वर्षांची सुरुवात नाटय़प्रेमींसाठी नेहमीच खास असते. निमित्त असतं, सवाई एकांकिका स्पर्धेचं. यावर्षी सवाई अठ्ठाविसाव्या वर्षांत पदार्पण करतेय. तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सवाई तिचं मनोगत मांडतेय.
नमस्कार! रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून २८ व्या वर्षांत पदार्पण करणारी मी सवाई आज आपल्यापुढे काही खास कारणास्तव शब्दांच्या रूपाने व्यक्त होऊ इच्छिते.
चतुरंग प्रतिष्ठानच्या बऱ्याच अपत्यांपकी एक म्हणजे ही सवाई. १९८८ साली माझा जन्म झाला. माझ्या जन्माला खुद्द कुसुमाग्रजांच्या नाशिकमधलं दीपक मंडळ आणि सन्माननीय गणेश सोळंकी यांची प्रेरणा निमित्त ठरावी हे माझं भाग्यच. खरं तर कुणालाच आपण या जगात येऊ अशी आधी कल्पना नसते तशी ती मलाही नव्हती आणि या नाटय़ाच्या रंगमहालात माझी मोहोर इतकी खोलवर रुतेल याचीही मी कधी कल्पना केली नव्हती, पण जिथे माझं नामकरणच ‘शेरास सव्वाशेर.. सव्वाई’ या तत्त्वावर झालं तिथे मी सव्वाशेर ठरले नाही तर नवलच. अशीच सव्वाई ठरत मी २८ वर्षांची झाले आहे. या २८ वर्षांतली माझी प्रगती म्हणाल तर नाटय़प्रेमींच्या ओठावर प्रजासत्ताक दिनासोबत ‘सवाई’ हे नाव जोडलं गेलं. यात खरं तर माझं असं श्रेय काहीच नाही. विद्याकाका (विद्याधर निमकर) म्हणतात तसं मी त्या रंगदेवतेच्या पायापर्यंत पोहोचण्यासाठी फुलाच्या परडीचं काम केलं. त्यात अचूक फुलं वेचण्याचं काम मला लाभणाऱ्या परीक्षकांनी केलं. सांगायला अभिमान वाटतो की आज रंगदेवतेच्या पायाशी फुलांचा ताटव आहे आणि त्यावर प्रत्येक २६ जानेवारीला नवीन पुष्पगुच्छांचं स्वागत करायला रंगदेवता मोठय़ा अदबीने उभी असते.
खरं तर तशी मी श्रीमंत घरातच जन्माला आले. ‘कलेची’ श्रीमंती आहे माझ्या दारात. आज जितके कलाकार नाटय़कलेत समृद्धीने वावरताहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला मलाचा दगड मी ठरले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा गर्व मुळीच नाही, पण एकाच आईच्या पोटी इतकी रत्न जन्माला यावीत आणि येतच राहावीत? याचं नवल वाटतं आणि मग ऊर भरून येतो. फार छोटय़ा काळात मी खूप मोठी झाले. श्रेय माझं नाहीच. पदाचा लोभ नसणारे कार्यकत्रे, आत्यंतिक शिस्त, सुयोग्य आयोजन, असंख्य गुणी कलाकार आणि माझ्यासाठी येणारा प्रेक्षकवर्ग. रसिक प्रेक्षकांचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ३६-३६ तास रांगेत उभं राहून शिस्तबद्ध पद्धतीने माझं तिकीट काढून बारा तास आपला उत्साह टिकवणं काही सोपं काम नव्हे.
याला कुठला जन्म म्हणावा? कुठलं पुण्य म्हणावं? त्या चित्रगुप्ताला माझ्या खात्यातलं पुण्य मोजताच आलं नसावं बहुधा किंवा त्याच्या खात्यातलंही त्याने मोठय़ा मानाने मला देऊ केलं असावं म्हणून अशी सत्संगती मला लाभली. माझं बोट धरून मला इतकं मोठं करणारी इतकी माणसं मिळाली आणि नि:संकोचपणे विश्रांती घ्यायला तुमच्यासारख्या प्रेक्षकांची झूल मिळाली.
एक प्रसंग आठवतो. अगदी माझ्या सुरुवातीच्या काळातला. अंतिम फेरीसाठी निवड झाली नाही म्हणून एका स्पर्धक संस्थेला त्या वर्षी माझा राग आला आणि त्यांनी स्पर्धा होऊ द्यायची नाही असं ठरवलं. घोषणा करायच्या, परीक्षकांना घेराव घालायचा, बोर्ड्स लावून धिक्कार करायचा, पत्रके वाटायची असं त्याचं सगळंच ठरलं होतं. माझ्या आयोजकांनीसुद्धा कायदेशीर मार्गाने पूर्वतयारी करून ठेवली होती. ती पहिलीच पोलीस बंदोबस्तातली सवाई ठरली. प्रेक्षकांच्या, मान्यवरांच्या, पोलिसांच्या साथीमुळे त्या वर्षी सवाई निर्वघ्निपणे पार पडली आणि नंतर असे प्रसंग क्वचितच आले. माझी शिदोरी अशा काही प्रसंगांपेक्षा अभिमानास्पद प्रसंगांनी समृद्ध झाली. एक वर्ष आयोजकांनी स्पध्रेतल्या काही एकांकिकेच्या सादरीकरणाचा कार्यक्रम करायचं ठरवलं. सगळ्या संस्थांना सादरीकरणाचा खर्च देण्यात आला. त्यातली एक संस्था अशी होती की त्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडूनही खर्च मिळाला. त्या संस्थेच्या प्रमुखाने दुसऱ्या दिवशी माझ्या आयोजकांच्या ऑफिसमध्ये येऊन उरलेली रक्कम परत केली. माझ्या यशात अशा प्रामाणिक कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे.
