गेले काही महिने आजारपणामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांची प्रकृती आता सुधारत असल्याचे वृत्त आहे. तिथल्या कमालीच्या भावनिक मतदारामुळे अम्माचे आजारपण हे अण्णा द्रमुकसाठी खुंटी हलवून बळकट करण्याचाच प्रकार ठरला.

कमालीचे व्यक्तिपूजक राजकारण हे तामिळनाडूचे वैशिष्टय़. गेल्या चार-सहा दशकांचा राज्यातील राजकारणाचा आढावा घेतला तर यात आजही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्ष तामिळनाडूत दुय्यम ठरलेत. आजच्या घडीला काँग्रेसला द्रमुकचा हात धरून राजकारण करावे लागते. तर भाजपला छोटय़ा पक्षांचा आधार घ्यावा लागतो. मुद्दा असा की येथील राजकारणाचा बाजच वेगळा आहे. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता रुग्णालयात असताना त्यांचे छायाचित्र समोर ठेवून मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात होती. राज्यातील ज्येष्ठ मंत्री पनीरसेलवन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार होता. मात्र ते जयललितांच्या खुर्चीत कधीही बसले नाहीत. कारण जयललितांचे (अम्मांचे) स्थान वेगळेच अशीच धारणा त्यामागे आहे.

दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्येही नव्वदी पार केलेल्या करुणानिधी यांनी पुत्र स्टॅलीन यांना वारस म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यातही स्टॅलीन व अळ्ळीगिरी यांच्यात भाऊबंदकी झालीच. अखेर अळ्ळीगिरी पक्षाबाहेर गेले. आता स्टॅलीन यांचे नेतृत्व स्थिरावले आहे. सध्या त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे. सलग दुसऱ्यांदा एखाद्या पक्षाला सत्ता मिळत नाही असा तामिळनाडूचा लौकिक आहे. यंदा मात्र त्याला छेद दिला गेला. लोकप्रिय घोषणा व कार्यक्रमाच्या जोरावर जयललितांनी बाजी मारली.

लोकप्रियतेचेच गमक

राजकारणात सवंग लोकानुरंज हे आपल्याकडे सुरू असते. तामिळनाडूत तर ते जरा अधिकच.  एक-दोन रुपयांत इडली, औषधे, मोफत रंगीत चित्रवाणी संच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप अशा कित्येक योजना अम्मांनी आणल्या. त्यामुळे जनतेने पुन्हा सत्तेत आणले. आताही त्यांची प्रकृती बिघडल्यावर राज्यभर अगदी होमहवन सुरू होते. देशभरातील प्रमुख नेत्यांनी अपोलो रुग्णालयाला भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजपच्या दृष्टीने जयललितांचा पाठिंबा राज्यसभेत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर केंद्रात सारेच विरोधक एकवटले असताना किमान अण्णा द्रमुकने विरोधी भूमिका घेऊ नये अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांचे प्रमुख नेते रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी गेले होते. निवडणूक प्रचारातील अपवाद वगळता भाजप जयललितांवर कठोर टीका टाळतो. मात्र नोटाबंदीच्या मुद्दय़ावर जयललितांच्या पक्षाने विरोधकांबरोबर संसद परिसरात झालेल्या आंदोलनात सुरात सूर मिसळल्याने भाजपचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या राजकारणाचा अंदाज भाजपला लागेना अशी स्थिती आहे. अर्थात राज्यात द्रमुक-काँग्रेस यांची आघाडी असल्याने अण्णा द्रमुकला अशा आंदोलनात सामील होणे अवघड आहे. अण्णा द्रमुकमध्ये संसद परिसरात नोटाबंदीच्या मुद्दय़ावर केलेल्या आंदोलनाने पक्षातील खासदारांच्या एका गटाने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. द्रमुकबरोबर आंदोलनात सामील झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे काही जणांचे मत आहे. उघडपणे याबाबत कोणी बोलू शकत नाही. मात्र पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता सक्रिय नसल्याने त्यांच्या मैत्रीण शशिकला या निर्णय घेत असल्याचा आक्षेप आहे, त्यातून विरोधकांच्या आंदोलनात अण्णा द्रमुकने सुरात सूर मिसळला असा काही खासदारांचा आरोप आहे. अन्यथा अण्णा द्रमुकची भूमिका भाजपला आतापर्यंत फारशी विरोधाची राहिलेली नाही.  नोटाबंदीच्या मुद्दय़ावर मात्र अण्णा द्रमुक सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधानांनी याबाबत संसदेत उत्तर द्यावे यापासून ते नोटाबंदी निर्णयाचे परिणाम, तसेच तो निर्णय फुटल्याचा आरोप अण्णा द्रमुकच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळे अण्णा द्रमुक केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक होणार काय असा प्रश्न आहे.  नोटाबंदीविरोधात आंदोलनाची धुरा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. अण्णा द्रमुकने थेट भूमिका घेतलेली नव्हती. मात्र बँका तसेच एटीएमबाहेरच्या रांगा नोटाबंदी निर्णयानंतर १५ दिवसांनी कायम असल्याचे पाहून विरोधकांच्या सुरात त्यांनी सूर मिसळला आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपच्या विरोधकांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत संसदेत चांगले संख्याबळ असलेले अण्णा द्रमुकसह, बिजू जनता दल व तेलंगण राष्ट्र समिती तटस्थ आहेत. मात्र आता अण्णा द्रमुकची भूमिका वेगळी दिसत आहेत. अर्थात जयललिता सक्रिय झाल्यावर काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे आहे.

