वातावरण गढूळ करणारे अशी समाजमाध्यमांची प्रतिमा तयार होत असतानाच, याच माध्यमाद्वारे समाजोपयोगी काम होऊ शकते हे काही तरुणांनी दाखवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या काही विघातक घटनांचे खापर समाजमाध्यमांवर फोडण्याची जणूकाही आवडच बहुतेकांमध्ये निर्माण झाली आहे. अर्थात, काही घटनांमुळे समाजमाध्यमांची ही प्रतिमा निर्माण झाली आहे. अनेक घटनांमध्ये वातावरण गढूळ करण्यात या माध्यमांनी कळीची भूमिका बजावली. परिणामी, त्याकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे, परंतु याच माध्यमांच्या आधारे अनेक समाजोपयोगी कामे करता येणे शक्य असल्याचे नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम आणि रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांनी दाखवून दिले आहे. फोरमने समाजमाध्यमातील मित्रांच्या मदतीने दुष्काळी गावात सहा लाखांत सुरू केलेला जलशुद्धीकरण प्रकल्प असो अथवा संघाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळेत उभारलेला सौरऊर्जा वीज प्रकल्प असो. समाजमाध्यमांच्या आधारे मिळालेल्या आर्थिक मदतीतून उभयतांनी असे अनेक संकल्प प्रत्यक्षात आणले आहेत.

तब्बल ७० लाखांचा सरकारी निधी खर्च होऊनही टंचाईग्रस्त गावाचा शिक्का पुसू न शकलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण हे गाव. याच ठिकाणी सोशल नेटवर्किंग फोरमने अवघ्या सहा लाखांत साकारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यामुळे पाण्यासाठी भटकणाऱ्या तोरंगणच्या ग्रामस्थांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. पाण्याचे महत्त्व ग्रामस्थांना असावे आणि त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी तोरंगण जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाण्याचे एटीएम यंत्र बसविण्यात आले आहे. त्याद्वारे एक रुपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळणार असून वापराचे पाणी मोफत व मुबलक उपलब्ध करून देण्यात आले. या प्रकल्पाचे व्यवस्थापन स्थानिक महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले. राज्यातील आदिवासी भागातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा. त्यासाठी फेसबुकवरील तरुण नेटिझन्स, अनिवासी भारतीय आणि शहरातील डॉक्टर्स यांच्या दातृत्वातून निधी संकलित झाला. दुष्काळात टँकरने पाणी देण्याचा शासकीय व्यवस्थेचा प्रघात आहे. पाणीपुरवठा योजनांवर बराच निधी खर्च होतो,पण अनेकदा तो पाण्यात जातो. या स्थितीत ग्रामस्थांच्या सहभागातून कार्यान्वित झालेला हा प्रकल्प शासकीय यंत्रणेच्या डोळ्यांत अंजन घालणारा म्हणावा लागेल. लोकार्पण सोहळ्यात फोरमने ५२ आदिवासी गावे-पाडय़ांचा पाणीप्रश्न सोडविण्याचा संकल्प केला, तोच समाजमाध्यमाद्वारे जगभर जोडलेल्या आपल्या एक हजार सदस्यांच्या बळावर.

या माध्यमांचा वापर खरे तर वापरकर्त्यांवर अवलंबून असतो. अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत बराक ओबामा यांनी कौशल्यपूर्वक त्याचा उपयोग केला होता. कोणत्याही घटनेसंदर्भात या माध्यमात तीव्र पडसाद उमटतात. सकारात्मक दिशा दर्शविण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल हे लक्षात घेऊन प्रमोद गायकवाड यांनी २०१० मध्ये सोशल नेटवर्किंग फोरमची स्थापना केली. सर्वाना प्रेरणा मिळेल अशा उपक्रमांची माहिती त्यांनी फेसबुकसह तत्सम माध्यमांवर देण्यास सुरुवात केली. वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याच्या आवाहनास तरुणाईचा प्रतिसाद मिळू लागला. कोणी गरीब विद्यार्थ्यांना वह्य़ा-पुस्तके देऊन, तर कोणी रक्तदानाद्वारे आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावू लागला. विशेष म्हणजे, त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आजवर ३०० उपक्रम सदस्यांनी राबविले.

दहशतवाद्यांविरोधात सीमेवर लढताना जवान शहीद झाल्यानंतर समाजमाध्यमांवर श्रद्धांजली अन् देशप्रेमाची उसळणारी लाट तात्कालिक स्वरूपाची. दुसऱ्या दिवशी हे देशप्रेम पुढील घटना घडेपर्यंत अंतर्धान पावते. या स्थितीत संबंधित जवानाच्या कुटुंबीयांची जबाबदारी देशवासीयांची असल्याचे भान फोरमने आणून दिले आहे. त्या अंतर्गत मदतीसाठी केलेल्या आवाहनास देशातील नव्हे तर परदेशातील भारतीयांनी सातत्याने मदतीचा हात देऊन आपण शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अनुभव आहे. त्यामुळे दहा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखाची मदत फोरम करू शकले. मराठवाडय़ातील दुष्काळी राजप्रिंपी गावास टँकर, याच भागातील अभयारण्यातील हरणांसाठी सिमेंटच्या टाक्यांची उपलब्धता, टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांची शृंखला. असे नानाविध उपक्रम समाजमाध्यमांच्या आधारे फोरमने प्रत्यक्षात आणले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात कार्यकर्त्यांचे जाळे विकून फोरमचे काम अविरतपणे सुरू आहे.

नाशिकच्या रचना विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्थापलेल्या संघाने समाजमाध्यमांच्या मदतीने सामाजिक जाणिवांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडविले आहे. शिक्षणाचे पाठ गिरविताना रात्र अंधारात काढणाऱ्या ५०० आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन संघाने सौरऊर्जा वीज प्रकल्पातून प्रकाशमान केले. संघाचे प्रमुख कौस्तुभ मेहता यांनी वाघेरा विठ्ठलराव पटवर्धन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची रात्रीच्या वेळी होणारी अडचण लक्षात घेऊन वसतिगृहात सौरदिवे बसविण्याची संकल्पना मांडली होती. त्याची माहिती फेसबुकवरून त्यांनी आपल्या मित्रपरिवारास दिली. अमेरिकास्थित आशुतोष हडप या मित्राचा ११ वर्षांचा मुलगा अमेयने ती वाचल्यावर या कुटुंबाने थेट त्या आश्रमशाळेस भेट दिली. विद्यार्थ्यांची स्थिती पाहून अमेरिकेला परतल्यावर त्या शाळकरी मुलाने स्वत:पासून निधी संकलनास सुरुवात केली. सहकारी मित्रांनी त्यास मदतीचा हात दिला. जवळपास ८० हजार रुपये जमवून अमेयने ती रक्कम रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाला पाठवून दिली. या कामासाठी त्याची अस्वस्थता लक्षात आल्यावर संघाने सदस्य व आप्तमित्रांना ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून मदतीचे आवाहन केले. त्यास सर्वानी प्रतिसाद देऊन दोन लाखांचा निधी संकलित केला. त्याअंतर्गत सौरऊर्जा वीज प्रकल्पाची उभारणी करत आश्रमशाळा व वसतिगृह प्रकाशमान करण्यात आले. याआधी संघाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमावेळी तब्बल दोन लाख ११ हजारांचा निधी संकलित करून दिला, तो समाजमाध्यमांच्या मदतीने. सामाजिक कार्यात हे माध्यम प्रभावीपणे काम करू शकते हे उभयतांनी आपल्या कार्यातून अधोरेखित केले आहे.
अनिकेत साठे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of social media for society