मला आता मोठमोठय़ा कलाकारांची नावं इथे उद्धृत करणं अगदी सोपं आहे आणि मी त्यांना घडवलंय असंही म्हणणं सोपं आहे, पण मी तसं म्हणणर नाही. कारण त्या कलाकारांनी मला घडवलंय. यात फक्त अभिनेत्यांचा हात नाही. बरेच लेखक, दिग्दर्शक यांचाही हातभार आहे. अनेक नेपथ्यकार दर वर्षी मला वेगवेगळ्या ढंगात घडवतात. प्रकाशयोजनाकार त्यांच्या प्रकाशयोजनेच्या कौशल्याने मला प्रकाशझोतात आणतात. मी खरी फुलते, बहरते ती मात्र प्रेक्षागृहातून येणाऱ्या टाळ्यांतून. कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षासारखी मी दरवर्षी नाटय़प्रेमींच्या कलाकृतीसाठी आसुसलेलीच असते, पण या टाळ्या मात्र क्षणोक्षणी दूत होऊन तुमचं अस्तित्व मला जाणवून देत असतात.
शरद जोशींनी म्हटलंय एका लेखात, ‘चतुरंग प्रतिष्ठानचे बालपण म्हणजे नाटय़वेडय़ांची रंगनिशा आणि कुणा तरी एका चुळबुळ्याच्या मनात आलेला सवाई विचार म्हणजे सवाई.’ वर्षांतली पहिली स्पर्धा आणि सगळ्या स्पर्धाचं सार. वर्षभरात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धाच्या विजेत्यांमधली स्पर्धा; पण खरं सांगायचं तर मला हा स्पध्रेपेक्षा अधिक रंगप्रेमींचा सोहळा वाटतो. दरवर्षी माझी दालनं या सोहळ्याने धन्य होतात आणि पुढच्या वर्षीची आस लावून बसतात.
रंगमंचावर सेट लागतो. सगळ्यांच्या ऑल द बेस्ट म्हणत गळाभेटी होतात. आपापल्या एंट्रीसाठी मंडळी आपापल्या िवगांमध्ये जातात. कोड क्रमांक अमुक अमुक सादर करत आहोत..लेखक अमुक अमुक..दिग्दर्शक अमुक अमुक..तर कोड क्रमांक…सादर करत आहोत..पडदा उघडतो..आणि माझ्या शरीरावर नकळत एक रोमांच उठतो. पोटात मोठा गोळा येतो. प्रकाशझोतात दिसणारे कलाकार आपला अभिनय पणाला लावतात तेव्हा धपापलेल्या हृदयावर फुंकर घातल्यासारखं वाटतं. समाजाने दुर्लक्षित केलेले पण ज्याची चर्चा होणं गरजेचं आहे असे असंख्य विषय सहजगत्या हाताळून प्रेक्षकांच्या सदसद््विवेकबुद्धीला चालना देत असतात. पडद्यामागच्या कलाकारांची कुठे कुणाला कॉस्च्युम पुरव, सेट लावण्यासाठी प्रेक्षकात दिसणार नाही पण सेट लावणारा ही धडपडणार नाही याची काळजी घेत बॅटरी दाखव, सादरीकरण संपलं की दिलेल्या वेळेआधी स्टेज क्लीन कर, या सगळ्या धांदलीची मी साक्षीदार आहे याचा अभिमान वाटतो. २५ जानेवारीच्या रात्रीपासून सुरू झालेला हा खेळ २६ जानेवारीच्या पहाटे अवघ्या काही मिनिटांत संपतो. विजेत्यांची नाव घोषित करण्याचा तो क्षण पाहिला की माझे आनंदाश्रू माझ्याच ओंजळीत मावत नाहीत. त्याला जोड असते तारुण्याने भरलेल्या जल्लोशाची, ‘जिंकून जिंकून जिंकणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? उंदीरमामा की जय, अरे घे घे घे घेऊन टाक असे घुमणारे आवाज नंतर कित्येक दिवस माझ्या कानात घुमत असतात. नाटक ही एक नशा आहे यात काहीच वाद नाही. या नशेत वेळेचं, तहान-भुकेचं, कशाचंच भान राहत नाही. सवाई म्हणजे नाटय़ क्षेत्रातला ऑस्कर समजला जातो. पुन्हा यात मला जपणाऱ्या सगळ्यांचाच हातभार आहे. आज तुमच्या मनाचा ठाव घ्यावासा वाटला, कारण या वर्षी ‘कलेत दंग..नाटय़रंग’ या सदराची सुरुवात वर्षांच्या सुरुवातीलाच कलेत दंग होणाऱ्या आणि असंख्य नाटय़कारांच्या कारकीर्दीची सुरुवात असणाऱ्या सवाईने व्हावी, अशी आपली लेखिकेची इच्छा.
चला आता मात्र मी रंगमंचावरून काढता पाय घेते अनेक रंगकर्मी रंगमंचावर धाव घेताना मला दिसताहेत. त्यांच्याकडे रंगमंच सोपवला की मी टाळ्यांचा नाद कानात साठवायला मोकळी. जाता जाता इतकंच सांगते आज ‘पोट’ हे जगण्याचं कारण ठरणाऱ्या माणसाला नाटकाची गरज आहे, नाट्यकर्मीची गरज आहे आणि माझी ‘सव्वा’लाखाची दालनं तुमच्यासाठी सदैव खुली आहेत. या आणि मला कृतार्थ होण्याची संधी द्या. मला चिरतरुण ठेवा. येताय ना?
(विशेष आभार- विद्याधर निमकर)