आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू ही अतिशय दु:खद घटना. मृत्यूनंतरही संबंधित व्यक्तीचा सन्मान कायम राहावा, ही मागं उरलेल्यांची इच्छा असते. त्यासाठी मदतीला उभी राहिलेय सुखांत ही अंत्यविधी सेवा.
मृत्यूविषयी बोलणं, चर्चा करणं सहसा टाळलं जातं. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत आता मृत्यूनंतरचंही नियोजन करून ठेवायला लागेल, किंबहुना ते करायला सुरुवात झाली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, परदेशी असणारी मुलंबाळं, वृद्ध-एकाकी माणसं, कुटुंबवत्सल असूनही कामाचा व्याप असणाऱ्या व्यक्ती अशा साऱ्यांनाच या पर्यायाचा विचार करणं गरजेचं झालं आहे.
‘सुखांत’चे संस्थापक संचालक संजय रामगुडे यांनी या कल्पनेला मूर्तस्वरूप दिलं. ते वाराणसीला गेले असताना तिथल्या गंगाघाटावर मृतदेहांवर ज्या पद्धतीनं अंत्यसंस्कार होत होते, ते पाहून त्यांचं मन विषण्ण झालं. त्याच वेळी त्यांच्या मनात अंत्यसंस्काराची सेवा देण्याची कल्पना आली. त्यासाठी त्यांनी दोन र्वष सखोल अभ्यास केला. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराच्या १९ पद्धती आहेत. आपली जिवलग व्यक्ती गेल्यावर त्या शोकात माणसं बुडून गेलेली असतात. सगळ्या वातावरणात एक अनामिक मानसिक ताणतणाव असतो. त्यातच अंत्यविधीची चिंता लागून राहते. तिरडी बांधण्यापासून ते पालिकेतून मिळणाऱ्या मृत्यू दाखल्यापर्यंतच्या अनेक गोष्टी दु:ख बाजूला सारून कराव्या लागतात. ही चिंता दूर करून अ‍ॅम्ब्युलन्सपासून ते अंत्यविधीसाठी मदत करण्यापर्यंत सुखांतची सशुल्क सेवा मिळू शकते.
मृत्यूपूर्वी घ्यायच्या या मोक्ष प्लॅनमध्ये इतर गोष्टींसाठी तरतूद करतो तशी मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांची तरतूद करता येते. त्यासाठी सुखांतचं सभासद व्हावं लागेल. त्याच्या इच्छा, अंत्यसंस्काराविषयीची मतं, त्याच्या जातीच्या अंत्यसंस्काराविषयीच्या रीतीभाती समजून घेतल्या जातील. त्याच्या जवळच्या व्यक्तींचे संपर्क क्रमांक घेतले जातील. सभासदाच्या इच्छेनुसार मृत्यूपूर्वी आणि तो गेल्यावर त्याच्या घरच्यांच्या परवानगीनं नेत्रदान, अवयवदान, देहदान करण्यासाठी मदत केली जाईल. या विविध दानांसाठीची सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन त्याविषयी लोकांमध्ये सजगता निर्माण होण्यासाठी त्यांना या संदर्भात समुपदेशन केलं जातं. सभासद झाल्यापासून दहा र्वष मुदतीचा हा प्लॅन आहे.
अंत्यसंस्कारांच्या वेळी काही वेळा श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं जातं. त्या वेळी उपस्थितांच्या भाषणांखेरीज सभासदाची सुखांतनं तयार केलेली एक मिनिटाची ध्वनिचित्रफीत दाखवली जाते. खुद्द सभासद प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असेल नि त्याला मृत्यूपश्चात त्यांचं मनोगत मांडायचं असेल तर आधीच त्याचं रेकॉर्डिग करून ते त्या वेळी दाखवता येऊ शकतं. बारा-तेराव्याच्या वेळी मांडण्यात आलेल्या फोटोविषयीही बऱ्याचदा दु:खामुळे उदासीनता असते. चटकन उपलब्ध असणारा फोटो लावला जातो. त्याऐवजी सभासदांनी फोटो निवडून ठेवायला सुचवलं जातं. सभासदाच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण जपण्यासाठी त्यांची जयंती नि पुण्यतिथी दहा र्वष साजरी केली जाते. सभासद नसलेल्यांसाठी तात्काळ सेवा मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार दिली जाते आहे. पंधरा जणांच्या टीम ‘सुखांत’ची ही सशुल्क सेवा सध्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरांत उपलब्ध आहे. ज्यांचं कुणीही नाही, त्यांचे अंत्यसंस्कार देणगीतून करा, अशा स्वरूपाची दत्तक योजनाही आकारते आहे. ‘मेकिंग डिफिकल्ट टाइम लिटिल इझिअर’ या सुखांतच्या टॅगलाइननुसार अनेकांचा शेवटचा प्रवास सुकर होतोय.
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा