डॉ. राधिका टिपरे response.lokprabha@ameyathakur07

उद्यानांचा फेरफटका

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम

कश्मीरला नंदनवन का म्हणतात याचा अनुभव शालीमार, निशात, चश्मेशाही बाग, परीमहल आणि इंदिरा गांधी टुलिप गार्डन पाहिल्यावर येतो. श्रीनगरमधील मुघलकालीन शालीमार बागेत काळय़ा संगमरवरात बांधलेल्या सुंदरशा मंडपामध्ये पर्शियन भाषेत दोन ओळी लिहिल्या आहेत..

गर फिरदौस बर रो ए जमीं अस्त..

हमीं अस्त, ओ हमीं अस्त, ओ हमीं अस्त..

या  धरतीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे.. इथेच आहे.. इथेच आहे..! या दोन ओळी पर्शियन कवी अमीर खुस्त्रो यांनी लिहिलेल्या आहेत असं मानलं जातं. परंतु वास्तवात या ओळी पर्शियन कवी ‘ओर्फी शिराजी’ यांच्या असून त्यांच्या भारतभेटीत त्यांनी त्या लिहल्या होत्या.. नंतरच्या काळात भारतातील अनेक इमारतींवर या ओळी कोरल्या गेल्या..! तर ज्या कश्मीरचं वर्णन या धरतीवरील स्वर्ग असं या कवीने केलं आहे आणि ज्या बागेतील संगमरवरी मंडपात या ओळी कोरलेल्या आहेत त्या शालीमार बागेत गेल्यानंतर या वर्णनाचा प्रत्यय येतो.

हा मुघलकालीन बगीचा इतका सुंदर आहे, की स्वर्गातील सौंदर्य म्हणजे यापेक्षा वेगळं काय असू शकतं? असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.. श्रीनगरमध्ये अनेक सुंदर बगीचे आहेत. ते पाहताना त्या काळातील उद्यानकला आणि स्थापत्यशास्त्राचे महत्त्व अधोरेखित होते. मुघलांचे निसर्गाप्रति असणारे प्रेम या उद्यानांत प्रतिबिंबित झाले आहे. सौंदर्यनिर्मितीसाठी त्यांनी वापरलेल्या सुंदर संकल्पना पाहून आपण थक्क होतो.

मुघल सम्राट जहांगीरने आपली मलिका नूरजहान हिच्यासाठी  इ.स. १६१९मध्ये शालीमार बाग विकसित केली. दल सरोवराच्या ईशान्य किनाऱ्यावर, पहाडातून सरोवराच्या दिशेने खळाळत येणाऱ्या ओढय़ाच्या पाण्यावर ही सुंदर, कल्पनातीत रम्य बाग फुलवलेली आहे. श्रीनगर शहराचा मानिबदू आणि मुघलकालीन बगीचाचा उत्कृष्ट नमुना, म्हणून हे उद्यान जगप्रसिद्ध आहे. ‘फराह बक्ष’ आणि ‘फैज बक्ष’ या नावानेसुद्धा ही बाग ओळखली जाते.

या उद्यानाचे श्रेय मुघल सम्राट जहांगीरला दिले जात असले तरी, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात प्रवरसेन दुसरा या राजाने त्याची निर्मिती केली होती आणि इ.स. ७९ ते १३९ या काळात त्याने कश्मीरवर राज्य केले, असाही दावा केला जातो. त्याच काळात श्रीनगर हे शहर त्याच्या राजधानीचे शहर म्हणून वसवले होते. प्रवरसेनाने स्वत:साठी दल सरोवराच्या ईशान्य बाजूला एक झोपडी बांधून घेतली होती.. त्या झोपडीला ‘शालीमार’ असे नाव दिले होते.. ‘सुकर्मा स्वामी’ या आपल्या गुरूला भेटायला जाताना राजा या झोपडीमध्ये मुक्काम करत असे.. संस्कृतमध्ये ‘शालीमार’ या शब्दाचा अर्थ होतो ‘प्रेमाचं घर’. काळाच्या ओघात ही झोपडी तर हरवून गेली.. मात्र बगीचाचे ‘शालीमार’ हे नाव मात्र मागे राहिले..!

त्याच जागेवर जहांगीर बादशहाने बाग बांधून घेतली आणि त्यानंतर बागेचं नामकरण ‘फराह बक्ष’ म्हणजेच आनंददायी व मनाला मोहवणारी असं करण्यात आलं.

नूरजहान अतिशय देखणी होती. तिच्या नावाचा अर्थसुद्धा ‘जगातील सर्वात सुंदर’ असा होतो.. पुढे मुघल बादशहा शहाजहानच्या इच्छेनुसार कश्मीरच्या तत्कालीन शासकाने १६३० साली बागेचा आकार वाढवला आणि या विशाल बागेचे नामकरण ‘फैज बक्ष’ असे केले.

नूरजहानला कश्मीरचं सौंदर्य आणि ही बाग इतकी प्रिय होती, की बादशहा जहांगीर उन्हाळय़ात आपले सर्व सरदार आणि लवाजम्यासह कश्मीरमध्ये येऊन राहायचा.. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत जवळजवळ १३ वेळा तो आणि नूरजहान संपूर्ण राजदरबार सोबत घेऊन उन्हाळय़ात कश्मीरमध्ये मुक्कामाला गेले होते. कश्मीरमध्ये पोहोचण्यासाठी हिमालयाच्या बर्फाच्छादित पिरपंजाल रांगेतील िखडी त्यांना हत्तीवर बसून ओलांडाव्या लागत. केवळ आनंदासाठी हा अवघड प्रवास करणाऱ्या शौकिन मुघल राज्यकर्त्यांचं कौतुकच करायला हवं.

पुढे शीख राजा रणजीत सिंह यांच्या कारकीर्दीत शालीमार बागेचा ताबा त्याच्याकडे गेला. त्या काळात उन्हाळय़ाच्या दिवसात त्यांच्याकडे येणाऱ्या युरोपीय पाहुण्यांची सोय श्रीनगरमधील शालीमार बाग आणि तेथील संगमरवरी मंडपामध्ये केली जात असे. पुढे राजा हरी सिंग जम्मू आणि कश्मीर राज्याचे शासक झाल्यानंतर शालीमार बागेमध्ये वीज आली. प्रत्येक नव्या शासकाने बागेमध्ये सुधारणा केल्या..  त्यामुळे आज ४०० वर्षांनंतरही शालीमार बाग तेवढीच मनमोहक आणि रम्य आहे.

शालीमार बागेची रचना पर्शियन स्थापत्य शैलीनुसार करण्यात आली असली तरी त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले होते. या बागेचा आराखडा इस्लामिक बागेच्या धर्तीवरच तयार करण्यात आला आहे. इस्लामिक बगीचा नेहमी सपाट जागेवर, चौरसात साकारला जातो. ज्यामध्ये मध्यभागी पाण्याचा हौद अथवा कारंजे असते. मध्यिबदूपासून चार दिशांना जाणाऱ्या त्रिज्येच्या अनुषंगाने उर्वरित बगीचाची रचना केली जाते. परंतु, शालीमार बागेचा आकार आयताकृती आहे. कारण ही बाग डोंगराच्या उतरणीवर फुलवायची होती. डोंगरउतारावरून खळाळत येणाऱ्या ‘शाह नहर’ या ओढय़ाला मध्यवर्ती ठेवून या बागेची स्थापत्य रचना करायची होती. या शाह नहरचा प्रवाह मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूंना शालीमार बागेची सुंदर रचना केलेली आहे. उंच पहाडातून दल सरोवराच्या दिशेने स्फटिकासारखे निर्मळ पाणी घेऊन येणाऱ्या या ओढय़ाच्या सभोवती तीन स्तरांत बागेची निर्मिती करण्यात आली आहे.

