हिमालयाच्या पर्वतरांगांमधून ट्रेन दौडवण्याचा नुसता विचार करून चीन थांबला नाही, तर त्याने प्रत्यक्ष अशी ट्रेन सुरूही केली. तिच्या अविस्मरणीय प्रवासाचा वृत्तान्त-
युरोपात आल्प्स पर्वतरांगांमध्ये काही शहरे रेल्वेमार्गाने जोडली आहेत. साऊथ अमेरिकेत अँडीजमधूनही हायवे वगैरे झाले आहेत. पण हिमालयासारख्या महाकाय, खडतर व लहरी डोंगरातून रेल्वे नेणे हा विचारही अगदी दुरापास्त. या मार्गावर समुद्रसपाटी-पासूनची उंची, कुठे कुठे अति उंचावर जाऊन सटकन् खाली येते, तसेच भूगर्भातील हालचालींमुळे भूकंपाची भीती, अंतर्भागातील जलसाठा, खडक शिवाय पर्माफ्रॉस्ट स्थितीत रूळ टाकण्यात येणारा अडथळा या सर्वाचा सखोल अभ्यास करून चीनने नेहमीप्रमाणे बाकीच्या देशांना मागे सारत यशस्वी झेप घेतली.
आमचा एव्हरेस्ट बेस कॅम्प नॉर्थ फेजचा जिकिरीचा प्रवास संपून एका नव्याच प्रवासाला सुरुवात झाली. हा प्रवास होता जगातील सर्वात उंच अशा रेल्वेमार्गाचा, ट्रान्स हिमालयन ट्रेनचा. मागे कैलाशच्या वाटेवर असताना सागाकडे या रेल्वेची बांधणी सुरू होती ते पाहिले होते. पण दोनेक वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपामुळे काठमांडूमार्गे कोदारी येथून झांग्मु, न्यालम् हा मार्ग पूर्णत: बंद असल्याने ल्हासा येथून रेल्वेने अथवा रस्त्याने शिगात्से येथे येतात व पुढे सागा, दारचेन करून परिक/मेला सुरुवात करतात. शिगात्से ते सागा, दारचेन हा मार्ग अजूनही रेल्वेने चालू केला नाही. दारचेनमार्गे पुढे अली येथून पाकिस्तानात रेल्वे नेण्याचा त्यांचा विचार आहे असे म्हटले जाते.
इतक्या उंचीवरून धावणारी ही आगीनगाडी नक्कीच आगळीवेगळी असणार. ट्रेन सुरू झाल्याचे काही वर्षांपूर्वी कळल्यावर भविष्यात एकदा तरी या मार्गाने जायलाच पाहिजे, असा विचार मनात रेंगाळत होता. पण एकदम उठून असं जाता येत नाही ना.. सर्वच प्रकारे, म्हणजे हवामान, इतक्या उंचीचा परिणाम, जेवण, प्रसंगी लागणारी औषधे वगैरे वगैरे विचार करावा लागतो. तसं बरंच संशोधन करून एकदाचं ठरलं.
सिल्क रूट चीन, तिबेट, नेपाळ, भारत, पाकिस्तान आणि पुढे युरोपमध्ये थेट तुर्कस्तानपर्यंत पोहोचला होता. तिबेटमधील शिगात्से येथून एक फाटा नथुला पासने सिक्कीमपर्यंत येतो. हिवाळ्यात बर्फामुळे हा रस्ता बंद असतो. पण आता वेगवेगळ्या मार्गानी प्रवास होत असल्याने या रस्त्याचा विशेष उपयोग होत नाही. चीन हा सदैव काही तरी अचाट करून दाखवण्यासाठी धडपडत असतोच. त्यामुळे चीनमधून निघणारी गाडी तिबेट, नेपाळमार्गे भारत व पाकिस्तानपर्यंत नेण्याचा विचार त्यांच्या सुपीक डोक्यात आला तर त्यात नवे नाही, असं म्हणायला हरकत नाही. या गाडीमुळे लगतच्या देशांत जमिनीवरून पोहोचणे हे व्यापाराला सोयीस्कर होईल, या विचाराने चीनने १९८२ मध्ये या रेल्वेमार्गाची आखणी केली. सद्य:स्थितीत टप्प्याटप्प्याने गाडी तिबेटमधील ल्हासापर्यंत आली आहे. पुढे ती काठमांडूपर्यंत नेण्याचा त्यांचा विचार आहे.
शांघाय येथून ल्हासापर्यंतच्या चार हजार ३७३ कि.मी. लांबीच्या प्रवासासाठी एकूण तीन दिवस लागतात. आमचा प्रवास ल्हासा येथून शिनीन्पर्यंत एकूण एक हजार ९७२ कि.मी. व २५ तासांचा होता. तिबेटची राजधानी ल्हासा हे तीन हजार ७०० मी. उंचीवरील ठिकाण आहे. येथील रेल्वे स्टेशन अद्ययावत आहे. स्टेशनमध्ये शिरल्यावर तिबेटी भाषा येत नसल्यामुळे अडचण होत होती, पण तिकीट दाखवल्यावर तपासनीसांनी कसे जायचे ते हाताने दाखवले. बरं, लिफ्टची सोय नसल्याने एस्कलेटरने वरच्या मजल्यावरील वेटिंग रूममध्ये सुटकेसेस घेऊन कसे पोहोचायचे, हा प्रश्न होता; पण तपासनीस अगत्यशील वाटला, कारण आमचा गोंधळलेला चेहरा पाहून स्वत: आमच्या बॅग्ज घेऊन वेटिंग रूमपर्यंत आला. वेटिंग रूमही स्वच्छ, भव्य, प्रशस्त होती.
इथपर्यंत तर आलो, पण गाडी आली तर अनाउन्समेंट तर कळली पाहिजे. नाही तर गडबड व्हायची. तिथे आमच्यासारखी काही कोरीअन मंडळी होती. आमचा गोंधळ पाहून त्यातील एक वयस्क गृहस्थ पुढे आले. त्यांना थोडीफार तिबेटी भाषा येत असल्याने, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बरोबर नेऊ, असे आश्वासन दिले व ते पाळले आणि आमचा ट्रान्स हिमालयाचा नावीन्यपूर्ण प्रवास सुरू झाला.
आमच्या गाडीचा नंबर होता झेड् ६८०२ आणि नाव होते ल्हासा किंगहाय एक्स्प्रेस. फलाटावर प्रत्येक डब्याबाहेर तिकीट चेकर सुहास्य वदनाने प्रत्येकाचे स्वागत करून मार्गदर्शन करत होते. आमच्यासारख्या अनोळखी चेहऱ्यांना अगदी सीटपर्यंत आणून पोहोचवत होते. कुठेही घुसाघुसी नाही, धक्काबुक्की नाही, कारभार कसा शांतपणे चालला होता.
गाडीच्या दोन श्रेणी होत्या. तिकिटाचे दर पहिल्या श्रेणीला ८०० आरएमबी व दुसऱ्या श्रेणीसाठी २०० आरएमबी. पहिल्या श्रेणीच्या कुपेमध्ये चार प्रवासी होते. त्यांच्यासाठी स्वच्छ पांढरीशुभ्र चादर, ब्लँकेट, उशी असलेले चार मऊमऊ बर्थ, तर दुसऱ्या श्रेणीला साधेच बर्थ होते. अति उंचीवर सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्यांचा काचा विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या असतात. तशाच या ट्रेनच्या काचा होत्या. पॅसेजमध्ये बसून मस्तपणे बाहेरच्या देखाव्याचा मजा घ्यायचा असेल तर त्यासाठी दुमडणाऱ्या सीट्स होत्या. प्रवाशांनी दरवाजे किंवा खिडक्या उघडल्यावर आतील हवा बाहेर जाऊ नये म्हणून दोनही सीलबंद केलेल्या होत्या.
प्रथम श्रेणीच्या प्रत्येक कुपेत खिडकीच्या जरा वर सतत येणाऱ्या ऑक्सिजनची व्यवस्था केलेली होती. डब्याच्या शेवटी एका बाजूला स्वच्छ प्रसाधनगृह, लागूनच वॉश बेसिन व साबण होता. दुसऱ्या टोकाला चहा, कॉफीसाठी गरम पाण्याचा मोठा थर्मास व पिण्यासाठी थंड पाणी होते. गाडी किती उंचीवरून जात आहे हे दर्शविणारा लहान स्क्रीन होता. पोटापाण्याची व्यवस्था अगदी चोख होती. दर तासाला शीतपेये, बीअर, सँडविचेस, बिस्किटे फिरवली जात होती. शिवाय पॅन्ट्रीमध्ये आशियाई जेवणाची व्यवस्था होती; पण आपलं भारतीय जेवण मात्र मिळालं नाही. इथं फ्राइड राइस, नूडल्स, व्हेजिज्, सूप मिळते, पण शाकाहारी मिळेलच याची खात्री देता येत नाही. ल्हासामधल्या वास्तव्यात आमच्या तिबेटी गाइडकडून चिनी भाषेत साधारणपणे लागणाऱ्या वस्तू, जेवणाचे पदार्थ, यांची इंग्रजीत नावे देऊन त्यांच्या समान अर्थी शब्द चिनी लिपीत व त्या भाषेत काय म्हणतात ते लिहून घेतले होते. ते फारच सोयीचे झाले.
ल्हासा सोडल्यावर काही वेळ सपाट भागावरूनच गाडी चालली होती. तेव्हा देखावा म्हणजे आसपासची शेती, मोनेस्ट्रीज् दिसत होत्या. पुढेपुढे थोडा चढउतार सुरू झाला. थोडय़ा वेळाने गाडी एकदम थांबली. काय झाले ते कळेना. बराच वेळाने शेजारच्या रुळावरून एक गाडी धावत गेली आणि नंतर मग पुन्हा आमची गाडी सुरू झाली. नंतर कळले की पुढे रूळ एकमार्गी असल्याने गाडी जाईपर्यंत थांबावे लागले. या प्रवासात एकूण ४५ स्टेशन्स लागतात; पण सर्वच ठिकाणी गाडी थांबत नाही. ज्या ठिकाणी काही खास पॅनोरमा, पवित्र ठिकाणं वगैरे असतात, तिथे वेग जरा कमी होतो. येथील हवामानामुळे इथे जास्त वस्ती नसते. त्यामुळे सर्वच स्टेशन्सवर सिग्नल यंत्रणा माणसांतर्फे चालवली जात नाही. काही स्टेशन्स शिनींग येथून रिमोट कंट्रोलतर्फे चालवली जाते.
गाडी सुरू झाल्यापासूनचे पहिले यांग्बाजेन् हे स्टेशन आले. जरा बाहेर येऊन पाहावे म्हणून फलाटावर उतरलो. फलाट ५०० मी. लांब होता. हसतमुख तिकीट चेकर्स व स्वच्छ प्रसाधनगृह पाहून बरे वाटले. अर्थात हे एकाच ठिकाणी नाही, तर पुढे प्रत्येक स्टेशन असेच होते. ल्हासा सोडल्यावर लीवू-वू हा बोगदा लागतो. शिनींग-ल्हासा हा टप्पा सध्याच्या किंगहाय रेल्वेचा सर्वात शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे हा बोगदा म्हणजे रेल्वे मार्गावरील तिबेटचे प्रवेशद्वार म्हटले जाते. या मार्गावरील नियमित, त्यामानाने कमी खर्चात होणाऱ्या प्रवासामुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने इथल्या रहिवाशांना उद्योगाला वाव मिळाला आहे. एवढेच नाही तर, या रेल्वेमार्गावर वेगवेगळी स्टेशन्स जंक्शन असल्याने चीनमधील सर्वच ठिकाणं एकमेकांशी जोडली गेली आहेत.
आमचा प्रवास गोलमदच्या दिशेने सुरू झाला होता. ल्हासा ते गोलमद हा टप्पा २००५ मध्ये पूर्ण झाला. ल्हासा सोडल्यानंतर थोडा वेळ म्हणजे यांग-बा-लीनपर्यंत रेल्वेला समांतर रस्ता होता. त्यामुळे मोटरगाडय़ा, लॉरीज्, बैलगाडय़ांची ये-जा दिसत होती. कुठं तरी खुरटी गवतांची कुरणे, त्यावर चरत असलेले याक, शेतात काम करणारी माणसं दिसत होती. हळूहळू गाडी उंचीवर जाऊ लागली. त्याचा परिणाम होऊ नये म्हणून थोडा वेळ ऑक्सिजन नळकांडय़ातून जरा हवा घेतली. ल्हासा, गोलमद या टप्प्यावर मध्ये काही ठिकाणं आहेत, पण तिथे या गाडीला थांबा नाही आणि चालत्या गाडीतून त्यांची नावं कळत नव्हती. त्यामुळे इंटरनेटची नावापुरती मदत घेतली.
वाटेत लागणाऱ्या बऱ्याचशा बोगद्यांपैकी फेंग्वाशन् टनेल हा जगात सर्वोच्च उंचीवर म्हणजे चार हजार ९०५ मीटरवर असलेला बोगदा होय. तिबेटमध्ये पठारी भागात कुनलुन तसंच नान् चेंग तांग्ला डोंगररांगा आहेत. मधूनच फेंग्वाशन् टनेल आहे. तेथून बाहेर आल्यावर तेथील सर्वात उंच शिखर, नान् चेंग तांग्ला दिसते. काही जणांनी नमसो लेक येथून हे शिखर पाहिले असेलच. थोडे पुढे यारलुंग सांगपो, म्हणजेच आपली ब्रह्मपुत्रा ही नदी त्यावर असलेल्या पुलावरून पाहिली. प्रचंड विस्ताराच्या नदीवरील पूल संपता संपेना असा आहे. पुढे काही भागांत हिरवी कुरणे दिसली. चुमा नदीजवळ त्यांचे अँटलोपसाठी अभयारण्य असल्याने रेल्वेमार्गाची बांधणी होताना थोडी अडचण होती, पण चीन थोडाच बसला आहे ऐकायला. त्यामुळे मधेमधे अँटलोपचे दर्शन होते.
समुद्रसपाटीपासून पाच हजार ७२ मी. उंचीवर असलले तेंगुला हे स्टेशन तेंगुला डोंगररांगांत आहे. या प्रवासाचा अध्र्यापेक्षा अधिक मार्ग समुद्रसपाटीपासून चार हजार मी. उंचीपर्यंत जातो. त्यामुळे या ठिकाणी उंचीचा परिणाम झटकन् होऊ शकतो. त्याचे एक उदाहरण आमच्यासमोरच घडले. आमच्याबरोबर असलेल्या कोरियन वयस्क गृहस्थांची पत्नी बोलत असताना एकदम पडली. ते पाहून सर्वाचीच घाबरगुंडी झाली. वैद्यकीय उपचारांची धावपळ सुरू झाली. त्या बाईंच्या तोंडावर लावलेला मास्क ऑक्सिजन सिलिंडरला जोडला होता. आमच्या डब्यात चाललेली मजामस्ती एकदम थंडावली. सर्वच जण आपापल्या परीने प्रार्थना करत होते. त्यांचे यजमान, वयस्क गृहस्थ निराश होऊन बसले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन हजार ७००मी. उंचीवरील गोलमद् स्टेशन आले. लष्कराची रुग्णवाहिका हजर होतीच. त्या बाईंना त्यातून इस्पितळात हलवण्यात आले.
ल्हासा ते गोलमद् या टप्प्यात म्हणजे ५५० किमी. अंतरात जमिनीची जी अवस्था असते तिला पर्माफ्रॉस्ट म्हणतात. म्हणजे अति थंड हवेमुळे जमिनीखाली बर्फ साठून राहते. ते कधीच वितळत नाही. त्यात जो भाग पर्माफ्रॉस्ट नसतो, त्यातला बर्फ तापमानात थोडाही बदल झाला तर वितळतो आणि जमिनीचा पृष्ठभाग वरखाली होतो. अशा परिस्थितीत रेल्वेचे रूळ तुटतात आणि अपघात होऊ शकतो. या सर्वाचा विचार करूनच जमिनीखाली दगड-विटा घालून केलेल्या पायावर रेल्वेचे हे पूल बांधले आहेत. चीनने किंगहाय रेल्वेचा प्रस्ताव मांडल्यावर जगभरातून ही अशक्यप्राय गोष्ट आहे, अशी मते आली. पण एकदा ठरवलेल्या ध्येयापासून मागे हटला तर तो चीन नाहीच. या भागातून गाडी जाताना पुलाचा फोटो घेता आला नाही त्यामुळे इंटरनेटवरील फोटोंवर भूक भागवावी लागली.
गोलमद्नंतर गाडी सपाट भागावरूनच धावते. शिनिंगपर्यंतच्या प्रवासात न्यू ग्वांजीवो हा सर्वात लांब बोगदा लागतो. या मार्गावर युझु हे चीनमधील शिखर दिसते. तसेच शिनिंगअगोदर १५०किमी. अंतरावर चीनमधील सर्वात मोठा किंगहाय लेक आहे. चार हजार ५००चौ. मी.चे क्षेत्रफळ असलेला हा तलाव खारट पाण्याचा आहे. येथे चीनमधील बऱ्याचशा नद्या येऊन मिळतात. त्यांनी बरोबर आणलेला गाळ, खनिजे येथेच पडून राहतात. त्यामुळे या पाण्याची घनता सहा टक्के आहे. हिवाळ्यात इथे बर्फ होतो, तर उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे या लेकचा विस्तार कमी होत आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या तलावात मासेही आहेत. दूरवरून येणारे पक्षीही येथे विसावतात. त्यामुळे येथे मोसमात सायकलस्वार तसेच पर्यटकांची गर्दी असते.
शिनिंग हा चीनमधील लहानसा प्रांत आहे, पण किंगहाय लेकमुळे इथे भरपूर ये-जा आहे. शिनिंगनंतर गाडी वेगवेगळ्या मार्गानी शेंग्डू, शांघाय, बीजिंगपर्यंत जाते. शिनिंग स्टेशन आल्यावर हसतमुख कर्मचारी वर्गाचा निरोप घेऊन आम्ही टॅक्सीत बसलो. ड्रायव्हर पोरगेलासाच होता. त्याला इंग्रजी येत नव्हते आणि आमची चिनी भाषेची मारामारी होती. पण त्याच्याकडे वेगळीच व्यवस्था होती. आम्ही भारतीय म्हटल्यावर तो हिंदी हिंदी विचारायला लागला. त्याने मोबाइलवरून कुणाला तरी फोन केला. आम्हाला काही सांगायचे असेल तर तो मोठय़ाने बोलायला सांगायचा. मग पलीकडून आम्हाला हिंदीत उत्तर मिळत असे. अशा आमच्या मस्त गप्पा झाल्या.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com