अवखळ ती आणि शांत तो.. स्वभाव, वागण्याबिगण्याच्या बाबतीत दोन टोकांवर असलेले ते दोघं. त्यांचं प्रेम, त्यांचं लग्न, त्यांचं नातं हे सगळंच मराठी सिने, नाटय़, टीव्ही प्रेक्षकांचं कुतुहल वाढवणारं. म्हणूनच पडद्यावरच्या आणि वास्तवातल्या उमेश कामत आणि प्रिया बापट या ‘क्युट’ जोडीशी त्यांच्या नात्याविषयी दिलखुलास गप्पा..
तुमच्या नात्याची सुरुवात कशी झाली? पहिली भेट, प्रपोजल, होकार, लग्न या आठवणींविषयी सांगा…
उमेश : आमची पहिली भेट झाली ती ‘भेट’ या सिनेमाच्या माध्यमातून. आम्ही दोघांनी त्यात काम केलं असलं तरी एकमेकांसमोर आलो नव्हतो. या सिनेमाच्या प्रिव्ह्य़ूच्यावेळी भेटलो. तेव्हा प्रिया बापट म्हणजे ‘दे धमाल’मधली बालकलाकार एवढाच माझा परिचय होता. ‘आभाळमाया’च्या दुसऱ्या पर्वामध्ये पुन्हा भेटलो. तिथे ओळख वाढली. त्यानंतर फारशा भेटीगाठी झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर ‘वादळवाट’ मालिका सुरू झाली. मेसेजेस व्हायला लागले. पण, तेव्हा ही ओळख अशाप्रकारे पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. कॉलेजच्या एका प्रकल्पासाठी एका कलाकाराची मुलाखत घ्यायची आहे; असं सांगून प्रियाने मला वरळी सी फेसला भेटायला बोलवलं होतं. मुलाखत घ्यायला आलेल्या तिच्याकडे नीट प्रश्नही तयार नव्हते. तेव्हा तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, असं वाटलं. त्यानंतर मी तिला भेटायचं टाळायचो. एकदा तिने भेटूया म्हणून दादरला बोलावलं. मी तिला काहीतरी कारण सांगून भेटायला नकार दिला. पण माझे बरेच मित्र दादर परिसरात राहतात. त्यामुळे त्याचवेळी मी नेमका तिला पार्कात दिसलो. ती प्रचंड चिडली. तेव्हाही तिच्या मनात काहीतरी वेगळं असल्याचा मला अंदाज आला होता. तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची मला अजिबात घाई नव्हती. स्लो अँड स्टेडी हा माझा फंडा आहे. काही दिवसांनी मात्र आम्ही दोघेही एकमेकांना आवडतो हे कळून चुकलं. २००३ मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. साधारण २००५ पर्यंत आम्ही मेसेज, फोन, भेटणं असं करत होतो. २००५ मध्ये दोघांनाही एकमेकांबद्दल मैत्रीपलीकडच्या भावना वाटू लागल्या. आम्ही यावर चर्चा केली. एकमेकांबद्दल वाटतंय, पण इतक्यात घाई करायला नको असं आम्ही ठरवलं. आपण एकत्र राहू शकतोय का हे बघूया, या मतावर येऊन पोहोचलो. मग रात्रीचे फोन वाढायला लागले. या ‘एकत्र राहू शकतोय का, हे बघूया’च्या फेजमध्ये एक दिवस प्रियाने मला प्रपोज केलं. साधारण २००६ मध्ये. तेव्हाही मी तिला लगेच उत्तर दिलं नाही. खरंतर माझं उत्तर तयार होतं. पण, माझं उत्तर एका महिन्याने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी दिलं. त्यानंतर खरी लढाई सुरू झाली. सुरुवातीला मुलीच्या घरी थोडय़ाफार अडचणी येतात. तसं आमच्याबाबतीतही झालं. माझं अभिनय क्षेत्रातलं काम हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. आम्हाला आई-बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नव्हतं. आम्ही एकमेकांना होकार कळवल्यावर घरी लगेच सांगितलं नव्हतं. माझ्या घरी काही अडचण नव्हती. तिच्या घरी मात्र लग्नाच्या आदल्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारण चार-पाच र्वष लढाई सुरूच राहिली. पण, आम्ही प्रयत्न करत राहिलो. इंडस्ट्रीतही हळूहळू चर्चा होऊ लागली होती. पण, आम्हाला घाई नव्हती. सगळ्यांच्या परवानगीने, आनंदाने आम्हाला लग्न करायचं होतं. शेवटी तसंच झालं. आम्ही ठरवल्याप्रमाणे झाल्याचा आम्हाला आनंद आहे.
प्रिया : मला उमेश ‘आभाळमाया’च्या पहिल्या पर्वापासूनच खूप आवडायचा. माझ्या एका मैत्रिणीशी चर्चा करताना एकदा त्याचा विषय आला. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की आम्ही एकत्र काम केलंय. ही चर्चा अगदी सहज झाली होती. मी आणि उमेश फार बोललो नव्हतो आधी. पण, जेव्हा मी बोलायला सुरुवात केली होती ती त्याची एक चाहती म्हणूनच केली होती. मी त्याच्या खूप मागे लागले होते. वरळी सी फेस, मेसेिजग, फोन असं सगळं केलं. शेवटी त्याने मला होकार दिला. माझ्या घरी आमच्याबद्दल सांगितल्यावर उमेश अभिनय इंडस्ट्रीत काम करतो हे समजल्यावर लगेच परवानगी मिळाली नव्हती. आईबाबांनी विचार करायला थोडा वेळ घेतला. पण, उमेशच्या बाबतीत कधीच काहीच वावगं पसरलं नव्हतं आणि ऐकायलाही आलं नव्हतं. माझ्या सगळ्या नातेवाईकांचा मुद्दा काही वेगळाच होता. ते माझ्या आईबाबांना येऊन सांगायचे, ‘किती चांगला मुलगा आहे. तुम्ही का थांबला आहात’. हे चित्र फार मजेशीर होतं. आम्हाला दोघांनाही इंडस्ट्रीतला जोडीदार नको होता. पण आम्ही आमची मतं नंतर बदलली.
सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तुम्ही लग्न केलंत. या सहा वर्षांत उमेशचं करिअर, प्रियाचं शिक्षण आणि घरच्यांना पटवण्याची दोघांची एकत्र लढाई असं सगळंच होतं. या संघर्षांच्या काळात तुमचं नातं कसं टिकवून ठेवलं, कसं जपलं?
प्रिया : हा सहा वर्षांचा काळ आमच्यासाठी खरंच कठीण होता. जोपर्यंत तुम्ही कमिटेड नसता तोपर्यंत कमिटेड असण्याची तुमची धडपड सुरू असते. एकदा का तुम्ही कमिटेड झालात की तुम्ही एकमेकांना गृहीत धरायला लागता. त्या गृहीत धरण्यामधून जास्त कम्फर्टेबल होता, एकमेकांवर जास्त हक्क सांगायला लागता. आमचंही काहीसं तसं झालं होतं. आमचीही खूप भांडणं व्हायची. आमच्या वयातलं अंतर हे आमच्यासाठी चांगलं आणि वाईटही होतं. चांगला यासाठी की उमेशच्या अनुभवाचा मला फायदा व्हायचा आणि वाईट यासाठी की एकाच घटनेवर आम्ही दोघेही आमच्या वयानुसार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त व्हायचो. मी वयाने त्याच्यापेक्षा लहान असल्याने माझी व्यक्त होण्याची पद्धत थोडी वेगळी असायची. त्यावेळी मी मोठय़ा माणसासारखं व्यक्त व्हावं या म्हणण्याला विरोध असायचा. या एका गोष्टीमुळे आमच्यात अनेकदा भांडणं झाली आहेत. आता मात्र ही भांडणं होत नाहीत. जसजसा काळ पुढे सरकला आमच्या विचारांमध्येही प्रगल्भता आली. नातं आणखी घट्ट होत गेलं. ही सहा र्वष आम्हाला बरंच काही शिकवून गेली. अशा कठीण काळातून तुम्ही जर तावून सुलाखून बाहेर निघालात तर तुमची पुढची र्वष सुखाची जातात. याचा अनुभव आता आम्ही दोघंही घेतोय. आम्ही ज्या काळात रिलेशनशिपमध्ये होतो त्याच दरम्यान उमेशच्या ‘वादळवाट’ आणि ‘असंभव’ या दोन महत्त्वाच्या मालिका झाल्या. त्यामुळे त्यावेळी एकमेकांना पुरेसा वेळ न देता नातं टिकवणं, जपणं हे आव्हान असतं. आमची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. पण, आमची तत्त्वं सारखी आहेत. त्यामुळे आम्हाला तत्त्वत: फारशा अडचणी आल्या नाहीत. आमचा एकमेकांना समजून घेण्याचा स्वभाव असल्यामुळे आम्हाला ते जमू शकलं.
उमेश :आमचे स्वभाव वेगवेगळे असले तरी मतं बऱ्यापैकी सारखी असतात. याचा आम्हाला नातं जपण्यासाठी उपयोग होतो. इंडस्ट्रीत एखाद्या कलाकृतीत काम करण्याचा निर्णय आमचा वैयक्तिक असला तरी कधी काही अडलं तर एकमेकांना विचारतो. एकमेकांची मतं विचारात घेतो. त्या सहा वर्षांतही अनेक टप्प्यांवर आम्हाला एकमेकांची साथ लाभली आहे. आम्ही एकत्र असल्यामुळेच अनेक गोष्टी सोप्या झाल्या. अडचणींतून मार्ग काढला.
कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलेलं मला आवडत नाही. गॉसिपिंग होणं हा माझ्या करिअरचा एक भाग आहे हे स्वीकारणं मला थोडं जड जातं. माझ्याबद्दलच्या गॉसिप्सचा मला नक्कीच त्रास होतो.
एखादी मालिका, सिनेमा किंवा नाटक अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलं नाही, तर परिणाम नात्यावर होतो का?
प्रिया : आमचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी होईल किंवा व्हायला हवा याचा विचार आम्ही करत नाही. आपण उत्तम काम केलं पाहिजे, करता आलं पाहिजे आणि आपण केलेलं काम प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं पाहिजे, हे एवढंच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. यात ‘आपलं’, ‘आपण’ म्हणजे सिनेमाची संपूर्ण टीम. बॉक्स ऑफिसवर हिट किंवा फ्लॉप हा मुद्दा मार्केटिंगकडे झुकणारा आहे. सिनेमा कोणत्या तारखेला येतोय, आजूबाजूला कोणते सिनेमे रीलिज होताहेत, अशा विविध घटकांशी संबंधित हिट आणि फ्लॉप हा मुद्दा येतो. तुमच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या कामात सुधारणा होण्यासाठी स्पेस देणारा जोडीदार असणं आवश्यक असतं. ही स्पेस आम्ही एकमेकांना देतो. त्यामुळे आमच्या कामाचा परिणाम आमच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीच होत नाही. आम्हा दोघांसाठीही आमचं काम एकमेकांना आवडणं हे महत्त्वाचं आहे. मला आठवतंय; ‘काकस्पर्श’ हा सिनेमा बघून झाल्यानंतर उमेशला सिनेमा खूप आवडला. पण, ‘तू अजून छान करू शकली असतीस’ असं तो नंतर म्हणाला. ‘हॅपी जर्नी’ बघून मात्र तो नि:शब्द झाला होता. त्याने माझं भरभरून कौतुक केलं. तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा होता. माझ्यासाठी संघर्ष हा बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट होण्याचा नाही तर उमेशला माझा सिनेमा आवडण्याचा असतो.