हा संपूर्ण परिसर डोंगराच्या उतरणीवर आहे. जमिनीच्या उंचीनुसार एका खालोखाल तीन सज्जांमध्ये (टेरेस) संपूर्ण बगीचाची रचना केलेली आहे. संपूर्ण बागेच्या मध्यातून खळाळत वाहणाऱ्या निर्झरावर वेगवेगळय़ा उंचीवर हौद बांधून त्यात कारंजी उभारून संपूर्ण रचनेला रमणीय स्वरूप दिलेले आहे. बाजूने चिनार वृक्षांची रांग आहेच. ४०० वर्षांपूर्वी संगमरवरात साकारलेली ही कारंजी आजही तितक्याच क्षमतेने पाण्याचे फवारे उडवतात.

बागेचे आजच्या घडीला असलेले क्षेत्रफळ जवळजवळ ३१ एकर आहे. बागेची लांबी ५८७ मीटर्स आणि रुंदी २५१  मीटर्स आहे. हिरवळींचे गालिचे अंथरलेल्या मोकळय़ा जागांच्या कडेला विविधरंगी फुलांचे ताटवे अक्षरश: डोळय़ांचे पारणे फेडतात. कश्मीरच्या आल्हाददायक हवामानात फुलणारी फुले किती मोहक आणि तजेलदार असतात याचे वर्णन शब्दांमध्ये करणे काठीण.

वेगवेगळय़ा उंचीवरील तीन सज्जांमध्ये शालीमारचे सौंदर्य फुललेले आहे. प्रत्येक सज्जाचे स्वतंत्र वैशिष्टयम् आहे. बागेच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपण पहिल्या सज्जामध्ये येतो. तत्कालीन परंपरेनुसार बागेचा हा परिसर सर्वसामान्य जनतेसाठी खुला असायचा. बागेत येणाऱ्यांना सामान्यांना फक्त या पहिल्या सज्जामध्ये येण्याची मुभा असे. या सज्जाच्या शेवटाकडे ‘दिवान ए आम’ हा मंडप बांधण्यात आला आहे. ज्याच्या मध्यभागी काळय़ा संगमरवरातील सिंहासन ठेवण्यात आले आहे. या मंडपातून खळाळत वाहणारा पाण्याचा प्रवाह समोरच्या चौकानी हौदामध्ये लहानशा धबधब्याप्रमाणे कोसळत राहतो. या हौदांमध्ये अनेक कारंजी आहेत. पादचाऱ्यांसाठी दुतर्फा प्रशस्त मार्गिका असून त्यांच्या किनाऱ्याने रंगबेरंगी फुलांचे ताटवे फुललेले आहेत. जाळीदार कठडे असून त्यावर फुलांचे वेल चढवलेले आहेत.

 बागेच्या दुसऱ्या सज्जातून वाहणारा झरा अधिक रुंद आहे. दोन्ही बाजूंना उंच उंच चिनार ताठ उभे आहेत. या ठिकाणी प्रवाहाच्या मध्यभागी ‘दिवान ए खास’चे बांधकाम होते. मात्र आता फक्त दगडी बांधकाम असलेली सपाट फरशी आणि काही दगडी बैठका शिल्लक आहेत. मध्यभागी संगमरवरातील प्रशस्त सिंहासन आहे.. दिवान ए खासचे छत आणि इतर बांधकाम शिल्लक नाही. पूर्वी इथे येण्याची परवानगी फक्त निमंत्रित मान्यवरांनाच असे. राजपरिवारातील सदस्यांसाठीचे हमाम एका बाजूला आजही पाहायला मिळतात.

तिसऱ्या आणि शेवटच्या सज्जामध्ये जनाना बाग आहे. या सुरेख बागेच्या मधून झरा वाहतो. एका बाजूला दिवान ए खास आणि दोन्ही बाजूंनी चिनार असलेली जनाना बाग म्हणजे विविधरंगी सुंदर फुलांच्या ताटव्यांनी सजलेला भाग आहे. जनाना बागेच्या सुरुवातीला झऱ्याच्या दोन्ही बाजूंना दोन मंडप आहेत. काश्मिरी शैलीमध्ये दगडी चौथऱ्यांवर बांधण्यात आलेल्या या चौरसाकृती खोल्या सुरक्षारक्षकांसाठी होत्या. जनाना बागेत फक्त मुघल राजस्त्रियांनाच प्रवेश असायचा. केवळ स्त्रियांसाठी असलेल्या या शेवटच्या बागेत इतर कुणीही प्रवेश करू नये यासाठी कडक सुरक्षा असे. शहाजहानने या जनाना बगीचामध्ये काळय़ा संगमरवरामध्ये एक सुंदर मंडप बांधून घेतला होता, ज्याला १२ कमानी होत्या, म्हणून त्याला बारादारी असेही म्हटले जायचे.. या सुंदर मंडपाच्या आतील भागात भिंतीवर अतिशय सुंदर फुलकारी रंगकाम केले होते. ज्याचे ठळक रंग आजही उठून दिसतात. मंडपाच्या सुंदर कमानी अतिशय नक्षीदार आहेत. या काळय़ा मंडपाच्या सभोवती पाण्याने भरून वाहणारे हौद असून त्यातील कारंजी सदैव उडत असतात. या संगमरवरी बारादारीचे एक वैशिष्टय़ आहे. या बारादारीला चार दगडी दरवाजे आहेत.

बारादारीच्या मागे वरच्या बाजूला दगडात बांधलेले प्रशस्त हौद असून त्यांच्या भिंतीवरून वाहणारा पाण्याचा प्रवाह दोन कमी उंचीच्या धबधब्यांच्या रूपात कोसळत राहतो.. विशेष म्हणजे या भिंतींमध्ये लहान लहान कोनाडे आहेत, ज्यांचा उल्लेख ‘चिन्नी खानस’असा केला जात असे. मुघलकाळात या देवळय़ांमध्ये रात्रीच्या वेळी तेलाचे दिवे लावले जायचे. रात्रीच्या अंधारात उजळलेले दिवे. दिव्यांच्या प्रकाशज्योतींच्या समोर वाहत्या निर्मळ पाण्याचा तरल पडदा. केवळ मनात या दृश्याची कल्पना करूनच मन शहारून जाते. या संगमरवरी मंडपाच्या पाठीमागे अगदी शेवटी दोन अष्टकोनी लहान मंडप आहेत.. तिथेच शालीमार बाग संपते..

या बागेच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या मुघल राजकर्त्यांनी नंतरच्या काळात याच नावाच्या इतर बागांची निर्मिती केली. यापैकी १६४१ साली शहाजहानने लाहौर येथे शालीमार बागेची निर्मिती केली, जी आजही लाहौर शहराची शोभा वाढवते आहे. दिल्ली येथे असणारी शालीमार बाग १६५३ साली बांधण्यात आली.

शालीमार बागेतून वाहणारा प्रवाह पुढे जाऊन दल सरोवरात मिसळतो. पूर्वी शालीमार बाग दल सरोवरापर्यंत जोडलेली होती. आता मात्र मध्ये रस्ता केलेला आहे. असे म्हणतात, की शिशिर ऋतूमध्ये पानगळ होण्यापूर्वी शालीमार बागेचे सौंदर्य खुलून येते. कारण पानगळ सुरू होण्यापूर्वी वृक्षांच्या पानांचे रंग बदलतात.. अंगावरील वस्त्रांचा हिरवाकंच रंग उतरवून सगळी वनचरे लाल-पिवळय़ा रंगात माखून जातात. कश्मीरचे सौंदर्य वृद्धिंगत करणारे चिनार वृक्ष या काळात कमालीचे सुंदर दिसतात. चिनारच्या पानांचे बदलणारे रंग म्हणजे निसर्गातील काव्यच म्हटले पाहिजे. 

हिरवळीचे गालिचे, उंच उंच चिनार वृक्षांचे हिरवेकंच स्तंभ, विविधरंगी फुलांनी फुललेले ताटवे आणि दूरवर आकाशाला कवेत घेणारी बर्फाच्छादित हिमशिखरे.. हे सारे काही श्रीनगरमधील या सुंदर बगीचाला स्वर्गीय परिमाण देते.