अन्वय सावंत
‘मी ज्या वेळी नावारूपालाही आले नव्हते, त्या वेळी माझी आई मला जे काही करशील, ते शेवटपर्यंत कर, अशी सूचना द्यायची. कोणतीही गोष्ट अर्ध्यातच सोडणे योग्य नसल्याची तिची धारणा आहे. त्यामुळे मी कायमच माझ्या खेळावर खूप मेहनत घेते. विश्वतील सर्वोत्तम क्रिकेटपटू अशी ख्याती मिळवणे, हे माझे ध्येय आहे.’ भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनचे हे काही वर्षांपूर्वीचे विधान. स्मृतीने सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय केवळ बोलून दाखवले नाही, तर ते गाठलेही.
सांगलीच्या स्मृतीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२१ वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. स्मृतीने याआधी २०१८ मध्येही हा पुरस्कार मिळवला होता. ‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती भारताची पहिली, तर ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीनंतर जगातील केवळ दुसरीच खेळाडू ठरली. तिने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी—२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करत आपला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला.
२०२१ हे वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघासाठी फारसे लाभदायी ठरले नाही. भारतीय संघाने तुलनेने बलाढय़ संघांना उत्तम झुंज दिली असली, तरी त्यांना सातत्याने सामने जिंकण्यात अपयश आले. स्मृतीने मात्र उत्कृष्ट कामगिरी करताना क्रिकेटजगताला आपली दखल घेण्यासाठी भाग पाडले. करोनामुळे २०२०मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे मर्यादित सामने झाले नाहीत. त्यातच त्यांना सरावासाठी फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने २०२१मध्ये पुन्हा सातत्याने सामने सुरू झाल्यावर स्मृतीसह भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना लय सापडण्यासाठी अवधी लागला.
कालांतराने मात्र स्मृतीने दिमाखदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. तिने एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिका (नाबाद ८०) आणि ऑस्ट्रेलिया (८६) यांच्याविरुद्ध अर्धशतके झळकावली. वर्षभरात तिने ११ एकदिवसीय सामन्यांत ३५२ धावा केल्या. तसेच ट्वेन्टी—२० या क्रिकेटच्या अन्य मर्यादित षटकांच्या प्रकारात स्मृतीने नऊ सामन्यांत दोन अर्धशतकांच्या साहाय्याने २५५ धावांची नोंद केली, परंतु स्मृतीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली.
भारतीय महिला संघाला २०१४नंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे भारताच्या खेळाडू हा सामना खेळण्यासाठी आतुर होत्या. इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे झालेल्या या कसोटीत यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात स्मृती (७८) आणि शेफाली वर्मा (९६) या भारतीय सलामीवीरांनी अर्धशतके साकारली. मात्र मधली फळी आणि तळाचे फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात इतर फलंदाजांच्या योगदानामुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. तसेच गेल्या वर्षीच भारतीय संघ पहिल्यांदा प्रकाशझोतातील (डे—नाइट) कसोटी सामनाही खेळला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेट्रिकॉन स्टेडियमवर (क्विन्सलंड) झालेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर स्मृतीने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दडपण टाकत केवळ ५१ चेंडूत अर्धशतक झळकावले. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला आणि त्यावेळी स्मृती ८० धावांवर खेळत होती. कोणत्याही विश्रांतीनंतर खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालेल्या फलंदाजांची लय बिघडण्याची भीती असते. स्मृतीने मात्र लक्ष विचलित होऊ दिले नाही.
आक्रमक शैलीतील खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मृतीने तिच्या खेळाची दुसरी बाजूही दाखवली. तिने वेगवान अर्धशतकानंतर संयमाने खेळ करताना १७० चेंडूत कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. तिची ही खेळी सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाची होतीच, पण या खेळीची भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली. ऑस्ट्रेलियात कसोटी शतक साकारणारी स्मृती ही पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. अखेर ती १२७ धावांवर बाद झाली. दुसऱ्या डावातही तिने ३१ धावा केल्यामुळे भारतीय संघाला हा सामना अनिर्णित राखण्यात यश आले.
भारताच्या परदेशातील या उल्लेखनीय कामगिरीत दिलेल्या योगदानाचा स्मृतीला २०२१ वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावताना नक्कीच फायदा झाला. स्मृतीने २०२१ वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमॉंन्ट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आयर्लंडची गॅबी लेविस या आघाडीच्या खेळाडूंवर मात केली. स्मृतीच्या या यशाने कोणत्याही क्रिकेट रसिकाला आश्र्च्र्याचा धक्का बसला नाही.
भावाकडून प्रेरणा घेत क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या स्मृतीच्या कामगिरीत अगदी लहानपणापासून सातत्य होते. वयाच्या नवव्या वर्षीच तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघात निवड झाली. तर तिने झटपट पुढची पायरी चढताना वयाच्या ११व्या वर्षीच महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात प्रवेश मिळवला. मग तिचा महाराष्ट्राच्या मुख्य संघातही समावेश झाला. त्यानंतर तिला भारतीय महिला संघाची दारे ठोठावण्यासाठीही फार काळ लागला नाही.
२०१३मध्ये बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी—२० सामन्यातून तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी लाभली. तिने या संधीचा चांगला उपयोग करताना ३९ धावांची खेळी केली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. वर्षांगणिक तिच्या खेळात आणि कामगिरीत सुधारणा होत गेली. कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह ती भारतीय महिला संघाच्या फलंदाजीची ती आधारस्तंभ झाली. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१७च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या यशामुळे भारतात महिला क्रिकेटला वेगळीच लोकप्रियता प्राप्त झाली. स्मृतीने इंग्लंडमधील आव्हानात्मक परिस्थितीत ९ सामन्यांत २१६ धावा करताना अनेकदा भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यामुळे तिचीही जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होऊ लागली.
२०१८मध्ये तिला ‘आयसीसी’ने वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर तीन वर्षांंनी ती पुन्हा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. यंदा न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार असून भारताला जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. भारताच्या ऐतिहासिक यशासाठी २५ वर्षीय स्मृतीने दमदार कामगिरी करणे अत्यंत गरजेचे आहे. स्मृती तिचा दर्जेदार खेळ कायम राखणार का आणि तिच्या खेळाचा भारताच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
स्मृतीची २०२१ मधील कामगिरी
कसोटी एकदिवसीय ट्वेन्टी – २०
सामने २ ११ ९
धावा २४४ ३५२ २५५
सरासरी ६१.०० ३५.२० ३१.८७
शतके /अर्धशतके १/१ —/२ —/२
सर्वोत्तम १२७ ८६ ७०
response.lokprabha@expressindia.com