आजच्या तुलनेत माध्यमांचं जग मर्यादित असताना मराठी माणसाची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या वसंत व्याख्यानमालांना आता काळाच्या ओघात ओहोटी लागली असली तरी, यूटय़ूबवर असलेलं टेड टॉक्स हे या व्याख्यानमालांचंच आधुनिक, व्यापक रुप आहे, असं म्हणायला हरकत नाही.

तुडुंब भरलेलं सभागृह किंवा मैदान. आता कोण बोलणार, याची वाट पाहणारे प्रेक्षक.. अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत हे चित्र सर्रास पाहायला मिळायचं. वक्ता हे बिरुद मिरवणाऱ्याला नटाएवढं ‘सेलिब्रिटी स्टेटस’ असण्याचा तो काळ. त्याहीपूर्वी आचार्य अत्रे, ना. सी. फडके, साने गुरुजी यांसारख्यांच्या भाषणांना होणारी गर्दी ‘महाभयंकर’ या शब्दातच वर्णन करता येणारी होती. गावोगावच्या श्रोत्यांशी संवाद साधण्याचा हा शब्दयज्ञ अखंडितपणे सुरू ठेवणारे वक्ते महाराष्ट्रात कधीच कमी नव्हते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या प्रकांड पंडिताच्या तोंडून कोणतेही तत्त्वज्ञान सुलभ होऊन ऐकायला मिळणे म्हणजे एकाच बैठकीत पाचशे-हजार पाने वाचल्याचा आनंद असे. माणसाला दुसऱ्याचे विचार ऐकायची सवय होती तेव्हा! ही सहिष्णुता त्याला अधिक जागृत ठेवत असे आणि त्याचे त्याला समाधानही मिळत असे. हे खरं असलं, तरी त्या वेळी आजच्यासारखे अन्य पर्यायही नव्हते माणसाला. घरबसल्या जगातल्या ग्रेट वक्त्यांना ऐकण्याची संधी नव्हती, की प्रत्यक्ष उठून दुसरीकडे न जाता कुठेही, कधीही भाषणं ऐकायची सोय नव्हती. तंत्रज्ञानाच्या विकासानं माणसाच्या वैचारिक खाद्यपोषणासाठी जे प्रचंड उपकार केले आहेत, त्याला तोड नाही. अतिशय थोडक्या वेळात अतिशय चपखलपणे आणि एखाद्या नटाला लाजवेल, असं सहजसुलभ आणि न अडखळता, शिवाय देखणेपणानं ‘टेड टॉक्स’सारखी व्याख्यानमाला तेव्हा संगणकावर उपलब्ध नव्हती. आता हे सारं उपलब्ध आहे आणि माणसाला, त्याची भूक भागवण्यासाठी खिशात मावणाऱ्या मोबाइलसारख्या यंत्राद्वारेही ते साध्य होतं. दुर्दैवानं मागच्या काळातल्या विचारवंतांचे सारविचार आता उपलब्ध नाहीत.

Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
students performance on Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal song
मोठ्यांना जमले नाही ते चिमुकल्यांनी करून दाखवले! ‘या’ गाण्यावर आतापर्यंत केलेला बेस्ट डान्स; Viral Video पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या
The little girl is doing an amazing dance
‘पहला तेरे नैन मैं देखे…’ गाण्यावर चिमुकली करतेय भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis,
“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण, आज विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा”; उद्धव ठाकरेंनी मर्मावरच…
Narendra Modi in sansad
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित नेहरूंचं ‘ते’ विधान वाचून दाखवलं; इंदिरा गांधींवरही टीकास्र!

भूतानसारख्या छोटय़ाशा देशाची पर्यावरण वाचवण्याच्या अथक प्रयत्नांची माहिती टेडमध्ये ऐक, असा निरोप मित्रानं पाठवला आणि त्या अठरा मिनिटांच्या भाषणानं आपण कसे निर्मळ होऊन जातो, याचा अनुभव घेता आला. जगातल्या कोणत्याही विषयावर अशी व्याख्यानं आयोजित करून ती यू-टय़ूब या वाहिनीवरून प्रसारित करण्याचा हा अभिनव उपक्रम माणसाच्या वैचारिक भुकेची खरोखरीची काळजी घेणारा असा. त्याला जगभरातून मिळणारा प्रतिसाद माणसाच्या या भुकेची जाणीव करून देणारा. जगभरातले काही लाख लोक ही व्याख्यानं पाहतात, ऐकतात, त्यावर प्रतिक्रिया देतात आणि त्या उपक्रमाचा भाग बनून जातात. जगात सर्वाधिक मोबाइल असणारा आपला देश असला, तरीही त्या यंत्राचा वापर भारतीय कशासाठी करतात, हे पाहिल्यावर कुणाच्याही मेंदूतून अशी भन्नाट कल्पना का सुचली नसेल, हे लक्षात येतं.

19-lp-vasantआपण या यंत्राचं खेळणं करण्यात पटाईत झालो. त्यावर चित्रपट पाहणं किंवा फुकट असणाऱ्या सेवांचा अधिकाधिक निर्बुद्धपणे प्रचंड वापर करण्यात आपण धन्यता मानतो. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपसारखी तंत्रव्यवस्था आपल्याला अधिक जवळची वाटते. दिवसभर इकडून तिकडे संदेशांची पाठवणी करणे हे भारतीयास अधिक सर्जनात्मक वाटते. समाज माध्यमांचा उपयोगही आपण कसा करतो? ‘फेसबुक’चा सर्वाधिक उपयोग करणारे आपण त्यावर काय वाट्टेल ते लिहीत असतो. आपलं सगळं खासगीपण गळून पडल्यागत आपण अधिकाधिक सोशल होत असल्याचा आव आणत राहतो. त्याचा ना स्वत:ला उपयोग, ना अन्यांना. पण तरीही अहोरात्र फेसबुकवर असणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे विविध प्रकारचे गंभीर सामाजिक आजार उद्भवू लागले आहेत आणि त्यावर लक्ष ठेवण्याची डोकेदुखी पोलिसांना करावी लागते आहे.

‘टेड टॉक्स’ ही यू-टय़ूबवर असणारी एक व्याख्यानमाला आहे. २००६ मध्ये सुरू झालेल्या या मालेत विज्ञान, तंत्रज्ञान, मानसिक आरोग्य, कला आणि सर्जनशीलता, जागतिक प्रश्न यांसारख्या अनेक विषयांवर कमीत कमी अठरा मिनिटांची व्याख्यानं उपलब्ध आहेत. कुणालाही सहजपणे ऐकता येणारी आणि सहजपणे कळू शकणारी ही व्याख्यानं ऐकणं हाही एक अनुभव असतो. तंत्रदृष्टय़ा उच्च मूल्यांची आणि प्रदर्शनाच्या पातळीवर अतिशय सुनियोजित अशी ही व्याख्यानं ऐकणं आज अधिक सुकर झालं आहे.

मुद्रणाचा शोध लागण्यापूर्वीच्या काळात शब्दसंवाद हा केवळ मुखाने करण्यावाचून माणसाला गत्यंतर नव्हतं. त्यासाठी संवादकाला विविध ठिकाणी प्रत्यक्ष, सदेह जाण्यावाचूनही पर्याय नव्हता. आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेवढंच शक्य होतं. वाहतुकीची आजच्यासारखी वेगवान साधनं नसतानाच्या काळातही माणसं एकमेकांना भेटण्यासाठी हजारो मैल प्रवास करत. संवादाच्या या गरजेपोटी हा प्रवास करण्यावाचून गत्यंतरही नव्हतं. पण विचारांच्या आदानप्रदानासाठी असं गावोगावी जाऊन भाषणं देणं हे त्या काळी सामाजिक कार्य मानलं जायचं. एखाद्या विषयात आयुष्यभर संशोधक वृत्तीने काम करणाऱ्या बुद्धिमान व्यक्तीला त्या विषयाबद्दलचे त्याचे संशोधन अवघ्या तास-दीड तासात मांडणं हे आव्हानात्मक वाटणारं होतं. काय सांगतो, कसं सांगतो आणि कसं पोहोचतं, या गोष्टींना त्यामुळेच महत्त्व प्राप्त होऊ लागलं. भाषण ही एक कला झाली आणि तिची जोपासना करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ हे तर आपण पूर्वीपासून ऐकतो आहोत आणि आपल्या संतपरंपरेनं ते गेली किमान हजार वर्षे सिद्धही केलं आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते अलीकडच्या संत गुलाबराव महाराजांपर्यंत सगळ्या संतांनी आपले विचार शब्दांतून व्यक्त केले. त्यांचे निरूपण झाले आणि ते लिखित रूपात आले. पुढील पिढय़ांसाठीचे ते विचार साधन बनलं.

प्रवास आणि विचार हातात हात घालून जाण्याच्या या काळात व्याख्यानमाला निर्माण झाल्या. गावोगावी जाऊन भाषणे देणाऱ्या वक्त्यांची भाषणे ऐकणं ही मेजवानी असे. संवादकलेतील सर्व कौशल्ये पणास लावून आपलं भाषण श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी लागलेला ध्वनिक्षेपणाचा शोध ही त्यासाठीही संजीवनी होती. एकाच वेळी हजारोंच्या समुदायाला विचारविश्वात नेऊन विचारप्रवृत्त करणाऱ्या व्याख्यानमाला हे महाराष्ट्राचं वैचारिक भूषण होतं. मुद्रणाचं तंत्रज्ञान आल्यानंतर वृत्तपत्र ही संकल्पना रुजली, तरीही प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची हौस महत्त्वाची मानली जात होती. दिवसभराच्या कामानंतर विरंगुळा म्हणून उपलब्ध असलेलं एकमेव साधन नभोवाणीचं होतं. भारतातल्या आकाशवाणीनं प्रचंड जनसमुदायाला कवेत घेण्यासाठी केलेले अथक प्रयत्न केवळ इतिहासातच नोंदवले गेले असले, तरीही त्याचे मोल अमूल्य आहे, हे विसरता येणार नाही. आकाशवाणीनं घराघरात सहजगत्या प्रवेश केला आणि ‘आपलं माजघर’ पासून ते ‘रविवारीय संगीत सभे’पर्यंत अनेकविध विषयांना आपलंसं केलं. तरीही भाषण ऐकणं ही एक समजून उमजून केलेली कृती मानली जायची. वक्त्याचं भाषण हीच त्याची कानोपकानी पोहोचलेली जाहिरात. एकदा भाषण चांगलं झालं, तरच पुन्हा निमंत्रण येणार, यावर वक्त्यांचा विश्वास होता, कारण श्रोता हा समुदाय तेही गांभीर्याने घेत असत.

पुण्यातली वसंत व्याख्यानमाला हे या सगळ्या चळवळीचे आधारस्थान. लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना भाषणांवर भर दिला होता. परंतु त्यांची ती वैचारिक चळवळ वसंत व्याख्यानमालेने शतकाहून अधिक काळ टिकवून ठेवली हे विशेष. देशातली आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना ऐकण्याची ती एक नामी संधी असायची. यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, डॉ. वि. म. दांडेकर यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील नामवंतांना तिथे ऐकणं ही एक मेजवानी असे. शरद पवार यांनी काँग्रेस सोडत असल्याची घोषणा याच व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून केली होती. ही व्याख्यानमाला सशुल्क असे. तिकीट दर फार नसले, तरीही पैसे देऊन व्याख्यान ऐकण्याची सवय यामुळे लागली. महाराष्ट्रात व्याख्यानमालांचे पेव फुटण्यासही ही व्याख्यानमाला कारणीभूत ठरली.

20-lp-vasantमहाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत या व्याख्यानमालांनी मूलभूत अशी कामगिरी बजावली. चांगले वक्ते शोधणे, त्यांना गाठणे, त्यांना बोलावणे, त्यांची प्रवासाची आणि राहण्याखाण्याची सोय करणे, श्रोते येण्यासाठी गावभर दवंडी पिटवणे यांसारख्या कष्टांना तेव्हा संयोजक घाबरत नसत. पदरमोड करून ते ही कामं करत आणि त्यातून मिळणारं समाधान एवढीच त्यांची शिदोरी होती. त्यामुळे कितीतरी वक्त्यांना महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा शब्दन्शब्द कानात साठवून ठेवण्यासाठी समाज तेव्हा आतुर असे. अगदी अलीकडे प्राचार्य शिवाजीराव भोसले किंवा प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारख्या वक्त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्धतेचा साक्षात्कार घडवला. हे सारे काळानुरूप बदलणार, हे तर खरेच. पण बदलले ते माध्यम आणि विचारप्रवृत्तीही. जगण्यातले ताणेबाणे वाढू लागले, रोजच्या जगण्याची लढाई हातातोंडाशी आली आणि सामाजिक उपक्रमासाठी हाताशी वेळही उरेनासा झाला. व्याख्यान ऐकण्यासाठी सावधचित्त असावे लागते. ते नव्या स्पर्धेच्या आक्रमणाने नाहीसं होऊ लागलं. व्याख्यानांना होणारी गर्दी रोडावू लागली आणि व्याख्यान ऐकण्याचं अवसानही संपू लागलं.

असं घडत असल्याबद्दल हळहळ करणं मूर्खपणाचं. कारण काळानुरूप जगण्याची साधनं बदलतात, संपर्काच्या साधनांमध्येही बदल होतो आणि विचार करण्याच्या क्षमताही विस्तारतात. नव्या तंत्रज्ञानानं माणसाचं सारं जगणंच कवेत घेण्यासाठी आरंभलेले प्रयत्न एखाद्या त्सुनामीसारखे माणसांवर आदळू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या या झपाटय़ानं जगणं सुकर होत असतानाच माणसाची विचारशक्तीही गळाठून जाण्याची शक्यता निर्माण होऊ लागली असतानाच, तंत्राचा कौशल्याने उपयोग करीत ‘टेड टॉक्स’सारखी कल्पना साकार होते आणि गोळीबंद रूपात, कमीतकमी वेळात जागेवर बसून आपल्या सोयीने, आवडेल त्या विषयावरील व्याख्यानं ऐकता येणं सुकर झालं आहे. भेडसावणाऱ्या प्रश्नांबरोबरच जागतिक विषयांवर उपलब्ध असणारी टेड टॉक्ससारखी कितीतरी भाषणे यू-टय़ूबवर उपलब्ध आहेत. हल्ली तर अभ्यासक्रमही त्यावरून शिकवला जाऊ लागला आहे.

विचारांचं आकर्षण असणाऱ्यांसाठी नव्या युगातील हे नवं साधन अधिक सोयीचं आणि उपयुक्त. महाराष्ट्रातील वक्त्यांना अशा भाषण मालिकेत आणून त्याची एक वाहिनी निर्माण करणं अशक्य नाही. जगात हल्ली वाचायलाच नको असतं, अशी टीका करणाऱ्यांना पुस्तकांच्या प्रचंड खपाने परस्पर उत्तर दिलं आहे. चांगलं काही ऐकायलाच नको असतं, या चर्चेलाही टेड टॉक्सने पूर्णविराम दिला आहे. हा समाज जगभरात मूठभरच असतो. पण तोच माणसाच्या अंतर्मनाला सतत प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. हा आतला आवाज जागा राहण्यासाठी, नव्या साधनांमधूनही आपली विचारवृत्ती जागी ठेवणं हे आज खरं आव्हान आहे. पॅकेजिंगच्या आजच्या युगात भाषण कलेचा नव्याने विचार करून अधिकाधिक लोकांना त्याकडे आकृष्ट करण्याचं तंत्र आपण आत्मसात करायला हवं. यू-टय़ूबवर काहीबाही पाहणाऱ्यांना अशी व्याख्यानांची मेजवानी मिळू लागली, तर मग व्याख्यानांसाठी गावोगाव भटकण्याची गरजही उरणार नाही आणि ती ऐकण्यासाठी वेळ साधण्याची धडपडही करावी लागणार नाही.
मुकुंद संगोराम –
response.lokprabha@expressindia.com
Twitter – @mukundsangoram

Story img Loader