स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
स्टारलिंक म्हणजे नेमकं काय? पारंपरिक इंटरनेटपेक्षा ते वेगळं कसं आहे? युक्रेनमध्ये त्याचा कसा वापर केला जातोय? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न..
गेल्या दोन आठवडय़ांपासून काही शब्द सतत आपल्या वाचण्यात, ऐकण्यात आणि पाहण्यात येत आहेत ते म्हणजे रशिया, युक्रेन, युद्ध, नाटो आदी; पण या गर्दीमध्ये आणखीन दोन शब्द आवर्जून अनेकदा कानावर पडले ते म्हणजे एलॉन मस्क आणि स्टारलिंक. स्टारलिंक तसा यापूर्वी काही वेळा सर्वसामान्यांपर्यंत बातम्यांच्या माध्यमातून पोहोचलेला शब्द; पण सध्या युक्रेनमध्ये ही सेवा सक्रिय करण्यात आली असून युद्धग्रस्त युक्रेनला त्याचा फार फायदा होत असल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा असणारं हे स्टारलिंक प्रकरण नेमकं आहे तरी काय? त्याचा युक्रेनला कसा फायदा होतोय आणि अशा इतर काही सेवा आहेत का यावरच टाकलेली नजर..
विनाशकारी युद्ध सध्या युक्रेनमध्ये सुरू आहे. यामध्ये लाखो निरपराधांना देश सोडावा लागला आहे तर शेकडोंचा बळी गेला आहे. आर्थिक नुकसानीबद्दल तर न बोललेलंच बरं अशी परिस्थिती आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही या युद्धावर मोठा परिणाम होताना दिसतोय. मग ते अगदी नेत्यांची वक्तव्यं प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा केलेला वापर असो किंवा स्मार्टफोन असो. तंत्रज्ञानाला युद्धाचा फटकाही बसलाय एका अर्थाने. युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बहल्ले केल्याने तेथील संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली आहे. यामध्ये इंटरनेट सेवेचाही समावेश आहे. सध्याच्या युगामध्ये संपर्काचं प्रमुख माध्यम असणाऱ्या इंटरनेटची सेवा बंद पडणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार. त्यामुळेच या आधुनिक समस्येवर युक्रेनमधील एका मंत्र्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या एलॉन मस्ककडे मदत मागितली. आता अर्थात एलॉनकडे थेट आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली नाही तर उद्ध्वस्त झालेलं इंटरनेटचं जाळं तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा सुरळीत करण्यासाठी स्टारलिंकची सेवा पुरवण्याची विनंती युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिकायलो फेडोरोव्ह यांनी २६ फेब्रुवारी रोजी ट्विटरवरून एलॉन मस्क यांच्याकडे केली.
विशेष म्हणजे या ट्वीटला एलॉन मस्क यांनी अवघ्या दहा तासांमध्ये ट्विटरवरूनच उत्तर दिलं. ‘स्टारलिंकची सेवा युक्रेनमध्ये सक्रिय करण्यात आली आहे. आणखी टर्मिनल्स युक्रेनला पाठवत आहोत,’ असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. एलॉन मस्क यांनी युक्रेनला केलेल्या या मदतीसाठी जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. एकीकडे मस्क यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत असताना १ मार्च रोजी युक्रेनच्या याच मंत्र्यांनी स्टारलिंककडून टर्मिनल्स युक्रेनमध्ये पोहोचल्याची माहिती फोटोसहित पोस्ट केली. हा फोटो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. याच टर्मिनल्सच्या माध्यमातून एकीकडे जमिनीवरील इंटरनेट यंत्रणा, टॉवर्स उद्ध्वस्त होत असताना सध्या युक्रेनमध्ये थेट उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध करून देण्याचं काम एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही खासगी अंतराळ कंपनी करत आहे.
स्टारलिंक ही सेवा नेमकी काय आहे, युद्धामध्ये मूलभूत सेवांना फटका बसलेला असताना स्टारलिंक कसं काम करतंय आणि असे अनेक प्रश्न सध्या या सेवेबद्दल फारशी माहिती नसणाऱ्यांना पडलेत; पण या प्रश्नांची उत्तरं ही भविष्यातील इंटरनेट विश्वात डोकावण्यास मदत करणारी आहेत.
स्टारलिंक ही एक लो अर्थ ऑर्बिट (एलईओ) उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवण्याची सुविधा आहे. मात्र सध्या भूस्थिर उपग्रहांच्या माध्यमातून तसेच समुद्राखाली मोठमोठय़ा वायर्सच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या इंटरनेट सेवेपेक्षा ही सेवा जास्त जलद आहे. यामागील मूळ कारण म्हणजे स्टारलिंक ही अनेक छोटय़ा छोटय़ा उपग्रहांच्या माध्यमातून पुरवली जाणारी सेवा आहे. त्याचप्रमाणे हे उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत म्हणजे अंदाजे ५०० किलोमीटरपासून अंदाजे २००० किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा घालत असतात. आता आपल्याकडे आधीपासूनच उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवली जात असताना या सेवांची काय गरज, असा प्रश्न पडू शकतो. तर त्याचं उत्तर असं आहे की, ही इंटरनेट सेवा म्हणजे जेननेक्स्ट म्हणजेच पुढील पिढीचं इंटरनेट आहे. सध्या इंटरनेट पुरवणारे भूस्थिर उपग्रह हे ३५ हजार किलोमीटरवर असतात. त्यामुळेच संदेशांची देवाणघेवाण आणि अधिक वापराचा ताण पडल्यावर या सेवांचा वेग मंदावतो. त्याउलट ५०० मीटरवर अनेक छोटय़ा छोटय़ा उपग्रहांच्या माध्यमातून पुरवलं जाणारं स्टारलिंकचं नेटवर्क हे कमी अड़थळे असणारं आणि अधिक वेगवान असतं. हे सर्व स्टारलिंक उपग्रह एकमेकांशी जोडलेले असतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास एखाद्या जाळय़ाने संपूर्ण पृथ्वीला गुंडाळलंय आणि ती जाळी विणताना मारलेली प्रत्येक गाठ ही एक स्टारलिंक उपग्रह आहे.
स्टारलिंकचं वैशिष्टय़ म्हणजे हे इंटरनेट सध्या आपण घरी ज्याप्रमाणे डीटूएच सेवा वापरतो त्याप्रमाणे घरावर टर्मिनेटर लावून वापरता येतं. या स्टारलिंक सेवेच्या माध्यमातून एलॉन मस्क यांना पैसा कमावून तो मंगळ मोहिमेसाठी वापरायचा आहे. मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स नावाच्या कंपनीच्या अंतर्गतच स्टारलिंकची सेवा पुरवली जाते आणि याच कंपनीच्या माध्यमातून मस्क यांना अंतराळ प्रवास आणि मंगळ मोहीम करायची आहे. स्टारलिंकच्या माध्यमातून पैसा कमवायचा, पण त्याचबरोबरच या सेवेच्या माध्यमातून पारंपरिक सेवेला पर्याय आणि अधिक वेगवान सेवा उपलब्ध करून द्यायचीय असं मस्क यांचं एकंदरीत धोरण आहे. ग्राहक आणि पुरवठादार दोघांचाही फायदा या तत्त्वावर सध्या स्टारलिंकचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगातील २९ देशांमध्ये या सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. भारतात स्टारलिंकला अद्याप तरी परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या देशांमध्ये स्टारलिंकला इंटरनेट सेवा देण्याचा परवाना मिळतो त्याच देशांमध्ये ही सेवा वापरता येते. तांत्रिकदृष्टय़ा पृथ्वीभोवती अगदी जवळून फिरणारं उपग्रहांचं हे जाळं जगभरामध्ये हव्या त्या ठिकाणी इंटरनेट सेवा पुरवू शकतं. मात्र त्यासाठी त्या संबंधित देशाची परवानगी आणि या उपग्रहांचे सिग्नल पकडण्यासाठी टर्मिनल्स आवश्यक आहेत. डीटूएचप्रमाणेच रिचार्ज किंवा मासिक देयक या माध्यमातून ही सेवा ग्राहकांना पुरवली जाते.
या सेवेचं वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये वायर्ड म्हणजेच वायर्सच्या माध्यमातून होणारी देवाणघेवाण फारच कमी आहे. त्यामुळेच नैसर्गिक आपत्ती, युद्धासारखी मानवनिर्मित आपत्ती यांसारख्या संकटांमध्येही ही सेवा फायद्याची ठरू शकते. अनेकदा अशा संकटांच्या वेळी पारंपरिक पद्धतीची इंटरनेट सेवा वायर्सचं नुकसान झाल्याने विस्कळीत होते. मात्र हा धोका स्टारलिंकच्या बाबतीत नाही. बरं अशी सेवा पुरवणारी स्टारलिंक ही एकमेव कंपनी नसून स्टारलिंक ज्या तंत्रज्ञानावर काम करतं ते इंटरनेटचं भविष्य असल्याचं मानलं जातंय.
अॅमेझॉनचं कुपीअर, ब्रिटनमधील वनवेब कंपनी, कॅनडामधील केपरलर आणि टेलसॅट, युरोपियन महासंघातील फ्रान्स, इटली आणि जर्मनीच्या उपग्रहांचा समावेश असणारी एअरबसच्या माध्यमातून राबवली जाणारी मोहीम यांसारख्या अनेक सेवा भविष्यात याच तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरामध्ये इंटरनेट पुरवण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्व कंपन्यांच्या या सेवेबद्दलच्या चाचण्या वेगवेगळय़ा टप्प्यांमध्ये आहेत. चीन तर होंगयुन, योंगयान आणि गॅलेक्सी स्पेस अशा तीन सेवा वेगवेगळय़ा प्रकल्पांच्या माध्यमातून अशी उपग्रहाच्या माध्यमातून सेवा देण्याच्या तयारीत आहे.
मात्र एकीकडे या सेवेमुळे इंटरनेट अधिक जलद आणि विनाअडथळा उपलब्ध होणार असलं तरी ज्याप्रमाणे या सेवेचा फायदा आहे तसाच तोटाही आहे. हळूहळू स्पर्धा वाढू लागणार त्याप्रमाणे आकाशात सोडल्या जाणाऱ्या या उपग्रहांची संख्या वाढणार. उदाहरणच द्यायचं झालं तर आजच्या घडीला स्टारलिंकचेच दोन हजारांहून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. अशा प्रकारे एकूण ४२ हजार उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडून जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवण्याचा एलॉन मस्क यांचा मानस आहे. बरं ही आकडेवारी फक्त स्टारलिंकची झाली. असेच काही हजार उपग्रह इतर कंपन्यांनाही त्यांची सेवा वाढवण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत पाठवायचे आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत या उपग्रहांचीच गर्दी होणार की काय, अशी चिंता आत्ताच व्यक्त करण्यात येत आहे. या साऱ्या गोंधळात अंतराळातील कचऱ्याचं प्रमाण वाढणार या समस्येचाही विचार करावा लागणार.
आता जाता जाता सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरील सर्व माहिती ही अत्यंत सोप्या भाषेत सांगितली असली तरी ही सेवा फार गुंतागुंतीची आणि तांत्रिक आहे. यामध्ये अगदी फेज अॅण्टीनापासून ते संशोधन, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, कायदे आणि या माध्यमावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धती अशा अनेक क्लिष्ट गोष्टी आहेत; पण ग्राहक किंवा वापरकर्त्यांशी या गोष्टींचा थेट संबंध येत नाही. समजून घ्यायची गोष्ट एवढीच की, सध्या युक्रेन युद्धामुळे चर्चेत आलेली स्टारलिंक सेवा ही इंटरनेटचं भविष्य असून लवकरच जगभरामध्ये अशा प्रकारच्या अनेक सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत होणार आहेत. त्यात सर्वाधिक जमेच्या बाजू याच की, इंटरनेटचा वेग यामुळे अधिक वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक संकटाच्या काळातही हे वायर्सचा फारसा संबंध नसणारं संपर्क माध्यम उपलब्ध नाही असं होणार नाही. त्यामुळेच सध्याच्या घडीला स्टारलिंक हे या क्षेत्रात आघाडीवर असलं तरी काही वर्षांमध्ये या अशा सेवा सर्वच देशांमध्ये उपलब्ध होऊन इंटरनेट अधिक स्वस्त आणि वेगवान होईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
(छायाचित्र : विकिपीडिया, स्टारलिंक)