उमेश : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात. त्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती आणि कशी साथ देता हे महत्त्वाचं आहे. प्रिया आणि मी याबाबतीत नशिबवान ठरलोय. आम्हाला आमच्या कठीण काळात एकमेकांची उत्तम साथ मिळाली. एखाद्या कलाकृतीचं यश-अपयश ही तर पुढची गोष्ट आहे. मनासारखं काम झालं नाही तर आमची चिडचिड होते. विशेषत: माझं असं अनेकदा होतं. अशावेळी प्रिया मला आधार, प्रोत्साहन देते. याचा पुढच्या कामांमध्ये फायदा होतो. आमच्या दोघांचीही यशाची व्याख्या वेगळी आहे. खूप पैसे कमवणं, शोबाजी करणं, गाडय़ा-मोबाईल घेणं या कशाचीही आम्हाला आवड नाही. जिथे जेवढं हवं तेवढंच करावं आणि आयुष्याचा आनंद घ्यावा, हे आमचं तत्त्व आहे. आम्ही एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सगळ्याचा सारासार विचार करून आम्ही पैशांची बचत करतो. प्रियाला निवडक कामं करायची असतील तर मी काम करत राहणं आणि मला निवडक काम करायचं असेल तर तिने काम करत राहणं गरजेचं असतं. असं एकमेकांना सांभाळून घेणं, आर्थिकदृष्टय़ा अशाप्रकारे विचार करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे नात्यावर एखाद्या कलाकृतीच्या यशापयशाचा अजिबात परिणाम होत नाही.
तुम्ही एकत्र जोडी म्हणून एकच मालिका, सिनेमा, नाटक आलंय. त्याशिवाय काहीच नाही. असं का?
उमेश : आम्ही ‘शुंभ करोति’ या मालिकेत, ‘टाइमप्लीज’ या सिनेमात आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकात एकत्र काम केलं आहे. त्यानंतर एकत्र काम करायचं बंद केलं. हे दोघं एकत्रच काम करतात असा इतरांचा समज होता कामा नये म्हणून ठरवून एकत्र काम करणं थांबवलं. तसेही त्यानंतर आलेल्या स्क्रिप्ट्स आम्हाला दोघांनाही आवडल्या नाहीत. त्यामुळे एकत्र काम करण्याचा प्रश्नच नव्हता. आता मात्र एकत्र काम करण्याची संधी शोधतोय. कदाचित लवकरच एकत्र काम करू.
एकाच करिअरमध्ये काम करताना सकारात्मक आणि नकारात्मक बाजू कोणती?
प्रिया : दोन भिन्न क्षेत्रांतल्या माणसाच्या कामाचं स्वरूप एकमेकांना लक्षात घेणं खूप कठीण असतं. यात त्या व्यक्तींचा दोष नाही. असुरक्षितता, द्वेष, पझेसिव्हनेस, यश, ग्लॅमर या सगळ्याच गोष्टी आमच्या क्षेत्रात आहेत. समजा, एखादीचा नवरा बिझिनेसमन आहे. पण, ती त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. इतर लोकांसाठी मात्र वेळ देऊ शकते. ही त्या नवऱ्यामधली असुरक्षितता कशाप्रकारे हाताळली जाईल याची खात्री नसते. त्या व्यक्तीच्या असुरक्षित वाटण्याबद्दल काहीच चुकीचं नाही. आम्हाला दोघांनाही मनोरंजन क्षेत्रातला जोडीदार नको होता. पण, आता तुमचा जोडीदार तुमच्या क्षेत्राशी निगडित असणं महत्त्वाचं असतं हे पटतंय. जोडीदाराला चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी माहीत असतात. मराठी सिनेमा वेगाने बदलतोय. त्याचे विषय, स्वरूप, आशय, सादरीकरण असं सगळंच बदलतंय. या सगळ्यात कलाकार म्हणून आमच्यातही बदल होत असतात. हे बदल स्वीकारणारा किंबहुना ते समजून घेणारा जोडीदार दोघांसाठीही हवा असतो. हे विचार विशिष्ट व्यक्तीत त्याचा अनुभव आणि काळ या दोनच गोष्टींमुळे निर्माण होतात. एकाच क्षेत्रात असल्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची क्षमता जास्त असते, हा सकारात्मक मुद्दा वाटतो.
उमेश : नकारात्मक एकच आहे, ते म्हणजे वेळ न मिळणं. कामाची वेळ विचित्र असते. मुंबईबाहेरचं शूटिंग महिनाभर असतं. शूटिंगहून आल्यावर पुन्हा एकमेकांच्या वेळा जुळतीलच असंही नाही. त्यामुळे वेळ न मिळणं हे खटकतं. पण, त्याचवेळी असंही सांगेन की, एकाच क्षेत्रातले असल्यामुळे वेळापत्रकाचं गणित नीट समजून घेता येतं. प्रिया महिनाभर शूटिंगसाठी बाहेर आहे हे मी समजून घेतो. कारण मी त्याच क्षेत्रात काम करतोय. पण, मी जर वेगळ्या क्षेत्रात काम करत असतो तर कदाचित माझी चिडचिड झाली असती. ही महिना-महिना काय बाहेर असते, अशा वेगळ्या पद्धतीने मी व्यक्त झालो असतो. आमच्या क्षेत्रात काम न करणारे काही जण आमच्या कामाच्या स्वरूपाला समजून घेतात. ही चांगलीच गोष्ट आहे. पण, समजून घेणं आणि त्याचा अनुभव घेऊन समजून घेणं यात थोडा फरक आहे.
या क्षेत्रात कलाकारांबद्दल किंवा कलाकार जोडीबद्दलचे गॉसिप्स वाऱ्यासारखे पसरतात. इतरांबद्दलचे किंवा तुमच्या जोडीबद्दलचे काही गॉसिप तुमच्यापर्यंत आले तर तुम्ही ते कसे हाताळता. गॉसिपिंग करणं, होणं याबाबत तुमचं मत काय?
प्रिया : आम्हा दोघांबद्दल, जोडीबद्दल आम्ही कधीच काही वावगं ऐकलं नाही. निदान आमच्यापर्यंत तरी कधी असं काहीही आलं नाही. तुम्ही समाजात कसे वागता हे महत्त्वाचं असतं. लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचं मत तयार करण्यासाठी तुमची स्क्रीन इमेज, पब्लिक इमेज खूप महत्त्वाची ठरते. गॉसिपिंगबाबत मला थोडं वाईट वाटतं. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर लोकांनी बोललेलं मला आवडत नाही. गॉसिपिंग होणं हा माझ्या करिअरचा एक भाग आहे हे स्वीकारणं मला थोडं जड जातं. माझ्याबद्दल असं कोणी काही बोललं आणि माझ्यापर्यंत पोहोचलं तर मला नक्कीच त्रास होतो. कारण मी फार भावनिक, पारदर्शी, प्रामाणिक आहे. एका गोष्टीचा अर्थाचा अनर्थ काढून स्वत:च्या मतांनी एखाद्याविषयी मत बनवलं की मला त्रास होतो. माणूस म्हणून मला ते पटत नाही. इतरांच्या बाबतीततही माझ्यापर्यंत अशा गोष्टींबद्दलही मला वाईट वाटतं. ग्लॅमर इंडस्ट्रीत असल्यामुळे कलाकारांविषयी गप्पा ऐकायच्यात म्हणून अशा गोष्टी पसरवणं हे मला पटत नाही. एकाच तराजूत सगळ्यांना तोलू नये. आपल्याकडे एक परिमाण सगळ्यांना लावलं जातं, सारासार विचार होत नाही. या गोष्टींचा मनावर परिणाम होतोच. अशा वेळी तुम्हाला आधार देणारी योग्य व्यक्ती तुमच्यासोबत असावी लागते किंवा तुम्ही स्वत: तेवढं खंबीर असावं लागतं. गॉसिपिंग सगळ्या क्षेत्रात होत असतं, पण दिसतं फक्त आमच्या क्षेत्रात.
उमेश : आम्ही ग्लॅमर इंडस्ट्रीत आहोत. लोक आमच्यावर प्रेम करतात. डोक्यावर घेतात. मग उद्या जर त्यांना कमेंट करावीशी वाटली तर ते करणार. ते रागाने करतील, प्रेमाने करतील किंवा हक्काने करतील. जे प्रेम करतात ते चिडूही शकतात. प्रत्येकाने आपापलं काम चोख करणं महत्त्वाचं असतं. सामाजिक प्रतिमा असलेल्या व्यक्तीला समाजात वावरताना ला भान ठेवावंच लागतं. कदाचित वैयक्तिक आयुष्यात ती व्यक्ती तशी नसेलही. पण, भान ठेवावंच लागतं. पब्लिक इमेज (सामाजिक प्रतिमा) असल्याचे फायदे असतात ना; मग ज्या गोष्टी फायद्याच्या नाहीत त्याचाही आदर करायला हवा. कामाच्या बाबतीत, कमिटमेंटच्या बाबतीत चुकीच्या बातम्या जेव्हा छापल्या जातात किंवा त्याबाबत बोललं जातं त्या वेळी मला त्याचा त्रास होतो. या गोष्टी घडत राहणार आहेत. लोक बोलत राहणारच. आपणच आपलं स्थान असं निर्माण करायला हवं की लोकच त्यावर बोलताना दहा वेळा विचार करतील.
आम्ही ग्लॅमर इंडस्ट्रीत असल्यामुळे प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात. उद्या जर त्यांना कलाकारांबद्दल एखादी कमेंट करावीशी वाटली तर ते करणार. रागाने, प्रेमाने किंवा हक्काने करतील. जे प्रेम करतात ते चिडूही शकतात. पब्लिक इमेज असल्याचे फायदे असतात ना; मग ज्या गोष्टी फायद्याच्या नाहीत त्याचाही आदर करायला हवा.
एखाद्या कलाकृतीची गरज म्हणून काही वेळा रोमँटिक किंवा इंटिमेट सीन्स करावे लागतात. अशा सीन्समुळे तुमच्या नात्यावर परिणाम होतो का? तुम्ही हे सगळं कसं हाताळता?
उमेश : केवळ इंटिमेट किंवा रोमँटिक सीन्सच नाही तर आम्ही प्रत्येक स्क्रिप्टची एकमेकांशी चर्चा करतो. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक स्क्रिप्ट्स एकमेकांना ऐकवण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. कधी कधी वेळेअभावी पूर्ण स्क्रिप्ट वाचून दाखवता येत नाही. मग अशा वेळी आम्ही सिनेमाची गोष्ट सांगतो. त्यात असलेल्या रंजक गोष्टी शेअर करतो. काही आवडणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो. इंटिमेट सीन्सबद्दलही चर्चा करतो. यात एक फायदा असा आहे की, आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे ते किती तांत्रिक, कृत्रिम असतं हे दोघांनाही माहितीये. तो प्रसंग शूट करताना आमच्या आजूबाजूला पन्नास लोक उभे असतात. कोणी थर्माकॉल धरून उभा असतो, कोणी लाइट्सकडे लक्ष ठेवून असतो, कोणी कॅमेराला असिस्ट करत असतं. हे सगळं पडद्यावर मात्र दिसत नाही. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला अजिबात अप्रूप वाटत नाही. त्यामागच्या भावना काय असतात याबाबत माहीत असल्यामुळे आम्ही दोघेही ते समजू शकतो. एकमेकांना त्याबाबत स्पष्टीकरण देण्याची कधीच वेळ येत नाही.
प्रिया : इंटिमेट आणि रोमँटिक सीन्स ज्या पद्धतीने शूट होतात ते प्रेक्षकांनी बघावं, अनुभवावं. एखादं रोमँटिक गाणं शूट करताना थोडं हस, वर बघ, उजवीकडे वळ असं सांगितलं जात असतं. पण, या सगळ्यात तुम्ही खरंच त्या व्यक्तीच्या किती प्रेमात आहात याचा अभिनय करायचा असतो. त्यात प्रचंड कृत्रिमता असते हे आम्ही जाणत असल्यामुळे याचा त्रास होत नाही.
अहंकाराचा मुद्दाही या क्षेत्रात महत्त्वाचा ठरतो. अहंकार बहुतेकदा मानधनाशी संबंधित असतो. त्याला जास्त मिळतात, तिला कमी किंवा तिला सिनेमांची ऑफर जास्त येते; तो फारसं काम करताना दिसत नाही; असं बोललं जातं.
प्रिया : आमच्यात अहंकाराला अजिबात जागा नाही. आमचं नातं अतिशय पारदर्शी आहे. आमच्या कामाविषयी आमच्यामध्ये स्पष्टता आहे. आम्ही ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक किंवा ‘शुभं करोति’ ही मालिका करत होतो त्या वेळी मला माहिती होतं किंबहुना मला आजही माहिती आहे की, उमेशचा कामाचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला पैसे जास्त मिळाले तर मला काही वाटत नाही. खरं सांगू का, तर मानधन कोणाचंही जास्त असू दे. शेवटी काय, पैसे एकाच घरात येणारेत ना. पण, मी कबूल करते की, आमच्या रिलेशनशिपच्या सुरुवातीला मला हा प्रश्न पडायचा. आता मात्र कधीच पडत नाही. यावर आम्ही बोललोही होतो. मी गंमतीत त्याला म्हणायचे, ‘आपलं ‘अभिमान’ सिनेमासारखं नाही ना रे होणार?’ अशा विचारांना कारणीभूत आपली सामाजिक जडणघडण आणि समाज आहेत. खरंतर दोन वेगवेगळ्या व्यक्ती असं नवरा-बायको या जोडप्याला वागवलं जात नाही. तर नवरा आहे, बायको आहे असंच बघितलं जातं. बायको नवऱ्यापेक्षा यशस्वी कशी होते, हे पचत नाही. कोणी जास्त यशस्वी व्हायचं आणि कोणी नाही ते लोकांनी का ठरवावं? हे दडपण, हा अहंकार आपल्या जडणघडणीत पेरला जातो. मुलाला स्वयंपाक येण्याची काय गरज?, मुलगी मुलापेक्षा बुटकीच बघितली पाहिजे, मुलापेक्षा मुलगी वयाने लहानच असायला हवी हे सगळे मुद्दे प्रत्येकाच्या जडणघडणीत इतके खोलवर रुजले आहेत की त्या गोष्टींचा पगडा लोकांच्या मनावर खूप आहे. मी मुळातच सेल्फ मेड मुलगी आहे. खूप लवकर स्वावलंबी झाले. असं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यावर फारसा परिणाम करत नाहीत. या गोष्टीवरून आम्ही एकमेकांवर हक्क गाजवत नाही. माझ्या यशस्वी करिअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा उमेशचाच आहे. पैसे कमवायचे म्हणून मी नको ते सिनेमे करत बसले असते तर मी आज इतकी यशस्वी झालेही नसते. ही स्पेस त्याने मला दिली. मला निवडक काम करता यावं म्हणून तो सतत काम करत राहिला. त्याने माझ्यासाठी खूप त्याग केलाय. आता माझी वेळ आहे. आता त्याने चूझी राहणं गरजेचं आहे. एकमेकांना अशा प्रकारे समजून घेणं माझ्यालेखी खूप महत्त्वाचं आहे.
उमेश : माझा अनुभव कितीही वर्षांचा असला, मी प्रियाला सीनिअर असलो तरी बॉक्स ऑफिसवर हिट सिनेमे प्रियाचेच आहेत. पण, समजा उद्या आम्हाला एकाच सिनेमाची ऑफर आली आणि त्यात तिला माझ्यापेक्षा दुप्पट पैसे मिळाले तरी माझी हरकत अजिबात नसेल. उलट या गोष्टीचा मला आनंदच आहे. प्रिया म्हणाली तसं की, शेवटी पैसे एकाच घरात येणार आहेत. मी त्यासाठी मानसिकदृष्टय़ा आधीच तयार असल्यामुळे पुरुषी अहंकार त्या वेळी आड येणार नाही. सुदैवाने आमच्यात असं झालंय की, सिनेमांमध्ये तिचं उत्तम चालू आहे आणि माझं नाटक, मालिकांमध्ये.
एकाच क्षेत्रात काम करताना पुढे जाण्याची चढाओढ असते. अशा महत्त्वाकांक्षेला तुमच्या नात्यात कितपत स्थान आहे?
प्रिया : आमच्यामध्ये कोण पुढे, कोण मागे अशी कधीच स्पर्धा नसते. आपल्यापेक्षा दुसऱ्याने अधिक उत्तम काम करावं, त्याला भरभरून यश मिळावं असंच आम्हाला सतत वाटत असतं. असं एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी असल्यामुळेच आमच्या कामाचा आमच्या नात्यावर कधीही परिणाम होत नाही.