पोटनिवडणुकीतही सरशी

राज्यात गेल्याच आठवडय़ात झालेल्या तीनही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ अण्णा द्रमुकने बाजी मारली. विशेष म्हणजे त्यातील एक जागा त्यांनी द्रमुककडून खेचली. पोटनिवडणुकांमध्ये सर्वसाधारणपणे सत्ताधाऱ्यांना कौल मिळतो असे जरी मानले जात असले, तरी जयललितांच्या गैरहजेरीत हे यश त्यांनी मिळवले आहे. त्या रुग्णालयात असताना पक्षाने विजय मिळवला. त्यातही नाटय़ होते. जयललितांनी पक्षाच्या उमेदवारांच्या फॉर्मवर (एबी फॉर्मवर) अंगठा उठवणे, रुग्णालयातून मत देण्यासाठी पत्रक काढणे या बाबी अण्णा द्रमुकला सहानुभूती मिळवून गेल्या. या पोटनिवडणुकीपैकी विधानसभा निवडणुकीवेळी तीनपैकी दोन मतदारसंघांत पैशाच्या प्रभावामुळे निवडणूकच रद्द करण्यात आली होती. खरे तर अशी घटना देशाच्या इतिहासातील ही पहिलीच  होती. पैशाचे आरोप होतात. मात्र मतदारांना भेटवस्तू व पैसे वाटणे याबाबत आरोप  झाल्याने थेट निवडणूकच रद्द करण्याचे पाऊल निवडणूक आयोगाने उचलले होते. त्यामुळे निवडणुकीतील पैशाचा प्रभाव या निमित्ताने अधोरेखित झाला होताच, पण तामिळनाडूचे राजकारण कोणत्या दिशेला जाते हेही दिसले होते. आता पोटनिवडणुकीत निकाल स्वीकारण्यास प्रमुख विरोधी पक्ष असलेला द्रमुक राजी नाही. सरकारी यंत्रणेचा वापर करून सत्तारूढ अण्णा द्रमुकने हे विजय मिळवल्याचा आक्षेप आहे. तर जनमताचा आदर करावा असा सल्ला अण्णा द्रमुकने त्यांच्या मुखपत्रातून दिला आहे. या दोन पक्षांतील आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत.

