श्रावणात ऊन-पावसाच्या लपंडावात सारेच हरवून जातात. हिरवळ, गारवा अशा प्रसन्न वातावरणात एखादं प्रेमगीत म्हणावंसं वाटलं नाही तरच नवल. श्रावणधारा बरसू लागल्यावर कोणीतरी आपसूकच ‘अब के सजन सावन में’ हे गुणूगुणू लागतं. तर कोणाला ‘हासरा नाचरा’ गाण्याचा मोह आवरता येत नाही.

श्रावण म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो ऊन-पावसाचा लपंडाव, उभे राहतात ते नागपंचमी, दहीहंडी, मंगळागौरीसारखे वातावरणात रसरशीतपणा आणणारे सण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकाशात उमलणारे इंद्रधनू. मराठीतील श्रावण किंवा हिंदीतील सावन हा तमाम कवींचा व गीतकारांचा आवडता महिना! चैत्राची चाहूल, चैत्रपालवी व कोकीळ गुंजनामुळे लागत असेल, आषाढाची चाहूल आषाढ धारांनी लागत असेल तर श्रावणाची चाहूल ही नि:संशयपणे इंद्रधनुष्यामुळेच लागते; म्हणूनच कवी म्हणतात, ‘इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला’ किंवा ‘आकाशाचा अतिथी, आला श्रावण श्रावण. त्याच्या सुंदर पोतडीत सप्तरंगी तोरण’

श्रावण किंवा सावन हा फक्त कवींचाच नाही तर आबालवृद्धांच्यादेखील आवडीचा महिना आहे. याचे गारूड ग्रामीण असो की शहरी; सर्वच जनमानसावर पडते. कृषिप्रधान भारतातील शेतकरी जेव्हा सावनची पहिली झलक अनुभवतो तेव्हा त्याच्या ओठांतून नकळतच उमटते एक अप्रतिम गीत, ‘हरियाला सावन ढोल बजाता आया, धिन तक तक मन के मोर नचाता आया, मिट्टी में जान जगाता आया, धरती पहनेगी हरी चुनरिया, बनके दुल्हनिया’ तर लहान मुले नाचू-गाऊच लागतात; ‘घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम ओ सावन राजा, कहाँ से आए तुम’ म्हणत ते धूम धूम, चाक धूम धूमचा ठेका धरतात.

‘आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षांऋतू तरी!’ श्रावणाची वाट पाहणाऱ्या आम जनतेच्या वरील मानसिकतेचे कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांनी जे वर्णन केले आहे ते किती तंतोतंत आहे ना! शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी व सोनटक्क्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुले श्रावणात भरपूर येतात. श्रावणातच ठिकठिकाणी सायली अन् गौरीची फुलेदेखील दिसतात. थोडक्यात काय तर मानवच कशाला निसर्गालादेखील श्रावणाचे अप्रूप फार! ‘श्रावण आला गं वनी श्रावण आला, दरवळे गंध मधुर ओला’; गदिमा यांना हे गीत सुचले असावे ते बहुधा या रंगबावऱ्या फुलांमुळेच. फुलांसमवेतच श्रावणामध्ये अजून कशाला उधाण येत असेल तर ते संगीताला, गीतांना! मंगळागौरीची गीते, पोळ्याची गीते, नागपंचमीची गीते, दहीहंडीची गीते या सर्वामुळे श्रावण हासरा, नाचरा होतो. कवी कुसुमाग्रजांच्या लेखणीमधून म्हणूनच श्रावणसंगीताला कुर्निसात करण्यासाठी ‘हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण’ अशा श्रावणसरी पाझरतात.

प्रियकर व प्रेयसी यांच्यातील प्रेमाचा, तसेच विरहाचा साक्षीदार असणारा श्रावण हा प्रेमीजनांचा वीक पॉइण्ट; म्हणूनच प्रियकराच्या भेटीशी निगडित अशी अनेक सावन किंवा श्रावणावरील गाणी आपल्या भेटीस नित्य येत असतात. श्रावणात जेव्हा प्रियकर आणि प्रेयसी भेटतात तेव्हा त्यांना अख्खी रात्रदेखील अपुरी पडते. ‘रिमझिम के गीत सावन गाए, हाय, भीगी-भीगी रातों में.. बडी लंबी जी की बातें, बडी छोटी बरखा की रात जी’ या गाण्यातून हीच भावना अधोरेखित होते, नाही का? पण श्रावणधारा व प्रियकर म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. कधी दोघेही दिलेले वचन पाळतात तर कधी दडी देऊनच बसतात. ‘तुम्हें गीतों में ढा लूंगा सावन को आने दो’ असे वचन देणारा प्रियकर, जेव्हा प्रेयसीच्या घराची वाटच विसरतो तेव्हा प्रेयसी खूप उदास होते आणि मग तिच्या गालांवरून अश्रूंच्या धारा वाहू लागतात अन् ओठांवर येते गीत; ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’ अशा अनेक उदास राती जेव्हा प्रेयसीच्या वाटय़ाला येत असतात तेव्हा तिची अवस्था ‘रोज खेळते आठवणींची भातुकली, वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली’ अशी काहीशी होते. पण श्रावणधारांसारखा लपंडाव खेळणारा तिचा प्रियकर जेव्हा अवचित अवतरतो तेव्हा तिची अवस्था नकळतच ‘कळलेच नाही कधी ठाकला, दारी श्रावण दारी साजण’ अशी होते. पण रुसलेली साजणी, प्रियकराला सहजासहजी कशी बरं माफ करेल, मग तिचा लटका रुसवा दूर करण्यासाठी प्रियकर आर्जव करतो, ‘जलधारात तारा छेडीत आला श्रावण छंदी फंदी, त्याची चढते गीत धुंदी. अशी रुसून मुकी बसून, नको आवरू आज, तुझा ओला विस्कटलेला साज’; पण सगळ्याच प्रेयसी भाग्यवान नसतात. त्यांच्या नशिबी प्रियकराचा सहवास नसतो व त्याचे कारण असते प्रियकराची नोकरी. रोटी, कपडा और मकानमध्ये म्हणूनच उद्विग्न झीनत तक्रार करते, ‘हाय हाय यह मजबूरी, ये मौसम और ये दूरी, मुझे पल-पल है तडपाए, तेरी दो टकियों की नौकरी में मेरा लाखों का सावन जाए’।

गुलाम अलीदेखील ‘बागों में पडे झुले, तुम भूल गये हमको; हम तुमको नहीं भूले..सावन का महिना है, साजन से जुदा रह कर जीना भी क्या जीना है’ असे आर्त सूर आळवत प्रेमीजनांचा विरह जिवंत करतात. श्रावणात रानावनात झोपाळे बांधले जातात. झोपाळ्यावर बसलेल्या प्रेयसीला जर तिचा प्रियकर झोका देत असेल तर तिचे हात जणू गगनालाच टेकू लागतात, पण जर तो प्रियकरच नसेल तर? ‘सावन के झुले पडे है तुम चले आओ’ असे आर्त सुरात विनवणी करणारी प्रेयसी डोळ्यासमोर आली की श्रावण काहीसा केविलवाणा भासू लागतो. तर कधी कधी झोका द्यायला प्रियकर रानात पोहोचलेला असतो, पण त्याची प्रेयसीच झोपाळ्यावर नसते अशावेळी प्रियकरदेखील अवसान गाळून बसतो व म्हणू लागतो, ‘मेरे नैना सावन भादौ, फिर भी मेरा मन प्यासा’ आणि तोदेखील प्रेयसीला, ‘अब सोचू तुम्हें, याद नहीं है, अब सोचू नहीं भूले, वो सावन के झूले’ असे म्हणत त्या झोपाळ्याची आठवण करून देतो.

पण काही प्रियकर मात्र समंजस असतात, आपली प्रेयसी बेवफा नाही तर तिची पण काही तरी मजबुरी आहे हे ते जाणून असतात. आपल्याला भेटायला ती येऊ  शकत नाही याचे तीव्र दु:ख तिलाही असेल याची त्याला जाणीव असते. तिने रडून रडून स्वत:चे हाल करून घेऊ  नये म्हणून तो तिला विनवणी करतो, ‘जब छाए कभी सावन की घटा, रो रो के न करना याद मुझे, ए जान-ए-तमन्ना गम तेरा कर दे ना कही बरबाद मुझे’. पण कधी कधी प्रियकर, प्रेयसी किंवा सावन यापैकी कोणीही खलनायक नसतो तर खलनायक असते ती परिस्थिती. अशावेळी नेमकी काय पंचाईत होते ती आपल्याला ‘चुपके चुपके’मधील ‘अब के सजन सावन में, आग लगेगी बदन में’ या गाण्यात अनुभविता येते. प्रेमकवी मंगेश पाडगावकर, ज्यांनी बहुतांशवेळा आपल्या कवितेतून सकारात्मकताच साकारली, त्यांना मात्र श्रावणात बरसणारा घननीळा, जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी असा भासतो व या बरसणाऱ्या श्रावणामुळे त्यांना सभोवताली एक सकारात्मक उर्जा भासू लागते व म्हणूनच ते लिहून जातात, जिथेतिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी.

श्रावण म्हणजे सणावारांचा महिना! नागपंचमीला गावाबाहेर रानावनात असंख्य झोपाळे झुलू लागतात व त्यावर हिंदोळे घेत अनेक विवाहोत्सुक मुली आपल्या भावी सुखी संसाराची किंवा प्रियकराची स्वप्ने बघू लागतात. हे दृश्य जसे श्रावणाचे प्रतीक आहे तसेच मंगळागौर व्रतासाठी, सुगंधी पुष्पे व पत्री गोळा करत रानात विहरणाऱ्या (नुकत्याच लग्न झालेल्या) नव यौवनादेखील श्रावणाचेच द्योतक असतात. म्हणून बालकवी यांच्या ‘श्रावण मासी हर्षमानसी’ कवितेमधूनदेखील हेच चित्र ‘सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती’ या ओळींमधून आपल्यासमोर येते. श्रावणातच येणारी दहीहंडी किंवा गोकुळाष्टमी म्हणजे बालगोपाळांचा सर्वात आवडता सण. त्यामुळेच ‘लाल मेंदी हातावरी, हळदीकुंकू लाह्य़ा फुले, झुलताती डोलताती नागपंचमीचे झुले.. फुटे हंडी ग दह्य़ाची, अंगी रोमांच दाटले, असा श्रावण बरसे, सणा संगे फळे फुले’ अशा काव्यपंक्ती रसिकांना वाचायला मिळतात.

भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला राखीचा सण व शेतात राबणाऱ्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळ्याचा सणदेखील याच श्रावण महिन्याची देणगी आहे. त्यामुळेच ‘आला श्रावण महिना, आली राखीची पुणीव; येईल गं भाऊराया, त्याला माझी गं जाणीव. आला श्रावण, महिना, पूजा खिल्लाराची जोडी; एक दिसाचा हा राजा, सारं वर्ष औत ओढी’ अशा ओळीदेखील ऐकायला मिळतातच की! कधी कधी काही गाण्यांमध्ये सावनपेक्षा इतरच गोष्टी जास्त भाव खाऊन गेल्या आहेत. जसे की ‘मिलन’ चित्रपटातील, ‘सावन का महिना, पवन करे शोर’ या गाण्यातील शोर व सोर शब्दांमधील सुरेल जुगलबंदी. तसेच काहीसे ‘गरजत बरसत सावन आयो रे’ या गाण्यातील सुमन कल्याणपूर व कमल बारोट यांच्या सुरेल जुगलबंदीमुळे होते. ‘लायो न संग में, हमरे बिछडे बलमवा’ ही सावनबाबतची सल या सुरेल जुगलबंदीमध्ये कुठेतरी हरवून जाते.

श्रावण संगीताची महती ही अशी दोनचार पानांमध्ये थोडीच सांगता येते! कारण जेव्हा जेव्हा श्रावणधारा बरसू लागतात तेव्हा अवघ्या निसर्गाची व मानवजातीची अवस्था ‘सावन बरसे, तरसे दिल’ गाण्यातील नायक-नायिकेसारखी होते; काय करू अन् किती करू असे होऊन जाते. तेव्हा आपण सारेच जण आता श्रावणाचे कोडकौतुक करण्यात दंग होऊ  या!
(छायाचित्र : मुरली अय्यर)
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com