छायाचित्रामध्ये दिसतो तो गाडीच्या आतमधला भाग. चालक दिसत नाही, पण स्टीअरिंग दिसते आणि समोरच्या काचेच्या पलीकडे सत्तरच्या दशकातील दोन पोलीस वाहतुकीचे नियमन करताना दिसतात. डावीकडून एक टेबलवाला डोक्यावर आणि हातात एकात एक घातलेली टेबले घेऊन रस्ता पार करताना दिसतो. हे दृश्य एरवी कोणत्याही रस्त्यावर असेच दिसू शकते; पण ही परफेक्ट फ्रेम आहे, जशी दिसतेय तशी हे किती जणांना कळते किंवा जाणवते? छायाचित्राची चौकट हा त्याची गुणवत्ता ठरविताना एक महत्त्वाचा निकष मानला जातो. तो इथे पुरेपूर कसास उतरतो. शिवाय हे छायाचित्र हे तसे द्विमित असले तरी चित्रकाराने साधलेला क्षण आणि चौकट यामधून अनेक मिती सहज जाणवतात. त्या मितीही अशा पद्धतीने येतात की, त्यातून खोली (डेप्थ) सहज जाणवावी. या सर्वच घटकांमुळे एक वेगळाच जिवंतपणा त्या छायाचित्रातून जाणवतो. हे सारे परिणाम साधणारे छायाचित्र आहे प्रसिद्ध अमेरिकन छायाचित्रकार विल्यम गैडनी याचे.
विल्यम आज हयात नाही. भारतीयांनाच काय पण अमेरिकनांनाही तो फार माहीत नाही. कारण हयातीत त्याचे एकच प्रदर्शन पार पडले. १९६९ साली त्याला फूलब्राइट स्कॉलरशिप मिळाली आणि तो प्रथम भारतात आला. त्या वेळेस फिल्म रोल्सवर फोटोग्राफी होत असे. असे ३५० रोल्स त्याने शूट केले. त्यानंतर १९७७ साली तो परत भारतात आला. या दोन्ही भेटींदरम्यान त्याने बनारस, कोलकात्याचे (तत्कालीन कलकत्ता) चित्रण केले. या भेटीत त्याचा भारतावर विशेष लोभ न जडता तरच नवल. रूढार्थाने याला स्ट्रीट फोटोग्राफी असे म्हणतात; पण विल्यमची छायाचित्रे ही त्याही पलीकडे जाऊन मानवी जीवनाचे काही अनोखे पैलू दाखविणारी आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी या प्रकारात मोडणाऱ्या छायाचित्रांमध्ये जिवंतपणा असतो. वेगळे जीवन त्यात पाहायला मिळतेच; पण विल्यमची छायाचित्रे त्याही पलीकडचे जीवन दाखवतात. ती एरवीच्या स्ट्रीट फोटोग्राफ्सपेक्षाही अनेक पटींनी बोलकी आहेत. कारण त्यात कुठेही कृत्रिमपणाचा लवलेशही नाही. असेच कृत्रिमपणाचा लवलेशही नसलेले खरेखुरे आयुष्य रस्त्यावरच पाहायला मिळते, अनुभवता येते. हाच स्ट्रीट फोटोग्राफीचा खरा उद्देश आहे; पण आताशा त्यात कृत्रिमरीत्या छायाचित्राला बोलके करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक छायाचित्रे रूढार्थाने स्ट्रीट फोटोग्राफ्स असली तरी ती पोझ देऊन टिपलेली असतात, त्यातील नैसर्गिकता हरवलेली असते. म्हणूनच खरीखुरी स्ट्रीट फोटोग्राफी पाहण्यासाठी विल्यमची छायाचित्रे पाहायला हवीत. हवेलीच्या गच्चीत झोपलेली मंडळी या छायाचित्रात ती ज्या सुखवस्तू भागात आहे, तिचे वास्तुशास्त्रीय अंग आणि तेथील माणसांचे जीवन असे दोन्ही पाहता येते. रात्रीच्या बनारसच्या छायाचित्रात जुन्या बनारसमधील हवेलीचा कोरीव काम असलेला व्हरांडा आणि रात्रीच्या अंधारात त्या व्हरांडय़ात खाली झोपलेल्या माणसाचा बाहेर आलेला केवळ एकच पाय छायाचित्रात दिसतो. तो केवळ एक पाय छायाचित्र बोलके तर करतोच, पण तिथली परिस्थितीही कथन करतो. त्यामुळे हे छायाचित्र कथनात्म होऊन जाते. ६०-७० च्या दशकात भारतात आलेल्या अनेक विदेशी छायाचित्रकारांना इथली गरिबी प्रकर्षांने जाणवली. म्हणून मग त्यांनी इथली भुकेकंगाल माणसे, भिकारी किंवा कचरा आणि त्यासोबत कवडीमोलाचे आयुष्य जगणारी माणसे अशी छायाचित्रे टिपली. ती गाजलीदेखील. त्यातील अनेकांना त्या काळी आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले. मग अशाच प्रकारची छायाचित्रे आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी पाठविण्याचा एक ट्रेण्डही सुरू झाला होता. विल्यमच्या छायाचित्रांमध्ये ती गरिबी दिसते, पण ती छायाचित्राचा भाग म्हणून येते; दिसते आणि प्रकर्षांने जाणवते ते त्यामध्ये असलेल्या माणसांचे जीवन, त्या जीवनाच्या नाना परी, जीवनाच्या मिती आणि त्याला असलेली खोलीदेखील! म्हणून विल्यम वेगळा ठरतो.
६०-७० च्या दशकातील भारताचे ते अकृत्रिम जीवन पाहायचे तर त्यासाठी ही सर्व छायाचित्रे अनमोल ठेवाच ठरतात. भारतातील वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतुकीचे छायाचित्रही असेच आहे. सायकलरिक्षातून एका कुटुंबाला घेऊन धावणारा माणूस, उलट दिशेने जाणारी ट्राम, त्यामागे असलेली अॅम्बेसेडर गाडी, मधेच असलेली हातगाडी आणि आपल्याला कधी जायला मिळेल या प्रतीक्षेत अलीकडे छायाचित्रकाराच्या बाजूस असलेला सायकलरिक्षावाला आणि हाती कापडी पिशवी असलेला एक पादचारी. प्रत्येकाची जाण्याची दिशा, त्यांचे पाहणे या साऱ्यातून विविध मिती जाणवतात, त्याच वेळेस छायाचित्राला खोलीही प्राप्त होते आणि तो क्षण जिवंत होतो!
कधी दुसऱ्या एका रात्रीच्या छायाचित्रात बनारसच्या हवेलीच्या पाश्र्वभूमीवर गाय आणि एक माणूस दोघेही रस्त्यावरच झोपलेले दिसतात. एक मनुष्य, एक प्राणी. या दोघांच्या आयुष्यातील असलेला साम्य-भेद हे चित्र जिवंतपणे बोलका करते. विल्यमची ही सारी छायाचित्रे पाहिल्यावर मनोमन पटते की, केवळ यंत्र म्हणजेच कॅमेरा हाती असून भागत नाही. त्यामागचा विचारी डोळा अधिक महत्त्वाचा असतो. याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे ते सारे क्षण आता परत येणार नाहीत, ना विल्यम परत येणार. पण ते गोठलेले क्षण आपल्याला पुनप्रत्ययाचा आणि एक चांगली कलाकृतीही पाहिल्याचा, अनुभवल्याचा आनंद नक्कीच देतील पुढील अनेक पिढय़ांना!
(छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या जहांगीर निकल्सन कलादालनात हे प्रदर्शन ३० जूनपर्यंत सकाळी १०.१५ ते सायं. ६.०० पर्यंत पाहता येईल.)
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab