांचे मनोरे बांधले गेले. देशप्रेम, भारताची प्रगती आणि तरुण पिढीचे मार्गदर्शन याचा मेळ या भेटीतून घडणे अनेकांना अपेक्षित होते.

मायक्रोसॉफ्टचे सीइओ सत्या नाडेला यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात भारताला भेट दिली. त्यासाठी एका भव्यदिव्य सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले. नावातच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दडलेले होते. ‘जगात प्रत्येक घरात एक कॉम्प्युटर असला पाहिजे हे मायक्रोसॉफ्टचे स्वप्न होते, त्याच स्वप्नाची पुढची पायरी म्हणून मला वाटते की, आता मोबाइलच्या माध्यमातून प्रगतीची पाऊलवाट चालणे गरजेचे आहे,’ असा कानमंत्र सत्या नाडेला यांनी भारताला दिला. मायक्रोसॉफ्टच्या ‘अझुर’ या हायब्रीड क्लाऊडचे समर्थन करत त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी भारतातील उद्योजकांना केले व देशातील अनेक ई-कॉमर्स कंपन्या या आणि अशा अनेक टेक्नॉलॉजीजचा वापर करत असल्याची उदाहरणे दिली. याशिवाय विन्डोज टेनवर आधारित नवीन मोबाइल फोन आणि टॅब्लेटची घोषणा करत नवीन तंत्रज्ञानाचे प्रक्षेपण केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्या नाडेला यांनी स्मार्ट शहरं आणि डेटा सेंटरच्या निर्माणामध्ये साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. नाडेला यांच्या दुसऱ्या भारत भेटीत त्यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षांचे स्वागत कुटुंबासोबत हैदराबादमध्ये केले. पण इथे येताच त्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व हैदराबादमधील ‘टी-हब’ या स्टार्ट-अप इंक्यूबेटरलाही भेट दिली.

सुंदर पिचाई यांच्या भारतभेटीची कहाणी काही वेगळी नाही. दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये सुंदर पिचाई यांनी आपल्या चतुरवाणीने तरुणाईचे मन जिंकले. ‘प्रोजेक्ट लून’चा प्रकल्प भारतात आणण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याची आठवण करून देत या प्रकल्पाचे महत्त्व त्यांनी तरुणांना पटवून दिले. भारतात मोठय़ा प्रमाणात तंत्रज्ञानाचे निर्माण करण्याची क्षमता असल्याचे त्याने मान्य केले. पण भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल होणे गरजेचे असल्याचे नमूद करून त्यांनी तरुणांना आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवले पाहिजे असे आवर्जून सांगितले. अनेक प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आणि आयआयटी चेन्नईमध्ये शिकतानाच्या आठवणींना उजाळा दिला. भारत अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत ५०० रेल्वे स्थानकांमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

२०१६ मध्ये भारतात वेगवेगळ्या स्तरावर काम करत अनेक प्रकल्प राबवण्याचा या दोन्ही ‘भारतीय’ शिलेदारांचा विचार आहे. गुगलच्या ‘प्रोजेक्ट लून’ला नुकतीच सरकारकडून मान्यता मिळाली आहे ज्याद्वारे देशातील गावागावांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचा गुगलचा मानस आहे. मायक्रोसॉफ्टच्या व्हाइट स्पेस तंत्रज्ञानाने भारतात प्रथम चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे आणि त्याचाही वापर क्षुल्लक दरात इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यात गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे नाव नसते तर नवलच. अशा वेळेस या दोन्ही कंपन्यांच्या मुख्यपदावर भारतीय असल्याचा पूर्ण फायदा ते करून घेणार यात काहीच दुमत नाही. सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला भारतात आले, लोकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं, पण त्यांनी भारतीय म्हणून देशाच्या प्रगतीपेक्षा त्यांच्या प्रकल्पांची माहिती पुरवण्यावर भर दिला. नवीन, भारतासाठी खास अशा योजना अजून तरी त्यांनी मांडलेल्या नाहीत. इतर देशांमध्ये चालत आलेले गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे हे प्रकल्प भारताला कितपत उपयोगी पडताहेत हा येणारा काळच ठरवेल. त्यामुळे सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला यांच्या या भारतभेटीने हुरळून न जाता गुगल आणि मायक्रोसॉफ्ट खरंच भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहेत की फक्त आपली आर्थिक पोळी भाजून घेणार आहेत याचा अंदाज या वर्षभरात नक्की बांधता येईल.
तेजल शृंगारपुरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader