मायक्रोव्हेव कूकिंग हे एक फास्ट कूकिंगचा प्रकार आहे. ज्याला झटपट कूकिंग याच नावाने ओळखतात. मायक्रोमध्ये जेवढय़ा लवकर कुठलाही पदार्थ बनविता तेव्हा कुठल्याही कूकिंगमध्ये बनविता येत नाही, ही फक्त आजच्या काळाची मागणी आहे. मायक्रो हे पदार्थाच्या मधल्या भागातून बाहेरच्या भागापर्यंत गरम करते. आपण जेव्हा गॅसवर किंवा शेगडीवर पदार्थ बनवितो तेव्हा बाहेरच्या भागातून आतल्या भागापर्यंत पदार्थ गरम करतो. हा मायक्रोतला मोठा फरक आहे. मायक्रो कूकिंग करताना त्याचे टायमिंग व प्रेशर हे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व त्या त्या पदार्थावर अवलंबून आहे. बटाटा थोडा शिजायला वेळ लागतो. त्यामुळे त्याला मायक्रो हाय व जास्त मिनिटे ठेवावेच लागते, त्याप्रमाणे टोमॅटो, वांगी या भाज्या सॉफ्ट असल्यामुळे त्यांना मीडियम किंवा लो व कमी मिनिटावर कूक कराव्यात.
(१) मायक्रोव्हेवमध्ये फक्त हार्ड प्लास्टिक व काचेची भांडी वापरावी.
(२) मायक्रोव्हेवमध्ये स्टीलची पितळेची, तांब्याची भांडी वापरू नये.
(३) कुठलीही फोडणी मायक्रोमध्ये न करता गॅसवर करावी.
(४) मायक्रो पदार्थामधल्या मॉइश्चरला गरम करतो, त्यामुळे ब्रेड किंवा चपाती गरम करताना पेपरात गुंडाळून गरम करावे नाही तर चपाती गरम झाल्यावर अतिशय सुंदर व सॉफ्ट होईल पण दोन-तीन मिनिटांनी तीच चपाती पापडासारखी कडक होईल.
भेंडी मसाला
१/२ किलो भेंडी, ४-५ हिरवी मिरची, १/२ चमचा हळद पावडर, ३-४ कांदे (उभे कापलेले), २-३ टोमॅटो (उभे चिरलेले), १ चमचा मिरे, १ चमचा धने (जाडसर दळलेले) मीठ चवीनुसार २ चमचे तेल.
भेंडी, हिरवी मिरची, कांदे व टोमॅटो उभे चिरून द्यावेत. एका काचेच्या बाऊलमध्ये तेल टाकून त्यात जिरे, धने पावडर, व हळद टाकून मायक्रोमध्ये दोन मिनिटे मीडियम व ठेवावे. नंतर त्यातच भेंडी कांदे, मिरची व टोमॅटो टाकून मायक्रो मीडियमवर पाच मिनिटे ठेवावे. मधून मधून बंद करून थोडेसे चमच्याने हलवत राहावे.
कोथिंबीर टॉमेटो सूप
५-६ टोमॅटो, १/२ जुडी कोथिंबीर (बारीक चिरून घेतलेली) , २-३ कांदे (बारीक चिरून घेतलेले), १/२ चमचा मिरपूड, १ चमचा जिरे, १ चमचा मोहरी, ५ वाटय़ा पाणी, मीठ चवीनुसार. काचेच्या उंचसर भांडय़ात बारीक केलेले टोमॅटो, कोथिंबीर, कांदे, व पाणी टाकून पाच मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे. नंतर बाकीचे सर्व साहित्य टाकून नीट ढवळून परत पाच मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे. सर्व साहित्य मिक्सरमधून मिक्स करून गाळून घ्यावे. गरम सर्व करावे.
बटाटे व कोलंबी कीस
४-५ बटाटे, १/२ वाटी शेंगदाणे, १ चमचा जिरे, २०-२५ मीडियम कोलंबी (सोललेली), ४-५ हिरवी मिरची, १/२ वाटी ओले खोबरे, ३-४ चमचे तेल, मीठ चवीनुसार.
काचेच्या उंचसर भांडय़ात बटाटे व शेंगदाणे, पाणी टाकून तीन मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे. बटाटे थोडे कच्चे पाहिजेत, शेंगदाणे सोलून घेऊन एका भांडय़ात बाकीचे सर्व साहित्य टाकून दोन-तीन मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे. हे सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर मिक्स करून घ्यावे. एका काचेचा भांडय़ात बटाटय़ाचा कीस किसून घ्यावा. त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले जाडसर सर्व साहित्य हळुवारपणे मिक्स करावे. त्यावर थोडेसे पाणी शिंपडून मायक्रो मीडियमवर पाच मिनिटे ठेवावे.
कंदमुळाचे भरीव
१/४ किलो कंदमुळे, १ टोमॅटो, (बारीक चिरलेला), १ कांदा (बारीक चिरलेला), १ चमचा लसून पेस्ट, ४-५ हिरवी मिरची (बारीक चिरलेली), १ चमचा जिरे, ४-५ पाने कढीपत्ता, मीठ चवीनुसार, ३-४ चमचे तेल, ३-४ चमचे दही एका फ्राय पॅनमध्ये तेल टाकून त्यावर टॉमेटो, कांदा, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरे व कढीपत्ता चांगले परतवून घ्यावे. काचेच्या उंच बाऊलमध्ये कंदमुळे चार मिनिटे मायक्रो हायवर टोस्ट करावीत. बाऊल थंड झाल्यावर कंदमुळामध्ये पाणी टाकून आठ मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे. थंड झाल्यावर त्याला सोलून मॅश करून घ्यावे. त्यावर फ्रायपॅनमध्ये केलेले मिश्रण टाकून मिक्स करावे. व दही टाकून सर्व एकत्र करून थंड सर्व करावे.
चॉकलेट फज
एक चमचा वेलची पूड, २५० ग्रॅम मिल्क चॉकलेट, १०० ग्रॅम बटर, १/४ वाटी काजूचे तुकडे, ५० गॅ्रम मिल्क पावडर, १/२ वाटी क्रीम.
एका काचेच्या भांडय़ात, चॉकलेटचे तुकडे करावेत, त्यात क्रिम टाकून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. बाहेरकाढून नीट मिसळून घ्यावे. हे मिश्रण चॉकलेट सॉससारखे असावे. ह्या मिश्रणात बाकीचे सर्व साहित्य टाकून नीट मिक्स करावे. मायक्रो हाय व ४ मिनिटे ठेवावे. प्रत्येक मिनिटानंतर एका चमच्याने मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर एका पसरट भांडय़ात काढून थापावे. थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडाव्यात.
कपातली मँगो व्हाइट चॉकलेट ब्राऊनी
१/२ वाटी मैदा, १/२ वाटी पिठीसाखर, १/२ वाटी बटर, १/२ वाटी व्हाइट चॉकलेट, १/२ वाटी मॅगो पल्प, २ अंडी.
एका भांडय़ात बटर व चॉकलेट टाकून मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. त्याच काचेच्या भांडय़ात, मँगो पल्प, अंडी, साखर व मैदा टाकून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या काचेच्या टी कपात अर्धे टाकून, मायक्रो मीडियमवर पाच मिनिटे ठेवावे. गरम सर्व करावे.
कमळाच्या पातातले फिश
१/२ वाटी ओले खोबरे, ६-७ हिरव्या मिरच्या, एक चमचा आले, लसून पेस्ट, मीठ चवीनुसार, एक मीडियम पापलेट (बांगडा, सुरमई, मोठी कोलंबीसुद्धा वापरू शकता.)
कमळाची पाने धुवून घ्यावीत, मिक्सरमध्ये ओले खोबरे, मिरची, आले, लसूण पेस्ट व मीठ टाकून चटणी बनवून घ्यावी. पापलेटला वाटलेली चटणी लावून कमळाच्या पानात ठेवून दोऱ्याने बांधावे. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून मायक्रो हायवर पाच मिनिटे ठेवावे. गरमागरम सर्व करावे. फिश रूम टेम्परेचरला असावे.
भरलेली तोंडली
१/४ किलो तोंडली, १/४ वाटी ओले खोबरे, १/४ वाटी काजू, १ चमचा जाडे तिखट, १ चमचा जिरे, १ चमचा धणे, मीठ चवीनुसार, २-३ चमचे तेल.
सर्व तोंडल्यांना धुऊन मध्ये उभी चीर पाडून पाण्यात ठेवून द्यावी. मिक्सरमधून बाकीचे सर्व साहित्य टाकून चटणी बनवून घ्यावी. ही चटणी तोंडल्यांमध्ये भरून काचेच्या भांडय़ात ठेवून थोडे पाणी शिंपडून मायक्रो हायवर चार मिनिटे ठेवावे.
कोकोनट कुकीज
१ वाटी डेसिकंटेण्ड कोकोनट, १ वाटी पिठीसाखर, १ चमचा व्हेनिला, २ अंडी
एका भांडय़ात डेसिकंण्टेड कोकोनट, अंडी व व्हेनिला टाकून मिक्स करावे. हे कणकेच्या पिठासारखे असावे. या मिश्रणाचे छोटे गोळे करून मायक्रोव्हेवच्या बेकिंग ट्रेवर पाच मिनिटे मीडियमवर ठेवून बेक करावे.