जयललिता पूर्णपणे बऱ्या झाल्याचे अपोलो रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. त्यांचे काम मार्गदर्शन करण्याचे आहे. त्यामुळे आताही त्या काम करू शकतील असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच त्या रुजू होतील अशी अपेक्षा आहे. या साऱ्या घडामोडीत राज्यातील व्यक्तिकेंद्रित संस्कृती मात्र दिसून आली. लोकांच्या आशीर्वादामुळे बरे झाल्याचे जयललिता म्हणाल्या. भावनिक आवाहनाचा मोठा परिणाम तामिळनाडूच्या राजकारणावर होतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तामिळनाडूत आताच्या विधानसभा निवडणुकीतही जयललिता यांनी तामिळनाडूतील जनताच माझे कुटुंब आहे, असा केलेला प्रचार प्रभावी ठरला होता. त्यांचा रोख करुणानिधी यांच्यावर होता. करुणानिधींनी पुत्र स्टॅलीन यांना पुढे आणल्याचा घराणेशाहीचा मुद्दा होता. त्या वेळी तामिळनाडूच्या जनतेने जयललितांवर विश्वास टाकला होता. सत्ताविरोधी लाट व जनतेच्या अपेक्षांचे ओझे असताना पुन्हा सत्ता मिळवणे कठीणच. पण जयललिता मतदारांच्या कसोटीस उतरल्या. आताही पोटनिवडणुकीतही अण्णा द्रमुकने बाजी मारली आहे. पोटनिवडणुकीत पक्षाने विजय मिळवल्यावर अपोलो रुग्णालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. २२ सप्टेंबरला जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अस्मितेचे राजकारण

अस्मितेभोवती चालणारे राजकारण, त्यात कमालीची व्यक्तिपूजा या बाबी तामिळनाडूत ठळकपणे दिसतात. राजकारणाच्या केंद्रस्थानी जयललिता किंवा करुणानिधी हे दोघेच आहेत. तिथे बाकीचे स्थानिक पक्ष नावालाच आहेत. अभिनेते विजयकांत यांचा डीएमडीके पक्ष राज्यात तिसरा पर्याय म्हणून उभा राहील असे बोलले जात होते. मात्र धरसोडवृत्तीमुळे विजयकांत यांचा पक्ष प्रभाव पाडू शकला नाही. वायको किंवा इतर नेत्यांची थोडय़ाफार फरकाने तीच स्थिती आहे. तसेच तामिळनाडूतील राष्ट्रीय पक्षांच्या अस्तित्वाचा मुद्दा लेखाच्या सुरुवातीलाच घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी राज्याचे राजकारण ६८ वर्षीय जयललिता यांच्याभोवती फिरणार असे चित्र आहे. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत असल्याने अण्णा द्रमुकला पाठिंबा मिळत आहे असाच निष्कर्ष राज्यातील निवडणूक निकालावरून काढता येतो.

जयललितांचा आजार अन्

ताप व शरीरातील पाणी कमी झाल्याने जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले. मात्र उपचार व त्याच्याशी निगडित बाबींवर गोपनीयता बाळगण्यात आली. परदेशातून डॉक्टर आले होते. आताही एका वृत्तानुसार त्यांचा श्वासोच्छ्वास ९० टक्के नैसर्गिकरीत्या सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच त्या थोडय़ाफार बोलल्याचेही वृत्त आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांतून बरेच काही येत होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने याबाबत सातत्याने विचारणा केली. जयललितांना रुग्णालयात दाखल केल्यावर बऱ्याच अवधीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पनीरसेलवन यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती हे सारेच अनाकलनीय होते.  स्थानिक वाहिन्यांवर जयललितांची रुग्णालयातील काही छायाचित्रे दाखवण्यात आली. तसेच त्यांना भेटायला जी विविध पक्षांची नेतेमंडळी आली त्यांना खुद्द जयललितांना भेटूच दिले नाही. डॉक्टरांशीच त्यांनी संवाद साधला. अर्थात रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून ही खबरदारी घेणे योग्यच आहे. अपोलो रुग्णालय व अण्णा द्रमुकने त्यांच्या प्रकृतीबाबत काय ती माहिती दिली. जयललितांनीही लोकांच्या आशीर्वादाने पुनर्जन्म झाल्याचे सांगितले. या सगळ्या घडामोडी पाहता एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच आहे. आता जयललितांनी सूत्रे स्वीकारल्यावरही काही काळानंतरच तथ्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.
हृषीकेश देशपांडे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader