‘सवाई’ ही तरुणांसाठीची एकांकिकांमधली मानाची स्पर्धा. यंदा तिचं २९ वं वर्ष होतं. वेगवेगळे विषय, समृद्ध अभिनय, सळसळता जोश, उत्साह या सगळ्यांसह ती यंदाही पार पडली.

सवाईचं हे २९वं वर्ष. सगळे नाटय़प्रेमी दरवर्षी चातकासारखी या स्पध्रेची वाट पाहात असतात. एकांकिका स्पर्धामधली ऑस्कर समजली जाणारी सवाई या वर्षी रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये पार पडली. स्पध्रेला सुरुवात होते खरं तर त्याची तिकिटं मिळण्यापासून. कुठेही स्पर्धा असली तरीही रसिकांची गर्दी तेवढीच. ३६-३६ तास नाटय़वेडे सवाईच्या तिकिटांसाठी रांगेत उभे असतात. याचं तिकीट मिळणं म्हणजे अचानक लॉटरी लागण्यासारखं आहे. यातच खरं तर स्पध्रेचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही.

42lp-drama-youth

तर अशी ही सवाई या वर्षीही रंगात आली. उत्तमोत्तम एकांकिकांनी या स्पध्रेवर आपल्या सादरीकरणाने साज चढवला. वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धामधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या २४ एकांकिका प्राथमिक फेरीत सहभागी झाल्या. रवींद्र पाथरे, शेखर ढवळीकर आणि दीपक राज्याध्यक्ष या प्राथमिक फेरीतल्या परीक्षकांनी अगदी सचोटीने आणि चोखंदळरीत्या सात एकांकिका अंतिम फेरी साठी निवडल्या. त्यात ‘दि जिनियस, नाशिक’ संस्थेची ‘कस्टमर केअर’, ‘अभिनय, कल्याण’ संस्थेची ‘सेल्फी’, ‘आकार अकादमी’ या संस्थेची ‘जेवणावळ’, ‘झिरो बजेट प्रोडक्शन’ संस्थेची ‘दृष्टी’, ‘जिराफ थिएटर्स नाटय़संस्था, मुंबई’ ची ‘जून-जुल’, ‘महर्षी दयानंद महाविद्यालया’ची ‘बत्ताशी’ आणि ‘कलासाधना, मुंबई’ ची भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली. या सात एकांकिकांचा अंतर्भाव होता.

तरुणाईच्या जल्लोशात स्पध्रेला सुरुवात झाली. आता आपलं नाटक आहे हे समजल्यावर सगळ्यांची उडालेली घाई, स्टेजवर रेडिअमच्या पट्टय़ा लावणं, सेट लावणं, माìकग करणं, म्युझिक ऑपरेटरने ट्रायल घेणं, सगळं मी प्रेक्षकांत बसून बंद पडद्यामागूनसुद्धा पाहू शकत होते. एरवी माणसांचा आवाज म्हणजे कलकलाट वाटतो; पण या आवाजाने अंगावर रोमांच उभे राहात होते. अखेर पडदा उघडला आणि ‘कस्टमर केअर’ एकांकिकेला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारी एकांकिका. गावातला शंकऱ्या नावाचा शेतकरी आपल्या भावना शेअर करण्यासाठी एका कॉल सेंटरमध्ये फोन करतो आणि आपल्या व्यथा सांगत जातो. नीलेश सूर्यवंशी यांच्या सहज अभिनयाने एकांकिका फुलत होती. प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवाव्या अशी वाक्यं थेट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत होती. त्यात प्रकाशयोजनाकाराने शेतकऱ्याच्या आत्महत्येवर असा काही प्रकाश टाकला की डोळे कधी पाणावले ते कळलंच नाही. याला जर या नाटकातल्या अभिनेत्रीच्या आणखी एनर्जीची जोड मिळाली असती तर नाटक अजून फुललं असतं. सेल्फी एकांकिकेने सुरुवातीलाच प्रेक्षकांना जिंकून घेतलं. विषय साधाच होता; दुर्लक्षित पालकत्व शैली आणि अतिस्वातंत्र्य यांचा पाल्यावर झालेला परिणाम. पण मांडणी मात्र प्रौढ. रंगमंचावर केवळ दोघा जणांनी ४५ मिनिटं प्रेक्षकांना खिळून ठेवलं होतं. त्या दोघांचाही स्टेजवरचा सहज वावर मनाला भावणारा होता. नाटकातल्या अभिनेत्रीने (सोनाली मगर) सुरुवातीच्या काही सेकंदांत आपली एक वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात तयार केली. फक्त नाटकाचं नाव आणि नाटकातला आशय यांचा संबंध लवकर जोडला गेला नाही.

44lp-drama-youth

‘जेवणावळ’ हे रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर आधारित नाटक. अत्यंत अनुभवी दिग्दर्शकांनी (डॉ. अनिल बांदिवडेकर) त्यांच्या कौशल्याने दिग्दíशत केलेलं. नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे नाटकाला काहीच सेट नव्हता. सगळं म्युझिकवर खेळवलं जात होतं, तरीही सगळं सेटसहित घडतंय असंच भासत होतं. बरेच बारकावे ध्वनी संयोजकाने हेरले होते. अगदी टेबलवर ग्लास ठेवण्यापासून ते अंथरलेली सतरंजी झटकण्यापर्यंत सगळं. ध्वनी संयोजनाने नाटक जिवंत केलं. रत्नाकर मतकरींची कथा अजून वेगळ्या पद्धतीत मांडता आली असती. एकंदर अनुभव थ्रिलिंग होता.

‘दृष्टी डोळ्यात नाही मनात असावी लागते’ असा उदात्त संदेश देणारं नाटक होतं, अनिकेत पाटील यांनी दिग्दíशत केलेलं, ‘दृष्टी’. नाटक दोन अंध व्यक्तींभोवती फिरतं. त्यांचं अंध असणं हेच त्यांच्या डोळसपणाचं लक्षण आहे हे नाटक संपल्यानंतर मनात पक्कं होतं. डोळस माणसंसुद्धा इतका सकारात्मक विचार करू शकणार नाहीत इतका आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाटकातील अभिनेत्री आपल्याला देऊन जाते. नाटकाचा सेट, प्रकाशयोजनेतील नवनवीन प्रयोग प्रेक्षकांना अवाक् करणारे होते. प्रेक्षकांच्या मनातील हुरहुर, उत्सुकता, थ्रिल, तळमळ या सगळ्या भावना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या मनात तशाच ठेवण्याचं काम या नाटकाने समर्थपणे केलं.

‘जून-जुल’ ही पुन्हा वेगळ्याच ढंगाची आणि एक नवीन विषय समोर घेऊन आलेली एकांकिका. एड्स झालेल्या दोघांचं अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज. उत्कृष्ट लेखन आणि सट्ल अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांचं मन एकांकिकेनं जिंकलं. नाटकाच्या नेपथ्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. प्रसन्न नेपथ्य. बाग सचोटीने उभी केली होती. संवादही चपखल बसवलेले होते. त्यांनी दोघांनीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंलं होतं.

‘बत्ताशी’. नाटकाच्या अनाऊन्समेंटनेच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तिथून या नाटकाला ज्या टाळ्या मिळायला सुरुवात झाली ती थांबलीच नाही. सेट उत्तम. प्रकाशयोजना वाखाणण्याजोगी, ध्वनी संयोजन कानांना तृप्त करणारं, तर अभिनय सगळ्या कलाकारांचा एकाच पातळीवर. कुणी कमी नाही तर कुणीच जास्त नाही. टीम वर्कचं उत्तम उदाहरण.

‘भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली’ हे स्पध्रेतलं शेवटचं नाटक. माणूस तंत्रज्ञानाच्या किती आहारी गेलाय याचं दर्शन या नाटकातून झालं. पण त्यांचा हा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत बाकीच्या नाटकांच्या तुलनेने पोहोचू शकला नाही; पण प्रयत्न नक्कीच स्तुत्य होता.

43lp-drama-youth अशा नव-नवीन विषयाच्या इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे वेगवेगळ्या छटा असणाऱ्या सात एकांकिका सादर झाल्या आणि सगळ्यांना आस होती ती म्हणजे निकालाची. तो निर्णायक क्षण अखेर आलाच. सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि वैभव मांगले यांनी २५ तारखेच्या रात्रीपासून ते २६ तारखेच्या सकाळपर्यंत डोळ्याची एकही पापणी हलू न देता या अंतिम फेरीचं परीक्षण केलं. सवाई एकांकिका प्रथम ‘बत्ताशी’ तर द्वितीय ‘दृष्टी’ ठरली. प्रेक्षक पसंतीवरही ‘बत्ताशी’नेच नाव कोरलं. सवाई दिग्दर्शकाचा मानही ‘बत्ताशी’च्या ओमकार राऊत आणि स्वप्निल िहगडे यांना मिळाला. जून-जुल या एकांकीचे लेखक राकेश जाधव यांना सवाई लेखक म्हणून गौरवण्यात आलं. सवाईच्या प्रकाशयोजनेचा पुरस्कार ‘दृष्टी’ या एकांकिकेच्या राजेश िशदे यांनी पटकावला. बत्ताशीचे ध्वनी संयोजक अभिजीत पेंढारकर हे सवाई ध्वनी संयोजक ठरले. सवाई अभिनेत्री या पुरस्कारावर ‘दृष्टी’ एकांकिकेमधल्या अश्विनी जोशी हिने आपली मोहोर उमटवली, तर सवाई अभिनेता या पुरस्कारावर ‘कस्टमर केअर’च्या नीलेश सूर्यवंशीने आणि सवाई नेपथ्यकार ठरले ‘बत्ताशी’ या नाटकाचे समीर तोंडवलकर.

तिघाही परीक्षकांच्या वतीने मत मांडताना सोनाली कुलकर्णी बोलल्या. त्यांना स्पर्धा अटीतटीची वाटली. इतक्या वर्षांची नाटकाची परंपरा याही वर्षी जपली गेली याचा त्यांना आनंद झाला. एका गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे लिहिण्याची क्षमता असताना आपण नामांकित लेखकांची नाटकं का सादर करावी? आपल्यातला लेखक जाणीवपूर्वक जागा होण्याची गरज आहे. आपण रिफ्रेश होण्याची गरज आहे. मोजक्या पण नेमक्या शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं. स्पध्रेच्या संस्थापकांनी न विसरता कुठून-कुठून लांबून येणाऱ्या, रात्रभर स्पर्धाना थांबणाऱ्या, रंगदेवतेचा मान राखणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले. खरंच रात्रभर न थकता स्पर्धा बघण्याची ऊर्जा सवाई बघताना येते कुठून हा न उलगडणारा प्रश्नच आहे. हा रंगमंच नेहमीच जाणकार प्रेक्षक, उत्तम कलाकार आणि उत्तम कलाकृती तयार करत राहील आणि नेहमीच ‘सव्वा’ई ठरत राहो अशी नटराजाच्या चरणी प्रार्थना.
ऋतुजा फडके