-सुनिता कुलकर्णी
बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझमची म्हणजेच घराणेशाहीची अलीकडच्या काळात बरीच चर्चा होत असते. ऋषी कपूर तर या नेपोटिझमचं ठसठशीत उदाहरण होतं. वडील राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर हे दोन काका अशी पार्श्वभूमी असलेल्या ऋषी कपूरना सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी इतरांना पार कराव्या लागतात, त्या कितीतरी पायऱ्या सहज गाळता आल्या आणि वयाच्या अवघ्या २१ वर्षी ‘बॉबी’सारख्या खास त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांनीच लाँच केलेल्या सिनेमात हिरोची भूमिका साकारायला मिळाली. पहिलाच सिनेमा त्याच्या गाण्यांसह सुपरडुपर हिट…
पण आता अगदी आजोबा सोडून द्या, पण वडिलांची सिनेसृष्टीची पार्श्वभूमी आहे, त्यांनी आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी सिनेमा लाँच केला आहे आणि आज ती मुलं कुठेही नाहीत, अशी यादी केली तर अगदी गेल्या ५० वर्षांमधलीच किती तरी नावं निघतील. अगदी ऋषी कपूर यांच्या भावाचं, राजीव कपूरचं नावही त्याच यादीत असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचाच अर्थ बॉलिवूडमध्ये, तुम्हाला पडद्यावर नाव कमवायचं असेल तुम्ही फक्त बडे बाप का बेटा असून चालत नाही. तिथे पडद्यावर तुमचं नाणं खणखणीत वाजावंच लागतं. मायबाप प्रेक्षक राज कपूरचा मुलगा कसा आहे हे बघायला पैसे टाकून एकदा येतील. पण त्याचं काम त्यांना आवडलं नाही तर पुढच्या वेळी त्याच्याकडे पाठ फिरवतील.

आपण फक्त राज कपूरचा मुलगा म्हणून नाही तर बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर टिकण्यासाठी जे जे लागतं ते सगळं घेऊन आलो आहोत, हे ऋषी कपूर यांनी सिद्ध केलं होतं. आपलं नाणं त्यांनी पडद्यावर खणखणीत वाजवून दाखवलं होतं. अमिताभ बच्चन यांच्याभोवती असलेलं वलय, हा हिरो दहा बारा जणांना मारू शकतो असा प्रेक्षकांना विश्वास वाटेल अशी तगडी शरीरयष्टी असलेले विनोद खन्ना असं वातावरण असताना उभं राहणं आणि टिकणं ही  सोपी गोष्ट नव्हती. कपूर खानदानाकडून मिळालेलं जन्मदत्त देखणेपण, नृत्यकौशल्य याच्या जोडीला आपण आपण चांगले अभिनेते आहोत हेदेखील त्यांनी आपल्या कारकीर्दीमधून सिद्ध केलं. त्यांची चरित्र अभिनेता म्हणून नंतरच्या काळातली कारकीर्दही त्यांच्यामधला अभिनेता किती ठसठशीत होता हेच सिद्ध करते.

राज कपूर यांचा मुलगा म्हणजे थोडक्यात बडे बाप का बेटा अशी कारकीर्द सुरू करून रुपेरी पडद्यावरचा चॉकलेट हिरो या प्रतिमेपासून चांगला अभिनेता या प्रतिमेपर्यंत प्रवास करणाऱ्या ऋषी कपूर यांना आदरांजली.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The brightest son of a big father msr