नोकरीनिमित्त पुण्याला स्थायिक झाल्यावर मला काही नवीन गोष्टी बघायला मिळाल्या.. बाटलीबंद पाणी, चीज, पिझ्झा, पावभाजी, गोबी-मंचुरिअन आणि व्हॅलेंटाइन-डे. यापैकी व्हॅलेंटाइन डे सोडून मी बाकी गोष्टींच्या चांगलीच आहारी गेले होते. व्हॅलेंटाइन डे मात्र लांबूनच बघितला आणि मैत्रिणींकडून ऐकला. छान गिफ्ट मिळते म्हणून त्या खूप खूश असायच्या. पुढे योगायोगाने माझे लग्न याच दिवशी झाले आणि मैत्रिणी म्हणाल्या की तू खूप लकी आहेस. मला मात्र हुरहुर लागून राहिली, कारण माझे हक्काचे गिफ्ट मला वेगळे मिळणार नव्हते. पण दर वर्षी पैसे वाचणार म्हणून नवरा खूश होता.
व्हॅलेंटाइन डे.. भारतीय मनोवृत्तीला फारसा न रुचणारा हा पाश्चात्त्य सण. खरे तर हा ‘सण’ बनवला गेला तो अमेरिकन मार्केटिंगमुळे. एकटय़ा अमेरिकेत १० लाख डॉलर्स इतकी उलाढाल होते या प्रेमाच्या दिवसासाठी. पूर्वी फक्त एकमेकांना शुभच्छा देऊनच हा दिवस साजरा व्हायचा.
पण का नाही आवडत हा दिवस? प्रेम आवडत नाही की प्रेमाचे प्रदर्शन आवडत नाही? की पाश्चात्त्य सण आहे म्हणून? खूप प्रश्न मनात आले. थोडा खोल विचार केला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली. मूलभूत गरजानंतर प्रेमाचा नंबर लागतो. ती एक भावनिक गरज असते. प्रेम सर्वानाच हवे असते. प्रेम मिळाले की सर्व खूश असतात आणि त्यांचे आंतरिक गुण वाढीस लागतात. प्रेमाच्या बळावर माणूस काय करू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात पण सापडतात. आपणा सर्वानाच प्रेम आवडते.. ते मनाशी जोडले जाणारे नाते असते. भारतीय संस्कृतीमध्ये या प्रेमाला खूप पवित्र मानले आहे. कारण दोन भिन्न व्यक्ती एकमेकाला पूरक ठरून चांगल्या समाजाची निर्मिती करणार असतात. अर्थात पुढे प्रेमाची उत्क्रांती होणे जरुरी आहे. शारीरिक आकर्षण संपले तरी एकमेकाची आणि अपत्याची जबाबदारी घेऊन प्रेमाने त्यांचा सांभाळ करणे हे खरे प्रेम होय.
प्रेमाच्या प्रदर्शनाबद्दल म्हटले तर भारतात बऱ्याच ठिकाणी प्रेममय लेणी कोरलेली आहेत आणि त्यांचे जतन केले आहे. कृष्णलीला अजूनही आपण चवीने वाचतो, कृष्णाला आणि गोपींना मनापासून दाद देतो. मग आताच विरोध का? तर, हा काळाचा महिमा आहे. प्रत्येक शतकात भारताने जे काही अनुभवले त्याचे परिणाम आपल्या सामाजिक मूल्यांवर झाले आहेत. वेदिक काळात सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. नंतर मात्र परकीय आक्रमणामुळे किंवा स्वकीय यादवीमुळे भारतात परिस्थितीनुसार वेगवेगळ्या चौकटी आखल्या गेल्या आणि लोकांची मानसिकता बदलली.
पण आता परिस्थिती अनुकूल आहे, जग जवळ आले आहे. मग हा आपला सण आणि तो दुसऱ्याचा असे न म्हणता आपण या आनंदात सामावलो तर? आपण राग आला तर पटकन रागवून मोकळे होतो, पण प्रेम व्यक्त करताना मूग गिळून बसतो. पाश्चात्त्य लोक एकमेकाला सतत ‘लव्ह यू’ म्हणत प्रेमाची जाणीव करून देतात आणि जगण्यातला उत्साह वाढवतात. रोज एक वाक्य प्रेमाने बोललो तर जीवन किती सुंदर बनेल कल्पना करा. एकमेकाला दाद देणे किंवा पुरेशी दखल घेणे किती आनंद देते.
आपण कोणाला तरी आवडतो ही भावनाच खूप बळ देते. फेसबुकवर नाही का आपल्या फोटोला लाइक्स मिळाले तर किती आनंद होतो, मग तसेच लाइक्स आपण प्रत्यक्ष का नाही देऊ शकत? त्याबरोबर एखादे प्रेमाचे वाक्य असेल तर दुधात साखर पडेल आणि सर्वाचे मन प्रेमाने व्यापून जाईल.
नवी पिढी मनमोकळी आहे आणि जागतिक वातावरणात वाढत आहे. त्यांच्या हातात माहितीचे भांडार आहे. त्यांचा चौकसपणा आणि कुतूहल दबले गेले नाही. प्रेम, विरह आणि मीलन या त्रिकोणात ते अडकले नाहीत. नवीन माध्यमामुळे त्याना विरह माहीत नाही.. ते कायम संपर्कात असतात. पण ब्रेक-अपचा कीडा त्यांच्या मनाला पोखरत आहे. आपण मात्र त्याना समजून घेऊन, मोकळेपणा वाढवून खरे प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजावून सांगायचा आहे.
असे म्हणतात की मनाच्या भावभावना जेव्हा स्थिर होतात तेव्हा आपण सृजनशील बनतो. जर मन स्थिर नसेल तर मानवाची बुद्धी पूर्णपणे वापरली जात नाही. साधारणपणे दहा टक्केच बुद्धी आपण वापरतो. आणि मानवी मेंदूची उत्क्रांती अजूनही चालूच आहे. नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा बुद्धिमान व्हायलाच हवी आणि त्यासाठी हे ताण-तणाव, मान-अपमान दूर करायला हवेत. अगदी प्राचीन काळापासून मानवाचे प्रतिसृष्टीचे स्वप्न आहे आणि आता वेळ आली आहे ते साकार होण्याची.. चला तर मग सर्वाशी प्रेमाने वागू आणि आपले मन ताणतणाव, राग, लोभ, मोह, मत्सर-असूया इत्यादी षड्रिपूपासून मुक्त ठेवू आणि एका नव्या उत्क्रांतीचा भाग बनू.
तुम्हा सर्वाना प्रेमाच्या दिवसासाठी मनापासून शुभेच्छा!!
प्रज्ञा रामतीर्थकर
response.lokprabha@expressindia.com