lp38मराठी सिनेमांची प्रगती बघता अमराठी लोक त्याकडे वळू लागले. निर्मिती, संगीत, गायन, अभिनय अशा विभागांमध्ये अमराठी चेहरे दिसू लागले. यात भर पडतेय ती तमीळ दिग्दर्शक आर. मधेश यांची. आगामी ‘फ्रेंड्स’ या मराठी सिनेमाचं ते दिग्दर्शन करताहेत.

मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत, हे सांगणं आता नवं राहिलं नाही. उत्तम विषयांचे, दर्जाचे सिनेमे मराठी सिनेसृष्टीत येताहेत. व्यावसायिकदृष्टय़ाही मराठी चित्रपट हळूहळू प्रगती करतोय. म्हणूनच, हिंदी सिनेसृष्टीतले अनेक जण मराठी सिनेमांमध्ये पैसा गुंतवू लागले. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर मराठी सिनेमांचं कौतुक करू लागले. इतर भाषिकांनाही मराठी सिनेमा खुणावू लागला. अशाच एका अमराठी दिग्दर्शकाला मराठी सिनेमाने आपल्याकडे खेचलं. आर. मधेश या तमीळ दिग्दर्शकाला मराठी सिनेमाने भुरळ पाडली. ‘फ्रेंड्स’ या आगामी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन ते करणार असून सिनेमाची कथाही त्यांचीच आहे. एका प्रादेशिक सिनेमातून दुसऱ्या प्रादेशिक सिनेमाकडे वळणारे अनेक असतील. त्यात आता मधेश यांची भर पडतेय. मराठी सिनेमा व्यावसायिकदृष्टय़ा भक्कम होऊ लागला आहे. व्यवसायाचं माध्यम म्हणूनही या क्षेत्रात येणारे अनेक आहेत. पण, मधेश मराठी सिनेमांकडे वळाले ते इथल्या प्रेक्षकांमुळे. अर्थात, मनोरंजन क्षेत्रात व्यवसायाचा मुद्दा ते मान्य करत असले तरी प्रेक्षकवर्ग त्यांना जास्त महत्त्वाचा वाटत असल्याचं ते सांगतात.

तमीळ सिनेमा इतकी कमाई करत असताना मराठी सिनेमा करावासा का वाटला; हा प्रश्न कोणत्याही मराठी प्रेक्षकाला पडणं स्वाभाविकच आहे. याचंच ते उत्तर देतात, ‘मी फ्रेंड्स हा मराठी सिनेमा करतोय हे कळल्यापासून मराठी लोक ‘मराठी सिनेमा का’ हा प्रश्न हमखास विचारतात. दक्षिणेकडच्या सिनेमांचं बजेट खूप असतं. तिथल्या सिनेमांची ओळख जगभर आहे. असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्या सिनेमांमध्ये आहे. पण, आता मराठी सिनेमाही जागतिक पातळीवर ओळख मिळवू लागला आहे. मराठी सिनेमांमध्ये आशय-विषय श्रेष्ठ ठरतो. या इंडस्ट्रीत केल्या जाणाऱ्या प्रयोगांतून बरंच शिकण्यासारखं आहे. हे प्रयोग प्रेक्षक खुल्या मनाने स्वीकारतात, दाद देतात, कौतुक करतात. सिनेमाविषयी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता प्रेक्षक सिनेमा बघायला येतात. प्रेक्षकांचा हा गुण मला भावला. प्रयोग आणि प्रेक्षक हे भावल्यामुळेच मी मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचं ठरवलं.

मराठी चित्रपटांमध्ये आता चांगला पैसा मिळतो हे उघड आहे. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये मराठी चित्रपटाने झेप घेतली आहे. व्यावसायिकदृष्टय़ाही मराठी सिनेमा आता मजबूत होऊ लागला आहे. म्हणूनच मराठी सिनेमात किंवा सिनेमासाठी काम करण्याची इच्छा असणारे अनेक आहेत. शेवटी, मनोरंजन क्षेत्रही आता एक व्यवसाय झाला आहे. कलेची सेवा म्हणून इथे काम करणारे मोजकेच असतील. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं वाईट नक्कीच नाही. किंबहुना नसावंच. आर. मधेश यांनी या मुद्दय़ांबाबत त्यांचं मत व्यक्त केलं. ‘तमीळ सिनेमांपेक्षा मराठी सिनेमांचं बजेट कमी असतं. पण, मराठी सिनेमा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पोहोचतो. काळ बदलतोय तसे सिनेमांमध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये बदलही होताहेत. एकेकाळी तमीळ सिनेमाचंही बजेट कमीच असायचं. कालांतराने त्यातही बदल होत गेले. मराठी सिनेमा हिंदी सिनेमांना स्पर्धा देऊ लागलाय’, मधेश सांगतात.

गेल्या काही चित्रपटांमधून नायक-नायिकांच्या वेगवेगळ्या जोडय़ा प्रेक्षकांनी बघितल्या. त्यांना चांगला प्रतिसादही दिला. नव्या जोडीमुळे सिनेमाचा लुकही फ्रेश वाटला. असाच फ्रेशनेस घेऊन येतोय फ्रेंड्स हा सिनेमा. या सिनेमातून एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्निल जोशी-गौरी नलावडे या दोघांना एकत्र या सिनेमात बघण्याची संधी मिळणार आहे. सिनेमातली नायिका ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी हवी होती म्हणून गौरीला स्वप्निलची नायिका म्हणून घेतल्याचं मधेश सांगतात. त्यांनी दोन र्वष या सिनेमासाठी काम केलंय. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, डोंबिवली अशा विविध ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांचं राहणीमान, बोलण्याची ढब, वागणूक अशा गोष्टींचं निरीक्षण केलं. ‘वाडा चिरेबंदी’, ‘सही रे सही’ अशी काही नाटकं बघितली. नाटकं बघून झाल्यानंतर पडद्यामागच्या लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं असा त्यांचा अभ्यास सुरू होता. मराठी सिनेमा असला तरी दिग्दर्शक दक्षिणेकडचा असल्याने सिनेमात ‘साऊथ’चा तडका नक्की असल्याचं ते हसत सांगतात.

दक्षिणेकडील सिनेमांवर कोटय़वधी खर्च केला जातो. ‘बाहुबली’ हा सिनेमा हे याचं अगदी ताजं उदाहरण आहे. त्याची भव्यता, तंत्रज्ञान, मांडणी, आकर्षकता असं सगळंच डोळे दिपून टाकणारं होतं. अशा प्रकारचे अनेक सिनेमे आले. अशी भव्यता सिनेमात उतरवण्यासाठी तिथल्या सिनेमांसाठी मोठं बजेट असतं. आर्थिक पाठबळ असलं की तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक प्रयोग करता येतात. सिनेमांच्या बजेटच्या मुद्दय़ावर मधेश त्यांचं मत व्यक्त करतात, ‘दक्षिणेकडून हिंदी सिनेसृष्टीत काम करणं सोप आहे. कारण हिंदी सिनेमा आणि दक्षिणेकडील सिनेमा यांच्या बजेटमध्ये फारशी तफावत नसते. त्यामुळे काम करताना आर्थिक अडचणी येत नाहीत. पण दक्षिण सिनेमातून एखाद्या मराठी सिनेमासाठी काम करताना बऱ्याच अडचणी येतात. त्यातली मुख्य अडचण म्हणजे बजेट. मला मराठी सिनेमा करताना भाषा आणि बजेट या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींशी खूप जमवून घ्यावं लागलं. तमीळ सिनेमाच्या एका गाण्यासाठी जितके पैसे खर्च होतात तितके मराठीमध्ये एका सिनेमासाठी खर्च केले जातात. यासाठी मला थोडा संघर्ष करावा लागला. माझ्यातल्या क्रिएटीव्ह माणसाचं आणि व्यावहारिक दृष्टिकोन असलेल्या माणसाचं द्वंद्व सुरू झालं होतं. शेवटी व्यावहारिकदृष्टय़ाही विचार करावाच लागतो. पण, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे हे काम बरंचसं सोप करता आलं. बजेटचा मुद्दा असला तरी मी सिनेमा करताना त्याच्या सादरीकरणात किंवा दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही.’ मराठी सिनेमांमध्ये फक्त बजेटचा अभाव आहे. बजेट वाढलं तरच तांत्रिकदृष्टय़ा मराठी सिनेमांची प्रगती होईल. आधुनिक तंत्रज्ञान नाही असा आरोप थेट केला जाऊ नये. कारण बजेट नाही म्हणून तंत्रज्ञान नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

मैत्री या विषयावर आधारित असंख्य मराठी-हिंदी सिनेमे याआधीही झाले आहेत. तमीळ दिग्दर्शक मराठी इंडस्ट्रीत येणार म्हणजे काही तरी हटके विषयावर सिनेमा करणार, असा समज होता. पण, दिग्दर्शक आर. मधेश यांनी मैत्री हाच विषय सिनेमातून दाखवला आहे. ‘मैत्री’ हाच विषय घेण्यामागचं कारण ते सांगतात, ‘सगळ्याच सिनेमांचा पाया प्रेमच असतो. प्रेमाच्या विविध छटांवर साधारण दोनशे सिनेमे येतात. पण त्यातले दोनच चालतात. कारण त्या सिनेमावर झालेले संस्कार वेगळे असतात. ‘मैत्री’ हा विषयी अनेकांनी दाखवला पण, त्याच्या हाताळण्याच्या पद्धतीवर त्याचं यशापयश अवलंबून असतं. ‘फ्रेंड्स’मध्ये मैत्री, तरुणाई, कुटुंब, मनोरंजन, प्रेमकथा, अ‍ॅक्शन असं सगळं आहे. मैत्रीत अनेकदा काही जण द्विधा मन:स्थितीत असतात. हे करू की ते, याचा स्वीकार करू की त्याचा असं काहींचं होत असतं. हीच मन:स्थिती मी या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’

मधेश यांनी काही मराठी सिनेमेही बघितले आहेत. ‘बालक पालक’, ‘किल्ला’, ‘रेगे’ अशा काही सिनेमांचं ते भरभरून कौतुक करतात. या सिनेमांमध्ये ‘हिरो’ म्हणून सिनेमाची कथा, मांडणी हेच असल्याचं ते नमूद करतात. असे विषय दाखवण्याचा प्रयोग मराठीशिवाय इतर भाषांमध्ये होऊ शकत नसल्याचंही ते आवर्जून सांगतात. कोणत्याही कलेला भाषा नसते. कला ही अनुभवायची असते. सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम असल्यामुळे संवाद महत्त्वाची भूमिका बजावतात. तमीळ दिग्दर्शकाला मराठी सिनेमा करताना भाषेची अडचण येणं अगदी स्वाभाविक आहे. पण मधेश यांच्या सहायकांकडून त्यांना बरीच मदत झाली. यामध्ये तमीळ आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे ज्ञान असलेले सहकारी होते. तसंच लेखक शिरीष लाटकर यांनीही भाषेसंदर्भात त्यांना साहाय्य केलं.

‘जीन्स’, ‘हिंदुस्तानी’, ‘कोचिडीअन’ अशा अनेक बिग बजेट आणि बडे कलाकार असलेल्या सिनेमांना त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. २५ वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीनंतर त्यांना मराठी सिनेमाकडे वळण्याची इच्छा झाली. सिनेमा करणाऱ्यांनी चोख काम केलं तर प्रेक्षक चांगल्या मनाने चित्रपट स्वीकारतोच, असं त्यांचं म्हणणं आहे. मराठीमध्ये आणखी तीन सिनेमे करण्याचं त्यांचं नियोजन असल्याचं ते सांगतात. आता मराठी सिनेमात ड्रामा, अ‍ॅक्शन, भव्यता दिसून येत असली तरी या तमीळ दिग्दर्शकामुळे मराठी सिनेमाला खास ‘साऊथ’चा तडका मिळेल यात शंका नाही.

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com  

twitter: @chaijoshi11

Story img Loader