-सुनिता कुलकर्णी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे काही बोलतात, त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं. आता ट्रम्प तात्यांनी करोनासंदर्भात इतक्या मोलाचा सल्ला दिला की तो आपल्याला कसा सुचला नाही, या द्वेषमूलक हेतूने आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सगळ्या जगाला ट्रम्प तात्यांच्या सल्ल्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला सांगितलं आहे, ही गोष्ट वेगळी.
खरं तर काय चुकीचं सांगितलं ट्रम्प तात्यांनी? करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यांना सतत जंतुनाशकांनी किमान ३० सेकंद हात धुवायला सांगितलं जातं. त्यामुळे करोनाचा विषाणू नष्ट होतो असंही सांगितलं जातं. असं असेल, तर एखाद्याच्या शरीरात गेलेला करोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी तेच जंतुनाशक संबंधित करोना रुग्णाच्या शरीरात टोचल्यावर कदाचित त्यामुळे त्याच्या शरीरात घुसलेला करोनाचा विषाणू नष्ट होईल, असं ट्रम्प तात्यांना वाटलं तर त्यांचं काय चुकलं? आणि इतका सोपा उपाय आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सुचू नये?
ट्रम्प तात्यांसारखेच आणखीही काही बुद्धिमान उपाय सुचवता येतील. करोना विषाणूचं चित्र पाहिलंत तर त्याच्यावर काही काटेरी उंचवटे दिसतात. तर या विषाणूवर जेवढे काटेरी उंचवटे आहेत, तेवढ्या फेऱ्या रोज पिंपळाला किंवा उंबराला मारल्या तर? किंवा तेवढे मिरची लिंबू करोना रुग्णाच्या बेडला लटकवले तर?
प्रत्येक गावाबाहेर करोनादेवीची मंदिरं उभारून तिची सकाळ संध्याकाळ आरती केली तर? करोनावर जेवढे काटेरी उंचवटे आहेत तेवढ्या उलट्या प्रदक्षिणा या करोना देवीला घातल्या तर? या करोनादेवीला रोज सकाळ संध्याकाळ सॅनिटायझरचा नेवैद्य दाखवला तर? दर वर्षी तिच्या नावाने एखाद्या डोंगरात जत्रा भरवण्याचा नवस बोललं तर? बाया बापड्यांनी करोना देवीच्या नावाने एखादं व्रत केलं, तिच्यावरच्या काटेरी उंचवट्यांइतके बुधवार किंवा रविवारचे उपवास धरले तर ? करोना महात्म्य रचून बरं होईपर्यंत त्याचं पारायण केलं तर ?