घर घेतानाचाही तुमचा अनुभव फार वेगळा आहे.
उमेश : हो, खरंच वेगळा आणि खास आहे आमच्यासाठी! जवळपास दहा र्वष मी घर शोधत होतो. त्यासाठी पैसे जमा करत होतो. २००३ पासून घर शोधायला सुरुवात केली होती. माझं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं ते २०१२ साली. मुंबईत घर घ्यायचं असं ठरवलंच होतं. पैसे जमताहेत असं वाटायचं तोच घरांचे दर आणखी वाढायचे. असं सतत होत राहिलं. प्रत्येक गोष्टीत पैसे जमवत होतो. बचत करत होतो. घर शोधण्यासाठी अक्षरश: मुंबई पालथी घातली. मनासारखं, बजेटमध्ये बसणारं घर काही सापडेना म्हणून मधल्या काही काळात तर मी आशाच सोडली होती. मुंबईत घर घ्यायचं स्वप्न तर होतंच शिवाय ते लग्नाआधी घ्यायचं अशीही इच्छा होती. पण, ते शक्य झालं नाही. लग्नानंतर एका वर्षांच्या आत घर घेण्याचं ध्येय मात्र मी आणि प्रिया असं दोघांनी गाठलं. लग्न झाल्यानंतर प्रियाने मला खूप साथ दिली आहे. घर घेताना तिचा आधार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. घर घेताना आमच्याकडे होतं-नव्हतं ते सगळं आम्ही दिलं. पण जिद्द सोडली नाही. घर घेतल्यानंतर हातात पैसे उरले नव्हते म्हणून वर्षभर घरात आम्ही काहीही काम करू शकलो नाही. पण, याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्या वेळी स्वत:चं घर झाल्याचा आनंद जास्त होता.
प्रिया : आमचं लग्न झाल्यानंतर उमेशच्या भावाचंही लग्न होणार होतं. त्यामुळे आता मोठं घर बघूया असं आम्ही ठरवलं. तूर्तास भाडय़ाचं घर बघूया, पण दुसरीकडे शिफ्ट होऊया असा तेव्हा विचार केला होता. तसे आम्ही चेंबूरमध्ये राहायला आलो. स्वत:चं घर घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. खरंतर आम्ही राहात असलेलं भाडय़ाचं घर विकत घेण्याची आमची इच्छा होती. पण, ते शक्य झालं नाही. पण, चेंबूरमध्ये आम्ही राहत असलेल्या परिसराची आम्हाला खूप सवय झाली होती. त्यामुळे त्याच भागात घर घ्यायचं असं ठरवलं होतं. एकदा एक घर मी बघितलं. का कोणास ठाऊक, पण त्या घरात पाऊल टाकताच हे घर घ्यायचंच असं मी ठरवून टाकलं. उमेशलाही माझी इच्छा सांगितली. घरातले पॉझिटिव्ह वाइब्स, उजेड, वारा या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तेच त्या घरात मला पहिल्या क्षणात जाणवलं. शेवटी आमचं स्वत:चं घर झालं. तुमचं तुमच्या कष्टाचं मेहनतीच्या पैशांचं घर असण्याचं फीलिंग खूप वेगळं आणि खास असतं.
तो नसताना मी एकटीच असते. तो घरी आल्यानंतर त्याला त्याची स्पेस हवी असेल तर त्या वेळेतही मी एकटीच असणार ना. याचा कुठेतरी त्रास होतो. पण, आता हळूहळू आम्हा दोघांमध्येही बदल होताहेत.
शूटिंगमुळे महिना-महिना तुमची भेट होत नसेल. अशावेळी एकमेकांपासून लांब राहून तुमचं नातं कसं जपता?
प्रिया : होय, हे अगदी खरंय. लग्नानंतर सलग तीन र्वष असं बरेचदा व्हायचं. खूप काम केलंय त्या दरम्यान. मी तर लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत शूटिंग करत होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही शूट केलं. त्यानंतर फक्त पाच दिवसांसाठी आम्ही हनिमूनला गेलो होतो. तिथून आल्यानंतर पुन्हा शूटिंग सुरू. असं अखंड तीन र्वष सुरू होतं. फक्त माझंच नाही तर उमेशचंही. पण, यात एक समाधान असायचं की आम्ही एकत्र आहोत. आम्हाला एकमेकांची साथ होती म्हणून आम्ही काम करू शकायचो. एकमेकांच्या पाठिंब्याशिवाय, आधाराशिवाय ते शक्य झालं नसतं. लग्नानंतर आमची कामं वाढली आहेत. पण, गेल्या वर्षी ठरवून आम्ही ब्रेक घेऊन फिरायला गेलो होतो. आता कामाचा ताण जरा कमी झालाय.
उमेश : लग्नानंतर सातत्याने कामं सुरू होती. पण ती कामं करणं आमच्यासाठी तितकंच आवश्यकही होतं. लग्नानंतर घर घेतल्यानंतर आर्थिक बाबींची घडी पुन्हा बसवण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. सुदैवाने आम्हाला तशी चांगली कामं मिळतही होती. आता आर्थिक घडी हळूहळू बसतेय.
मग, जेव्हा एकत्र मोकळा वेळ मिळतो. तुमच्यासाठी तो दिवस कसा असतो?
उमेश : खरं सांगू का, तर कलाकाराचं रुटीन असं वेगळं काही नसतं. प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठी वेगळाच असतो. त्याच्या वाटय़ाला कधीतरी सात रविवार येतात. तर कधी कधी दोन-दोन महिने रविवार येतही नाही. कामाचं स्वरूप, वेळ, ठिकाण यावर आम्हाला मिळणारा मोकळा दिवस अवलंबून असतो. त्यामुळे आमच्या सुट्टीच्या दिवसाचंही आम्ही असं रीतसर प्लॅनिंग करत नाही. तो दिवस जसा, जिथे साजरा करावासा वाटेल तसं करतो.
प्रिया : उमेशमुळे मला खूप चांगल्या सवयी लागल्या आहेत. त्याचा नेहमी आग्रह असतो की, आपण या क्षेत्रात काम करतोय तर इतरांचे सिनेमे, नाटकं आपण अभ्यास म्हणून बघायला हवीत. पूर्वी मी फार बघायचे नाही. पण, आता त्याचं म्हणणं मला पटलंय. त्यामुळे आता आम्ही दोघेही सिनेमे, नाटकं बघतो. दुसरी सवय म्हणजे व्यायाम आणि जिमची. उमेशमुळे ही सवय लागली आणि आमच्या जिमच्या परुळेकर सरांमुळे माझ्यात जिम, व्यायामाची आवड निर्माण झाली आहे. आता व्यायाम केला नाही तर मला चैन पडत नाही.
एकमेकांच्या मित्रपरिवाराबद्दल तक्रारींमुळे तुमच्यात वाद होतात का?
उमेश : हो, होतं ना असं कधीकधी. प्रियाची चिडचिड होते. पण, मी नेहमीच शांत असतो. मुळात कसंय, प्रियाला फारसे मित्रमैत्रिणी नसल्यामुळे आता माझा मित्रपरिवार तिचाही झालाय. त्यामुळे ती त्यांच्यात मिसळून गेलीय. आणि म्हणूनच ती थेट त्यांच्याशीच काय ते बोलत असते. तिचा राग, म्हणणं ती त्यांच्यासमोर व्यक्त करते. त्यांनाही काही वेळा तिचं म्हणणं पटतं. तिचे फोन वगैरे करून झाल्यानंतर ती मला सांगते. मी शांतपणे ऐकत असतो.
प्रिया : मला फार मित्रमैत्रिणी नाहीत. त्यामुळे उमेशचे मित्रमैत्रिणी आता माझेही झालेत. आमचा आता एक ग्रुप तयार झालाय. माझी त्याच्या मित्रांबद्दल काही तक्रार असली तरी मी ते उमेशला सांगत नाही किंवा त्याच्याकडे भुणभुण करत नाही. मला ज्या व्यक्तीचं वागणं-बोलणं पटलेलं नाही त्या व्यक्तीशीच मी थेट बोलते. माझं त्याच्या मित्रांशी खूप चांगलं नातं आहे म्हणूनही असेल हे कदाचित. उमेशची व्यक्त होण्याची पद्धत माझ्या पूर्णत: विरुद्ध आहे. एखादी घटना दहा वेळा घडून झाल्यानंतर अकाराव्यांदा होतेय ते तो बघेल. घडली तर त्याबद्दल नीट विचारपूर्वक बोलेल. माझं तसं नाही. पहिल्यांदाच बोलून मोकळं व्हावं म्हणजे पुढचा वेळ वाचतो. मला त्याच्यापासून काहीही लपवता येत नाही. मी लपवूच शकत नाही. जे काही करते ते त्याला सांगते. मग त्याच्या मित्रावर चिडलेलं असो किंवा त्यांना सुनावलेलं काही असो!
मला स्पेस द्यायला आवडते. प्रिया आणि माझे याबद्दल मतभेद आहेत. तिचं आयुष्य माझ्याभोवती फिरतं. त्यामुळे तिच्यासाठी स्पेसची व्याख्या वेगळी आहे. तिला कदाचित माझ्यासोबत राहूनही तिची स्पेस मिळते.
एकमेकांना स्पेस देणं किती महत्त्वाचं वाटतं. तुमच्या लेखी स्पेसची व्याख्या काय?
उमेश : कोणालाही स्पेस देणं महत्त्वाचंच आहे. आपलं म्हणणं कोणावरही लादू नये, या मताचा मी आहे. मला स्पेस द्यायला आवडते. खरंतर प्रत्येकाला ती हवीच असते. प्रिया आणि माझे याबद्दल मतभेद आहेत. तिचं आयुष्य माझ्याभोवती फिरतं. त्यामुळे तिच्यासाठी स्पेसची व्याख्या वेगळी आहे. तिला कदाचित माझ्यासोबत राहूनही तिची स्पेस मिळते. तिला फारसे मित्रमैत्रिणी नसल्यामुळे माझा मित्रपरिवार आता तिचाही झालेला आहे. लग्नाआधी ती तिच्या आईच्या खूप जवळ होती. आता लग्नानंतर तिच्यासाठी मीही खूप जवळचा झालोय. त्यामुळे तिला माझ्यासोबत असणं जास्त आवडतं. मला स्पेस हवी असते. माझा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे प्रत्येकाला मी थोडा थोडा वेळ दिला तरी तो वेळ खूप असतो. जितका वेळ मी इतरांसाठी देईन तितका तिच्यापासून लांब राहीन. मला माझी स्पेस हवी असली तरी मी तिच्या मताचा, भावनांचा आदर करतो. तिच्यासाठी मी महत्त्वाचा आहे म्हणून तिला जास्तीत जास्त वेळ देण्याचा माझाही प्रयत्न असतोच. मी तिच्यासोबत नसलो की कधीकधी तिची चिडचिड होत असते. तिचा बोलका स्वभाव असल्यामुळे तिला आजूबाजूला सतत माणसं हवी असतात. तिला गोष्टी शेअर करायला आवडतात. हे सगळं बोलण्यासाठी तिला कोणीतरी हवं असतं. माझा स्वभाव याच्या थोडा विरुद्ध आहे.
प्रिया : उमेश तुलनेने माझ्यापेक्षा जास्त वेळासाठी कामात गुंतलेला असतो, त्यामुळे त्याला त्याचा ‘मी’ वेळ मिळत नाही. मी करत असलेल्या कामासाठी लागणारा वेळ तुलनेने कमी असल्यामुळे मला माझा ‘मी’ वेळ बराच मिळतो. त्यामुळे तो नसताना मी एकटीच असते. तो घरी आल्यानंतर त्याला त्याची स्पेस हवी असेल तर त्या वेळेतही मी एकटीच असणार ना. याचा कुठेतरी त्रास होतो. अर्थात हा स्वभावाचा भाग आहे. पण, आता हळूहळू आम्हा दोघांमध्येही बदल होताहेत. आमचं नातं आता प्रगल्भ झालंय. शंभर चांगल्या गोष्टी असतील आणि एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल तर ती सोडून द्यावी.
आजकाल कमिटमेंट खूप कमी बघायला मिळते. रिलेशनशिपबद्दल असलेलं गांभीर्य कुठेतरी हरवत चाललंय का?
प्रिया : या सगळ्याचा तुमच्या जडणघडणीशी खूप जवळचा संबंध आहे. आजच्या पिढीला दोष देऊन चालणार नाही. त्यांचे पालक काय करतात, त्यांचा प्राधान्यक्रम काय असतो, त्यांनी त्यांच्या मुलांना कसं वाढवलं या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. मी कॉलेजमध्ये असेपर्यंत माझ्या हातात मोबाइल नव्हता. आज तिसरी-चौथीतल्या मुलाकडे मोबाइल, टॅब, लॅपटॉप असतो. तो काही गोष्टी आई बाबांना शिकवतो. अशा परिस्थितीत त्याचं ज्ञान वाढतं पण, त्याचवेळी त्यांचं स्वातंत्र्यही वाढत जातं, हे लक्षात घ्यायला हवं. जर तुम्ही तुमच्या मुलाला या सगळ्या गोष्टी देताय तर तुम्ही त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकारही द्यायला हवा. तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. फक्त लग्न आणि लग्नाच्या कमिटमेंटबद्दल बोलायचं झालं तर यापूर्वी लोकांना घटस्फोट घ्यावासा वाटत नसे, असं अजिबातच नाही. तेव्हाचे लोक सामाजिक दबावामुळे गप्प राहायचे. आपण असं केलं तर कलंक लागेल, हे सामाजिक दडपण घेतलं जायचं. मी वेगळी झाले तर माझ्या मुलीचं काय होईल, मला लोक काय म्हणतील असे अनेक विचार त्यामागे असायचे. जन्मलेल्या प्रत्येकाला सुखाने जगण्याचा हक्क आहे. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते. एकासाठी असलेलं सुख दुसऱ्यासाठी योग्य की अयोग्य हा मुद्दाच चुकीचा आहे. त्या व्यक्तीला काय हवंय हे जास्त महत्त्वाचं आहे. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल मोठमोठे विचार आपण मांडतो. पण, ते नेहमीच मिळतं असं नाही. अर्थात एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यामुळे त्याच्या आजूबाजूचे लोक, कुटुंबीय यांच्यावर परिणाम होतो कारण ते भावनिकदृष्टय़ा त्याच्याशी जोडलेले असतात. दोन माणसं एकत्र राहून सुखी नसतील तर त्यांनी एकत्र का राहावं? त्यांनी वेगळं राहावं आणि सुखी राहावं. चांगलं-वाईट असा एक सरधोपट नियम सगळ्याच गोष्टींना लावता कामा नाही. कारण इथे पुन्हा चांगलं-वाईट हे व्यक्तिपरत्वे बदलत जातं.
उमेश : आपण कमिटमेंटची परिभाषा बदलली पाहिजे. आजच्या काळात विविध गोष्टी एकाच वेळी सहज उपलब्ध असतात. आताच्या राहणीमानानुसार लोकांना विशिष्ट गोष्टींचे निष्कर्षही वेगाने समोर यायला हवे असतात. लोकांची संयमी वृत्तीही कमी झाली आहे. खूप गोष्टींची एक्सपोझर्स वाढली आहेत. सध्याची पिढी उथळ आहे, गंभीर नाही; असं मी म्हणणार नाही. थोडय़ा काळाच्या रिलेशननंतर वेगळं होऊन एखादं जोडपं दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून सुखी राहणार असतील; तर त्यांनी नक्कीच तसं करावं. एखाद्याशी कमिटमेंट आहे म्हणून ते नातं तसंच टिकवून जबरदस्तीने राहण्यात काहीच अर्थ नाही. स्वतंत्र जगणं लोकांना आता आवडू लागलंय. आमच्या तत्त्वांची, विचारांची एकवाक्यता नसती तर कदाचित आमच्यातही अडचणी आल्या असत्या. त्यामुळे एकमेकांच्या तत्त्वांचा, मतांचा, विचारांचा आदर करणं मला महत्त्वाचं वाटतं. कमिटमेंट देऊन शेवटपर्यंत टिकवणारी जोडपी आजही बघायला मिळतातच. आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांचा कालावधी सध्या कमी होत चाललाय. मुलांना मॅच्युरिटी लवकर येते. पण, त्याचवेळी त्यासंबंधी असलेल्या इतर घटकांचाही विचार व्हायला हवा. कमिटमेंट पाळली जात नाही हे खूप सोप्या पद्धतीने बोललं जातं. पण, यामध्ये नेहमीच वाईट बाजू असेल असं नाही. कमिटमेंट न पाळण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, Twitter – @chaijoshi11